चतुःश्लोकी भागवत – वैकुंठमहिमा

तें वैकुंठ जाण साचार । सर्व लोकां वरिष्ठवर ।
त्याहून परतें नाही पर । यालागीं परात्पर ह्नणती त्यातें ॥६०॥

जेथें परमात्मा नांदे स्वयंज्योती । त्या वैकुंठाची वैभवस्थिती ।
वर्णितां खुंटली परेची गती । यालागी ह्नणती वैकुंठ लोक ॥६१॥

ज्या लोकाचिये ठायी । क्लेशमात्र प्राणियांसी नाहीं ।
मोहाची वार्ता कांहीं । कोणी स्वप्नीही नदेखती ॥६२॥

नित्य देखतां हरीचे पाय । क्षुधातृषा जिरोनी जाय ।
तेथें मोहक्लेश कैचा राहे । आनंदे नांदताहे वैकुंठलोक ॥६३॥

ज्या वैकुंठाचें नांव घेतां । काळ पळे मागुता ।
तेथें कैची भयाची वार्ता । जननिर्भयता नांदे पैं ॥६४॥

ज्या लीकाचिये ठायीं । मरणाचें नांव नाहीं ।
जरा प्रगटे निजदेहीं । हे जन कोणी जाणेचिना ॥६५॥

ज्या लोकाचें स्तवन । सदाशिव करी आपण ।
इंद्रादिदेवगण । वैकुंठाचे गुण स्वयें वदती ॥६६॥

मृत्युलोकीचें मुनिगण । पावावया वैकुंठभुवन ।
अद्यापि करिती अनुष्ठान । भगवद्भजन निजनिष्ठा ॥६७॥

तोचि वैकुंठलोक । पांचश्लोकी श्रीशुक ।
वर्णितसे आत्यंतिक । ऐके त्यक्तोदक परीक्षिती ॥६८॥

Leave a Comment