श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेले नाशिकचे
श्री काळाराम मंदिर


गोदावरी तिरावर वसलेले नाशिक हे चारही युगात प्रसिद्ध असून ते हरिहरात्मक महाक्षेत्र आहे. भगवान शिव आणि विष्णु यांचे या स्थळी वास्तव्य झाल्याने यास हरिहर क्षेत्रही संबोधले गेले. त्रेतायुगात भगवान श्रीरामांनी वनवासात असतांना गोदातटी श्राद्धदानादिके करून आपल्या पितृगणांचा उद्धार केला. अशा प्रकारे प्रभु श्रीरामाच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या आणि यच्चयावत हिंदूंचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभव असलेल्या नाशिक येथील श्री काळाराम मंदिराची माहिती जाणून घेऊ.

श्री काळाराम मंदिराचा इतिहास

पूर्वी काळाराम मंदिराच्या ठिकाणी अरण्य होते. सध्या जेथे श्री काळाराम मंदिर आहे, त्या मंदिराच्या ठिकाणी श्रीरामांची ‘पर्णकुटी’ होती. श्रीराम सवादोन वर्षे पंचवटीत वास्तव्याला होते. या स्थानाला वैष्णवांच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. ओढा नाशिकरोड येथील जहागिरी असलेले पेशव्यांचे सरदार श्री. रंगनाथ ओढेकर यांना माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी मंदिराचे बांधकाम करण्याची आज्ञा केली आणि याच काळात ओढेकर यांना प्रभु श्रीरामाचा ‘तुम्ही मंदिराचा जीर्णोद्धार करावा’ असा स्वप्नदृष्टांत झाला.

मंदिराचे दगडी बांधकाम

आता श्री काळाराम मंदिर असलेल्या ठिकाणी पूर्वी लाकडी मंदिर होते. श्री समर्थ रामदासस्वामींनी याच मंदिरात श्रीरामाची उपासना केली होती. या मंदिरातील मूर्ती काही शतकांपूर्वी नाशिकमधील गोदावरी नदीच्या ‘रामकुंडा’त मिळालेल्या आहेत. म्हणूनच या मूर्ती वालुकामय असून स्वयंभू आहेत. या मंदिराच्या बांधकामासाठी नाशिकपासून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या ‘रामशेज’ नावाच्या डोंगरावरून दगड आणण्यात आले. या डोंगरावर प्रभु श्रीराम रात्री निद्रा करण्यासाठी जात असत. या डोंगरावरील दगड काढल्यानंतर दूध आणि नवसागर टाकून उकळून त्याची परीक्षा केली गेली. पूर्ण बांधकामासाठी सिमेंट अथवा पाण्याचा वापर झालेला नाही. मंदिराचे बांधकाम या दगडांपासून झाले आहे. खिस्ताब्द १७७८ ते खिस्ताब्द १७९० या कालखंडात हे मंदिर पूर्ण झाले. त्यावेळेस या मंदिराच्या बांधकामाला २३ लक्ष रुपये खर्च आला.

वास्तूशास्त्राचा उत्तम नमुना

श्री काळाराम मंदिर हे हेमाडपंथी वास्तूशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखले जाते. मंदिराचा एकूण परिसर २६६ फूट लांब आणि १३८ फूट रुंद असून मंदिरास चारही दिशांना असलेली प्रवेशद्वारे हे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याचे प्रतीक आहेत. आतील मंदिरास तीन दरवाजे असून ते सत्त्व, रज आणि तम प्रवृत्तीची प्रतिके आहेत. मंदिराच्या भोवताली मोकळी जागा आणि यात्रेकरूंसाठी (१०० कमानी असलेल्या) ओवर्‍या आहेत. बाहेरच्या ओवर्‍यांना ८४ आर्च आहेत. ८४ लक्ष योनीनंतर मनुष्य जन्म प्राप्त होतो. याचे प्रतीक म्हणून ८४ आर्च आहेत. ४० खांबांवर भव्य सभामंडप उभा आहे. मंदिरावर सोन्याचा कळस असून त्या कळसासाठी पैसे अल्प पडल्याने शेवटी सरदार रंगनाथ ओढेकरांच्या पत्नीने तिच्या नाकातली ‘नथ’ दिली होती. उत्तरायण आणि दक्षिणायन काळात सूर्याची किरणे प्रत्यक्ष रामरायाच्या चरणांवर पडतात. गर्भगृहातील राममूर्ती आणि सभामंडपातील मारुतीची मूर्ती यांचे ‘नेत्रोमिलन’ होते. मंदिराच्या चारही दरवाज्याच्या बाहेरील बाजूस मारुति मंदिरे आहेत.

विशिष्ट भाव प्रगट करणार्‍या मूर्ती

श्री काळाराम मंदिरातील राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती काळ्या रंगाच्या आहेत. श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती विशिष्ट भाव प्रगट करतात. श्रीरामाचा उजवा हात हा छातीवर असून डावा हात हा पायाकडे दर्शविलेला आहे. या क्रियेतून आपणास ज्ञात होते की, जो कोणी श्रीरामास शरण जाईल, श्रीरामाच्या चरणांचे स्मरण करील, त्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणार्‍यास श्रीराम छातीवर हात ठेवून सांगत आहेत, ‘मी समर्थ आहे, तू फक्त माझे स्मरण ठेवून तुझे कार्य करत रहा.’ आजपर्यंत अनेक भाविकांना तसा अनुभव आलेला आहे. श्रीरामासमोर केवळ नतमस्तक होऊन, तळमळीने जर आपण काही मागणे मागितले, तर तेही लवकरच पूर्ण होते, फक्त निष्ठा हवी. तळमळ हवी आणि विश्वास हवा. याही पुढे जाऊन श्रीरामाने स्वीकारलेल्या मार्गाचे अवलंबन केले, तर त्या भाविकास ‘ब्रह्मानंद’ प्राप्त होईल. या ब्रह्मानंदाचे वर्णन करणे अशक्यच आहे. एक बाणी, एक वचनी, एक पत्नी अशा या श्रीरामास दिवसातून एकदा तरी स्मरण केले किंवा त्याचे नामस्मरण केले, तर लवकरच या सुख-दुःखाच्या चक्रातून आपण मुक्त होऊ शकतो. लंकेत जाण्यासाठी पूल बांधतांना वानरांनी ‘श्रीराम’नामाचे सागरात जे दगड टाकले होते, तेही सागरात तरंगले होते आणि रामसेतू तयार झाला होता. असा हा रामनामाचा महिमा आहे. संतश्रेष्ठ चक्रधरस्वामी, समर्थ रामदासस्वामी, गोंदवलेकर महाराज आदी महापुरुषांनी याच श्री काळारामाची उपासना केल्याच्या इतिहासात नोंदी आहेत.

मारुतीची दासमूर्ती

श्री काळाराम मंदिरातील मूर्ती इतक्या सुंदर आहेत की, त्यांच्या दर्शनाने आपण आपले देहभान विसरून जातो. क्षणभर आपले दुःख आपण विसरून जातो. आपले मन प्रसन्न होते. मुख्य मंदिरात राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती असून समोर सभामंडपात मारुतीची ‘दासमूर्ती’ आपणास बघावयास मिळते. त्या मारुतीरायाचे दर्शनही आपणास प्रफुल्लीत करते. ही हात जोडून उभी असलेली मूर्ती आपणास ‘श्रीरामाचे दास बना, रामाचे नामस्मरण करा’ असा जणू संदेशच देत आहे.

याही पुढे जाऊन श्रीरामाने स्वीकारलेल्या मार्गाचे अवलंबन केले, तर त्या भाविकास ‘ब्रह्मानंद’ प्राप्त होईल. या ब्रह्मानंदाचे वर्णन करणे अशक्यच आहे. एक बाणी, एक वचनी, एक पत्नी अशा या श्रीरामास दिवसातून एकदा तरी स्मरण केले किंवा त्याचे नामस्मरण केले, तर लवकरच या सुख-दुःखाच्या चक्रातून आपण मुक्त होऊ शकतो. लंकेत जाण्यासाठी पूल बांधतांना वानरांनी ‘श्रीराम’नामाचे सागरात जे दगड टाकले होते, तेही सागरात तरंगले होते आणि रामसेतू तयार झाला होता. असा हा रामनामाचा महिमा आहे. संतश्रेष्ठ चक्रधरस्वामी, समर्थ रामदासस्वामी, गोंदवलेकर महाराज आदी महापुरुषांनी याच श्री काळारामाची उपासना केल्याच्या इतिहासात नोंदी आहेत.

लेखक : महंत सुधीरदासजी पुजारी, नाशिक