वन्दे मातरम् – क्रांतीकारकांचा मूलमंत्र

           थोर वंग देशभक्त बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे वन्दे मातरम् या गीताचे रचयिते आहेत. इ.स. १८७६ साली त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले. ही कादंबरी इ.स. १८८२ साली प्रकाशित झाली आणि लवकरच हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले.

वन्दे मातरम् येथे ऐका :

वन्दे मातरम्
सुजलां सुफलां मलयजशीतलाम्
शस्यशामलां मातरम् ।
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीं
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं
सुहासिनीं सुमधुर भाषिणीं
सुखदां वरदां मातरम् ।। १ ।। वन्दे मातरम् ।

कोटि-कोटि-कण्ठ-कल-कल-निनाद-कराले,
कोटि-कोटि-भुजैर्धृत-खरकरवाले,
अबला केन मा एत बले ।
बहुबलधारिणीं नमामि तारिणीं
रिपुदलवारिणीं मातरम् ।। २ ।। वन्दे मातरम् ।

तुमि विद्या, तुमि धर्म
तुमि हृदि, तुमि मर्म
त्वं हि प्राणा: शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति,
हृदये तुमि मा भक्ति,
तोमारई प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे
मातरम् ।। ३ ।। वन्दे मातरम् ।

त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदलविहारिणी
वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम्
नमामि कमलां अमलां अतुलां सुजलां सुफलां मातरम् ।। ४ ।। वन्दे मातरम् ।

श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां
धरणीं भरणीं मातरम् ।। ५ ।। वन्दे मातरम् ।

– बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (चटर्जी)
(`वन्दे मातरम्’ हे गीत रविवार, कार्तिक शुद्ध नवमी, शके १७९७ (७ नोव्हेंबर १८७५) या दिवशी पूर्ण झाले.)

`वन्दे मातरम्’चा भावार्थ

माते, मी तुला वंदन करतो.
जलसमृद्ध नि धनधान्यसमृद्ध दक्षिणेकडील मलय पर्वतावरून येणाऱ्या वायूलहरींनी शीतल होणाऱ्या नि विपुल शेतीमुळे श्यामलवर्ण बनलेल्या, हे माते !
पांढऱ्याशुभ्र चांदण्यामुळे तुझ्या रात्री प्रफुल्लित असतात, तर फुलांना बहर आल्यामुळे तुझी भूमी वृक्षराजींचे वस्त्र परिधान केल्यासारखी सुशोभित दिसते. सदा हसतमुख आणि सर्वदा मधुर बोलणारी, वरदायिनी, सुखप्रदायिनी अशा हे माते !

          तीस कोटी मुखांतून भयंकर गर्जना उठत असतांना आणि साठ कोटी हातांतील परजलेल्या खड्गांची पाती चमकत असतांना, हे माते तू अबला आहेस, असे म्हणण्याचे धारिष्ट्य तरी कोण करणार ? खरोखरी, माते अपार सामर्थ्य तुझ्या ठिकाणी आहे. शत्रूसैन्याच्या लाटा परतवून लावून आम्हा संतानांचे रक्षण करणाऱ्या हे माते, मी तुला नमस्कार करतो.

तूच आमचे ज्ञान, तूच आमचे चारित्र्य नि तूच आमचा धर्म आहेस. तूच आमचे हृदय नि तूच आमचे चैतन्य आहेस. आमच्या देहातील प्राण खरोखरी तूच आहेस. आमच्या मनगटातील शक्ती तूच अन् अंत:करणातील काली पण तूच. देवळांमध्ये आम्ही ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतो ती सर्व तुझीच रूपे.

आपल्या दाही हातांत दहा शस्त्रे धारण करणारी शत्रूसंहारिणी दुर्गा तूच आणि कमलपुष्पांनी भरलेल्या सरोवरात विहार करणारी कमलकोमल लक्ष्मी तूच. विद्यादायिनी सरस्वतीही तूच. तुला आमचा नमस्कार असो. माते, मी तुला वंदन करतो. ऐश्वर्यदात्री, पुण्यप्रद नि पावन, पवित्र जलप्रवाहांनी नि अमृतमय फळांनी समृद्ध असलेल्या, अशा हे माते तुझ्या थोरवीला कशाचीच जोड नाही, कोणतीच सीमा नाही. हे माते, हे जननी आम्ही तुला प्रणाम करतो.

माते, तुझा वर्ण श्यामल आहे. तुझे चारित्र्य धवल आहे. तुझे मुख सुंदर हास्याने विलसत आहे. तू सर्वाभरणभूषित असल्याने किती सुंदर दिसतेस ! खरोखरी, आम्हाला धारण करणारी तूच आणि आमचे भरणपोषण करणारीही तूच. माते, तुला आमचे पुन:श्च प्रणिपात

भारतमातेच्या सुपुत्रांनो, राष्ट्राभिमान जोपासण्यासाठी कृतीशील व्हा !

  • भारतमातेच्या सुपुत्रांनो, `वन्दे मातरम्’ची अवहेलना, क्रांतीकारकांचा अवमान, तसेच इतिहासाचे विकृतीकरण रोखण्यासाठी काय करणार आहात ?
  • प्रत्येक शाळा आणि महाविद्यालय यांच्या व्यवस्थापनाला / चालकांना भेटून तेथे प्रतिदिन `वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत संपूर्ण म्हटले जाईल, यासाठी प्रबोधन करा !
  • राष्ट्रासाठी अमूल्य योगदान देणारे राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचे स्मृतीदिन साजरे करा !
  • क्रांतीकारकांची चरित्रे सांगणारी व्याख्याने, कथाकथन स्पर्धा अन् चित्रपट यांचे आयोजन करा !

        वरील संदर्भात आपण काही कृती केली असल्यास आपले नाव आणि पत्ता यांसह आपली कृती आम्हाला लिहून कळवा.

इतिहासाच्या स्मरणाने राष्ट्र टिकेल अन् राष्ट्र टिकले, तर आपण टिकू !