रामभक्त त्यागराज

अनुमाने ४०० वर्षांपूर्वी तामिळनाडूमध्ये त्यागराज नावाचा रामभक्त होऊन गेला. तो उत्तम कवीही होता. तो रामाची स्व-रचित भजने म्हणायचा. त्याचे रामनाम सतत चालू असे. एकदा त्याला दुसर्‍या शहरात जायचे होते. तो रानातून जात असतांना त्याला लुबाडण्यासाठी दोन चोर त्याच्या पाठी लागले. त्यागराज स्वत:च्याच नादात भजने गुणगुणत चालला होता. ५ घंट्यांनंतर दुसरे शहर जवळ आले. त्या वेळी दोन्ही चोर त्यागराजच्या पाया पडले. त्यागराजला आश्‍चर्य वाटले. त्याने विचारले, तुम्ही मला नमस्कार का करता ? ते म्हणाले, आम्ही चोर आहोत. तुमच्याजवळ जे काही असेल, ते आम्ही घेऊन जाणार होतो; पण तुमच्या दोन्ही बाजूंना तुमचे रक्षक असल्याने आम्ही तुम्हाला काहीच करू शकलो नाही. त्या रक्षकांनी आम्हाला ओळखले. ते आम्हाला पकडणार होते; पण आम्ही त्यांची क्षमा मागितली आणि त्यांना नमस्कार करू लागलो. तेव्हा त्यांनी सांगितले, आम्हाला नमस्कार न करता त्यागराजांना नमस्कार करा, तरच आम्ही तुम्हाला सोडू; म्हणून आम्ही तुम्हाला नमस्कार करत आहोत. त्यागराजने विचारले, कोणते दोन रक्षक ? मी तर कोणालाही सांगितले नव्हते. त्यागराज बाजूला बघू लागले, तर तेथे कोणीच नव्हते. चोरांनाही आश्‍चर्य वाटले. ते दोन्ही रक्षक नाहीसे झाले होते.

त्यागराजांनी त्यांना विचारले, ते रक्षक कसे दिसत होते ? चोर म्हणाले, दोघांच्या खांद्यावर धनुष्य-बाण होते. डोक्यावर मुकुट होता आणि दोघेही तरुण होते. त्या वेळी त्यागराजांच्या डोक्यात प्रकाश पडला की, चोरांना दिसलेले रक्षक म्हणजे श्रीराम आणि लक्ष्मणच होते. त्यागराज चोरांना म्हणाले, तुम्ही भाग्यवान आहात. मी रामभक्त असून मला रामाचे दर्शन अजून झाले नाही. तुम्ही चोर असून आणि रामाचे भक्त नसूनही तुम्हाला रामाचे दर्शन झाले. मी चोर झालो असतो, तर बरे झाले असते !

– डॉ. वसंत बाळाजी आठवले (आताचे पू. वसंत आठवले), चेंबूर, मुंबई. (निज भाद्रपद कृष्ण पक्ष ९, कलियुग वर्ष ५११४ (९.१०.२०१२))

Leave a Comment