हॅरी पॉटर नको, तर संतचरित्रे वाचा !

मुलांनो, ‘हॅरी पॉटर’ची कथा ही वास्‍तवतेचा जरासुद्धा आधार नसलेली काल्‍पनिक कथा आहे. ही काल्‍पनिक साहसकथा कधीतरी सत्‍यात उतरेल का ? मग जे खोटे (उदा. हॅरी पॉटर, टारझन, अरेबियन नाईट्‍स आदी कथा) आहे, ते वाचण्‍यात वेळ का दवडायचा ? परकीय साहित्‍याच्‍या नादी लागून हिंदु संस्‍कृतीतील अनमोल ठेवा का विसरायचा ?

हिंदुस्थान ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्‍वर, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदासस्वामी, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद आदी अनेक संत हिंदुस्थानात होऊन गेले. बालवयात `ज्ञानेश्‍वरी’ हा महान ग्रंथ लिहिणारे संत ज्ञानेश्‍वर कसे घडले, ते अभ्यासा ! भक्‍तीसाठी आणि सेवेसाठी आकाशात उड्डाण करणार्‍या मारुतीची गोष्ट केव्हाही अधिक संस्कारक्षम नाही काय ?

संतचरित्रे वाचण्याचे लाभ

अ. संतचरित्रांतून आदर्श उभे रहाणे : समाजासमोर सध्या फारसे आदर्श नाहीत. त्यामुळे समाज दिशाहीन झाला आहे. आपण कुणाचे अनुकरण करावे, असा प्रश्‍न समाजासमोर उभा रहातो. संतचरित्रांतून सर्वांसमोरच योग्य आदर्श उभे रहातात. संतांची चरित्रे वाचून त्यांचे अनुकरण कसे करायचे, तेही कळते.

आ. संतांची शिकवण वाचून वाचक चांगल्या मार्गाकडे वळणे : संतांनी वेळोवेळी समाजाला योग्य दिशा देऊन चांगल्या मार्गाकडे वळवले आहे. ती उदाहरणे वाचून आपणही चांगल्या मार्गाकडे वळतो, उदा. संत ज्ञानेश्‍वर महाराज यांनी रेड्याकडून वेद वदवून सर्व प्राणीमात्रांत ईश्‍वर असल्याने सर्वांवर प्रेम करा, असे शिकवले. विठ्ठलभक्तीत सदा रमणार्‍या संत तुकारामांनी सुख-दु:खाच्या प्रसंगी देवाला आठवा, ही शिकवण दिली.

इ. संतचरित्राचा अभ्यास केल्याने ईश्‍वरावरील श्रद्धा वाढायला लागणे आणि जीवन आनंदी बनणे : संतचरित्राचा अभ्यास केला, तर आपली ईश्‍वरावरील श्रद्धा वाढायला लागते. संतचरित्र आणि संतांचे विचार अभ्यासल्यामुळे जीवनात ईश्‍वराची उपासना करण्याचे महत्त्व कळते. ईश्‍वराची उपासना केल्यामुळे आपल्यातील सद्गुण वाढून जीवन आनंदी बनते.

मुलांनो, संतांनी साधना आणि गुरुसेवा कशी केली, हे वाचा आणि तुम्हीही तशी साधना अन् सेवा करण्यास आरंभ करा !

ई. संतलिखित ग्रंथ वाचावेत : मुलांनो, संतचरित्रांसह संतलिखित ग्रंथही वाचावेत. संतलिखित ग्रंथांमध्ये ईश्‍वरी चैतन्य असल्याने ते वाचल्याने ज्ञानासह त्या चैतन्याचाही लाभ होतो. त्यामुळे असे ग्रंथ वाचावेत.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी