श्री सिद्धिविनायकाची कथा

सिद्धटेक हे स्थान भीमा नदीच्या काठावर आहे. या स्थानाला सिद्धटेक असे का म्हणतात व येथील गणेशाला सिद्धिविनायक असे नाव का पडले यासंबंधी एक पौराणिक कथा आहे ती अशी..

फार प्राचीन काळी, एकदा ब्रह्मदेवाला वाटले, आपण सृष्टीरचना करावी. यासाठी त्याने गणेशाच्या आज्ञेनुसार तपश्चर्या सुरु केली. गणेशाने त्याला एकाक्षरमंत्राचा जप दिला होता. ब्रह्मदेवाच्या उग्र तपश्चर्येने गणेश प्रसन्न झाला व 'तुझ्या सर्व मनःकामना पूर्ण होतील' असा ब्रह्मदेवाला त्याने वर दिला. मग ब्रह्मदेवाने सारी सृष्टी निर्माण केली. त्या वेळी क्षीरसागरात गाढ झोपलेल्या भगवान विष्णूच्या कानातून मधु व कैटभ हे दोन राक्षस निर्माण झाले. त्यांनी ब्रह्मदेवास त्रास देण्यास सुरुवात केली. सारी पृथ्वी भयभीत झाली. तेव्हा सर्व देवांनी भगवान विष्णूला जागे केले. विष्णूचे व मधु-कैटभांचे घनघोर युद्ध झाले. पाच हजार वर्षे युद्ध चालले, तरी विष्णू त्या दैत्यांना मारू शकला नाही; म्हणून तो शंकराकडे गेला. युद्धारंभी तू गणेशाचे स्तवन केले नाहीस, म्हणून तुला विजय मिळत नाही, असे शंकर म्हणाले. तेव्हा विष्णू एका पवित्र टेकडीवर आला. तेथे त्याने 'श्रीगणेशाय नमः' या षडाक्षर मंत्राने गणेशाची आराधना केली. त्या तपश्चर्येने विनायक (गणेश) प्रसन्न झाला. विनायकाच्या कृपेने विष्णूला सिध्दी प्राप्त झाली. मग त्याने मधु-कैटभांना ठार केले. विष्णूला विनायक ज्या ठिकाणी प्रसन्न झाला व ज्या ठिकाणी सिध्दी प्राप्त झाली, त्या ठिकाणी विष्णूने एक मोठे मंदिर बांधले व त्यात गंडकीशिलेची विनायकाची मूर्ती स्थापन केली. या ठिकाणी विष्णूची कार्यसिद्धी झाली, म्हणून या स्थानाला सिद्धटेक असे म्हणतात व येथील विनायकाला 'श्रीसिद्धिविनायक' असे म्हणतात. या वेळेपासून सिद्धटेक हे स्थान गणेशाचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.

कालांतराने ते मंदिर नष्ट झाले. पुढे एका गुराख्याला या टेकडीवर विनायकाने दृष्टांत दिला. तो गुराखी रोज भीमा नदीच्या पाण्याने गणेशाला स्नान घालीत असे व आपल्या शिदोरीचा नैवेद्य दाखवीत असे. तेव्हा गणेशाने त्याला सांगितले. तू स्वतः माझी पूजा न करता एखाद्या ब्राह्मणाकरवी कर. तेव्हा त्याने पुरोहित नावाच्या ब्राह्मणाकडून श्रींची पूजा सुरु केली. पुढे पेशवे काळात येथे मंदिर बांधण्यात आले, अशी एक आख्यायिका आहे.

सिद्धटेक

श्री सिद्धिविनायक

श्री सिद्धिविनायक

सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जिर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरूड यांच्या प्रतिमा आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून ९९ कि. मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून १४२ कि. मी. अंतरावर आहे.

मंदिर उत्तराभिमुख असून गाभारा मात्र प्रशस्त आहे. जवळच भीमा नदी असल्याने या नदीच्या परिसरात सुंदर घाट बांधण्यात आले आहेत. जवळच विष्णू, शिवाई, महादेव आदि देवांची मंदिरे आहेत.