अहंकार आला की, दुःख आले !

१. रथोत्सवाच्या वेळी रथाचे एक चाक तुटल्याने
चिंतित झालेल्या भाविकांना पर्यायी कोणतेही वाहन न मिळणे

एका गावात रथोत्सव चालू असतो. भाविक तो रथ एका गावातून दुसर्‍या गावात वाजत-गाजत नेत असतात. मध्येच रथाचे एक चाक तुटून जाते, त्यामुळे भाविक चिंतित होतात. त्यांना प्रश्‍न पडतो, रथातील देवाला दुसर्‍या गावाला कसे पोहोचवायचे ? भाविक पर्यायी म्हणून बैलगाडी, घोडागाडी शोधतात; पण काहीही उपलब्ध होत नाही.

२. भाविकांनी मार्गातील एका गाढवाला सजवून, त्याच्यावर देव ठेवून दुसर्‍या गावाकडे प्रयाण करणे आणिकाही जण गाढवालाही भक्ती-भावाने हार घालू लागणे

मार्गात मध्येच भाविकांना कचरा खाणारे एक गाढव दिसते. सर्व जण त्याला चंदनतैलादी लावून आंघोळ घालतात, रेशमी वस्त्र घालून सजवतात आणि त्यावर देवाला बसवतात. उत्सव पुन्हा चालू होतो अन् सर्व जण दुसर्‍या गावाकडे प्रयाण करतात. काही भाविक गाढवावरील देवाला हार घालू लागतात. काही वेळाने देवाला हार घालायला जागा रहात नाही; म्हणून लोक गाढवालाच भक्ती-भावाने हार घालू लागतात.

३. मानसन्मानाने आनंदलेल्या गाढवाने पाठीवर ओझे आहे,असे वाटून अंग झाडल्याने देव खाली पडणे आणि भडकलेल्या भाविकांकडून गाढवाला चोप मिळणे

मार्गाने जातांना गाढव विचार करते, आतापर्यंत कधी मिळाले नाही, ते राजवैभव मला आज कसे काय मिळत आहे ? भाविक देवाला ओवाळत असलेली आरती आपल्यासाठी आहे, असे गाढव मानू लागले आणि त्यामुळे ते अधिकच आनंदी झाले. काही क्षणांनंतर त्याच्या मनात विचार आला, मला हे राजवैभव मान्य आहे; पण माझ्या पाठीवर काहीतरी ओझे आहे. हा विचार आल्यावर ते स्वतःचे अंग झाडते. त्यामुळे त्याच्या पाठीवरील देव खाली पडतो. हे पाहून भाविक भडकतात आणि गाढवाला धोपटतात.

तात्पर्य : जोपर्यंत आपल्यावर देवाची किंवा गुरूंची कृपा आहे, आपल्याजवळ त्यांचा वास आहे, तोपर्यंतच आपल्याला मानसन्मान आणि समाजाकडून लाभणारे प्रेम मिळणार आहे. ज्या क्षणी अहंकार बळावतो, त्या वेळी आपली स्थिती गाढवापेक्षा वेगळी रहात नाही; म्हणून देवाला विसरू नये. अहंरहित रहावे. सर्व मानसन्मान देवाचरणी अर्पण करावेत.

– संग्राहक : श्री. उमेश गौडा (३०.८.२०१३)