सृष्टिपूर्व गुह्यज्ञान

ब्रह्मदेव सृष्टी करण्यास पात्र झाला

सृष्टी न करवे सर्वथा । करितां येईल अहंता ।
ऐसा ब्रह्मा ह्नणत होता । तोचि यापरी तत्त्वत्तां अनुग्रहिला देवें ॥२४॥

जो सृष्टी नकरवे ह्नणत होता । तोचि आपुल्या अकर्तात्मता ।
सृष्टी करावयाची योग्यता । पावला विधाता पूर्णबोधें ॥२५॥

सृष्टिपूर्व गुह्यज्ञान

पुढीं सांठविले बुद्धिबळ । तेजि खेळतां विस्तारिले खेळ ।
तेवीं पूर्वसृष्टी सकळ । ब्रह्मा तत्काळ विस्तारी स्वयें ॥२६॥

पूर्ण पावोनि समाधान । श्रीनारायणाचें चरण ।
वंदिता जाला चतुरानन । उल्हासे पूर्ण पूर्णानंदबोधें ॥२७॥

हे कल्पादीची गुह्यज्ञानकथा । येणें ज्ञानसंपन्न जाला विधाता ।
तेचि कथा ऐकतां आतां । साधका तत्त्वतां लाभ काय ॥२८॥

सृष्टीपूर्वील कथा जीर्ण । जीर्णपणें वीर्यक्षीण ।
परीक्षिती तूं ऐसें न ह्नण । हे नित्य नूतन टवटवीत ॥२९॥

कल्पादीचा हा दिनकर । वृद्धपणें अतिजर्जर ।
याचेनी नलोटे अंधकार । ऐसा विचार मूर्खही नकरी ॥७३०॥

बहुकाळ ठेविला पुरोनी । अग्निहोत्रींचा जुना अग्नि ।
ह्नणोनी ठेवूं जातां वळचणीं । धडधडी तत्क्षणीं नित्य नूतनत्वें ॥३१॥

तेवीं कल्पादि हें गुह्यज्ञान । गुरुमुखें ऐकतां सावधान ।
साधक होती ज्ञानसंपन्न । यालागीं नित्य नूतन कथा हे ॥३२॥

स्वभूस्वयंभूगुह्यज्ञान । ऐके परिक्षिती सावधान ।
सुखरुप होईजे आपण । यालागीं नित्य नूतन कथा हे ॥३३॥

कथा नित्य नूतन आणि गोड । निर्दळी दैन्य दुःख दुर्वाड ।
साधका नित्य सुरवाड । पुरवी कोड श्रोतयाचें ॥३४॥

ऐसी नित्य नूतन सुखरुपता ।
हरिस्रष्टयांची ज्ञानकथा हे सृष्टीपूर्वील व्यवस्था ।
कैसेनी हाता आली पैं ॥३५॥

Leave a Comment