मृत्यूच्या क्षणीही मायेचे विचार न सुटणे

मृत्यूच्या क्षणीही मायेचे विचार न सुटणे

एक म्हातारा गृहस्थ आजारी पडला. आजार एवढा होता की, तो बोलू शकत नव्हता. त्याचे सर्व आयुष्य कुटुंबाच्या पालन-पोषणासाठी द्रव्य मिळवण्यात गेले होते. मुलांनी सांगितले, ‘बाबा, आता तुम्ही केवळ देवाचे नाव घ्या’. आयुष्यभर देवाचे नाव न घेतल्यामुळे आयुष्याच्या अंती त्याला नामजप करता येईना. एकदा अंगणात एक वासरू केरसुणी खात होते. त्याने आपल्या मुलांना सांगण्याचा प्रयत्न केला. मुलांना वाटले बाबा धन, संपत्ती याविषयी काहीतरी सांगत असावेत; म्हणून त्यांनी डॉक्टरांना आणले आणि सांगितले, बाबा बोलू शकतील असे औषध द्या. डॉक्टरांनी औषध दिले आणि औषधाचे १० सहस्र (हजार) रुपये मागितले. मुलांनी दिले, औषध घेतल्यावर म्हातारा बोलू लागला. तो म्हणाला, ‘मघापासून तुम्हाला सांगतो आहे की, वासरू केरसुणी खात आहे; पण तुमचे लक्षच नाही. काही मिनिटांतच वासरू केरसुणी … ‘असे म्हणत त्याने प्राण सोडला.

परमात्म्याच्या द्वारी जातो, तसे ख-या कलाकाराकडे विनम्रतेने, दीन होऊन, आतुरतेने आणि याचक होऊनच जाणे आवश्यक !

एका सम्राटाने एका संगीततज्ञाला गायनासाठी राजदरबारात बोलावले. संगीततज्ञाने सांगितले, ‘आज्ञा असली, तरी मी येऊ शकत नाही; कारण आज्ञेने गाण्याचे सूर आतून येऊ शकत नाहीत. प्रार्थना असेल, तर मी येऊ शकतो; पण ज्या दिवशी माझे पाय राजमहालाकडे वळतील, त्या दिवशी मी येईन. आज्ञा याच क्षणी पूर्ण होऊ शकते; पण प्रार्थनेसाठी वाट पहावी लागते’. राजाने मंत्र्याला सांगितले, काहीतरी मार्ग काढावा लागेल. मंत्र्याने सांगितले, ‘आपण त्याच्या घरी जाऊन गाणे ऐकू’. तेव्हा राजा म्हणाला, ‘जीवनात जे श्रेष्ठ आहे, त्याच्या जवळ जावे लागते. त्याला आपल्या घरी बोलावले जाऊ शकत नाही’. संगीततज्ञाने सांगितले, ‘माझ्या झोपडीत याल, तर राजाचे वस्त्र चालणार नाही; कारण आपण राजा म्हणूनच गाणे ऐेकाल. गाणे ऐकण्यासाठी श्रावक बनणे महत्त्वाचे आहे. याचकाप्रमाणे या’.

परमात्म्याच्या द्वारी असेच जावे लागते. विनम्रतेने, दीन होऊन, आतुरतेने, याचक होऊन जावे लागते.

भगवंत असतांना भीती कसली ?

एक नवविवाहित नौकाविहार करण्यासाठी जातात. त्यांची नाव बुडू लागते, तरी युवक शांत होता. पत्नीने विचारले, ‘तुम्ही शांत कसे ?’ युवकाने तलवार काढली आणि पत्नीच्या मानेवर ठेवली. पत्नी हसू लागली. युवक म्हणाला, ‘तुला भीती नाही वाटली !’ पत्नी म्हणाली, ‘जोपर्यंत तुमच्या हातात तलवार आहे, तोपर्यंत भीती कसली ?’ युवक म्हणाला, ‘जोपर्यंत नाव भगवंताच्या हातात आहे, तोपर्यंत भीती कसली ?’

त्रागा करणारी पत्नी मिळाल्यास होणारा लाभ

सॉक्रेटिस आणि त्याची बायको झांबेटी यांचे बिलकुल पटत नसे. सॉक्रेटिसला एका शिष्याने विचारले, ‘विवाह करू कि नको ? झांबेटीसारखी बायको मिळाली तर ?’ सॉक्रेटिस म्हणाला, ‘अवश्य कर. जर झांबेरीसारखी बायको मिळाली, तर सॉक्रेटिस होशील !’

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)