गुरुपौर्णिमा

आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा ! साधना करणार्‍यांचा वर्षातील महत्त्वाचा उत्सव. गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! भारतीय संस्कृतीमध्ये गुरु-शिष्य परंपरेची जोपासना झालेली आहे. किंबहुना ही परंपरा म्हणजे भारतीय संस्कृतीचे भूषण आहे. ‘गुरूंची महती’ हेच त्यातील मर्म आहे.

शिष्याने कोणती साधना करावी ते गुरु जाणतात. त्याला नुसती साधना सांगून ते थांबत नाहीत, तर त्याच्याकडून साधना करवून घेतात. हेच गुरूंचे खरे शिकवणे असते. गुरूंचे लक्ष शिष्याच्या ऐहिक सुखाकडे नसते, कारण ते प्रारब्धानुसार असते. गुरूंचे लक्ष फक्त शिष्याच्या आध्यात्मिक उन्नतीकडे असते. श्री शंकराचार्यांनी म्हटले आहे, ‘‘ज्ञानदान करणार्‍या सद्गुरूंना शोभेल अशी उपमा या त्रिभुवनात कोठेही नाही. त्यांना परिसाची उपमा दिली, तरी तीही अपुरी पडेल; कारण परीस लोखंडास सुवर्णत्व देत असला, तरीही त्याचे परीसत्व देऊ शकत नाही.’’ गुरूंची महती वर्णन करायला शिष्याला शब्द अपुरे पडतात. गुरु आतही आहेत आणि बाहेरही आहेत. तुम्ही अंतर्मुख व्हावे, अशी परिस्थिती गुरु निर्माण करतात.

तुम्हाला आत्म्याकडे म्हणजेच ब्रह्माकडे ओढावे, म्हणून गुरु आतही म्हणजे हृदयात सिद्धता करत असतात. हिंदु संस्कृतीमध्ये गुरूंनी शिष्याकरवी करून घेतलेले कार्य अनेक उदाहरणांद्वारे वर्णन करता येते. आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य, रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद या गुरु-शिष्य जोड्या आणि त्यांचे अद्वितीय कार्य आज जगाला परिचित आहे. या सगळ्या उदाहरणांमधून अधर्माच्या विरोधात लढण्याचा श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश सर्वत्र पोहोचतो. विद्यमान काळातील अधर्माचरणी राजकीय वातावरण लक्षात घेता गुरु-शिष्य नात्याची प्रचीती आणि त्यातून धर्माचरणी राज्यस्थापनेची मुहूर्तमेढ पहायला मिळावी, ही गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी अपेक्षा !

संदर्भ: दैनिक सनातन प्रभात