चाणक्य कौटिल्य


आचार्य चाणक्याकडेम्हणे कोणीतरी एक चिनी प्रवासी आला होता. ज्यावेळी तो भेटायला आला त्यावेळी हा विष्णुगुप्त (चाणक्य कौटिल्य) लिहित बसलेला होता. त्याकाळी मोठे दिवे नव्हते, वीज नव्हती, आपल्याला ज्ञात आहे. तेलाचे दिवे लावलेले असत. त्या तेलाच्या दिव्यामध्ये विष्णुगुप्त लिहित बसलेला होता. संध्याकाळचा समय होऊन गेलेला होता. काही महत्वाची कागदपत्रे लिहित होता. लिहित असताना तो चिनी आला, त्याचेआचार्य चाणक्यानेस्वागत केले, त्याला बसवले, आणि मग आपल्या हातातले लेखन कार्य विष्णुगुप्ताने पूर्ण केले. पूर्ण केल्यानंतर त्याने काय केले? त्याच्यासमोर दोन दिवे होते. एक प्रज्वलित झालेला होता व एक तसाच होता. चाणक्याने प्रथम आपल्या समोरचा दिवा विझवला आणि दुसरा दिवा प्रज्वलित केला. त्यावेळी तो चिनी प्रवासी कुतुहलाने पाहू लागला. हे असे कशासाठी करतो आहे चाणक्य? त्याला असे वाटले की बहुधा भारतातील ही प्रथा असावी. पाहुणा आला की बहुधा असे करत असावेत. मग कुतुहलाने त्याने प्रश्न विचारला चाणक्याला, 'आपल्याकडे प्रथा आहे का की पाहुणा आला की असे करावे?' एक दिवा विझवायचा आणि दुसरा लावायचा?.

तेव्हा चाणक्य म्हणाला, 'असे नाही. मी ज्या दिव्याच्या प्रकाशात आत्ता काम करत होतो ते माझ्या राज्याचे काम होते, माझ्या राष्ट्राचे काम होते आणि त्या दिव्यामध्ये जे तेल भरलेले होते ते राष्ट्राच्या पैशातून भरलेले आहे. आता मी तुमच्याशी संवाद करणार हा माझा व्यक्तिगत संवाद असेल. हा संवाद राष्ट्राचा नाही! ते राष्ट्राचे तेल वाया जाऊ नये म्हणून मी तो दिवा विझवला, आणि दुसऱ्यात माझ्या स्वकष्टाचे तेल घातले आहे. म्हणून तो दुसरा दिवा पेटविला.'

आमचे आचार्य एवढ्या उंचीवर होते हे पाहून मन थक्क होऊन जाते. इतक्या उंचीवर जाऊन पोहोचलेली ही माणसे पाहिली की काही वेळेला असे वाटते की आम्ही त्यांना अंशतः का होईना अनुसरले पाहिजेच. किती शुध्द वागणे, किती शुध्द आचार, किती शुध्द मन, किती शुध्द चित्त आणि अंतःकरण असेल ! आपल्या मनाशी आपण जरा कल्पना करून पाहा. या आचार्यांना कोणती पदवी द्यावी? कोणत्या स्तराला आणि कोणत्या अत्युच्च वैचारिक बैठकीवर हे आरूढ झालेले आहेत, त्याला काय म्हणावे? आमची माणसे केव्हा शिकतील? राज्यकर्त्यांनी खरे तर यातून शिकले पाहिजे ! पण दुर्दैवाने कोणी शिकत नाही.

संदर्भ :दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment