गोवा मुक्तीच्या क्रांतीचे खरे शिल्पकार आणि थोर राष्ट्रभक्त डॉ. राममनोहर लोहिया !

‘खा, प्या आणि मजा करा’ या तत्त्वावर चालणार्‍या पोर्तुगीज सालाझारशाहीतील सार्वजनिक सभा बंदीला गोव्यात उघड आव्हान देत थोर समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांनी १८.६.१९४६ या दिवशी मडगांव येथे एक भलीमोठी सार्वजनिक सभा घेतली आणि त्यासह गोव्यात जनक्रांतीची ज्योत पेटवली. ज्यातून प्रेरणा प्राप्त असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपले सर्वस्व पणाला लावून ती ज्योत तेवत ठेवली आणि परिणाम स्वरूप १९.१२.१९६१ या दिवशी साडे चारशे वर्षांच्या प्रदीर्घ वसाहतवादी दास्याच्या छळातून गोवा मुक्त झाला. या गोवा मुक्ती लढ्यात सहभागी ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रतिवर्षी १८ जून हा दिवस गोव्यात क्रांतीदिन म्हणून पाळला जात आहे.

१. ‘गोवा मुक्ती’च्या प्रयत्नात खर्‍या अर्थाने प्राण ओतून नवचैतन्य आणणारे डॉ. राममनोहर लोहिया !

ब्रिटिश, डच, फ्रेंच इत्यादी पाश्चिमात्य साम्राज्यशाही राष्ट्रांच्या तुलनेत पोर्तुगालने २२.५.१४९८ या दिवशी वास्को-द-गामाच्या रूपाने भारतात सर्वप्रथम पाय ठेवला. खिस्ताब्द १९६१ मध्ये माघारी परतणार्‍या या दीर्घकालीन वसाहतवाद्यांच्या पराभवाचे खरे शिल्पकार ठरले, थोर राष्ट्रभक्त डॉ. राममनोहर लोहिया ! स्वयं पोर्तुगालमध्येच‘फॅसिस्ट’ राज्यकारभार चालवणार्‍या डॉ. सालाझारच्या राज्यात भाषण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, संघटनेचे स्वातंत्र्य, वृत्तपत्र चालवण्याचे स्वातंत्र्य इत्यादी जीवनावश्यक मानवी मूल्यांना काडीचेही मोल नव्हते. त्या वेळी गोवा हा स्वतःच्याच राष्ट्राचा भाग असल्याचे मानणार्‍या त्या फॅसिस्ट’वाद्यांकडून गोव्यात वेगळे असे काय असणार ? अमानुष दडपशाही हा त्यांच्या राजवटीचा विशेष गुण ! अशा परिस्थितीत पोर्तुगीज दास्याच्या शृंखला तोडण्यासाठी अनेकांनी अविरत प्रयत्न केले. त्यातील कित्येक गोमंतकीय सुपुत्रांना मारले, फासावर चढवले किंवा अफ़्रीकेत सीमापार करण्यात आले, तरीही गोवा मुक्तीचे प्रयत्न चालूच होते; पण या प्रयत्नात खर्‍या अर्थाने प्राण ओतून नवचैतन्य आणले, ते डॉ. लोहियांनी !

२. डॉ. लोहियांच्या आगमनाने गोवा मुक्ती चळवळीला अभूतपूर्व चालना देणारे देवदूतच आल्यासारखे गोमंतकियांना वाटणे

आंतरराष्ट्रीय राजकारणाचा गाढा अभ्यास असलेले आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपली हयात घालवलेले डॉ. लोहिया हे गोव्यात मडगाव येथे सार्वजनिक भाषण करणार, ही वार्ता अगदी वार्‍याप्रमाणे राज्यभर पसरली आणि तोदिवस उजाडला. १८.६.१९४६ हा दिवस नव्या विचारांचे वादळच घेऊन गोव्यात अवतरला. पहाता-पहाता दुपारी ३-४ या वेळेत असंख्य गोमंतकीय बांधव लांब-लांबचा प्रवास करून मडगावला पोहोचले. सभास्थानी अवतरलेल्या डॉ. लोहियांनापाहून एकूण मडगाव नगरीच दुमदुमली ‘भारतमाता की जय’, ‘महात्मा गांधी की जय’, ‘राममनोहर लोहिया की जय !’ त्यांच्या आगमनाने गोवा मुक्ती चळवळीला अभूतपूर्व चालना देणारे देवदूतच आल्यासारखे गोमंतकियांना वाटले.

३. डॉ. लोहियांना अटक केल्यावरही त्यांनी पेटवलेली क्रांतीची मशाल पोर्तुगिजांना गोमंतभूमीतून हुसकावूनच थांबणे

‘सालाझारची ‘फॅसिस्ट’ सत्ता असली; म्हणून काय झाले ? गोमंतक हा भारताचाच भाग आहे. भारताच्या स्वातंत्र्यासह गोवा मुक्त झालाच पाहिजे’, असे सदोदित मानणार्‍या डॉ. लोहियांनी आपल्या भाषणाला प्रारंभ करताच तिथे उपस्थित पोर्तुगीज अधिकारी कॅप्टन मिरांद यांनी त्यांना अडवले आणि स्पष्ट सांगितले, ‘‘गोव्यात भाषण करण्यावर बंदी आहे.’’ त्यावर देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या डॉ. लोहियांनी त्यांना भाषण करणे, हा आपला मूलभूत अधिकार असून आपण अहिंसक मार्गाने सभा घेत असल्याचे सांगून निर्भीडपणे आपले भाषण चालूच ठेवले. ते पाहून रागाचा पारा अगदी शिगेला पोहोचलेल्या कॅप्टन मिरांदने कमरेचे पिस्तूल काढले आणि लोहियांवर रोखून गरजला, ‘‘भाषण बंद कर. अन्यथा गोळी झाडीन’’; पण सच्च्या देशभक्ताला नसानसांत देशप्रेम संचारलेल्या डॉ. लोहियांना कॅप्टन मिरांदच्या पिस्तूलची ती कसली भीती ? त्यांनी हळूच माशी झटकावी, त्याप्रमाणे मिरांदाचा पिस्तुलधारी हात आपल्या डाव्या हाताने बाजूला सारला आणि पुन्हा एकदा सभास्थान गरजले, ‘राममनोहर लोहियाकी जय.’ शेवटी मिरांदने डॉ. लोहियांना अटक केली; पण त्याने पेटवलेली क्रांतीची मशाल मात्र विझवणे मिरांदच्या आवाक्या बाहेरचे होते. शेवटी तीच मशाल मिरांदसह समस्त पाखल्यांना (पोर्तुगिजांना) गोमंतभूमीतून हुसकावूनच थांबली.

४. डॉ. लोहियांच्या अटकेनंतर गोवा मुक्तीच्या सत्याग्रही दोलनाचे क्रांतीकारी चळवळीत रूपांतर होणे

डॉ. लोहियांच्या अटकेनंतर उपस्थित जनसमुदायामध्ये त्यांच्या भाषणाच्या प्रती वाटण्यात आल्या. प्रेरित झालेल्यांनी आपापल्या भागात जाऊन आणखीही बर्‍याच जणांना या मुक्ती चळवळीत सामाविष्ट होण्यासाठी प्रेरित करून एकप्रकारे पोर्तुगीजसत्तेला सुरुंगच लावला. पुढे या चळवळीने अथांग रूप धारण केले आणि गोवामुक्तीसाठी सर्व थरांतून प्रयत्न होऊ लागले. यात गोमंतकियांप्रमाणेच उर्वरीत भारतातीलदेशभक्तांनीही मोठ्या प्रमाणात भाग घेतला. १५.८.१९५५ या दिवशी पत्रादेवी चेकनाक्यावर झालेला सत्याग्रह अविस्मरणीयच ठरला. ‘चलो-चलो गोवा चलो’,‘लाठी-गोली खायेंगे, फिर भी गोवा जायेंगे’, असा जयघोष करत भारताच्या विविधभागातून प्रचंड संख्येने आलेल्या निःशस्त्र सत्याग्रहींवर क्रूर पोर्तुगिजांनी अक्षरशःगोळीबार केला. त्यांच्या त्या अमानुष गोळीबाराला अनेक सत्याग्रही बळी गेले, हुतात्माझाले; पण त्या घटनेनंतर मात्र ‘गोवा विमोचन समिती’ने सत्याग्रह पद्धत मागे घेतली आणि अनेक तरुणांनी ‘जशास तशे’, ‘ठोशास ठोसा’ या तत्त्वानुसार हातात रायफली,हातबाँब, मशीनगन घेऊन पोलीस ठाण्यांवर आक्रमण केले.

५. दीर्घकालीन पोर्तुगीज दास्यता संपून गोवा मुक्त होणे, ही डॉ. लोहियांच्याक्रांतीची फलश्रुती !

शेवटी भारत शासनाने सैन्य पाठवून गोवा मुक्त करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार ‘विजय ऑपरेशन’च्या अंतर्गत भारतीय सैन्याचे रणगाडे-चिलखती गोव्याच्यासीमेवर बेळगावला आले. तिथल्याच सांबरा विमानतळावर लढाऊ विमाने जमली.दुसर्‍या बाजूने कारवारच्या माजाळी भागात लष्कर थांबले, तर पश्चिम सागरात भारतीयआरमार सज्ज ठाकले. १८.१२.१९६१ या दिवशी भारतीय सैन्याने चहुबाजूंनी गोव्यावरआक्रमण केले आणि पोर्तुगिजांना ‘पळता भुई थोडी’ केली. गोव्यातील विमानतळ बाँबटाकून नष्ट केले. पोर्तुगालहून आलेली ‘अल्बूकर्क’ ही लढाऊ नौका बाँब आक्रमण करूनबुडवली. पायदळाने मुसंडी मारून दुसर्‍याच दिवशी गोवा कह्यात घेतले. पोर्तुगालचागोव्यातील सेनाधिकारी जनरल मान्युएल आंतानियू सिल्व्ह याने भारतीय लष्कराचे ब्रिगेडीयर के.एस. धिल्लन यांच्यासमोर शरणपत्र लिहून दिले आणि त्याचक्षणी साडेचारशे वर्षांची गोव्यावरील दीर्घकालीन पोर्तुगीज दास्यता संपून गोवा मुक्त झाला.डॉ. लोहियांच्या क्रांतीची फलश्रुती झाली.’

संदर्भ : दैनिक ‘पुढारी’ १८.६.१९९९