१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचा प्रारंभदिन

स्वा. सावरकरलिखित `१८५७ चे स्वातंत्र्यसमर’
या स्फूर्तीदायी ग्रंथातील पहिल्या प्रकरणाचा काही भाग…

१८५७ सारखी प्रचंड क्रांती हेतूव्यतिरिक्‍त घडणे शक्य आहे काय ? दिल्लीला पडलेले वेढे, कानपूरला झालेल्या कत्तली, साम्राज्यांचे उभारलेले ध्वज व त्या ध्वजांखाली लढत लढत शूरांच्या धारातीर्थात पडलेल्या उड्या; यांसारखी कृत्ये काही एका अत्यंत उदात्त व स्फूर्तीजनक साध्याशिवाय घडणे शक्य होते काय ? एखाद्या आठवड्याला भरणारा बाजारदेखील काही विशिष्ट हेतूव्यतिरिक्‍त भरलेला नसतो. मग जो बाजार भरवण्याची तयारी वर्षानुवर्षे चाललेली होती, ज्याची दुकाने पेशावरपासून कलकत्त्यापर्यंत प्रत्येक सिंहासनावर उघडलेली होती, ज्यात राज्यांची व साम्राज्यांची देव-घेव चाललेली होती व जिथे रक्‍ताच्या व मांसाच्या नाण्याशिवाय दुसरे चलनी नाणे कोणी जुमानीत नव्हते, तो बाजार काय उगीच भरला व उगीच उठून गेला ? नाही, नाही. तो बाजार भरला, असेही नाही व उगीच उठून गेला असेही नाही !

क्रांतीमागील मूलभूत तत्त्व न शोधणे ही पहिली चूक !

एखादे लहानसे घर बांधावयाचे असले तरीही त्या घराचा तोल सांभाळला जाईल, इतका भक्कम पाया बांधण्यात येतो. पाया भक्कम व घराच्या वजनाचा तोल सांभाळणारा असल्याशिवाय त्या पायावर उभारलेले घर हे पत्त्यांच्या तंबूहून जास्त भव्य व विशाल कधीही उठवता यायचे नाही, हे अशिक्षित मनुष्यासही समजत असते; परंतु हे अगदी सामान्य मनुष्यालाही अवगत असणारे व्यवहार ज्ञान विसरून जाऊन जेव्हा एखादा लेखक प्रचंड क्रांतीरचनेचा इतिहास देतांना त्या क्रांतीची ती भव्य व विशाल इमारत तोलण्यास मूलभूत असणारा पाया कोणता होता, याची मीमांसा करत नाही किंवा `ते प्रचंड क्रांतीमंदिर एखाद्या गवताच्या काडीवर उभारलेले होते’, असे बरळत सुटतो, तेव्हा तो वेडगळ तरी असतो किंवा भामटा तरी असतो. या दोहोंतून तो कोणत्याही विशेषणास पात्र असला, तरी इतिहास लेखनाच्या पवित्र कृत्यास तो सर्वथैव नालायक ठरतो !

प्रत्येक क्रांतीच्या मुळाशी तत्त्व असते !

मोठमोठाल्या धर्मक्रांत्या किंवा राज्यक्रांत्या यांच्या वरवरच्या स्वरूपास असणार्‍या असंबद्धतेची किंवा विभिन्नतेची साखळी त्या क्रांत्यांच्या मुळाशी असणार्‍या तत्त्वांस समजून घेतल्याशिवाय कधीही जुळवता येणार नाही. अनेक चक्रे व अनेक लोहभाग यांनी युक्‍त असणारे एखादे भव्य यंत्र प्रचंड शक्‍तीची कामे करीत असतांना, ती शक्‍ती कोणत्या यंत्रशास्त्रीय नियमाने उत्पन्न केलेली आहे, हे पूर्ण रीतीने कळल्याशिवाय प्रेक्षकांमध्ये विस्मयता उद्भवेल; परंतु ज्ञानाने येणारी मार्मिकता मात्र कधीही आढळणार नाही. फ्रेंच राज्यक्रांती किंवा हॉलंडमधील धर्मक्रांती यांसारखी अद्भुत कृत्ये जेव्हा वाचकांना व लेखकांना आपल्या भव्यतेने चकीत करतात, तेव्हा त्या त्यांच्या भव्यतेने गोंधळून जाऊन वाचकांची दृष्टी व लेखकांची लेखणी ही त्यांचे मूलभूत असणार्‍या शक्‍तींचे विवरण करण्यास धजत नाही, परंतु या मूलशक्‍तींच्या विवरणाशिवाय त्या क्रांतीचे खरे रहस्य कधीही लक्षात येणारे नसल्याने इतिहासशास्त्रात नुसत्या वर्णनापेक्षा मूलविवरणालाच अधिक महत्त्व दिलेले आहे !

क्रांतीची आकस्मिक कारणे वेगळी व प्रधान कारणे वेगळी !

हे मूलविवरण करत असतांना, पुष्कळ वेळा इतिहासलेखकांची आणखी एक चूक घडत असते. प्रत्येक कार्यास काही प्रत्यक्ष, काही अप्रत्यक्ष, तर काही विशिष्ट, काही सामान्य, काही आकस्मिक व काही प्रधान कारणे कारणीभूत झालेली असतात. त्यांचे वर्गीकरण करण्यातच इतिहासकाराचे खरे कौशल्य असते; परंतु पुष्कळ इतिहासकारांची या वर्गीकरणात तारांबळ उडून आकस्मिक कारणांनाच प्रधान कारणांचे स्वरूप देण्यात येते व एखाद्या घराला आग लागली असता, ती आग लावणार्‍या मनुष्याच्या ऐवजी त्याच्या हातातील आगकाडीवर सर्व जबाबदारी लादणार्‍या मूर्ख न्यायाधिशाप्रमाणे तो इतिहासकार हास्यास्पदतेला पात्र होतो. निमित्तकारणांनाच प्रधान कारणे समजून एखाद्या ऐतिहासिक प्रसंगाचा इतिहास लिहू लागल्याने त्या प्रसंगाचे खरे महत्त्व कधीही लक्षात येत नाही. किंबहुना ते अद्भुत व क्रांतीकारक प्रसंग क्षुल्लक कारणांकरता घडले हे पाहून त्या प्रसंगांबद्दल व त्यांतील व्यक्‍तींबद्दल अयथार्थ बुद्धी उत्पन्न होऊ लागते. यासाठी ऐतिहासिक प्रसंगांचा व विशेषत: क्रांतीकारक प्रसंगांचा इतिहास लिहितांना त्यांचे नुसते वर्णन देऊन त्यांची बरोबर कल्पना देता येत नाही किंवा त्यांचा उगम त्यांच्या निमित्तकारणापर्यंतच शोधून माघारी फिरल्यानेही त्यांचे यथार्थ स्वरूप जाणता येत नाही; तर ज्याला सत्य, नि:पक्षपाती व मार्मिक इतिहास लिहावयाचा असेल, त्याने त्या प्रसंगांची व त्या क्रांतीची उभारणी कोणत्या पायावर केलेली होती, त्यांच्या मुळाशी काय तत्त्व होते व त्यांची प्रधान कारणे काय होती, यांचे पर्यालोचन अवश्य केले पाहिजे.

क्रांतीच्या मुळातील तत्त्व पवित्र असेल, तर कृत्येही पवित्र ठरतील !

प्रत्येक क्रांतीच्या मुळाशी कोणते तरी तत्त्व असलेच पाहिजे, असे इटलीचा प्रख्यात तत्त्ववेत्ता व देशभक्‍त मॅझिनी याने म्हटले आहे. क्रांती म्हटली म्हणजे इतिहासातील मनुष्यजातीच्या आयुष्याची उलथापालथ होय. लाखो व्यक्‍ती ज्यासाठी झटतात, राजांची सिंहासने ज्यासाठी डळमळू लागतात, असलेले मुकूट फुटले जाऊन नसलेले मुकूट ज्यासाठी उत्पन्न होतात, स्थापलेल्या मूर्तींचा भंग व नवीन मूर्तींचे उत्थापन ज्यासाठी होते व ज्याच्यापुढे रक्‍ताचे पूर वाहवण्याची काहीच कथा नाही, असे प्रचंड समूहांना वाटू लागते; अशा एखाद्या क्षोभकारक तत्त्वाशिवाय दुसर्‍या कोणत्याही क्षुल्लक व क्षणिक पायावर क्रांतीची इमारत उभारली जाणे शक्य नाही ! प्रत्येक क्रांतीच्या मुळाशी असणारे हे तत्त्व ज्या मानाने पवित्र किंवा अपवित्र असेल त्या मानाने त्या क्रांतीतील कार्यकर्त्या व्यक्‍तींची स्वरूपे व कृत्ये पवित्र किंवा अपवित्र ठरत असतात. हेतूवरून कृत्यांची परीक्षा जशी व्यवहारात केली जाते; त्याचप्रमाणे इतिहासातही व्यक्‍तींच्या किंवा राष्ट्रांच्या हेतूवरून त्यांच्या कृत्यांचे स्वरूप ठरत असते. ही कसोटी सोडून दिली असता, एखाद्या व्यक्‍तीने दुसर्‍या व्यक्‍तीला मारणे व एखाद्या सैन्याने दुसर्‍या सैन्याला मारणे यांत काहीच भेद रहाणार नाही. साम्राज्यासाठी सिकंदराच्या स्वार्‍या व इटलीच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या गॅरीबाल्डीच्या स्वार्‍या या सारख्याच किमतीच्या ठरतील. या भिन्न कृत्यांचे यथायोग्य परीक्षण होण्यास जसा त्यांचा हेतू समजावून घेतलाच पाहिजे, त्याचप्रमाणे प्रत्येक क्रांतीचे यथायोग्य विवेचन होण्यास तिचा हेतू काय होता, तिच्या अंतर्यामीची इच्छा काय होती, कोणत्या तत्त्वाच्या तत्त्वातून ती उद्भवली होती, हे अवश्य पाहिले पाहिजे !

१८५७ च्या क्रांतीच्या मुळाशी असलेली तत्त्वे : स्वधर्म आणि स्वराज्य !

स्वा. सावरकरलिखित `१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या स्फूर्तीदायी ग्रंथातील पहिल्या प्रकरणाचा काही भाग… १८५७ सारखी प्रचंड क्रांती हेतूव्यतिरिक्‍त घडणे शक्य आहे काय ? पेशावरपासून कलकत्त्यापर्यंत जी लाट उसळली ती आपल्या सामर्थ्याने काहीतरी विशिष्ट पदार्थ बुडवून टाकण्याच्या हेतूशिवायच उठणे शक्य होते काय ? दिल्लीला पडलेले वेढे, कानपूरला झालेल्या कत्तली, साम्राज्यांचे उभारलेले ध्वज व त्या ध्वजांखाली लढत लढत शूरांच्या धारातीर्थात पडलेल्या उड्या; यांसारखी उदात्त व स्फूर्तीजनक कृत्ये काही एका अत्यंत उदात्त व स्फूर्तीजनक साध्याशिवाय घडणे शक्य होते काय ? एखाद्या आठवड्याला भरणारा बाजारदेखील काही विशिष्ट हेतूव्यतिरिक्‍त भरलेला नसतो. मग जो बाजार भरवण्याची तयारी वर्षानुवर्षे चाललेली होती, ज्याची दुकाने पेशावरपासून कलकत्त्यापर्यंत प्रत्येक सिंहासनावर उघडलेली होती, ज्यात राज्यांची व साम्राज्यांची देव-घेव चाललेली होती व जिथे रक्‍ताच्या व मांसाच्या नाण्याशिवाय दुसरे चलनी नाणे कोणी जुमानीत नव्हते, तो बाजार काय उगीच भरला व उगीच उठून गेला ? नाही, नाही. तो बाजार भरला, असेही नाही व उगीच उठून गेला असेही नाही !

१८५७ च्या क्रांतीयुद्धाचे स्वरूप सर्वतोपरी भ्रष्ट करणारी दुसरी युक्‍ती किंवा दुसरी चूक विजातीय व त्यांची झील ओढणार्‍या स्वजातीय इतिहासकारांनी जी केलेली आहे ती ही होय की, `सत्तावनच्या या प्रलयाचे कारण मूठभर आपमतलबी लोकांनी उठवलेली काडतुसांची कंडी होय’. इंग्रजी इतिहासावर व इंग्रजांच्या लाचलुचपतीवर वाढलेले एक एतद्देशीय ग्रंथकार म्हणतात, “काडतुसास गायीची व डुकराची चरबी लावतात, इतके केवळ ऐकूनच मूर्ख लोक बिथरले. ऐकलेली गोष्ट खरी कि खोटी याचा कोणी शोध केला आहे काय ? एक बोलला म्हणून दुसरा बोलला आणि दुसरा बिघडला म्हणून तिसरा बिघडला अशी अंधपरंपरा चालून अविचारी मूर्खांचा समाज जमला आणि बंड माजले.”

५७ सारखी प्रचंड क्रांती असल्या कारणापासून उत्पन्न होईल, हे म्हणणार्‍या मंद किंवा दुष्टबुद्धींना क्रांती म्हणजे एक `अविचारी मूर्खांचा समाज’ होय, असे वाटल्यास त्यात काही आश्चर्य नाही. जर ५७ ची क्रांती ही मुख्यत: काडतुसांवरूनच प्रदीप्‍त झाली होती, तर तिला नानासाहेब, दिल्लीचे बादशाह, झाशीची राणी किंवा रोहिलखंडचे खानबहादूर खान हे का मिळाले ? त्यांना इंग्रजी लष्करात नोकरी धरावयाची नव्हती किंवा घरी बसले, तरी ती लष्करी काडतुसे तोडलीच पाहिजेत, असाही हुकूम कोणी त्यांच्यावर केलेला नव्हता. जर ५७ ची उठावणी ही केवळ किंवा मुख्यत: काडतुसांच्या चरबीनेच झाली होती, तर हिंदुस्थानावरील इंग्रजी गव्हर्नर जनरलने ती न वापरण्याचा हुकूम सोडल्याबरोबर ती झटकन शमलीही असती; परंतु `शिपायांनी आपल्या हाताने आपली काडतुसे बनवावी’, अशी सरकारी परवानगी मिळाल्यावरही तिचा उपयोग करून घेण्याऐवजी किंवा लष्करी नोकरी सोडून सर्वच कटकट मिटवण्याऐवजी, लष्करी शिपायांनीच नव्हे, तर लष्कराशी ज्यांचा अर्थाअर्थी संबंध नाही अशा लाखो लोकांनी, राजांनी व महाराजांनी आपले प्राण रणांगणात का खर्च केले ? लष्करी व बिनलष्करी, राजा व रंक, हिंदु व मुसलमान या सर्वांना स्फुरण येण्यास असल्या किरकोळ गोष्टी कारणीभूत होत नसतात, तर त्या गोष्टींच्या मुळाशी असणारे तत्त्व त्यास कारणीभूत होत असते !

राज्य खालसा करणे, हेसुद्धा तात्कालीक कारण !

`काडतुसांची भीती हे बंडाचे प्रमुख कारण आहे’, या म्हणण्यात जितकी अयथार्थता आहे, तितकीच `त्या बंडाचा उगम केवळ अयोध्येच्या राज्याला खालसा करण्यात आले’, या म्हणण्यात दिसून येईल. अयोध्येच्या राज्यातील हिताहिताशी ज्यांचा काही एक संबंध नव्हता, असे किती तरी लोक या भयंकर क्रांतीत हातावर शीर घेऊन लढत होते ! मग त्या लढण्यात त्यांचा काय हेतू ?सीताहरण हे रामायणाचे जसे केवळ निमित्त झाले, त्याचप्रमाणे वरील सर्व लहानमोठी कारणे ही निमित्ते असून मुख्य कारणे म्हणजे त्यांच्या मुळाशी असलेली तत्त्वेच होत !

ही तत्त्वे कोणती होती ? हजारो शूरांच्या तलवारी त्यांच्या म्यानांतून ओढून काढून रणांगणात चमकवणारी ही तत्त्वे कोणती होती ? निस्तेज झालेल्या मुकुटांना सतेजता देणारी व मोडून पडलेल्या ध्वजांचे पुनरूद्धरण करणारी ही तत्त्वे कोणती होती ? ज्यांच्यावर सहस्रो व्यक्‍तींनी आपल्या उष्ण रक्‍ताचा अभिषेक वर्षानुवर्षे अखंड प्रेमाने सुरू ठेवावा, ती ही तत्त्वे कोणती होती ? ज्यांच्या साहाय्यासाठी श्रीमत हनुमानजीने कानपूरच्या रणांगणावर हुंकार करू लागावा व ज्यासाठी झाशीच्या महालक्ष्मीने शुंभनिशुंभाच्या रक्‍तात भिजलेली आपली पुराणप्रसिद्ध तलवार पुन्हा उपसू लागावे, अशी ही तत्त्वे कोणती होती ? १८५७ च्या क्रांतीची प्रधान कारणे असलेली दिव्य तत्त्वे होती `स्वधर्म आणि स्वराज्य’ !

स्वराज्य हे स्वधर्म संरक्षणाचे मूल साधन आहे !

१८५७ च्या क्रांतीची प्रधान कारणे असलेली दिव्य तत्त्वे म्हणजे `स्वधर्म व स्वराज्य’ ही होत ! परकीय व आपमतलबी इतिहासकारांनी त्या दिव्य हिंदभूचे चित्र कितीही घाणेरड्या रंगात काढलेले असले, तरी जोपर्यंत आमच्या इतिहासातील पानावरील चितोडचे नाव पुसलेले नाही, सिंहगडचे नाव पुसलेले नाही, प्रतापादित्याचे नाव पुसलेले नाही किंवा गुरू गोविंदसिंगांचे नाव पुसलेले नाही, तोपर्यंत ही स्वधर्म व स्वराज्य यांची तत्त्वे हिंदुस्थानच्या रक्‍तामासांत खिळून रहाणारी आहेत !

ईश्‍वराची आज्ञा ही आहे की, स्वराज्य संपादा. कारण स्वधर्म संरक्षणाचे ते मूल साधन आहे. जो स्वराज्य संपादन करत नाही, जो गुलामगिरीत तटस्थ बसतो, तो अधर्मी व धर्मद्रोही होय. म्हणून स्वधर्मासाठी उठा व स्वराज्य संपादन करा !

`स्वधर्मासाठी उठा व स्वराज्य संपादन करा !’ या तत्त्वाने हिंदुस्थानच्या इतिहासात कितीतरी दैवी चमत्कार केलेले आहेत ! श्रीसमर्थ रामदासांनी महाराष्ट्राला अडीचशे वर्षांपूर्वी हीच दीक्षा दिली होती !

“धर्मासाठी मरावें । मरोनी अवघ्यांसि मारावें ।
मारिता मारिता घ्यावें । राज्य आपुलें !”

सत्तावनच्या क्रांतीयुद्धाची `स्वराज्य आणि स्वधर्म’ हीच तात्त्विक कारणे होती !