प्रवचन : २६ जानेवारी

विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपल्याला सगळ्यांना सण साजरा करायला आवडते. आपण अगदी उत्साहाने ते साजरे करतो. गुढीपाडवा, गणेशोत्सव, दिवाळी हे जसे आपले धार्मिक सण आहेत, तसेच २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट हे आपले राष्ट्रीय सण आहेत. २६ जानेवारी १९५० या दिवशी आपल्या देशाची राज्यघटना अस्तित्वात आली. आपले धार्मिक सण हे विशिष्ट तिथीला येतात. त्या दिवशी देवतेची पूजा करण्याची आणि तिचा आशीर्वाद घेण्याची आपल्याला संधी असते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने आपल्यातील राष्ट्रभक्ती वाढवण्याची संधी आपल्याला मिळते.

राष्ट्रभक्ती म्हणजे काय ?

जन्मदात्र्या आईवर आपले प्रेम असते, आपण तिचा आदर करताे, तसेच आपली भारतभू ही आपली राष्ट्रमाता आहे, याचा आपल्याला अभिमान हवा. आपण भारतासारख्या सर्वांत प्राचीन आणि सर्वश्रेष्ठ संस्कृती असणार्‍या राष्ट्रात जन्माला आलो आहोत, याचे महत्त्व आपण लक्षात घ्यायला हवे. आपल्या राष्ट्राविषयी आपल्या मनात नितांत आदराची भावना हवी. आपल्या क्रांतीकारकांनी तर आपल्या राष्ट्रावर प्राणापलीकडे प्रेम केले. हीच राष्ट्रभक्ती होय. तुमचे आपल्या राष्ट्रावर प्रेम आहे का ? (मुलांना विचारणे – मुले हो उत्तर देतील. मुलांना उत्तर देण्यास लावून सहभागी करून घेणे.) पण केवळ आपल्या राष्ट्रावर आपले प्रेम आहे, असे म्हणून भागणार आहे का ? तर ते आपल्या कृतीतूनही दिसले पाहिजे.

राष्ट्रभक्ती वृद्धींगत करण्यासाठी काय कराल ?

आपल्या राष्ट्राचा तेजस्वी इतिहास आणि श्रेष्ठतम संस्कृती आपण जाणून घेतली, तर आपल्यामध्ये राष्ट्राविषयी अभिमान निर्माण होईल. राष्ट्राविषयी अभिमान असेल, मनात राष्ट्रप्रेम असेल, तर राष्ट्राचे प्रतीक असणार्‍या प्रत्येक गोष्टीविषयीही आपल्या मनात आदर राहील. राष्ट्राची प्रतिके कोणती ? (मुलांना उत्तर विचारू शकतो.) राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, वन्दे मातरम् सारखे राष्ट्रीय गीत, राष्ट्राचा नकाशा (म्हणजेच मानबिंदू) ही आपली राष्ट्रीय प्रतिके आहेत. यांचा यथायोग्य सन्मान राखणे, हे आपले राष्ट्रकर्तव्य आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण हे कर्तव्य पार पाडत आहोत का ? आज काय स्थिती आहे ? अनेक ठिकाणी राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, आपल्या राष्ट्राचा नकाशा यांचा अवमान झालेला आपल्याला पहायला मिळतो ना ? आपल्या राष्ट्रप्रतिकांचा मान राखणे आणि त्यांचा कुठेही अवमान होत असेल, तर तो थांबवणे, या कृती आपल्याकडून झाल्यास त्यातून आपले राष्ट्रप्रेम दिसून जार्इल. आपल्या राष्ट्राचे आदर्श नागरिक म्हणून आपली जी जी कर्तव्ये आहेत, त्यांचे आपण पालन करणे, ही सुद्धा आपली राष्ट्रभक्तीच होय.

राष्ट्रध्वजाचा सन्मान कसा राखाल ?

२६ जानेवारी किंवा १५ आगॅस्ट हे दिवस साजरे झाल्यावर आपण पहातो की, राष्ट्रध्वज रस्त्यात, रस्त्याच्या कडेला इकडे-तिकडे पडलेले असतात; काही गटारात जातात, तर काही पायदळी तुडवले जातात. राष्ट्रध्वज उंच ठिकाणी फडकवणे, हे आपले राष्ट्र स्वतंत्र असल्याचे प्रतीक आहे. आदल्या दिवशी आपण राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रगीत म्हणतो, तेव्हा आपण या स्वतंत्र राष्ट्राचे नागरिक असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो आणि दुसर्‍या दिवशी तोच राष्ट्रध्वज रस्त्यावर पडलेला, फाटलेला पाहून आपल्याला काहीच कसे वाटत नाही ? इतके आपले मन राष्ट्रध्वजााविषयी असंवेदनशील कसे होते ? मित्रांनो, आपल्या राष्ट्रध्वजाचा सदोदित सन्मान राखणे, हे आपले राष्ट्रकर्तव्य समजून आजपासून आपण राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी नेहमीच प्रयत्न करू, अशी प्रतिज्ञा करू या. आपल्या वर्गात, शाळेत, रस्त्यावर कुठेही राष्ट्रध्वज पडलेला दिसला, तर आपण तो उचलून शाळेत जमा करू या. किती जण ही कृती करणार ? (मुले हात वर करतील.) शाबास. मुलांनो, राष्ट्रध्वज मुळातच रस्त्यावर पडू नये म्हणून आपण प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरायचे नाहीत. गाडीवर किंवा आपल्या सदर्‍याच्या खिशावर ते लावायचे नाहीत. काही जण राष्ट्रध्वज तोंडावर रंगवून घेतात, काही जण राष्ट्रध्वजाची रगंसंगती असलेले कपडे घालतात, तर काही जण राष्ट्रध्वजाच्या रंगाचा केक कापतात, हेही याेग्य नव्हे, हे आता तुमच्या लक्षात आले असेलच. असे कुठेही होत असलेले आढळल्यास ते अयोग्य असून त्यामुळे आपल्या राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. असे करणार्‍यांना आपण हे सांगितले पाहिजे. तुमच्यापैकी किती जण असे सागंणार ? (मुले हात वर करतील.) काही ठिकाणी राष्ट्रध्वज उलटा लावलेला किंवा चित्र काढलेला असताे, हा तर अक्षम्य अपराध आहे. राष्ट्रध्वज संहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमान करणे, हा कायदेशीर अपराध आहे, हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे. जर कोणी सागूंनही एकत नसतील, तर त्यांना हा अपराध असल्याची जाणीव करून द्या.

राष्ट्रगीत आणि राष्ट्राचा नकाशा यांच्या सन्मानाविषयी जागरूक रहा !

राष्ट्रगीत किंवा राष्ट्रगीताची धून कुठेही चालू असेल, तर आपण सावधानमध्ये उभे रहायला हवे. ही कृती करणे, हा आपण आपल्या राष्ट्राला दिलेला सन्मान आहे. काही जण त्या वेळी बसून रहातात. राष्ट्रगीताची धून केवळ ५३ सेकंदाची आहे. एवढा वेळ उभे रहाण्याएवढेही राष्ट्रप्रेम आपल्यात नाही का ? राष्ट्रगीताचा नेहमीच सन्मान राखला जावा, यासाठी राष्ट्रगीताची धूनही याेग्य ठिकाणीच वाजवली गेली पाहिजे. काही संकेतस्थळांवर किंवा अन्य राष्ट्रांत आपल्या देशाचा नकाशा चुकीचा काढलेला असतो. त्यात काश्मीर, अरुणाचलप्रदेश या राज्यांतील जे भाग भारतात आहेत, ते दुसर्‍या देशांत दाखवले जातात. त्यामुळे ते भाग आपल्या राष्ट्रात नाहीत, असा त्याचा अर्थ होताे, हे लक्षात घ्यायला हवे. हाही एक मोठा अपराध आहे. हा केवळ राष्ट्राचाच नव्हे, तर प्रत्येक भारतीय नागरिकाचा हा अवमान आहे. या दृष्टीने आपण सर्वांनी सतर्क रहायला हवे. यातून आपले राष्ट्राविषयीचे प्रेमही वृद्धींगत होईल.

आदर्श नागरिकांची कर्तव्ये कशी पार पाडाल ?

वाहतकुीचे सर्व नियम पाळणे, रस्त्याने जातांना डाव्या बाजूने चालणे, रस्त्यात कचरा न टाकणे इत्यादी आदर्श नागरिकाचे कर्तव्य असणार्‍या छाेट्या छाेट्या गोष्टीही आपण सर्वांनी कटाक्षाने केल्या, तर आपले आपल्या राष्ट्रावर प्रेम आहे, असे म्हणू शकतो. आज आपले राष्ट्र चहूबाजूंनी संकटात आहे. बाहेरून पाक, चीन इत्यादी शत्रू राष्ट्रे आपल्या सीमांवर आक्रमणे करत आहेत, तर राष्ट्रात आतकंवाद, भ्रष्टाचार यांनी थैमान घातले आहे. तुम्ही सर्व जण लहान आहात, या समस्यांशी एकदम लढू शकत नाही; मात्र आज तुमच्यामध्ये तुमच्या राष्ट्राविषयी प्रखर राष्ट्राभिमान निर्माण झाला, तर मोठे झाल्यावर तुम्ही या समस्यांना तोंड देण्यासाठी सिद्ध होऊ शकाल.

प्रखर राष्ट्राभिमान असणार्‍यांचा आदर्श समोर ठेवा !

विद्यार्थी मित्रांनो, छत्रपति शिवाजी महाराज, शंभूराजे, महाराणा प्रताप, पहिला बाजीराव यांसारखे धर्मनिष्ठ राजे आणि असंख्य राष्ट्रप्रेमी क्रांतीकारक यांनी आजपर्यंत दिलेल्या क्रांतीलढ्यामुळे आज आपण स्वतंत्र भारतात सुरक्षित जीवन जगू शकतो. स्वातंत्र्यपूर्वकाळात क्रांतीकारकांनी सशस्त्र आणि अत्याचारी राज्यकर्ते असलेल्या इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले. कित्येक क्रांतीकारकांमध्ये लहानपणापासूनच राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित होती. १९१८ ची गोष्ट. पंजाबमधील उधमसिंग अवघा १९ वर्षांचा होता. त्या वळेी तो जालियनवाला बागेतील सभेत भाषण ऐकण्यासाठी गेला होता. सभेला सहस्रो राष्ट्रप्रेमी एकत्र जमले होते. सभा चालू झाली आणि अचानक इंग्रज अधिकारी जनरल डायरने सैनिकांना गोळीबाराचे आदेश दिले. पटांगणाला चारही बाजूंनी भिंती होत्या. भारतियांनी अशा प्रकारे एकत्र येऊन क्रांती करू नये, या दुष्ट हेतूने डायरने २ सहस्र भारतियांचा केलेला भयंकर नरसंहार उधमसिंहने त्याच्या डोळ्यांनी पाहिला आणि हृदयात प्रतिशोधाची अखंड ज्योत तेवत ठेवली. तब्बल २० वर्षांनंतर इंग्लंडमध्ये जाऊन त्याने ओडवायर या इंग्रजी अधिकार्‍याचा वध केला. भगतसिंगांप्रमाणे सरदार उधमसिंहांनी हसत हसत फासाला कवटाळले. असे अनेक उधमसिंग फासावर लटकले म्हणून आपण स्वतंत्र झालो. याचे स्मरण आपण सातत्याने ठेवायला हवे. मुलांनो, राष्ट्रीय दिनांच्या दिवशी आपण शाळेत किंवा आपल्या इमारतीमध्ये क्रांतिकारकांच्या जीवनावरील प्रवचने, व्याखाने, वक्तृत्व किंवा निबंध स्पर्धा यांचे आयोजन करून त्यांचे स्मरण करू शकतो. आपले पालक किंवा शिक्षक यांच्यासमवेत राष्ट्रपुरुष किंवा क्रांतीकारक यांची जन्मस्थळे, स्मारके यांना भेट देऊ शकतो. आपल्याकडे क्रांतीकारकांची माहिती सागंणारे प्रदर्शनही उपलब्ध आहे. ते आपण लावू शकतो. राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचे स्मृतीदिन साजरे करू शकताे, तसेच राष्ट्राभिमानी व्यक्तिमत्त्वांचे मार्गदर्शन किंवा अनुभवकथन आयोजित करू शकतो. यासाठी जे विद्यार्थी किंवा शाळा पुढाकार घेऊ इच्छितात त्यांना आम्ही साहाय्य करू.

राष्ट्राभिमान कसा जोपासाल ?

१. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिललेे वन्दे मातरम् हे गीत स्वातंत्र्यपूर्वकाळात क्रांतीवीरांचे स्फूर्तीस्थान होते, तर वन्दे मातरम् हा जयघोष क्रांतीकारांचे स्फूल्लिगं चेतवणारा स्वातंत्र्याचा मूलमंत्र होता. आजही आपण संपूर्ण वन्दे मातरम् म्हटतांना आपल्या अंगावर रोमांच उभे रहातात. शाळा, महाविद्यालये, कायार्लये येथे आपण ते आवर्जून म्हटले पाहिजे आणि आपल्या मातृभूमीला वंदन केले पाहिजे. आम्ही संपूर्ण वन्दे मातरम् गीत उपलब्ध करून देऊ शकतो.

२. अनेक जण ट्रेकिंगसाठी जातात. विद्यार्थ्यांनो, आपल्याला केवळ साहसासाठी गड चढून जायचे नाही, तर छत्रपती शिवाजीराजांनी मावळ्यांसह पराक्रम करून शत्रूकडून हे गड जिंकून घेतले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले, हा हिंदूंचा तेजस्वी इतिहास सतत आठवायचा आहे. या दृष्टीकोनातून गड, जलदुर्ग यांना भेटी द्या. शिवछत्रपतींचा पदस्पर्श त्या गडांना झाला आहे, याची जाणीव त्या वेळी ठेवा.

३. परदेशी बनावटीच्या वस्तू न वापरता कटाक्षाने आपल्या देशातील आस्थापनांत (कंपन्यांत) सिद्ध झालेल्या वस्तू वापरा. त्या वस्तूंच्या आस्थापनांची सूचीही आमच्याकडे उपलब्ध आहे. विद्यार्थांनो, बाबू गेनू हा तरुण स्वदेशीचा वापर करण्याच्या आग्रहापोटी इंग्रजांच्या विदेशी मालाच्या ट्रकला अडवण्यासाठी ट्रकखाली येऊन पडला. ट्रक त्याच्या अंगावरून गेला. स्वदेशी वस्तू वापरण्याच्या आग्रहापोटी प्राणार्पण करणार्‍या बाबू गेनूच्या राष्ट्रप्रेमाची आपण कल्पना तरी करू शकतो का ?

४. एकमेकांशी आवर्जून मराठीतच बोला. मराठीतून शुभेच्छा द्या. इग्रंजी शब्दांचा वापर टाळा. स्वभाषेचा अभिमान असला, तर राष्ट्राभिमान निर्माण होतो. विद्यार्थ्यांनो, वरील कृती या काही प्रातिनिधिक राष्ट्राभिमान दर्शवणार्‍या कृती आहेत. त्यातील काही जरी आपल्याला करायला जमल्या, तरी खर्‍या अर्थाने प्रजासत्ताकदिन साजरा केला, असे होईल. आपल्या राष्ट्रासाठी कृतीशील हाेण्याचा संकल्प करून, तसेच भारतमाता आणि राष्ट्रपुरुष यांना वंदन करून आपण इथे थांबूया.