नरसोबाची वाडी


मिरज-कोल्हापूर लोहमार्गावरील जयसिंगपूर या पहिल्याच स्टेशनवर उतरून आठ मैलावर कृष्णा-पंचगंगा-संगमावर हे ठिकाण लागते. वाडी हे नावाप्रमाणेच एक खेडेगाव आहे. सर्व वस्ती कृष्णेच्या काठावर एकवटली आहे. कृष्णेच्या घाटावरच दत्त पादुका मंदिर आहे. वाडीचा कृष्णाघाट प्रशस्त आहे.

श्रीनरसिंह सरस्वती औदुंबरचा चातुर्मास संपवून इथे आले आणि बारा वर्षें इथे राहून पुढे गाणगापूरला गेले. श्रीगुरुंच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या तीरावरील भूमीला आवेगाने मिठी देण्याची तिलाही जणू ओढ असावी. पादुकांच्या समोरून कृष्णा वाहत चालली आहे आणि जवळूनच उजव्या बाजूने पंचगंगा धावत आली आहे. दत्त दर्शनाचा आनंद पंचगंगेच्या हृदयी रिचवण्याची जणू कृष्णेला घाई झाली आहे आणि जवळच, एक फर्लाग अंतरावर, तिनें पंचगंगेशी मिळणी साधली आहे.

इथे बारा वर्षे राहून, अनेक दीनदलितांच्या जीवनांत समाधानाचे नि सुखाचे मळे फुलवून, अनेकांची संकटें दूर सारून ते पुढें गाणगापूरला गेले. कृष्णेच्या पैलतीरावर औरवाड आणि गौरवाड या नांवाची दोन गांवे आहेत. ही गांवे विजापूरच्या आदिलशहाने वाडीच्या दत्तपूजेसाठी इनाम दिलेली होती. यांपैकी औरवाड म्हणजेच गुरुचरित्रांतील अमरापूर. या अमरापुरांत अमरेश्वर नांवाचे शिवस्थान आहे. या अमरापुराचा आणि त्याच्या कृष्णापंचगंगा-संगमाचा महिमा गुरुचरित्रांत असा वर्णिला आहे :

पंचगंगा नदीतार। प्रख्यात असे पुराणांतर।
पांच नामें आहेति थोर । सांगेन ऐका एकचित्तें।।
शिवा भद्रा भोगावती । कुंभी नदी सरस्वती।
पंचगंगा ऐसी ख्याति । महापातक संहारी।।
ऐसी प्रख्यात पंचगंगा। आली कृष्णेचिया संगा।
प्रायगाहूनि असे चांगा। संगमस्थान मनोहर।।
अमरापुर म्हणिजे ग्राम । स्थान असे अनुपम।
जैसा प्रयाग संगम। तैसें स्थान मनोहर।।
वृक्ष असे औदुंबरु । प्रत्यक्ष जाणा कल्पतरु।
देव असे अमरेश्वरु । तया संगमा षट्‍कूळीं ।।

नदीच्या बाजूने घाटाच्या पहिल्या टप्प्यावरच लहानसे दत्त पादुकामंदिर आहे. या पादुकांना ‘मनोहर पादुका’ अशी संज्ञा आहे. मंदिराच्या मागे औदुंबराचा पार आहे. दुपारी बारा वाजता या मनोहर पादुकांची महापूजा होते. महापूजेच्या वेळी पुजारी पादुकांवर लोटीभर दूध ओततात आणि त्यानंतर त्या अमृताच्या अभिषेकानें मनोहर पादुका दर्शनेच्छूंच्या डोळ्यात भरतात.

घाटाच्या अखेरच्या टप्प्यावर श्रीवासुदेवानंद सरस्वतींचें स्मृतिमंदिर आहे. वाडीचें दत्तस्थान हेंच वासुदेवानंदाचें प्रेरणास्थान होय. त्यांच्या स्मृतिमंदिरामागें श्रीगुरूंशीं समकालीन असलेले श्रीरामचंद्रयोगी यांचें स्मृतिस्थान आहे आणि उजव्या हाताला ओळीने नारायणस्वामी, काशीकरस्वामी, गोपाळस्वामी, मौनीस्वामी या तपोनिधींची स्मारकें आहेत. त्यांच्या तपानें आणि चिरविश्रांतीनें कृष्णाकांठ पुनीत झाला आहे. मुक्तेश्वरानें भावार्थ रामायणाचें उत्तरकांड याच पवित्र स्थानीं रचले.