तानाजी मालुसरे

स्वतःच्या प्राणांची आहुती देत कोंढाणा किल्ला जिंकून देणारा ‘सिंह’ म्हणजे तानाजी मालुसरे !

तानाजी मालुसरे हे सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावचे होय. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्वासातील होते. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते.

फेब्रुवारी १६७० मध्ये तानाजी मालुसरे हे आपल्या मुलाचे लग्नाचे आमंत्रण छत्रपती शिवाजी महाराजांना देण्यासाठी गेले होते. त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या ताब्यातील कोंढाणा ताब्यात घेण्याचा विचार सांगितला; परंतु तानाजींचा मुलगा रायबा याचे लग्न असल्याने छत्रपती शिवाजी महाराज बेत पालटणार होते. तानाजींनी स्वत:हून प्रेरित होऊन महाराजांना या लढाईचे नेतृत्व स्वतःला देण्यास सांगितले. त्या वेळी तानाजींनी ‘आधी लगीन कोंढाण्याचे, मगच रायबाचे’, असे उद्गार काढले.

५ फेब्रुवारी १६७० (माघ कृ. नवमी) या दिवशी कोंढाणा जिंकण्यासाठी तानाजी प्राणपणाने लढले आणि स्वतःच्या प्राणांची आहुती देत गड जिंकून दिला. छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा कळले की, तानाजी मालुसरे या युद्धात कामी आले, तेव्हा महाराजांना अतिव दु:ख झाले आणि त्याच्या तोंडातून वाक्य बाहेर पडले ‘गड आला; पण सिंह गेला !’ तानाजींच्या बलीदानाप्रीत्यर्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे नाव कोंढाणावरून ‘सिंहगड’ असे पालटले.

संदर्भ : विकिपीडिया संकेतस्थळ