शरीरसंपदा निरोगी राखण्यासाठी हे करा !

मुलांनो, निरोगी अन् बलवान शरीरसंपदा, हा एक अलंकार आहे. शरीर निरोगी असेल, तरच तुम्ही अभ्यास नीटपणे करू शकाल, सहलीला जाऊ शकाल किंवा खेळांच्या स्पर्धांत भाग घेऊ शकाल. लोकमान्य टिळक आणि स्वा. सावरकर यांनी शरीर बलवान होण्यासाठी विद्यार्थीदशेतच विशेष प्रयत्न केले होते. त्यामुळेच ते अनुक्रमे मंडाले आणि अंदमान येथील जीवघेणा कारावास भोगून मायदेशी सुखरूप परत आले. शरीर निरोगी अन् बलवान राखण्यासाठी पुढे सांगितल्याप्रमाणे वर्तन ठेवावे.

१. नियमित योगासने करावीत

शरीरसौष्ठव निर्माण करण्यासाठी केल्या जाणार्‍या अ‍ॅरोबिक्ससारख्या व्यायाम -प्रकारांमुळे केवळ शारीरिक व्यायाम व थोडेफार मनोरंजन होते. प्राचीन ऋषीमुनींची देणगी असलेल्या योगासनांमुळे शारीरिक व्यायाम तर होतोच; शिवाय शरिरातील सुप्तशक्ती जागृत होऊन आध्यात्मिक बळ निर्माण होते आणि मानसिक व बौद्धिक क्षमताही वाढते. ऋषीमुनी नित्य योगासने करत असल्यामुळे हिमालयासारख्या प्रतिकूल हवामानातही ते अनेक वर्षे निरोगी रहात असत. योगासनांमुळे मधुमेह, रक्तदाब,सांधेदुखी यांसारख्या दुर्धर आजारांवर ताबा मिळवता येतो, याचे अनेक अनुभव सध्याआपण दूरचित्रवाहिन्यांवरून ऐकतो.

बालमित्रांनो, निरोगी व दीर्घायु जीवनाची ही गुरुकिल्ली आतापासूनचआपल्याजवळ बाळगली, तर आपले जीवन खरोखरंच आनंदी होईल !

सूर्यनमस्कार ही प्राथमिक योगासने आहेत. सूर्यनमस्काराचे महत्त्व, तो घातल्याने होणारे फायदे आणि सूर्यनमस्कार घालण्याची पद्धत जाणण्यासाठी येथे क्लिक करा !

२. नियमित प्राणायाम करावा

प्राणायामाने रोगप्रतिकारशक्ती वाढते, तसेच वारंवार होणारे पडसे, दमा, पचनाच्या तक्रारी आदी व्याधीही घटतात. हे प्रकार जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली शिकून घ्या आणि तुमचे आरोग्य उत्तम राखा.

३. आयुर्वेदाची कास धरावी

आजकाल प्रकृतीची थोडीशी कुरबूर वाटली की, अनेक जण लगेच अ‍ॅलोपॅथिक औषधे घेणे चालू करतात. प्राचीन ऋषीमुनींनी सांगितलेल्या आयुर्वेदाचे महत्त्व का विसरले जाते ? अ‍ॅलोपॅथिक औषधांचे दुष्परिणाम होऊ शकतात किंवा त्या औषधोपचारातून दुसरा एखादा विकार निर्माण होऊ शकतो. आयुर्वेदिक औषधांमुळे असे होत नाही. आयुर्वेदिक औषधांमुळे निरोगी आणि दीर्घायुषी होता येते.

मुलांनो, तुम्हीही पडसे किंवा खोकला झाल्यावर आईला काढा करायला सांगणार ना ? हिंदु संस्कृतीचा हा वारसा जपण्याचे दायित्व तुमच्यावरच आहे, हे लक्षात ठेवा !

Leave a Comment