माहूर – दत्तात्रेयांचे शयनस्थान


हे स्थान मराठवाड्यात ( ता. किनवट, जि. नांदेड) आहे. पुराणात हे दत्ताचें शयनस्थान असल्याचे सांगण्यात आले आहे. बाराव्या शतकांतील दत्तभक्त चांगदेव राऊळ यांना येथेंच दत्त साक्षात्कार झाला चांगदेव राऊळांच्याही पूर्वी या स्थानाची विशेष प्रसिद्धी होती. हे एक शक्तिपीठही आहे. परशुरामाची आई रेणुका येथे सती गेली, असे पुराणात म्हटले आहे. गुरुचरित्रात या स्थानाचे ओझरते उल्लेख आहेत.

माहूरच्या एका स्त्रीचा पती श्रीगुरूंनी संजीवित केला, अशी कथा गुरुचरित्रात (अ. 30) आहे. महानुभाव संप्रदायांत माहूराचा महिमा विशेष आहे. 'स्थानपेथी'च्या काही प्रतीत तेराव्या शतकांतील माहूरविषयी विस्तृत वर्णन आले आहे. अलीकडच्या काळात विष्णुदासांचा निवास माहूर येथे होता. दासोपंतांनी बारा वर्षे या ठिकाणी तप करून दत्तप्रभूला प्रसन्न करून घेतले होते.

माहूरच्या तीर्थमहिम्यात देवदेवेश्वर (महानुभावीय दत्तस्थान), रेणुकादेवी, अनसूया, दत्तात्रेय या देवांची मंदिरे आणि अमृतकुंड, सर्वतीर्थ, कमलतीर्थ, शिखर ही स्थानें महत्त्वाची गणली जातात. दत्तात्रेयाचे मंदिर माहूरपासून सहा मैलांवर एका शिखरावर आहे. महंत मुकुंदभारती या नावाच्या महंतांनीं सध्याचे मंदिर सन 1297 मध्ये बांधले. मूळ मंदिर फक्त 10' X12' या आकाराचे आहे. त्यानंतर भोवतींच्या ओवऱ्या व प्राकार यांची बांधणी झालेली आहे.

या देवस्थानाला औरंगजेबाकडून अनेक जहागिर्‍या मिळालेल्या आहेत. देवस्थानाचे वार्षिक उत्पन्न पन्नास हजारांवर आहे. 'माळवातीर्थ' म्हणून ओळखलें जाणारें तीर्थ म्हणजे महानुभावीय साहित्यात व ज्ञानेश्वरांच्या अभंगांत उल्लेखिलेला मेरुवाळा तलाव होय.