Due to a software update, our website may be briefly unavailable on Saturday, 18th Jan 2020, from 10.00 AM IST to 11.30 PM IST

क्रांतीकारक पं. श्यामजी कृष्ण वर्मा !

इंग्रजांच्या भूमीत राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी झटणारे निर्भय क्रांतीकारक पं. श्यामजी कृष्ण वर्मा !

आताच्या काळाच्या दृष्टीने तुलना करता, स्वातंत्र्यपूर्व काळ हा मोठा भाग्याचा म्हटला पाहिजे; कारण त्या काळच्या तरुणांपुढे स्वराज्य हे तेजस्वी ध्येय होते आणि त्या ध्येयपथावरून चालतांना अडीअडचणींना तोंड देतांना त्यांना जो आनंद होत होता, तो अवर्णनीय होता. जीवनामध्ये असे काही दिव्य असावे आणि त्यासाठी खडतर प्रयत्न करण्याची सुवर्णसंधी त्या काळच्या तरुणांना मिळत होती. जीवन सार्थकी लागल्याचे समाधान त्यांच्या वाट्याला येत होते. स्वातंत्र्याच्या होमात अनेक समिधा अर्पाव्या लागतात, त्यांपैकी आपण एक आहोत, याचा विलक्षण आनंद त्यांना मिळत होता. या देशात असे प्रयत्न करणारे अगणित होतेच; परंतु शत्रूच्या घरात राहूनही स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे काही निर्भय क्रांतीकारकही होते. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा हे त्यांपैकीच एक होते.

भारतियांना लेखनकला अवगत नसल्याचा पाश्‍चात्त्यांचा दावा पुराव्यासह खोडून काढणारे पंडितजी !

पंडितजींना लहान वयात विद्येसाठी लोकांच्या घरी कपडे धुण्याचे आणि पाणक्याचे कामही करावे लागले. विद्यार्थीदशेत ते स्वामी दयानंद सरस्वती यांच्या संपर्कात आले आणि त्यामुळे त्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली. याच काळात त्यांनी संस्कृतवर प्रभुत्व मिळवले. त्यानंतर ते काही काळ ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापिठात संस्कृतचे अध्यापक म्हणून कार्यरत झाले. पाश्‍चात्त्यांचे असे मत होते की, लेखनकला आणि लिपी भारतियांनी परकियांकडून घेतली. वेदांतील आधारांवरून वेदकाळी भारतियांना लेखनकला आणि लिपी यांचे ज्ञान होते, हे पंडितजींनी पुराव्यासह सिद्ध केले. त्यांनी सादर केलेल्या या प्रबंधामुळे त्यांचे विदेशात कौतुक झाले. जर्मनीने त्यांना पंडित पदवी दिली, तर ऑक्सफर्ड विद्यापिठाने त्यांना एमए उपाधी अर्पिली. ते नंतर भारतात आले; मात्र पुन्हा त्यांना वैयक्तिक कार्यासाठी ब्रिटनमध्ये जावे लागले. आपला देश पारतंत्र्यात आहे, या विचाराने ते अस्वस्थ असत. ब्रिटनमधील स्वतंत्र वातावरणात भारताच्या स्वातंत्र्याविषयी स्वतःची मते अधिक जोरकसपणे मांडता येतील, हे लक्षात आल्यावर त्यांनी तेथेच वास्तव्य करण्याचा निश्‍चय केला.

इंग्रजांच्या भूमीतस्थापन केलेले इंडिया हाऊस बनले सशस्त्र क्रांतीकारकांचे माहेरघर !

पंडितजींनी होमरूल सोसायटी आणि इंडियन सोशिऑलॉजिस्ट ही दोन पत्रके काढली. या पत्रकांमध्ये ब्रिटीश साम्राज्यावर टीका केली जात असे. ब्रिटनमध्ये शिकण्यासाठी येणार्‍या भारतीय तरुणांसाठी त्यांनी इंडिया हाऊस नावाच्या वसतीगृहाची स्थापना केली. तेथे भारतीय मुलांची रहाण्याची आणि जेवणाची सोय केली गेली. येथे क्रांतीकारकांच्या कारवाया चालत. पुढे या इंडिया हाऊसचा इंग्रजांना इतका धसका बसला होता की, एखाद्या वाचनालयात एखाद्या भारतियाने इंडिया हाऊसचा पत्ता विचारला की, तुम्ही क्रांतीकारक असालच, अशी प्रतिक्रिया इंग्रज व्यक्त करत असत.

ब्रिटनमध्ये शिकणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्यांच्या माध्यमातून, तर भारतात स्वातंत्र्यासाठी कार्य करणार्‍या राष्ट्रप्रेमींना अर्थपुरवठा करून साहाय्य करणारे राष्ट्रप्रेमी पंडितजी !

पंडितजींनी ब्रिटनमध्ये शिकण्यासाठी आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना महान भारतीय पुरुषांच्या नावाने शिष्यवृत्त्या देणे चालू केले. याच शिष्यवृत्त्यांपैकी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवाजी शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी या शिष्यवृत्तीचे खरोखरच चीज केले. ब्रिटनमध्ये वास्तव्याच्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर इंडिया हाऊसमध्ये वास्तव्य करत होते.

भारताला स्वातंत्र्य कसे मिळवून द्यायचे, हे सूत्र जितके महत्त्वाचे, तितकेच स्वातंत्र्यानंतर स्वराज्याची रचना कशी करायची, हेही सूत्र पंडितजींना महत्त्वाचे वाटले. म्हणूनच या विषयावर विद्वत्तापूर्ण निबंध लिहिणार्‍यालाही त्यांनी पारितोषक घोषित केले होते. भारताच्या कानाकोपर्‍यात स्वातंत्र्यासाठी कार्य करणार्‍यांना ते आर्थिक साहाय्य करत असत.

इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन ब्रिटनमधून पलायन करणारे आणि शेवटपर्यंत
विदेशात वास्तव्य करून भारताच्या स्वातंत्र्यासाठी झटणारे पंडितजी !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी चालू केलेल्या अभिनव भारत संघटनेच्या कार्याची पंडितजींनी ओळख करून घेतली आणि ते अभिनव भारताचे कट्टर पुरस्कर्ते बनले. त्यानंतर त्यांनी या संघटनेला प्रकट सहकार्य करणे चालू केले. पं. श्यामजींचे स्वराज्याविषयी चाललेले कार्य इंग्रजांच्या नजरेतून सुटले नाही. इंग्रज शासन कार्यवाही करणार, हे लक्षात आल्यावर पंडितजींनी कोणास काही कळू न देता पॅरिसला प्रयाण केले. ते पॅरीसला पोहोचण्याआधीच त्यांचा ब्रिटनमधील अधिकोषात जमा केलेला सर्व निधी फ्रान्सच्या अधिकोषात जमा झाला होता. त्यामुळे इंग्रजांना त्यांच्या पदव्या काढून घेण्यापलीकडे त्यांच्या विरोधात कोणतीही कार्यवाही करता आले नाही. महायुद्ध चालू झाल्यावर त्यांना फ्रान्समध्ये रहाणेही धोक्याचे वाटले. त्यामुळे त्यांनी स्वित्झर्लंडला प्रयाण केले.

स्वातंत्र्यासाठी शेवटपर्यंत कार्य करणारे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ३० मार्च १९३० या दिवशी अखेरचा श्‍वास घेतला.

संदर्भ: स्वातंत्र्यलढ्यातील अमर क्रांतीकारक, संकलक : वि.द. कयाळ