शाळेला विद्येचे मंदिर मानून आदर्शरित्या वागावे !

विद्यार्थीदशेत आपला बहुतेक वेळ शाळा आणि शिक्षण यांच्याशी निगडित असतो. शाळा हे विद्येचे मंदिर आहे, तसेच ते संस्काराचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. भावी आयुष्‍यात यशस्‍वी होण्‍यासाठी आई-वडील तुम्‍हाला शाळेत पाठवतात. त्‍यांच्‍या विश्‍वासाला तडा जाईल, असे वागू नका, तर वागून अन् गुणसंपन्‍न बनून हिंदुस्‍थानचे भावी आधारस्‍तंभ व्‍हा. यासाठी पुढील गोष्‍टी लक्षात ठेवा.

१. शाळेतील वर्तन असे असावे !

१. सायकल ओळीत (रांगेत) लावावी आणि वर्गात जाऊन दप्तर ठेवावे.

२. शाळेच्या पटांगणात प्रार्थनेसाठी एकत्र जमतांना वर्गातून ओळीने (रांगेने) यावे आणि ओळीतच उभे रहावे. प्रार्थना झाल्यावर पुन्हा वर्गात ओळीनेच जावे.

३. वर्गात गेल्यावर वास्तूदेवता, स्थानदेवता, तसेच विद्येच्या देवता श्री गणेश आणि श्री सरस्वतीदेवी यांना मनोमन वंदन करून ‘तुमच्या कृपेने मला या वास्तूत ज्ञान ग्रहण करण्याची संधी मिळाली आहे. आज शिकवल्या जाणार्‍या सर्व विषयांचे ज्ञान मला एकाग्रतेने ग्रहण करता येऊ दे’, अशी प्रार्थना करावी.

४. प्रत्येक विषयाच्या तासिकेला (period) आरंभ होतांना कुलदेवता किंवा उपास्यदेवता यांना प्रार्थना करावी, ‘शिक्षकांमध्ये मला तुझे रूप दिसू दे आणि आता वर्गात शिक्षक जे काही शिकवणार आहेत, ते मला नीट कळू दे.’

५. वर्ग चालू असतांना शिक्षकांना काही विचारायचे असल्यास मध्येच मोठ्याने प्रश्न न विचारता हात वर करावा. शिक्षक विचारण्यास सांगतील, तेव्हा तो प्रश्न विचारावा.

६. तासिका संपतांना देवतेच्या चरणी ‘तुझ्या कृपेने मला शिक्षकांनी शिकवलेला विषय समजला. त्यासाठी मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे’, अशी कृतज्ञता व्यक्त करावी.

७. कागदाचे बोळे, पेन्सिलीला टोक काढल्यावर निघणारी साले, खोडरबरने खोडल्यावर निघणारे लहान कण किंवा इतर कचरा वर्गात कोठेही न टाकता कचरापेटीतच टाकावा. वर्ग आणि शाळेचा परिसर नेहमी स्वच्छ राखावा.

८. मित्र-मैत्रिणींशी आपुलकीने आणि प्रेमाने वागावे. त्यांना सदैव साहाय्य करावे.

९. शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारीवर्ग, तसेच शिपाईकाका यांच्याशीही आदराने वागावे.

२. शाळेतील वर्तन असे नसावे !

१. अनुपस्थित मित्राची उपस्थिती लावू नये.

२. वर्ग चालू असतांना चॉकलेट किंवा अन्य पदार्थ खाऊ नयेत.

३. दोन तासिकांमधील मोकळ्या वेळेत वर्गात गडबड-गोंधळ करू नये.

४. वर्गातील मुलांना चिडवणे, मारणे, त्यांच्या कपड्यांवर शाईच्या रेघा ओढणे, यांसारखे त्रास देऊ नयेत.

५. कोणाविषयीचे खोटे गार्‍हाणे (तक्रार) शिक्षकांना सांगू नये.

६. शाळेच्या वह्या आणि पुस्तके यांवर शाईचे डाग पाडू नयेत. तसेच वह्यांवरील अन् पुस्तकांतील चित्रे दाढी-मिशा इ. काढून विद्रूप करू नयेत.

७. वर्गातील बाकांवर / भिंतींवर नावे लिहिणे किंवा रेघोट्या मारणे, अशी कृत्ये करू नयेत.

८. शारीरिक प्रशिक्षण (पी.टी.) चुकवण्यासाठी रुग्णाईत (आजारी) असल्याचे खोटे कारण सांगू नये.

मुलांनो, ‘शाळा ही विद्येची देवता श्री सरस्वतीदेवी हिचे देऊळच आहे’, असा भाव ठेवून या ‘विद्यामंदिरा’चे पावित्र्य राखा ! यामुळे श्री सरस्वतीदेवी प्रसन्न होईल आणि तुम्हाला चांगली विद्या लाभेल !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी

Leave a Comment