धार्मिक विधींचे मुख्य स्थान रामकुंड (श्रीराम तीर्थ)
नाशिकमधील प्रसिद्ध तीर्थ रामकुंड आहे. यालाच रामतीर्थ असेही म्हणतात. या रामतीर्थात अरुणा आणि वरुणा नदीचा संगम आहे. या रामतीर्थात सूर्य तीर्थ, चक्र तीर्थ, अश्वीन तीर्थ, अस्थी विलय तीर्थ असून धार्मिक विधींचे मुख्य स्थान आहे.

वनवासाच्या काळांत प्रभू श्रीरामचंद्रांनी येथे महादेवाची स्थापना केली. षोडशोपचारे पूजन करून शिवस्तोत्र म्हणून शिवास प्रसन्न करून घेतले. प्रभू रामचंद्रांच्या स्तुतीने महादेव प्रकट झाले. त्यांनी राम लक्ष्मणास आशीर्वाद दिले आणि वर मागण्यास सांगितले. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले की, जो कोणी या स्तोत्राचे या स्थळी पठण करेल त्यांचे कार्यसिद्धी होवो. ज्यांचे पीतर नरकांत असतील, त्यांनी तेथे पिंडदान केले असता त्यांना स्वर्गलोक प्राप्त होवो.’

महादेव प्रसन्न होऊन रामचंद्रांना ‘एवमस्तु’म्हणून अंतर्धान पावले. तेव्हापासून हे रामतीर्थ म्हणून प्रसिद्ध झाले. रामकुंडाचे बांधकाम इ.स. १६९६ मध्ये सातारा जिल्ह्यातील खटावचे जमीनदार चित्रराव यांनी केले. १७८२ मध्ये गोपिकाबाई पेशवे यांनी रामकुंडाची दुरुस्ती केली. रामकुंड क्षेत्र पितरांना मोक्ष देणारे आहे. येथे स्नान, दान, पिंडदान यांचे विशेष महत्त्व आहे. आपल्या पित्याचे देहावसान झाले, असे कळल्यावर श्रीरामाने या ठिकाणी यथाविधी श्राद्ध करून गायी दान दिल्या.

रामकुंडाच्या पुढेच लक्ष्मण कुंड आहे. इस १७५८ मध्ये महादजी गोविंद काकडे यांनी ते बांधले. रामकुंडापासून दहा फुटांवर सीताकुंड आहे. त्याच्याजवळच अन्य छोटी छोटी कुंडे आहेत.