सत्संगाचा महिमा टिकवण्यासाठी जडभरताने वैयक्तिक अपमानाकडे दुर्लक्ष करणे

‘एकदा राहूगण राजा पालखीत बसून कपील मुनींच्या आश्रमात जात होता. पालखीचा एक सेवक आजारी पडला. त्यामुळे राजाने सांगितले, ‘‘जो कोणी दिसेल त्याला पालखी उचलण्यासाठी घेऊन या.’’ सेवकांनी भरताला पाहिले. ‘हा चांगला तगडा जवान आहे’, असे वाटून त्यांनी त्यालाच पकडून आणले. पालखी घेऊन जात असतांना राजाने भरताचा अपमान केला. तो म्हणाला, ‘‘तू नीट चालत नाहीस. वाकडा-तिकडा चालतोस, त्यामुळे मला पालखीत पुष्कळ त्रास होतो.’’ एकदा राजाचे डोके पालखीच्या लाकडावर आपटले. त्या वेळी राजाने भरताला सांगितले, ‘‘तुला मी दंड करीन.’’ वास्तविक राजाकडून भरताने एक दमडीसुद्धा घेतली नव्हती किंवा अन्नसुद्धा सेवन केले नव्हते, तरीपण राजाच्या अहंकारी वृत्तीने भरताला मारायला राजा प्रवृत्त झाला. भरताने विचार केला की, राजा आपल्या शरिराला मारतो, आत्म्याला काहीच होत नाही; म्हणून मी मौनच धरीन.भरताने विचार केला, ‘राहूगण राजाला मी उचलले आहे. जर राजाचा अहंकार नष्ट न झाल्यामुळे तो नरकवासी झाला, तर सत्संगाचा महिमा नष्ट होऊन जाईल.’ लोक म्हणतील, ‘‘जडभरताच्या संगतीत राहूनसुद्धा राजाला नरकवास घडला.’’ सत्संगाचा महिमा कायम राखण्यासाठी भरताने मौन सोडले आणि राजाशी बोलायला प्रारंभ केला. भरताने राजाला उपदेश केला, ‘‘राजा कल्याण होवो. तू कपील मुनींच्या आश्रमात उपदेश घेण्यासाठी जात आहेस; पण तुझा अहंभाव सोडून जा.’’ त्या वेळी राहूगण राजाने भरताची क्षमा मागितली; म्हणून भरताने राजाला आत्मज्ञानाची अनुभूती दिली.’

– डॉ. वसंत बाळाजी आठवले (खिस्ताब्द १९९०)

Leave a Comment