`हिंमत असेल तर माझ्यावर गोळी चालवा’ – शिरीषकुमार


पाताळगंगा नदीच्या काठी चार डोंगराच्या कुशीत वसलेल्या नंदनगरी अर्थात नंदुरबार शहराची पूर्वापार ओळख ही व्यापाऱ्यांची वसाहत म्हणूनच. या गावात १९२६ मध्ये एका व्यापाऱ्याच्या घरात शिरीषकुमारांचा जन्म झाला. त्याच्यासह पाच संवगड्यांनी स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती दिली. त्यामुळे या गावाचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले. नंदुरबार हे आता कुठे अंदाजे एक लाख लोकसंख्येचे छोटेसे गाव आहे. परस्परांना ओळखणारे आणि स्नेह जाणणारे लोक आहेत. घराघरांतून चालणारा व्यापार आणि देवाणघेवाण हे महत्त्व जाणून पूर्वापार अनेक ज्येष्ठ प्रवाशांनी या गावाला भेटी दिल्या आहेत. प्रसिद्ध प्रवासी ट्‌वेनियरने १६६० ला श्रीमंत आणि समृद्धनगरी असे नंदुरबारचे वर्णन केले आहे, तर नंद नावाच्या गवळी राजाने हे गाव वसविल्याची आख्यायिका आहे. ऐन-ए-अकबरी (इ.स. १५९०) मध्ये नंदुरबारचा उल्लेख किल्ला असलेले आणि सुबक घरांनी सजलेले शहर असा आहे.

नंदुरबारमध्ये बाळा शंकर इनामदार नावाचे एक व्यापारी होते. त्यांचा तेलाचा व्यापार होता. त्यांना मुलगा नसल्याने ते काहीसे दु:खी होते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी दुसरा विवाह केला. त्यांना कन्याप्राप्ती झाली. ही कन्या त्यांनी पुष्पेंद्र मेहता यांना सोपवली. १९२४ ला पुष्पेंद्र व सविता यांचा विवाह झाला. २८ डिसेंबर १९२६ ला या दांपत्याच्या पोटी, मेहता घराण्यात शिरीषकुमारचा जन्म झाला. या काळात देशातील अन्य गावे व शहरांप्रमाणेच नंदुरबारचेही वातावरण स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेने भारलेले होते. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सामान्यांनी काय करायचे तर हाती तिरंगा झेंडा घेऊन प्रभातफेरी, मशाल मोर्चे काढायचे. देशप्रेमांनी ओतप्रोत घोषणा द्यायच्या! नंदुरबारमधील अशा कामात मेहता परिवाराचा सहभाग होता. शिरीष वयपरत्वे शाळेत जाऊ लागला होता आणि त्याच्यावर महात्मा गांधी व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मोठा प्रभाव होता. त्या काळात "वंदे मातरम्‌' आणि "भारत माता की जय' असा जयघोष करणाऱ्या कोणालाही पोलिस अटक करू शकत होते.

नहीं नमशे, नहीं नमशे !

महात्मा गांधींनी ९ ऑगस्ट १९४२ ला इंग्रजांना "चले जाव'चा आदेश दिला. त्यानंतर गावोगावी प्रभात फेऱ्या, ब्रिटिशांना इशारे दिले जाऊ लागले. बरोबर महिनाभरानंतर, ९ सप्टेंबर १९४२ ला नंदुरबारमध्ये निघालेल्या प्रभात फेरीत आठवीत शिकत असलेला शिरीष सहभागी झाला होता. गुजराथी मातृभाषा असलेल्या शिरीषने प्रभात फेरीत घोषणा सुरू केल्या, "नहीं नमशे, नहीं नमशे', "निशाण भूमी भारतनु'. भारत मातेचा जयघोष करीत ही फेरी गावातून फिरत होती. मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी पोलिसांनी अडवली. शिरीषकुमारच्या हातात झेंडा होता. पोलिसांनी ही मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले. या बालकांनी ते आवाहन झुगारले आणि "भारत माता की जय', "वंदे मातरम्‌'चा जयघोष सुरूच ठेवला. अखेर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. एका पोलिस अधिकाऱ्याने मिरवणुकीत सहभागी मुलींच्या दिशेने बंदूक रोखली. तेव्हा त्या अधिकाऱ्याला एका चुणचुणीत मुलाने सुनावले, "गोळी मारायची तर मला मार!'. ती वीरश्री संचारलेला मुलगा होता, शिरीषकुमार मेहता! संतापलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या, एक, दोन, तीन गोळ्या शिरीषच्या छातीत बसल्या आणि तो जागीच कोसळला. त्याच्यासोबत पोलिसांच्या गोळीबारात लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशिधर केतकर, घनश्‍यामदास शहा हे अन्य चौघेही शहीद झाले.