व्यायाम करताना ही काळजी घ्या !

सर्वप्रथम संपूर्ण अंगाला तेल लावावे. यासाठी खोबरेल तेल, तीळतेल, सरकीचे तेल यांपैकी कोणतेही तेल चालते. या प्रक्रियेला अभ्यंग असे म्हटले जाते. नियमित अभ्यंग केल्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते, तरतरी येते, दृष्टी सुधारते आणि अंग पुष्ट होऊन बळकटी येते.

१. व्यायामाचे प्रमाण

अभ्यंग केल्यावर शरिराच्या अर्ध्या शक्तीने व्यायाम करावा. व्यायाम करत असतांना तोंडाने श्वांस चालू झाला म्हणजे अर्धी शक्ती वापरली गेली, असे समजावे. अजून व्यायाम करायचा असल्यास थोडा वेळ थांबून श्वास पुन्हा नाकावाटे सुरळीत चालू झाल्यावर करू शकतो. न्यूनतम २० मिनिटे व्यायाम करावा. सूर्यनमस्कारही घालू शकतो.

२. व्यायामाविषयी काही प्रायोगिक सूचना

अ. व्यायाम प्रथमच करत असल्यास पहिल्याच दिवशी खूप व्यायाम करू नये. व्यायाम प्रत्येक दिवशी थोडा थोडा वाढवावा आणि स्वतःला झेपेल एवढाच करावा.

आ. व्यायामानंतर शरिराचे तापमान वाढते. थंडीच्या दिवसांत सकाळी उठल्यावर खूप थंडी वाजत असेल, तर २ मिनिटे जागच्या जागी धावल्यामुळे थंडी वाजण्याचे प्रमाण लगेच न्यून होते.

इ. व्यायामानंतर २ मिनिटे सुक्या अंगपुसणीने किंवा हातांनी सर्व शरीर रगडून घ्यावे. यामुळे व्यायामामुळे पेशींमध्ये वाढलेला वात न्यून होतो, तसेच घर्षणातून एकप्रकारचा विद्युतप्रवाह निर्माण होऊन तो शरिरातील रोगांना नष्ट करतो.

ई. व्यायाम झाल्यावर ३० मिनिटांनंतर स्नान करावे. या मधल्या ३० मिनिटांमध्ये कपडे धुणे, वाचन अथवा नामजप करू शकतो.

उ. अभ्यंगानंतर व्यायाम करायचा नसल्यास २० मिनिटांनंतर स्नान करू शकतो. अगदीच घाई असल्यास अभ्यंगानंतर ५ मिनिटांनंतरही स्नान करू शकतो. तेल लावल्यावर ५ मिनिटांमध्ये ते त्वचेमध्ये जिरू लागते. अंग चोळण्याच्या ५ मिनिटांत हे साध्य होते. तरीही तेल लावून २० मिनिटे थांबू शकत असल्यास उत्तम.

ऊ. व्यायाम झाल्यावर १५ मिनिटे शांत बसून वाचन अथवा नामजप करावा. त्यानंतर ५ मिनिटे अंगाला तेल लावून थोडा वेळ थांबून स्नान करावे.

ए. अभ्यंग करून (अंगाला तेल लावून) व्यायाम केल्यावर घाम येत नाही, असे नसते. उलट अभ्यंग करून व्यायाम केल्याने तेलाचे कार्य चांगले घडून येते.

– वैद्य मेघराज पराडकर, आयुर्वेदाचार्य, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१२.२०१३)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात