आरती दत्तात्रयप्रभूची ।
करावी सद्‌भावें त्याची ॥ धृ. ॥

आरती दत्तात्रयप्रभूची ।
करावी सद्‌भावें त्याची ॥ धृ. ॥
श्रीपदकमला लाजविती ।
वर्तुल गुल्फ रम्य दिसती ॥
कटिस्थित कौपिन ती वरती ।
छोटी अरुणोदय वरि ती ॥ चाल ॥
वर्णूं काय तिची लीला ।
हीच प्रसवली, मिष्टान्न बहु, तुष्टचि झाले,
ब्रह्मक्षेत्र आणि वैष्य शुद्रही सेवुनियां जीची ॥
अभिरूची सेवुनियां ॥ १ ॥
गुरुवर सुंदर जगजेठी ।
ज्याचें ब्रह्मांडे पोटीं ।
माळा सुविलंबित कंठी ।
बिंबफळ रम्य वर्णूं ओष्ठी ॥ चाल ॥
अहा ती कुंदरदनशोभा ।
दंडकमंडलू, शंखचक्र करिं, गदापद्म धरि,
जटामुकुट परि, शोभतसे ज्याची ॥
मनोहर शोभतसे. ॥ २ ॥
रुचिरा सौम्य युग्मह्रष्टी ।
जिनें द्विज तारियला कुष्टी ॥
दरिद्रे ब्राह्मण बहु कष्टी ।
केला तिनेंच संतुष्टी ॥ चाल. ॥
दयाळा किती म्हणूनि वर्णू ।
वंध्या वृंदा, तिची सुश्रद्धा, पाडुनि बिबुधची,
पुत्ररत्न जिस देउनिया सतिची ॥
इच्छा पुरविली मनिंची ॥ ३ ॥
देवा अघटित तव लीला ॥
रजकही चक्रवर्ती केला ॥
दावुन विश्वरुप मुनिला ।
द्विजादरशूल पळें हरिंला ॥ चाल. ॥
दुभविला वांझ महिषी एक ।
निमिषामाजी, श्रीशैल्याला तंतुक नेला,
पतिताकरवी, वेद वदविला, महिमा अशी ज्याची ॥
स्मराही महिमा. ॥ ४ ॥
ओळखुनि क्षुद्रभाव चित्ती ।
दिधलें पीक अमित शेती ॥
भूसर एक शुष्क वृत्ती ॥
क्षणार्धे धनद तया करिती ॥ चाल. ॥
ज्याची अतुल असे करणी ।
नयन झांकुनी, सर्वे उघडितां नेला काशिस,
भक्त पाहातां वार्ता अशि ज्याची ॥
स्मरा हो वार्ता अशि ज्याची ॥ ५ ॥
दयाकुल औदुंबरि मुर्ती ।
नमितां होय शांतवृत्ती ॥
न देती जननमरण पुढती ।
सत्य हे न धर मनि भ्रांति ॥ चाल ॥
सनातन सर्वसाक्षी ऎसा ।
दुस्तर हा भव, निस्तरावया, जाउनि स्त्वर,
आम्ही सविस्तर, पूजा करुं त्याची ॥
चला हो पूजा करुं त्याची ॥ ६ ॥
तल्लिन होउनि गुरुचरणीं ।
जोडुनि भक्तराजपाणी ॥
मागे हेंचि जनकजननी ।
अंती ठाव देऊ चरणीं ॥ चाल. ॥
नको मज दुजे आणिक कांही ।
भक्तवत्सला, दीनदयाळा, परम कृपाळा, दास नित्य याची ॥
उपेक्षा करूं नको साची ॥ ७ ॥