क्रांतीवीर कन्हैयालाल दत्त आणि सत्येंद्रनाथ बोस !

इंग्रजांच्या अन्यायकारक राजवटीच्या विरोधात क्रांती करणारे आणि
फितुरांना अद्दल घडवणारे क्रांतीवीर कन्हैयालाल दत्त आणि सत्येंद्रनाथ बोस !

कन्हैयालाल यांचा जन्म आणि बालपण

हिंदुस्थानवर इंग्रजांची राजवट सुरू असतांनाच साधारणतः ११४ वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. त्या दिवशी गोकुळाष्टमी असल्याने संपूर्ण हिंदुस्थानात कृष्णजन्माचा उत्सव चालू होता. कंसाच्या अन्यायी आणि अत्याचारी राजवटीचा नाश करण्यासाठी जसा श्रीकृष्णाचा जन्म झाला होता, त्याच मुहूर्तावर इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध बंड करून आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोलकाताजवळील चंद्रनगरच्या फ्रेंच वसाहतीमध्ये रहाणार्‍या'दत्त' कुटुंबात एका बालकाचा जन्म झाला होता.

संपूर्ण 'दत्त' कुटुंबात आनंदीआनंद होता. ३०.८.१८८८ रोजीचा तो दिवस होता. नामकरण विधी होऊन त्या बालकाचे नाव कन्हैया ठेवण्यात आले. कन्हैयाची बालपणाची १-२ वर्षेच चंद्रनगरातील आपल्या घरी गेली असतांनाच त्याच्या वडिलांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आपल्या कुटुंबासह मुंबई गाठली. तेथे एका खाजगी कंपनीमध्ये ते नोकरी करू लागले. कन्हैया थोडा मोठा झाल्यावर शिक्षणासाठी त्याच्या वडिलांनी त्याचे नाव आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत दाखल केले. लहानपणापासूनच त्याला व्यायामाची आवड होती. त्याची शरीरयष्टी सडपातळ; परंतु काटक होती. त्याने लहानपणापासूनच लाठी चालवण्याची कसब अवगत केली होती. कन्हैयाच्या बालमनाला सैनिकी शिक्षणाचेही अत्यंत आकर्षण होते.

इंग्रज राजवटीतील अन्यायकारक घटनांचा कन्हैयाच्या
तरुण मनावर परिणाम होणे आणि त्यानंतर क्रांतीकारकांशी परिचय होणे

बाल कन्हैया आता युवा कन्हैया झाला होता. जसे वय वाढले, तशी कन्हैयामध्ये आणखी काही गुणांची भर पडली. त्याची प्रगल्भता वाढली. घरात होणा-या सुसंस्कारांमुळे, तसेच आजूबाजूला असलेल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे अवलोकन केल्यावर पदोपदी इंग्रज राजवटीतील अन्यायकारक घटना कन्हैयाच्या तरुण मनावर परिणाम करीत होत्या. कोलकातामधील 'युगांतर' समितीच्या कार्यकर्त्यांशी कन्हैयालालजींचा परिचय झाला. युगांतरच्या अरविंद घोष, बारींद्र घोष, उल्हासकर दत्त आणि सत्येंद्रनाथ बोस अशा अनेक जाज्वल्य देशाभिमानी वीरांच्या सहवासाने कन्हैयालालजी हिरीरीने क्रांतीकार्यात सहभागी होऊ लागले. त्यांच्या आवडत्या प्राध्यापक चारुचंद्र रॉय यांनी इतिहासाच्या व्यतिरिक्त बंदूक चालवण्याचे उत्तम शिक्षणही कन्हैयालालजींना दिले. मुष्टीयुद्धही त्यांनी आत्मसात केले होते. इंग्रज सरकारच्या विरोधात जनमत बनवण्याचे कन्हैयालालजींचे कार्य सदैव चालू असायचे. चंद्रनगर येथील फ्रेंच वसाहतीमध्ये बाहेरून होत असलेला शस्त्रपुरवठा तेथील मेयरच्या लक्षात आला होता. त्याविरुद्ध त्या मेयरने निर्बंध घातला होता. त्यामुळे क्रांतीकारकांना अनेक अडचणी निर्माण झालेल्या होत्या. शेवटी त्या क्रांतीकारकांनी ठरविले, त्या 'मेयरला ठार मारायचे.' १८.४.१९०८ रोजी मेयरच्या घरावर बाँब टाकून त्याला मारण्यासाठी युगांतर समितीच्या नरेंद्र गोस्वामी आणि इंद्रभूषण राय या कार्यकर्त्यांनी हे दायित्व स्वीकारून तसा प्रयत्न केला; परंतु मेयर त्यातूनही नशिबाने वाचला. पोलिसांच्या तपासात काही दिवसांनंतर नरेंद्र गोस्वामी आणि इंद्रभूषण राय पकडले गेले. पोलिसांनी पकडल्यानंतर 'क्रांतीकारकाची अवस्था कशी होते', हे दाखवल्याने शेवटी नरेंद्र गोस्वामी पोलिसांच्या गळाला लागला. पोलिसांच्या छळापासून मुक्तता आणि कारागृहात असेपर्यंत सर्व सुखसोयी मिळाव्या या अटींवर तो माफीचा साक्षीदार झाला. त्याने सर्व क्रांतीकारकांबद्दलची माहिती पोलिसांना सांगितली आणि आपल्या सहकार्‍याचा विश्वासघात केला.

नरेंद्र गोस्वामीने दिलेल्या माहितीच्या आधारे
इंग्रजांनी इतर क्रांतीकारकांना पकडणे

नरेंद्र गोस्वामीने दिलेल्या माहितीच्या आधारे वेगाने तपास करत असतांनाच त्यांना जी काही माहिती मिळाली, त्याच्या आधारे इंग्रज अधिकारी सावधानता बाळगत हिंदुस्थानच्या वंग क्रांतीकारकांना पकडण्याचे अथक प्रयत्न करत होते. तेव्हाच ३० एप्रिलला खुदीराम बोस आणि प्रफुल्लचंद्र चाकी या दोन वंगवीरांनी मुझफ्फरपूरच्या किंग्जफोर्डला बाँबने ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. चंद्रनगरची घटना आणि किंग्जफोर्डवरील आक्रमण या दोन घटनांच्या अनुषंगाने तपास चालू असतांनाच इंग्रज अधिकार्‍यानी नरेंद्रकडून त्यांना मिळालेल्या माहितीवरून कोलकातामधील १३४ हॅरीसन रोड येथील एका घरावर, तसेच माणिकतोळा उद्यानाजवळील एका घरावर धाड घातली असता एक सुसज्ज बाँब कारखानाच त्यांना आढळला. २.५.१९०८ रोजी त्याच आधारे युगांतर समितीच्या बारींद्रकुमार घोष, अरविंद घोष, उल्हासकर दत्त, कन्हैयालाल दत्त आणि सत्येंद्रनाथ बोस अशा अनेक महत्त्वाच्या क्रांतीकारकांना इंग्रज अधिकार्‍यानी पकडले. या सर्वांना बंगालमधील अलीपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. या सर्व प्रमुख क्रांतीकारकांच्या अटकेमुळे बंगालमधील इंग्रज सरकारच्या विरोधात जनमत निर्मितीचे कार्य करणारे, तसेच सशस्त्र क्रांतीकारकांना त्यांच्या कार्यासाठी शस्त्रास्त्रे पुरविणारे आणि माणिकतोळा बगीच्या जवळील गुप्तरीत्या चालू असलेल्या बाँबचा कारखाना बंद पडला. जोशात असलेले क्रांतीचे वारे अचानक आलेल्या वादळाने सैरभैर होऊन बंद पडले.

नरेंद्र गोस्वामीला फितुरीची अद्दल घडवण्याचे ठरवणे

अलीपूरच्या तुरुंगात असलेल्या सर्व क्रांतीकारकांवरील खटला न्यायालयात सुनावणीस आला होता. नरेंद्र गोस्वामी फितूर होऊन माफीचा साक्षीदार झाला असल्याने त्याला इतर क्रांतीकारकांमधून काढून वेगळ्या बराकीमध्ये ठेवले होते. युगांतर समितीच्या क्रांतीवीरांमध्ये नरेंद्र गोस्वामीला फितुरीची अद्दल घडविण्याचे ठरत होते; परंतु सदैव पोलिसांच्या गराड्यात असणार्‍यानरेंद्र गोस्वामीला भेटताही येत नव्हते. त्यामुळे शेवटी कन्हैयालालजींनी आपल्याबरोबर असलेल्या सत्येंद्रनाथ बोस (खुदीराम बोस यांचे काका) यांच्या बरोबरीने एक कट रचला आणि तो प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू केले. तशातच ११.८.१९०८ रोजी खुदीराम बोस यांना फाशी देण्यात आली. त्यामुळे कन्हैयालाल आणि सत्येंद्रनाथ यांचा निर्धार अधिकच पक्का झाला.

संधी साधून कन्हैयालालजींनी
नरेंद्रगोस्वामीलाआपल्या पिस्तुलातून गोळी झाडणे

२७.८.१९०८ रोजी सत्येंद्रनाथांनी पोट दुखण्याचे कारण सांगून रुग्णालयात स्वतःला भरती करून घेतले. तेथे नरेंद्रशी गप्पा मारत त्याचा विश्वास संपादन केला आणि आपणही माफीचा साक्षीदार होण्यास सिद्ध असल्याचे खोटेच सांगितले. त्यानंतर दोनच दिवसांनी कन्हैयालालजीदेखील पोट दुखण्याचे निमित्त करूनच रुग्णातलयात भरती झाले. त्या आधी रुग्णालयात घरून येणार्‍याजेवणाच्या डब्यातून त्यांनी २ पिस्तुले गुपचूप आणून घेतली होती. ३१.८.१९०८ रोजी सकाळी ८ वाजता नरेंद्र गोस्वामीचा निरोप मिळताच इंग्रज अधिकारी हिनिग्स नरेंद्र गोस्वामीला सोबत घेऊन कन्हैयालाल आणि सत्येंद्रनाथ यांना भेटण्यास आला. आपल्या सावजाच्या प्रतीक्षेत शिकारी तयारीतच होते. कन्हैयालालजींनी दुरूनच नरेंद्र गोस्वामीला येत असतांना बघितले. सत्येंद्रनाथांना त्यांनी इशारा केला. रुग्णालयाच्या एका कोपर्‍यातच इंग्रज अधिकारी हिगिन्सला सत्येंद्रनाथांनी थांबवून 'त्याला काहीतरी गुपित सांगतो आहे', असे भासवून त्याच्या कानात पुटपुटले. हिगिन्सला काहीच न कळल्याने हिगिन्स प्रश्नार्थक मुद्रेने सत्येंद्रनाथांकडे फक्त बघतच होता. तेवढ्यात नरेंद्र गोस्वामी बराच पुढे गेला होता. हीच संधी साधून कन्हैयालालजींनी नरेंद्र गोस्वामीला थांबवून त्याला मारण्यासाठी रिव्हॉल्व्हर बाहेर काढले. ते पाहून हिगिन्स त्यांना पकडण्यास पुढे धावला. नरेंद्र गोस्वामीची तर पाचावर धारण बसली होती. तो जीवाच्या आकांताने पळत सुटला. पळता पळता ओरडू लागला, "हे माझा जीव घेत आहेत. मला वाचवा !"

नरेंद्रच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करत सत्येंद्रनाथांनी एक गोळी झाडली. ती गोळी नरेंद्रला हातावर लागली. तरीही जीव वाचवण्याच्या उद्देशाने तो धावत होता. त्याला वाचवण्यासाठी हिगिन्सने कन्हैयालालजी आणि सत्येंद्रनाथ यांना रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु देशद्रोही अन् मित्रद्रोही नरेंद्रला सहजासहजी सोडून द्यायला हे बंगाली वाघ कदापीही तयार नव्हते. हिगिन्सला मारपीट करून जायबंदी केल्याने हिगिन्स निपचित पडला होता. कन्हैयालाल आणि सत्येंद्रनाथ दोघेही पुन्हा नरेंद्रच्या मागावर गेले. रुग्णालयाचे आवार खूप मोठे होते; परंतु तेथून बाहेर पडण्याचा मार्ग कन्हैयालालजींनी रोखून धरल्याने नरेंद्रला फक्त इकडून-तिकडे पळण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तेवढ्यात लिटन नावाचा एक सुरक्षारक्षक हा आरडाओरडा ऐकून तेथे आला. त्याने नरेंद्रला वाचवण्यासाठी धाव घेतली. हे बघताच सत्येंद्रनाथांनी लिटनला ३-४ मुष्टीप्रहार लगावले. लिटनने धरतीवर लोळण घेतली. हीच संधी साधून कन्हैयालालजींनी आपल्या पिस्तुलातून नरेंद्रवर गोळी झाडली. ती गोळी नरेंद्रला वर्मी लागली. नरेंद्र गोस्वामी गोळी लागून तेथील एका सांडपाण्याच्या नालीत कोसळला.

क्रांतीवीरांना मृत्यूदंडाची शिक्षा होणे

कन्हैयालालजींनी आणि सत्येंद्रनाथांनी एका राष्ट्रद्रोही फितुरला कंठस्नान घालून यमसदनी पाठवले. आपले ध्येय पूर्ण करताच 'वन्दे मातरम्'चाजयघोष करत सत्येंद्रनाथ आणि कन्हैयालालजी पोलीस येण्याची वाट पहात थांबले होते. आजूबाजूचे कैदी, सहकारी आणि तुरुंगातील सुरक्षा सैनिक सर्वच जण स्तब्ध झाले होते. थोड्याच वेळात इंग्रज अधिकारी तेथे आले. त्यांनी दोन्ही वंगवीरांना हातकड्या घालून पिस्तुले ताब्यात घेतली. ७.९.१९०८ रोजी सेशन कोर्टात कन्हैयालाल दत्त आणि सत्येंद्रनाथ बोस यांच्यावर खटला चालू झाला. काही दिवसांनंतर तो खटला वरिष्ठ न्यायालयात गेला. न्याय देण्याचे नाटकच असल्याने निर्णय देण्यासाठी इंग्रज सरकार जेवढे उत्सुक होते, त्यापेक्षा अधिक उत्साही होते बंगालचे वाघ कन्हैयालालजी आणि सत्येंद्रनाथजी. त्यांना माहीत होते की, शिक्षा मृत्यूदंडाचीच होणार आहे. त्यांच्या अपेक्षेनुसारच निर्णय आला, फाशीची शिक्षा ! फाशीचे दिवसही ठरले. १०.११.१९०८ रोजी कन्हैयालालजींना, तर २१.११.१९०८ रोजी सत्येंद्रनाथांना !

कन्हैयालालजींच्या अंत्ययात्रेतील जनतेचा प्रतिसाद पाहून इंग्रजांनी
फाशीनंतर सत्येंद्रनाथ बोस यांच्या पार्थिवाचा अंत्यसंस्कार तुरुंगातच करणे

कन्हैयालालजींच्या अंत्ययात्रेतील जनतेचा प्रतिसाद पाहून इंग्रज सरकार हबकले होेते. २१.११.१९०८ रोजी सत्येंद्रनाथ बोस यांना फाशी दिल्यावर त्यांचे पार्थिव तुरुंगाबाहेर नेण्यास त्यांनी परवानगी नाकारली आणि तुरुंगातच अंत्यसंस्कार करण्यात आला.

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी आत्मार्पण करणारे दोन निधडे देशभक्त कन्हैयालाल दत्त व सत्येंद्रनाथ बोस यांना आजचा भारतीय समाज विसरला आहे, असे वाटते. स्वातंत्र्यसंग्रामातील ज्ञात-अज्ञात विरांनी केलेल्या बलीदानाची सार्थकता आपण सर्वांनी कसोशीने जोपासली पाहिजे. हीच खरी त्यांना श्रद्धांजली होईल.

– श्री. जयंत यशवंत सहस्रबुद्धे, अकोला (वर्ष २००५)

Leave a Comment