चतुःश्लोकी भागवत – वैकुंठ स्थिति

ज्या लोकाची निजस्थिती । शुद्धसत्वजन वर्तती ।
रजतममिश्रित गती । ज्या लोकाप्रती असेना ॥६९॥

नवल ते लोकींचा ठसा । बाल्यतारुण्यवृद्धदशा ।
नाहीं तेथें तिन्ही वयसा । क्षय आहे कैसा हें नेणिजे ॥७०॥

तेथें समूळ माया नाहीं । मा कलिविक्रम कैंचा ते ठायी ।
मोहलोभादिद्वेष पाही । मायेच्याठाई वर्तती ॥७१॥

उगमीं वाकडी लागे नेटें । तेणें नदनदीपूर लोटे ।
तेवीं माया विषयसंघट्टें । चढणी नेटेपाटें मोहादिदशा ॥७२॥

जेथें उगम नाही मायेचा । तेथें रागदशे ठाव कैंचा ।
परमानंदें पूर्ण साचा । हरिप्रियांचा समूह नांदे ॥७३॥

भक्तिप्रतापें जे आथिले । यालागी ते देवदैत्यी पूजिले ।
मायामोहातीत जाहले । अढळ बैसले वैकुंठी ॥७४॥

देवाची माया ऋद्धिसिद्धी । दैत्यांची माया विघ्नें ब्राधीं ।
भक्त नढळतीच दृढबुद्धी । जिणोनी उपाधि पूज्य झाले ॥७५॥

शोधिती सत्त्व अतिसात्विकें । जे हरिभक्त हरिप्रेमाधिकें ।
जे झाले श्रीहरिसारिखे । त्यांचें स्वरुप सुखें शुक सांगे ॥७६॥

Leave a Comment