शुकयोगींद्र

श्रीव्यासांनीं आपला पुत्र शुकयोगींद्र यांना आपल्यासारखेंच ‘ ज्ञानी ’ केले

जंव अर्थाअर्थी चोखडी गोडी । तंव अतिशयें अतिआवडी ।
श्रीशुकाची पडली उडी । सर्वांगी चोखडी चाखिली चवी ॥२५॥

ऐसा देखोनी अधिकार । श्रीव्यासें निजकुमर ।
उपदेशिला शुकयोगींद्र । जो ज्ञाननरेंद्र योगियांचा ॥२६॥

जो ब्रह्मचर्यशिरोमणी । जो भक्तांमाजीं अग्रगणी ।
जो योग्यांचा मुकुटमणी । सज्ञान चरणीं लागती ज्याचे ॥२७॥

जो सुखरुपें रुपा आला । की शांतिरसाचा ओतिला ।
निखळ विज्ञानाचा घडला । स्वयें साकारला परब्रह्मरुप ॥२८॥

त्याच्या देहाची पाहतां शोभ । ब्रह्मज्ञानी निघाले कोंब ।
तो ज्ञानाचा पूर्णबिंब । स्वयें स्वयंभ पूर्णब्रह्म ॥२९॥

दशलक्षण श्रीव्यासोक्ती । चतुःश्लोकीचे अर्थप्राप्ती ।
श्रीशुकाची निजस्थिती । झाली निश्चितीं परब्रह्मरुप ॥३०॥

यापरी श्रीशुक्र आपण । स्वयें झाला स्वानंदघन ।
त्या आनंदाचें समाधान । पाहोनि पूर्ण समाधिस्थ झाला ॥३१॥

नाहीं वृत्तिधैर्यधारणा । आपेंआप सहजें जाणा ।
समाधी आली समाधाना । सुखरुपें पूर्णार्णवबोध झाला ॥३२॥

समाधी आणि उत्थान । दोहीं अवस्था गिळूनी जाण ।
शुक्र आपणिया आपण । सुखरुपें पूर्ण प्रबोध पावे ॥३३॥

दहा हजार वर्षे श्रीशुक समाधि अवस्थेंत

ते समाधीचा अवबोध । शुकासी वाटे निमिषार्ध ।
बाहेर लौकिक प्रसिद्ध । दशसहस्त्राब्द पुराणगणना ॥३४॥

दशसहस्त्रवर्षेपर्यत । श्रीशुक होता समाधिस्थ ।
ऐसी महापुराणें गर्जत । शुकासी वाटत निमिषार्ध पैं ॥३५॥

यालागीं स्वरुपीं निर्वाही । सर्वथा रीघ मना नाहीं ।
मुख्य काळचि जेथें नाहीं । काळगणना तेठायीं । ठसावे कोणा ॥३६॥

लवनिमिषपळेंपळ । साधूनियां समाधि त्रिकाळ ।
हें मायामय मृगजळ । स्वरुपीं अळुमाळ स्पर्शलें नाहीं ॥३७॥

जो सूर्यापासीं स्वयें राहे । त्यासी उदयास्त भेटों नलाहे ।
तेवीं स्वरुपीं जो निमग्न होये । त्यासी काळाची सोये स्वप्नीहि नलगे ॥३८॥

काळगणनाप्रसिद्धी । हे लौकिकी जाण त्रिशुद्धी ।
स्वस्वरुपींचा संबंधी । काळाची अवधी निः शेष नपवे ॥३९॥

जें जें आकारासी आलें । तें तें जाण काळें ग्रासिलें ।
काळासी ज्यानें सबाह्य व्यापिलें । तेथें काळाचेंही गेलें काळत्व सगळें ॥९४०॥

ते स्वरुपी निजनिर्वाही । शुक समाधिस्थ जाहला पाही ।
मां काळगणना तेठायीं । कैंची काई सांगावी पां ॥४१॥

यालागीं समाधि आणि उत्थान । हें अपक्वासीच घडे जाण ।
पूर्वाच्या अंगा लक्षण । अणुप्रमाण असेचिना ॥४२॥

पूर्णाची लक्षितां लक्षणें । थोटावली अवधी पुराणें ।
वेद ‘ नेति नेति ’ म्हणे । तेथें माझें बोलणें सरे केवीं ॥४३॥

पूर्णयोगी प्रारब्धवशें । लौकिकीं जैसा तैसा दिसे ।
तेही पूर्णस्थिती तो असे । कांहीं अनारिसें करी ना करवी ॥४४॥

ब्रह्मस्वरुप श्रीशुक व्युत्थानदर्शेत येतांच परीक्षितीच्या घरीं आले

यापरी शुकाची समाधि जाणा । स्वयें आली समाधाना ।
तैंच परीक्षितीच्या सदना । विचरतां त्रिभुवना अवचट आला ॥४५॥

बाप भाग्य परीक्षिती । ब्रह्मनिधी लागला हातीं ।
ब्रह्मज्ञानाची ऐसी ख्याती । घातली जगतीं ज्ञानपव्हे ॥४६॥

Leave a Comment