श्री गिरिजात्मजाची कथा

आपल्याला गजानन पुत्र व्हावा या इच्छेने पार्वतीने लेण्याद्रि पर्वताच्या गुहेत १२ वर्षे तपश्चर्या केली. तिच्या तपश्चर्येने गजानन प्रसन्न झाला. तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझा पुत्र होईन, तुझे व लोकांचे मनोरथ पूर्ण करीन, असा त्याने पार्वतीला वर दिला. भाद्रपद चतुर्थीला पार्वतीने गजाननाच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली. ती मूर्ती सचेतन होऊन पार्वतीपुढे पुत्र रूपाने प्रकट झाली. त्या बालकाला सहा हात, तीन नेत्र व सुंदर शरीर होते.

गिरिजात्मज गणेशाने १२ वर्षे या क्षेत्रात तप केले. अत्यंत बाल्यावस्थेतच मोठमोठ्या दैत्यांचा संहार केला व सर्वांची जाचातून सुटका केली. याच प्रदेशात गौतममुनींनी गणेशाची मुंज केली. याच प्रदेशात गणेशाचा 'मयुरेश्वर' अवतार झाला असे म्हणतात. गिरिजात्मज गणेशाने या प्रदेशात सुमारे १५ वर्षे वास्तव्य केले होते. त्यामुळे हे क्षेत्र अत्यंत पवित्र मानले जाते.

लेण्याद्री

श्री गिरिजात्मज

श्री गिरिजात्मज

अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री श्री गिरिजात्मज. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जिर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पाय-या आहेत.

लेण्याद्रीचा श्री श्री गिरिजात्मज हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.