असुर आणि देव या दोघांनाही खुश करणे !

असुर आणि देव या दोघांनाही खुश करणे !

एकदा एका बाईने असुर आणि देव यांच्या चित्रांसमोर दिवे लावले. एकाने तिला विचारले, अहो, सैतानासमोर दिवा का लावलात ? ती म्हणाली, नरकात जायची वेळ आली, तर त्याला खुश करून ठेवलेले चांगले.

भक्ताचा सकारात्मक दृष्टीकोन

एका देवभक्ताच्या आठ मुलांपैकी सात मुले साथीच्या रोगात मेली. त्यांच्या नास्तिक शेजा-यांनी विचारले, ‘कारे बाबा, कुठे आहे तुझा देव ? आणि कुठे ऐकली देवाने तुझी प्रार्थना ?’ देवभक्त म्हणाला, ‘माझ्या नशिबात माझी आठही मुले मृत होणार होती; पण प्रभुकृपेमुळेच एक मुलगा वाचला’.

धनवंतांनो, धन देणार्‍या ईश्‍वराचा त्याग करू नका !

एकदा एक श्रीमंत मनुष्य एका साधू महाराजांच्या पायावर डोके ठेवू लागला. महाराजांनी विचारले, तुम्ही मला नमस्कार का करता ? तो म्हणाला, तुम्ही दिवसभर ईश्‍वर चिंतनात रहाता आणि संपत्तीचा त्यागही केलेला आहे. आम्हाला तर धंद्यामुळे ईश्‍वराचे नाव घेण्यासही वेळ मिळत नाही. तेव्हा ते साधू महाराज म्हणाले, तर मग मलाच तुम्हाला नमस्कार करावा लागेल; कारण मी केवळ संपत्तीचाच त्याग केला; पण तुम्ही तर संपत्ती प्रदान करणार्‍या ईश्‍वराचाही त्याग केला आहे.

कोलंबससारखी जिज्ञासा साधनेतही आवश्यक !

कोलंबस हिंदुस्थानच्या शोधासाठी निघाला होता. त्याला पोपने सांगितले, ‘जाऊ नकोस. पृथ्वी सपाट आहे. पृथ्वीच्या टोकाला जाऊन कोसळशील आणि नरकात पडशील’. कोलंबस म्हणाला, ‘काही अडचण (हरकत) नाही. त्यामुळे मला पृथ्वीचे टोक आणि नरकही बघावयास मिळेल !’

बहुतेकांना मुक्ती नको असते !

प्रल्हाद : देवा, तू सगळ्यांना मुक्ती का देत नाहीस ?

देव : मी सिद्धच आहे; पण घ्यायला कोणी सिद्ध नाही.
त्यानंतर देवाने एका डुकराला विचारले.

देव : स्वर्गाला येतोस का ?

डुक्कर : स्वर्गाला येईन; पण बायको आणि मुले यांना आणता आले, तरच येईन.

देव : हो चालेल.

डुक्कर : पण स्वर्गात घाण आहे का ?

– पू. (डॉ). वसंत बाळाजी आठवले.