महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर

पुण्यात घडलेली एक अपूर्व घटना आहे – ज्यांच्या नावाने 'प्राच्य विद्या संशोधन संस्था' आज पुण्यामध्ये आहे त्या भांडारकरांना फर्ग्यूसन महाविद्यालयात एक व्यक्ती शिकवायला हवी होती. त्यांनी वाईला, कोकणात, माहुलीला निरोप पाठवला. कारण तिथे उत्तम वेदपाठशाळा आहेत हे त्यांना माहित होते आणि तिथून ज्ञानसंपन्न होऊन कोणीतरी व्यक्ती यावी आणि त्यांनी फर्ग्यूसन महाविद्यालयात शिकवावे अशी इच्छा धारण करून भांडारकरांनी तिन्हीकडे निरोप दिला. निरोप दिल्यावर माहुलीहून एका शास्त्रीबुवांनी त्यांचा पट्टशिष्य पाठवला. तो पुण्यात आला आणि भांडारकरांपुढे जाऊन उभा राहिला. त्यावेळी ते म्हणाले, 'बाळ, तू का आलास?' त्यावेळी त्याने आपल्या सद्गुरूंचे नाव सांगितले. आणि म्हणाला, 'फर्ग्यूसन महाविद्यालयात एक संस्कृत प्राध्यापकाची जागा रिकामी आहे असे माझ्या सद्गुरूंना आपण सांगितलेत म्हणून त्यांनी मला पाठवले आहे.'

भांडारकरांनी त्याच्याकडे पाहिले, १८-१९ वर्षाचा हा तरुण काय शिकवेल ? त्यांना मनाशी नवल वाटले! ते म्हणाले, 'बाळ, ठीक आहे, तुला आता पाठवले आहे खरे, तू दोन दिवस राहा पुण्यात. मी तुझ्या विद्येची चाचणी घेणार आहे' आणि मग दोन तीन दिवसानंतर पुण्यातले नामांकित विद्वान गोळा झाले. अन त्या तरुणाची परीक्षा घेतली गेली. जसे प्रश्न विचारावेत तसे भराभर त्यांची उत्तरे तो तरुण देत होता, आणि समोरचे परीक्षक आश्चर्यचकित होत होते. मग वेदांतले काही विचारा, सिद्धांत कौमुदीतले काही विचारा, महाभाष्य विचारा, योगदर्शनावर विचारा, सगळे याला ज्ञात आहे आणि विस्तार करून सांगण्याची याची पात्रता आहे असे हळूहळू लक्षात यायला लागले आणि मग लघुसिद्धांत कौमुदी म्हणत असताना एकदा भांडारकरांनी शलाका-न्याय पद्धतीने एक पान उलगडले आणि काही सूत्रे म्हणायला प्रारंभ केला, त्यावेळी तो तरुण एकदम मध्ये बोलला, 'गुरुवर्य, क्षमा करा. कदाचित अनवधानाने राहिले असेल पण मधे चार सूत्रे आपण म्हणायची विसरलात. ती सूत्रे येणेप्रमाणे आहेत' आणि त्याने ती सूत्रे म्हणून दाखवली. ५-६ तास अशी परीक्षा चालली होती. शेवटी भांडारकरांच्या नेत्रात अश्रू उभे राहिले. आणि काय केले असेल भांडारकरांनी – त्या माणसाचे काळीज केवढे मोठे असले पाहिजे – त्यांनी त्या तरुणाला नमस्कार केला आणि ते म्हणाले, 'बाळा, अरे आम्ही काय तुझी परीक्षा घेणार? तुझे वय लहान असेल, आम्ही वयाने मोठे असू; पण तू ज्ञानाने जितका वृद्ध आहेस तितका मी वृद्ध नाही. तुला माझा विनम्र प्रणिपात.' ज्या तरुणाला त्यांनी हे वंदन केले, ज्याने या पुण्यभूमीचा नावलौकिक वाढवला त्या महापुरुषाचे नाव 'महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर! केवढे सामर्थ्य असले पाहिजे. 'शास्त्रे वादभयं!' त्या वादात उत्तीर्ण होण्याचे सामर्थ्य काहीच महापुरुषाजवळ असतेच. पण शास्त्राला वादाचे भय असते !

Leave a Comment