श्रीज्ञानेश्वरी – अध्याय चौथा

॥ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥

श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ चतुर्थोऽध्यायः – अध्याय चवथा ।
। ज्ञाकर्मसंन्यासयोगः ।

आजि श्रवणेंद्रियां पाहलें । जें येणें गीतानिधान देखिलें ।
आतां स्वप्‍नचि हें तुकलें । साचासरिसें ॥ १ ॥
आधींचि विवेकाची गोठी । वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी ।
आणि भक्तराजु किरीटी । परिसत असे ॥ २ ॥
जैसा पंचमालापु सुगंधु । कीं परिमळु आणि सुस्वादु ।
तैसा भला जाहला विनोदु । कथेचा इये ॥ ३ ॥
कैसी आगळिक दैवाची । जे गंगा जोडली अमृताची ।
हो कां जपतपें श्रोतयांचीं । फळा आलीं ॥ ४ ॥
आतां इंद्रियजात आघवें । तिहीं श्रवणाचें घर रिघावें ।
मग संवादसुख भोगावें । गीताख्य हें ॥ ५ ॥
हा अतिसो अतिप्रसंगें । सांडूनि कथाचि ते सांगें ।
जे कृष्णार्जुन दोघे । बोलत होते ॥ ६ ॥
ते वेळीं संजयो रायातें म्हणे । अर्जुनु अधिष्ठिला दैवगुणें ।
जे अतिप्रीति श्रीनारायणें । बोलतु असे ॥ ७ ॥
जें न संगेचि पितया वसुदेवासी । जें न संगेचि माते देवकीसी ।
जें न संगेचि बंधु बळिभद्रासी । तें गुह्य अर्जुनेंशीं बोलत ॥ ८ ॥
देवी लक्ष्मीयेवढी जवळिक । परी तेही न देखे या प्रेमाचें सुख ।
आजि कृष्णस्‍नेहाचें बिक । यातेंचि आथी ॥ ९ ॥
सनकादिकांचिया आशा । वाढीनल्या होतिया कीर बहुवसा ।
परी त्याही येणें मानें यशा । येतीचिना ॥ १० ॥
या जगदीश्वराचें प्रेम । एथ दिसतसें निरुपम ।
कैसें पार्थें येणें सर्वोत्तम । पुण्य केलें ॥ ११ ॥
हो कां जयाचिया प्रीती । अमूर्त हा आला व्यक्ती ।
मज एकवंकी याची स्थिती । आवडतु असे ॥ १२ ॥
एर्‍हवीं हा योगियां नाडळे । वेदार्थासी नाकळे ।
जेथ ध्यानाचेही डोळे । पावतीना ॥ १३ ॥
तो हा निजस्वरूप । अनादि निष्कंप ।
परी कवणें मानें सकृप । जाहला आहे ॥ १४ ॥
हा त्रैलोक्यपटाची घडी । आकारची पैलथडी ।
कैसा याचिये आवडी । आवरला असे ॥ १५ ॥

श्रीभगवानुवाच ।
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् ।
विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ॥ १॥

मग देव म्हणे अगा पंडुसुता । हाचि योगु आम्हीं विवस्वता ।
कथिला परी ते वार्ता । बहुतां दिवसांची ॥ १६ ॥
मग तेणें विवस्वतें रवी । हे योगस्थिति आघवी ।
निरूपिली बरवी । मनूप्रती ॥ १७ ॥
मनूनें आपण अनुष्ठिली । मग इक्ष्वाकुवा उपदेशिली ।
ऐसी परंपरा विस्तारिली । आद्य हे गा ॥ १८ ॥

एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः ।
स कालेनेह महता योगो नष्टः परंतप ॥ २॥

मग आणिकही या योगातें । राजर्षि जाहले जाणते ।
परी तेथोनि आतां सांप्रतें । नेणिजे कोण्ही ॥ १९ ॥
जे प्राणियां कामीं भरु । देहाचिवरी आदरु ।
म्हणौनि पडिला विसरु । आत्मबोधाचा ॥ २० ॥
अव्हांटलिया आस्थाबुद्धि । विषयसुखची परमावधि ।
जीवु तैसा उपाधि । आवडे लोकां ॥ २१ ॥
एरव्हीं तरी खवणेयांच्या गांवीं । पाटाउवें काय करावीं ।
सांगें जात्यंधा रवी । काय आथी ? ॥ २२ ॥
कां बहिरयांच्या आस्थानीं । कवण गीतातें मानीं ।
कीं कोल्हेया चांदणीं । आवडी उपजें ? ॥ २३ ॥
पैं चंद्रोदया आरौतें । जयांचे डोळे फुटती असते ।
ते काउळे केवीं चंद्रातें । वोळखती ? ॥ २४ ॥
तैसी वैराग्याची शिंव न देखती । जे विवेकाची भाष नेणती ? ।
ते मूर्ख केंवीं पावती । मज ईश्वरातें ? ॥ २५ ॥
कैसा नेणों मोहो वाढीनला । तेणें बहुतेक काळु व्यर्थ गेला ।
म्हणौनि योगु हा लोपला । लोकीं इये ॥ २६ ॥

स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः ।
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ॥ ३॥

तोचि हा आजि आतां । तुजप्रती कुंतीसुता ।
सांगितला आम्हीं तत्त्वतां । भ्रांति न करीं ॥ २७ ॥
हें जीवींचें निज गुज । परी केवीं राखों तुज ।
जे पढियेसी तूं मज । म्हणौनियां ॥ २८ ॥
तूं प्रेमाचा पुतळा । भक्तीचा जिव्हाळा ।
मैत्रियेचि चित्कळा । धनुर्धरा ॥ २९ ॥
तूं अनुसंगाचा ठावो । आतां तुज काय वंचूं जावों ? ।
जर्‍ही संग्रामारूढ आहों । जाहलों आम्ही ॥ ३० ॥
तरी नावेक हें सहावें । गाजाबज्यही न धरावें ।
परी तुझें अज्ञानत्व हरावें । लागे आधीं ॥ ३१ ॥

अर्जुन उवाच ।
अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः ।
कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ॥ ४॥

तंव अर्जुन म्हणे श्रीहरी । माय आपुलेयाचा स्‍नेहो करी ।
एथ विस्मयो काय अवधारीं । कृपानिधी ॥ ३२ ॥
तूं संसारश्रांतांची साउली । अनाथ जीवांची माउली ।
आमुतें कीर प्रसवली । तुझीच कृपा ॥ ३३ ॥
देवा पांगुळ एकादें विजे । तरी जन्मौनि जोजारु साहिजे ।
हें बोलों काय तुझें । तुजचि पुढां ॥ ३४ ॥
आतां पुसेन जें मी कांहीं । तेथ निकें चित्त देईं ।
तेवींचि देवें कोपावें ना कांहीं । बोला एका ॥ ३५ ॥
तरी मागील जे वार्ता । तुवां सांगितली होती अनंता ।
ते नावेक मज चित्ता । मानेचिना ॥ ३६ ॥
जे तो विवस्वतु म्हणजे कायी । ऐसें हें वडिलां ठाउवें नाहीं ।
तरी तुवांचि केवीं पाहीं । उपदेशिला ? ॥ ३७ ॥
तो तरी आइकिजे बहुतां काळांचा । आणि तूं तंव श्रीकृष्ण सांपेचा ।
म्हणौनि गा इये मातुचा । विसंवादु ॥ ३८ ॥
तेवींचि देवा चरित्र तुझें । आपण कांहींचि नेणिजे ।
हें लटिकें केवीं म्हणिजे । एकिहेळां ? ॥ ३९ ॥
परि हेचि मातु आघवी । मी परियेसें ऐशी सांगावी ।
जे तुवांचि रवी केवीं । पाही उपदेशु केला ॥ ४० ॥

श्रीभगवानुवाच ।
बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप ॥ ५॥

तंव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता । तो विवस्वतु जैं होता ।
तैं आम्हीं नसों ऐसी चित्ता । भ्रांति जरी तुज ॥ ४१ ॥
तरी तूं गा हें नेणसी । पैं जन्में आम्हां तुम्हासी ।
बहुतें गेलीं परी तियें न स्मरसी । आपुलीं तूं ॥ ४२ ॥
मी जेणें जेणें अवसरें । जें जें होऊनि अवतरें ।
तें समस्तही स्मरें । धनुर्धरा ॥ ४३ ॥

अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीष्वरोऽपि सन् ।
प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया ॥ ६॥

म्हणौनि हें आघवें । मागील मज आठवें ।
मी अजुही परि संभवें । प्रकृतियोगें ॥ ४४ ॥
माझें अव्ययत्व तरी न नसे । परी होणें जाणें एक दिसे ।
तें प्रतिबिंबें मायावशें । माझ्याचि ठायीं ॥ ४५ ॥
माझी स्वतंत्रता तरी न मोडे । परी कर्माधीनु ऐसा आवडे ।
तेही भ्रांतिबुद्धि तरी घडे । एर्‍हवीं नाहीं ॥ ४६ ॥
कीं एकचि दिसे दुसरें । तें दर्पणाचेनि आधारें ।
एर्‍हवीं काय वस्तुविचारें । दुजें आहे ? ॥ ४७ ॥
तैसा अमूर्तचि मी किरीटी । परी प्रकृति जैं अधिष्ठीं ।
तैं साकारपणें नट नटीं । कार्यालागीं ॥ ४८ ॥

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ७॥

जें धर्मजात आघवें । युगायुगीं म्यां रक्षावें ।
ऐसा ओघु हा स्वभावें । आद्यु असे ॥ ४९ ॥
म्हणौनि अजत्व परतें ठेवीं । मी अव्यक्तपणही नाठवीं ।
जे वेळीं धर्मातें अभिभवी । अधर्मु हा ॥ ५० ॥

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥ ८॥

ते वेळीं आपुल्याचेनि कैवारें । मी साकारु होऊनि अवतरें ।
मग अज्ञानाचें आंधारें । गिळूनि घालीं ॥ ५१ ॥
अधर्माची अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं ।
सज्जनांकरवीं गुढी । सुखाची उभवीं ॥ ५२ ॥
दैत्यांचीं कुळें नाशीं । साधूंचा मानु गिंवशीं ।
धर्मासीं नीतीशीं । शेंस भरीं ॥ ५३ ॥
मी अविवेकाची काजळी । फेडूनि विवेकदीप उजळीं ।
तैं योगियां पाहे दिवाळी । निरंतर ॥ ५४ ॥
सत्सुखें विश्व कोंदे । धर्मुचि जगीं नांदें ।
भक्तां निघती दोंदे । सात्त्विकाचीं ॥ ५५ ॥
तै पापांचा अचळु फिटे । पुण्याची पहांट फुटे ।
जैं मूर्ति माझी प्रगटे । पंडुकुमरा ॥ ५६ ॥
ऐसेया काजालागीं । अवतरें मी युगीं युगीं ।
परि हेंचि वोळखें जो जगीं । तो विवेकिया ॥ ५७ ॥

जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः ।
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥ ९॥

माझें अजत्वें जन्मणें । अक्रियताचि कर्म करणें ।
हें अविकार जो जाणे । तो परममुक्त ॥ ५८ ॥
तो चालिला संगें न चळे । देहींचा देहा नाकळे ।
मग पंचत्वीं तंव मिळे । माझ्याचि रूपीं ॥ ५९ ॥

वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः ।
बहवो ज्ञानतपसा पूता मद्‍भवमागताः ॥ १०॥

एर्‍हवीं परापर न शोचिती । जे कामनाशून्य होती ।
वाटा कें वेळीं न वचती । क्रोधाचिया ॥ ६० ॥
सदा मियांचि आथिले । माझिया सेवा जियाले ।
कीं आत्मबोधें तोषले । वीतराग जे ॥ ६१ ॥
जे तपोतेजाचिया राशी । कीं एकायतन ज्ञानासी ।
जे पवित्रता तीर्थांसी । तीर्थरूप ॥ ६२ ॥
ते मद्‍भावा सहजें आले । मी तेचि ते होऊनि ठेले ।
जे मज तयां उरले । पदर नाहीं ॥ ६३ ॥
सांगैं पितळेची गंधिकाळिक । जैं फिटली होय निःशेख ।
तैं सुवर्ण काई आणिक । जोडूं जाइजे ? ॥ ६४ ॥
तैसे यमनियमीं कडसले । जे तपोज्ञानें चोखाळले ।
मी तेचि ते जाहले । एथ संशयो कायसा ? ॥ ६५ ॥

ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ ११॥

एर्‍हवीं तरी पाहीं । जे जैसे माझ्या ठायीं ।
भजती तयां मीही । तैसाचि भजें ॥ ६६ ॥
देखैं मनुष्यजात सकळ । हें स्वभावता भजनशीळ ।
जाहलें असे केवळ । माझ्याचि ठायीं ॥ ६७ ॥
परी ज्ञानेंवीण नाशिले । जे बुद्धिभेदासी आले ।
तेणेंचि त्या कल्पिलें । अनेकत्व ॥ ६८ ॥
म्हणौनि अभेदीं भेदु देखती । यया अनाम्या नामें ठेविती ।
देवी देवो म्हणती । अचर्चातें ॥ ६९ ॥
जे सर्वत्र सदा सम । तेथ विभाग अधमोत्तम ।
मतिवशें संभ्रम । विवंचिती ॥ ७० ॥

काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धि यजन्त हि देवताः ।
क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥ १२॥

मग नानाहेतुप्रकारें । यथोचितें उपचारें ।
मानिलीं देवतांतरें । उपासिती ॥ ७१ ॥
तेथ जें जें अपेक्षित । तें तैसेंचि पावती समस्त ।
परी तें कर्मफळ निश्चित । वोळख तूं ॥ ७२ ॥
वांचून देतें घेतें आणिक । निभ्रांत नाहीं सम्यक ।
एथ कर्मचि फळसूचक । मनुष्यलोकीं ॥ ७३ ॥
जैसें क्षेत्रीं जें पेरिजे । तें वांचूनि आन न निपजे ।
कां पाहिजे तेंचि देखिजे । दर्पणाधारें ॥ ७४ ॥
नातरी कडेयातळवटीं । जैसा आपुलाचि बोलू किरीटी ।
पडिसादु होऊनि उठी । निमित्तयोगें ॥ ७५ ॥
तैसा समस्तां यां भजना । मी साक्षिभूतु पैं अर्जुना ।
एथ प्रतिफळे भावना । आपुलाली ॥ ७६ ॥

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम् ॥ १३॥

आतां याचिपरी जाण । चार्‍ही हे वर्ण ।
सृजिलें म्यां गुण- । कर्मविभागें ॥ ७७ ॥
जे प्रकृतीचेनि आधारें । गुणाचेनि व्यभिचारें ।
कर्में तदनुसारें । विवंचिली ॥ ७८ ॥
एथ एकचि हे धनुष्यपाणी । परी जाहले गा चहूं वर्णीं ।
ऐसी गुणकर्मकडसणी । केली सहजें ॥ ७९ ॥
म्हणौनि आइकें पार्था । हे वर्णभेदसंस्था ।
मीं कर्ता नव्हें सर्वथा । याचिलागीं ॥ ८० ॥

न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ।
इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥ १४॥

हें मजचिस्तव जाहलें । परी म्यां नाहीं केलें ।
ऐसें जेणें जाणितलें । तो सुटला गा ॥ ८१ ॥

एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः ।
कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् ॥ १५॥

मागील मुमुक्षु जे होते । तिहीं ऐशिया जाणोनि मातें ।
कर्में केलीं समस्तें । धनुर्धरा ॥ ८२ ॥
परि तें बीजें जैसीं दग्धलीं । नुगवतींचि पेरिलीं ।
तैशीं कर्मेंचि परि तयां जाहलीं । मोक्षहेतु ॥ ८३ ॥
एथ आणिकही एक अर्जुना । हे कर्माकर्मविवंचना ।
आपुलिये चाडें सज्ञाना । योग्यु नोहे ॥ ८४ ॥

किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः ।
तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ १६॥

कर्म म्हणिपे तें कवण । अथवा अकर्मा काय लक्षण ।
ऐसें विचारितां विचक्षण । गुंफोनि ठेले ॥ ८५ ॥
जैसें कां कुडें नाणें । खयाचेनि सारखेपणें ।
डोळ्यांचेंहि देखणें । संशयीं घाली ॥ ८६ ॥
तैसें नैष्कर्म्यतेचेनि भ्रमें । गिंवसिजत आहाती कर्में ।
जे दुजी सृष्टी मनोधर्में । करूं सकती ॥ ८७ ॥
वांचूनि मूर्खाची गोठी कायसी । एथ मोहले गा क्रांतदर्शी ।
म्हणौनि आतां तेंचि परियेसीं । सांगेन तुज ॥ ८८ ॥

कर्मण्यो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः ।
अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥ १७॥

तरी कर्म म्हणजे स्वभावें । जेणें विश्वाकारु संभवे ।
तें सम्यक् आधीं जाणावें । लागे एथ ॥ ८९ ॥
मग वर्णाश्रमासि उचित । जें विशेष कर्म विहित ।
तेंही वोळखावें निश्चित । उपयोगेंसी ॥ ९० ॥
पाठीं जें निषिद्ध म्हणिपे । तेंही बुझावें स्वरूपें ।
येतुलेनि कांहीं न गुंफे । आपैसेंचि ॥ ९१ ॥
एर्‍हवीं जग हें कर्माधीन । ऐसी याची व्याप्ती गहन ।
परी तें असो आइकें चिन्ह । प्राप्तांचें गा ॥ ९२ ॥

कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः ।
स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्‍नकर्मकृत् ॥ १८॥

जो सकळकर्मीं वर्ततां । देखैं आपुली नैष्कर्म्यता ।
कर्मसंगें निराशता । फळाचिया ॥ ९३ ॥
आणि कर्तव्यतेलागीं । जया दुसरें नाहीं जगीं ।
ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगीं । बोधला असे ॥ ९४ ॥
तरी क्रियाकलापु आघवा । आचरतु दिसे बरवा ।
तोचि तो ये चिन्हीं जाणावा । ज्ञानिया गा ॥ ९५ ॥
जैसा कां जळापाशीं उभा ठाके । तो जरी आपणपें जळामाजिं देखे ।
तरी तो निभ्रांत वोळखे । म्हणे मी वेगळा आहें ॥ ९६ ॥
अथवा नावें हन जो रिगे । तो थडियेचें रुख जातां देखे वेगें ।
तेचि साचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हण अचळ ॥ ९७ ॥
तैसें सर्व कर्मीं असणें । ते फुडें मानूनि वायाणें ।
मग आपणया जो जाणे । नैष्कर्म्यु ऐसा ॥ ९८ ॥
आणि उदोअस्तुचेनि प्रमाणें । जैसें न चालतां सूर्याचें चालणें ।
तैसें नैष्कर्म्यत्व जाणें । कर्मींचि असतां ॥ ९९ ॥
तो मनुष्यासारिखा तरी आवडे । परी मनुष्यत्व तया न घडे ।
जैसें जळामाजीं न बुडे । भानुबिंब ॥ १०० ॥
तेणें न पाहतां विश्व देखिलें । न करितां सर्व केलें ।
न भोगितां भोगिलें । भोग्यजात ॥ १०१ ॥
एकेचि ठायीं बैसला । परि सर्वत्र तोचि गेला ।
हें असो विश्व जाहला । आंगेंचि तो ॥ १०२ ॥

यस्य सर्वे समारम्भाः कामसंकल्पवर्जिताः ।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः ॥ १९॥

जया पुरुषाच्या ठायीं । कर्माचा तरी खेदु नाहीं ।
परी फलापेक्षा कहीं । संचरेना ॥ १०३ ॥
आणि हें कर्म मी करीन । अथवा आदरिलें सिद्धी नेईन ।
येणें संकल्पेंहीं जयाचें मन । विटाळेना ॥ १०४ ॥
ज्ञानाग्नीचेनि मुखें । जेणें जाळिलीं कर्में अशेखें ।
तो परब्रह्मचि मनुष्यवेखें । वोळख तूं ॥ १०५ ॥

त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः ।
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित्करोति सः ॥ २०॥

जो शरीरीं उदासु । फळभोगीं निरासु ।
नित्यता उल्हासु । होऊनि असे ॥ १०६ ॥
जो संतोषाचा गाभारा । आत्मबोधाचिये वोगरां ।
पुरे न म्हणेचि धनुर्धरा । आरोगितां ॥ १०७ ॥

निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः ।
शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्‍नोति किल्बिषम् ॥ २१॥

यदृच्छालाभसंतुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः ।
समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते ॥ २२॥

कैसी अधिकाधिक आवडी । घेत महासुखाची गोडी ।
सांडोनियां आशा कुरोंडी । अहंभावेंसीं ॥ १०८ ॥
म्हणौनि अवसरें जें जें पावे । कीं तेणेंचि तो सुखावे ।
जया आपुलें आणि परावें । दोन्ही नाहीं ॥ १०९ ॥
तो दिठीं जें पाहे । तें आपणचि होऊनि जाये ।
आईके तें आहे । तोचि जाहला ॥ ११० ॥
चरणीं हन चाले । मुखें जें जें बोले ।
ऐसें चेष्टाजात तेतुलें । आपणचि जो ॥ १११ ॥
हें असो विश्व पाहीं । जयासि आपणपेंवांचूनि नाहीं ।
आतां कवण तें कर्म कायी । बाधी तयातें ॥ ११२ ॥
हा मत्सरु जेथ उपजे । तेतुलें नुरेचि जया दुजें ।
तो निर्मत्सरु काइ म्हणिजे । बोलवरी ? ॥ ११३ ॥
म्हणौनि सर्वांपरी मुक्तु । तो सकर्मुचि कर्मरहितु ।
सगुण परि गुणातीतु । एथ भ्रांति नाहीं ॥ ११४ ॥

गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः ।
यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥ २३॥

तो देहसंगें तरी असे । परी चैतन्यासारिखा दिसे ।
पाहतां परब्रह्माचेनि कसें । चोखाळु भला ॥ ११५ ॥
ऐसाहि परी कौतुकें । जरी कर्में करी यज्ञादिकें ।
तरी तियें लया जाती निःशेखें । तयाच्याचि ठायीं ॥ ११६ ॥
अकाळींचीं अभ्रें जैशीं । उर्मीवीण आकाशीं ।
हारपती आपैशीं । उदयलीं सांती ॥ ११७ ॥
तैशीं विधिविधानें विहितें । जरी आचरे तो समस्तें ।
तरी तियें ऐक्यभावें ऐक्यातें । पावतीचि गा ॥ ११८ ॥

ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नो ब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥ २४॥

हें हवन मी होता । कां इयें यज्ञीं हा भोक्ता ।
ऐसिया बुद्धीसि नाहीं भिन्नता । म्हणौनियां ॥ ११९ ॥
जे इष्टयज्ञ यजावे । तें हविर्मंत्रादि आघवें ।
तो देखतसे अविनाशभावें । आत्मबुद्धि ॥ १२० ॥
म्हणौनि ब्रह्म तेंचि कर्म । ऐसें बोधा आलें जया सम ।
तया कर्तव्य तें नैष्कर्म्य । धनुर्धरा ॥ १२१ ॥
आतां अविवेकु कुमारत्वा मुकले । जयां विरक्तीचें पाणिग्रहण जाहलें ।
मग उपासन जिहीं आणिलें । योगाग्नीचें ॥ १२२ ॥

दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ।
ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति ॥ २५॥

जे यजनशील अहर्निशीं । जिहीं अविद्या हविली मनेंसीं ।
गुरुवाक्य हुताशीं । हवन केलें ॥ १२३ ॥
तिहीं योगाग्निकीं यजिजे । तो दैवयज्ञु म्हणिजे ।
जेणें आत्मसुख कामिजे । पंडुकुमरा ॥ १२४ ॥
आतां अवधारी सांगैन आणिक । जे ब्रह्माग्नी साग्निक ।
तयांतें यज्ञचि यज्ञु देख । उपासिजे ॥ १२५ ॥

श्रोत्रादिनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति ।
शब्दादीन्विषयानन्ये इन्द्रियाग्निषु जुह्वति ॥ २६॥

एक संयमाग्निहोत्री । ते युक्तित्रयाच्या मंत्रीं ।
यजन करिती पवित्रीं । इंद्रियद्रव्यीं ॥ १२६ ॥
एकां वैराग्य रवि विवळे । तंव संयती विहार केले ।
तेथ अपावृत जाहले । इंद्रियानळ ॥ १२७ ॥
तिहीं विरक्तीची ज्वाळा घेतली । तंव विकारांचीं इंधनें पळिपली ।
तेथ आशाधूमें सांडिलीं । पांचही कुंडें ॥ १२८ ॥
मग वाक्यविधीचिया निरवडी । विषय आहुती उदंडीं ।
हवन केलें कुंडीं । इन्द्रियाग्नीच्या ॥ १२९ ॥

सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे ।
आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते ॥ २७॥

एकीं ययापरी पार्था । दोषु क्षाळिले सर्वथा ।
आणिकीं हृदयारणीं मंथा । विवेकु केला ॥ १३० ॥
तो उपशमें निहटिला । धैर्येंवरी दाटिला ।
गुरुवाक्यें काढिला । बळकटपणें ॥ १३१ ॥
ऐसें समरसें मंथन केलें । तेथ झडकरी काजा आलें ।
जें उज्जीवन जाहलें । ज्ञानाग्नीचें ॥ १३२ ॥
पहिला ऋद्धिसिद्धींचा संभ्रमु । तो निवर्तोनि गेला धूमु ।
मग प्रगटला सूक्ष्मु । विस्फुलिंगु ॥ १३३ ॥
तया मनाचें मोकळें । तेंचि पेटवण घातले ।
जें यमनियमीं हळुवारलें । आइतें होतें ॥ १३४ ॥
तेणें सादुकुपणे ज्वाळा समृद्धा । मग वासनांतराचिया समिधा ।
स्‍नेहेंसीं नानाविधा । जाळिलिया ॥ १३५ ॥
तेथ सोहंमंत्रें दीक्षितीं । इंद्रियकर्मांच्या आहुती ।
तियें ज्ञानानळीं प्रदीप्तीं । दिधलिया ॥ १३६ ॥
पाठीं प्राणक्रियेचिये स्रुवेनिशीं । पूर्णाहुती पडली हुताशीं ।
तेथ अवभृत समरसीं । सहजें जहालें ॥ १३७ ॥
मग आत्मबोधींचें सुख । जें संयमाग्नीचें हुतशेष ।
तोचि पुरोडाशु देख । घेतला तिहीं ॥ १३८ ॥
एक ऐशिया इहीं यजनीं । मुक्त ते जाहले त्रिभुवनीं ।
या यज्ञक्रिया तरी आनानीं । परि प्राप्य तें एक ॥ १३९ ॥

द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे ।
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः ॥ २८॥

एक द्रव्युयज्ञु म्हणिपती । एक तपसामग्रीया निपजविती ।
एक योगयागुही आहाती । जे सांगितलें ॥ १४० ॥
एकीं शब्दीं शब्दु यजिजे । तो वाग्यज्ञु म्हणिजे ।
ज्ञानें ज्ञेय गमिजे । तो ज्ञानयज्ञु ॥ १४१ ॥
हें अर्जुना सकळ कुवाडें । जे अनुष्ठितां अतिसांकडें ।
परी जितेंद्रियासीचि घडे । योग्यतावशें ॥ १४२ ॥
ते प्रवीण तेथ भले । आणि योगसमृद्धि आथिले ।
म्हणौनि आपणपां तिहीं केलें । आत्महवन ॥ १४३ ॥

अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे ।
प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः ॥ २९॥

मग अपानाग्नीचेनि मुखीं । प्राणद्रव्यें देखीं ।
हवन केलें एकीं । अभ्यासयोगें ॥ १४४ ॥
एक अपानु प्राणीं अर्पिती । एक दोहींतेंही निरुंधिती ।
ते प्राणायामी म्हणिपती । पंडुकुमरा ॥ १४५ ॥

अपरे नियताहाराः प्राणान्प्राणेषु जुह्वति ।
सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः ॥ ३०॥

एक वज्रयोगक्रमें । सर्वाहारसंयमें ।
प्राणीं प्राणु संभ्रमें । हवन करिती ॥ १४६ ॥
ऐसें मोक्षकाम सकळ । समस्त हे यजनशीळ ।
जिहीं यज्ञद्वारां मनोमळ । क्षाळण केले ॥ १४७ ॥
जया अविद्याजात जाळितां । जें उरलें निजस्वभावता ।
जेथ अग्नि आणि होता । उरेचिना ॥ १४८ ॥
जेथ यजितयाचा कामु पुरे । यज्ञींचें विधान सरे ।
मागुतें जेथूनि वोसरें । क्रियाजात ॥ १४९ ॥
विचार जेथ न रिगे । हेतु जेथ न निगे ।
जें द्वैतदोषसंगें । सिंपेचिना ॥ १५० ॥

यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् ।
नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम ॥ ३१॥

ऐसें अनादिसिद्ध चोखट । जें ज्ञान यज्ञावशिष्ट ।
तें सेविती ब्रह्मनिष्ठ । ब्रह्माहंमंत्रें ॥ १५१ ॥
ऐसें शेषामृतें धाले । कीं अमर्त्यभावा आले ।
म्हणौनि ब्रह्म ते जहाले । अनायासें ॥ १५२ ॥
येरां विरक्ति माळ न घालीचि । जयां संयमाग्नीची सेवा न घडेचि ।
जे योगयागु न करितीचि । जन्मले सांते ॥ १५३ ॥
जयांचें ऐहिक धड नाहीं । तयांचे परत्र पुससी काई ।
म्हणौनि असो हे गोठी पाहीं । पंडुकुमरा ॥ १५४ ॥

एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे ।
कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥ ३२॥

ऐसें बहुतीं परी अनेग । जे सांगितलें तुज कां याग ।
ते विस्तारूनि वेदेंचि चांग । म्हणितले आहाती ॥ १५५ ॥
परी तेणें विस्तारें काय करावें । हेंचि कर्मसिद्ध जाणावें ।
येतुलेनि कर्मबंधु स्वभावें । पावेल ना ॥ १५६ ॥

श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्ञानयज्ञः परंतप ।
सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥ ३३॥

अर्जुना वेदु जयांचें मूळ । जे क्रियाविशेषें स्थूळ ।
जया नव्हाळियेचें फळ । स्वर्गसुख ॥ १५७ ॥
ते द्रव्यादियागु कीर होती । परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती ।
जैशी तारातेजसंपत्ती । दिनकरापाशीं ॥ १५८ ॥
देखैं परमात्मसुखनिधान । साधावया योगीजन ।
जे न विसंबिती अंजन । उन्मेषनेत्री ॥ १५९ ॥
जें धांवतया कर्माची लाणी । नैष्कर्म्यबोधाची खाणी ।
जें भुकेलिया धणी । साधनाची ॥ १६० ॥
जेथ प्रवृत्ति पांगुळ जाहली । तर्काची दिठी गेली ।
जेणें इंद्रियें विसरलीं । विषयसंगु ॥ १६१ ॥
मनाचें मनपण गेलें । जेथ बोलाचें बोलकेंपण ठेलें ।
जयामाजी सांपडलें । ज्ञेय दिसे ॥ १६२ ॥
जेथ वैराग्याचा पांगु फिटे । विवेकाचाही सोसु तुटे ।
जेथ न पाहतां सहज भेटे । आपणपें ॥ १६३ ॥

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ ३४॥

तें ज्ञान पैं गा बरवे । जरी मनीं आथि आणावें ।
तरी संतां यां भजावें । सर्वस्वेसीं ॥ १६४ ॥
जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंठा ।
तो स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ॥ १६५ ॥
तरी तनुमनुजीवें । चरणांसीं लागावें ।
आणि अगर्वता करावें । दास्य सकळ ॥ १६६ ॥
मग अपेक्षित जें आपुलें । तेंही सांगती पुसिलें ।
जेणें अंतःकरण बोधलें । संकल्पा नये ॥ १६७ ॥

यज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव ।
येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ॥ ३५॥

जयाचेनि वाक्य उजिवडें । जाहलें चित्त निधडें ।
ब्रह्माचेनि पाडें । निःशंकु होय ॥ १६८ ॥
तें वेळीं आपणपेयां सहितें । इयें अशेषेंही भूतें ।
माझ्या स्वरूपीं अखंडितें । देखसी तूं ॥ १६९ ॥
ऐसें ज्ञानप्रकाशें पाहेल । तैं मोहांधकारु जाईल ।
जैं गुरुकृपा होईल । पार्था गा ॥ १७० ॥

अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः ।
सर्व ज्ञानप्‍लवेनैव वृजिनं संतरिष्यसि ॥ ३६॥

जरी कल्मषाचा आगरु । तूं भ्रांतीचा सागरु ।
व्यामोहाचा डोंगरु । हौनी अससी ॥ १७१ ॥
तर्‍ही ज्ञानशक्तिचेनि पाडें । हें आघवेंचि गा थोकडें ।
ऐसें सामर्थ्य असे चोखडें । ज्ञानीं इये ॥ १७२ ॥
देखैं विश्वभ्रमा{ऐ}सा । जो अमूर्ताचा कडवसा ।
तो जयाचिया प्रकाशा । पुरेचिना ॥ १७३ ॥
तया कायसे हे मनोमळु । हें बोलतांचि अति किडाळु ।
नाहीं येणें पाडें ढिसाळु । दुजें जगीं ॥ १७४ ॥

यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मासात्कुरुतेऽर्जुन ।
ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ॥ ३७॥

सांगै भुवनत्रयाची काजळी । जे गगनामाजि उधवली ।
तिये प्रळयींचे वाहटुळी । काय अभ्र पुरे ? ॥ १७५ ॥
कीं पवनाचेनि कोपें । पाणियेंचि जो पळिपे ।
तो प्रळयानळु दडपे । तृणें काष्ठें काई ? ॥ १७६ ॥

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥ ३८॥

म्हणौनि असो हें न घडे । तें विचारितांचि असंगडें ।
पुढती ज्ञानाचेनि पाडें । पवित्र न दिसे ॥ १७७ ॥
एथ ज्ञान हें उत्तम होये । आणिकही एक तैसें कें आहे ।
जैसें चैतन्य कां नोहे । दुसरें गा ॥ १७८ ॥
या महातेजाचेनि कसें । जरी चोखाळु प्रतिबिंब दिसे ।
कां गिंवसिलें गिंवसे । आकाश हें ॥ १७९ ॥
नातरी पृथ्वीचेनि पाडें । कांटाळें जरी जोडे ।
तरी उपमा ज्ञानीं घडे । पंडुकुमरा ॥ १८० ॥
म्हणौनि बहुतीं परी पाहतां । पुढतपुढती निर्धारितां ।
हें ज्ञानाची पवित्रता । ज्ञानींची आथि ॥ १८१ ॥
जैसी अमृताची चवी निवडिजे । तरी अमृताचिसारिखी म्हणिजे ।
तैसें ज्ञान हें उपमिजे । ज्ञानेंसींचि ॥ १८२ ॥
आतां यावरी जें बोलणें । तें वायांची वेळु फेडणें ।
तंव साचचि हें पार्थ म्हणे । जें बोलत असां ॥ १८३ ॥
परी तेंचि ज्ञान केवीं जाणावें । ऐसें अर्जुनें जंव पुसावें ।
तंव तें मनोगत देवें । जाणितलें ॥ १८४ ॥
मग म्हणतसे किरीटी । आतां चित्त देईं इये गोठी ।
सांगेन ज्ञानाचिये भेटी । उपावो तुज ॥ १८५ ॥

श्रद्धावा.ण्ल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ ३९॥

तरी आत्मसुखाचिया गोडिया । विटे जो कां सकळ विषयां ।
जयाच्या ठायीं इंद्रियां । मानु नाहीं ॥ १८६ ॥
जो मनासीं चाड न सांगे । जो प्रकृतीचें केलें नेघे ।
जो श्रद्धेचेनि संभोगें । सुखिया जाहला ॥ १८७ ॥
तयातेंचि गिंवसित । तें ज्ञान पावे निश्चित ।
जयामाजि अचुंबित । शांति असे ॥ १८८ ॥
तें ज्ञान हृदयीं प्रतिष्ठे । आणि शांतीचा अंकुर फुटे ।
मग विस्तार बहु प्रगटे । आत्मबोधाचा ॥ १८९ ॥
मग जेउती वास पाहिजे । तेउती शांतीची देखिजे ।
तेथ आपपरु नेणिजे । निर्धारितां ॥ १९० ॥
ऐसा हा उत्तरोत्तरु । ज्ञानबीजाचा विस्तारु ।
सांगतां असे अपारु । परि असो आतां ॥ १९१ ॥

अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।
नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥ ४०॥

ऐकें जया प्राणियाच्या ठायीं । इया ज्ञानाची आवडी नाहीं ।
तयाचें जियालें म्हणों काई । वरी मरण चांग ॥ १९२ ॥
शून्य जैसें कां गृह । कां चैतन्येंवीण देह ।
तैसें जीवित तें संमोह । ज्ञानहीन ॥ १९३ ॥
अथवा ज्ञान कीर आपु नोहे । परि ते चाड एकी जरी वाहे ।
तरी तेथ जिव्हाळा कांहीं आहे । प्राप्तीचा पैं ॥ १९४ ॥
वांचूनि ज्ञानाची गोठी कायसी । परि ते आस्थाही न धरीं मानसीं ।
तरी तो संशयरूप हुताशीं । पडिला जाण ॥ १९५ ॥
जे अमृतही परि नावडे । ऐसें सावियाचीं आरोचकु जैं पडे ।
तैं मरण आलें असें फुडें । जाणों येकीं ॥ १९६ ॥
तैसा विषयसुखें रंजे । जो ज्ञानेसींचि माजे ।
तो संशयें अंगिकारिजे । एथ भ्रांति नाहीं ॥ १९७ ॥
मग संशयीं जरी पडिला । तरी निभ्रांत जाणें नासला ।
तो ऐहिकपरत्रा मुकला । सुखासि गा ॥ १९८ ॥
जया काळज्वरु आंगीं बाणे । तो शीतोष्णें जैशीं नेणे ।
आगी आणि चांदिणें । सरिसेंचि मानीं ॥ १९९ ॥
तैसें साच आणि लटिकें । विरुद्ध आणि निकें ।
संशयीं तो नोळखे । हिताहित ॥ २०० ॥
हा रात्रिदिवसु पाहीं । जैसा जात्यंधा ठाउवा नाहीं ।
तैसें संशयीं असतां कांहीं । मना नये ॥ २०१ ॥

योगसंन्यस्तकर्माणं ज्ञानसंछिन्नसंशयम् ।
आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनंजय ॥ ४१॥

म्हणौनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर ।
हा विनाशाची वागुर । प्राणियांसि ॥ २०२ ॥
येणें कारणें तुवां त्यजावा । आधीं हाचि एकु जिणावा ।
जो ज्ञानाचिया अभावा- । माजि असे ॥ २०३ ॥
जैं अज्ञानाचें गडद पडे । तैं हा बहुवस मनीं वाढे ।
म्हणौनि सर्वथा मार्गु मोडे । विश्वासाचा ॥ २०४ ॥
हृदयीं हाचि न समाये । बुद्धीतें गिंवसूनि ठाये ।
तेथ संशयात्मक होये । लोकत्रय ॥ २०५ ॥

तस्मादज्ञानसंभूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः ।
छित्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥ ४२॥

ॐ तत्सदिति श्रीमद्‍भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥

ऐसा जरी थोरावें । तरी उपायें एकें आंगवे ।
जरी हातीं होय बरवें । ज्ञानखड्ग ॥ २०६ ॥
तरी तेणें ज्ञानशस्त्रें तिखटें । निखळु हा निवटे ।
मग निःशेष खता फिटे । मानसींचा ॥ २०७ ॥
याकारणें पार्था । उठीं वेगीं वरौता ।
नाशु करोनि हृदयस्था । संशयासी ॥ २०८ ॥
ऐसें सर्वज्ञाचा बापु । जो श्रीकृष्णु ज्ञानदीपु ।
तो म्हणतसे सकृपु । ऐकें राया ॥ २०९ ॥
तंव या पूर्वापर बोलाचा । विचारूनि कुमरु पंडूचा ।
कैसा प्रश्नु अवसरींचा । करिता होईल ॥ २१० ॥
ते कथेची संगति । भावाची संपत्ति ।
रसाची उन्नति । म्हणिपेल पुढा ॥ २११ ॥
जयाचिया बरवेपणीं । कीजे आठां रसांची वोवाळणी ।
जो सज्जनाचिये आयणी । विसांवा जगीं ॥ २१२ ॥
तो शांतुचि अभिनवेल । ते परियसा मर्‍हाटे बोल ।
जे समुद्राहूनि सखोल । अर्थभरित ॥ २१३ ॥
जैसें बिंब तरी बचकें एवढें । परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें ।
शब्दाची व्याप्ति तेणें पाडें । अनुभवावी ॥ २१४ ॥
नातरी कामितयाचिया इच्छा । फळे कल्पवृक्षु जैसा ।
बोलु व्यापकु होय तैसा । तरी अवधान द्यावें ॥ २१५ ॥
हें असो काय म्हणावें । सर्वज्ञु जाणती स्वभावें ।
तरी निकें चित्त द्यावें । हे विनंती माझी ॥ २१६ ॥
जेथ साहित्य आणि शांति । हे रेखा दिसे बोलती ।
जैसी लावण्यगुणकुळवती । आणि पतिव्रता ॥ २१७ ॥
आधींच साखर आवडे । तेचि जरी ओखदां जोडे ।
तरी सेवावी ना कां कोडें । नावानावा ? ॥ २१८ ॥
सहजें मलयानिळु मंदु सुगंधु । तया अमृताचा होय स्वादु ।
आणि तेथेंचि जोडे नादु । जरी दैवगत्या ॥ २१९ ॥
तरी स्पर्शें सर्वांग निववी । स्वादें जिव्हेतें नाचवी ।
तेवींचि कानांकरवीं । म्हणवीं बापु माझा ॥ २२० ॥
तैसें कथेचें इये ऐकणें । एक श्रवणासी होय पारणें ।
आणि संसारदुःख मूळवणें । विकृतीविणें ॥ २२१ ॥
जरी मंत्रेंचि वैरी मरे । तरी वायां कां बांधावीं कटारें ? ।
रोग जाय दूधसाखरें । तरी निंब कां पियावा ? ॥ २२२ ॥
तैसा मनाचा मारु न करितां । आणि इंद्रियां दुःख न देतां ।
एथ मोक्षु असे आयता । श्रवणाचिमाजि ॥ २२३ ॥
म्हणौनि आथिलिया आराणुका । गीतार्थु हा निका ।
ज्ञानदेवो म्हणे आइका । निवृत्तिदासु ॥ २२४ ॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां चतुर्थोऽध्यायः ॥