वाचतांना आपल्या डोळयांची काळजी कशी घ्यावी ?


मुलांनो, ‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. दिवसभरात निरनिराळ्या कारणांसाठी आपल्याला वाचन करावेच लागते. अभ्यास, वर्तमानपत्र, गोष्टींची पुस्तके, बाहेरगावाहून आलेली पत्रे, संगणक हाताळतांना इत्यादी. हे वाचन करतांना पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या, तर छोटी छोटी दुखणी टाळता येतील.

वाचन करतांना घ्यावयाची काळजी

अ. वाचन नेहमी ताठ बसून करावे.

आ. वाचतांना पटल (टेबल) आणि आसंदी (खुर्ची) स्थिर असावी, तसेच पुस्तक आणि डोळे यांतील अंतर ३० ते ३५ सें.मी. इतके असावे.

इ. वाचण्याच्या खोलीत भरपूर प्रकाश असावा. शक्यतो पुस्तकावर प्रकाश मागून आणि डाव्या अंगाने (बाजूने) असावा, म्हणजे उजव्या हातात पुस्तक धरून वाचतांना बोटांची सावली पडणार नाही.

ई. वाचन, टंकलेखन, चित्र काढणे, शिवणकाम इत्यादी बराच वेळ करायचे असल्यास प्रत्येक १५-२० मिनिटांनंतर दूरच्या एखाद्या वस्तूवर दृष्टी थोडा वेळ स्थिर करावी किंवा डोळे १ ते २ मिनिटे बंद करावेत किंवा एखाद्या वस्तूवर ध्यान करावे.

उ. डोळ्यांवर ताण येऊ नये; म्हणून अधून मधून ते थंड पाण्याने धुवावेत, तसेच डोळ्यांचे व्यायामही प्रतिदिन करावेत.