तात्या टोपे : १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचे सेनापती !

तात्या टोपे

तात्या टोपे

पेशव्यांचे प्रमुख सल्लागार

तात्या टोपे यांचा जन्म १८१४ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग त्र्यंबक भट. त्यांचे घराणे मूळचे येवल्याचे. तात्यांचे वडील बाजीराव पेशवे यांच्या धर्मदाय विभागाचे प्रमुख होते. पांडुरंगरावांची विद्वत्ता आणि कर्तव्यदक्षता या गुणांवर मोहित होऊन बाजीरावांनी भर राजसभेत अतीमौल्यवान नवरत्नजडित टोपी देऊन त्यांचा सन्मान केला. तेव्हापासून त्यांचे आडनाव `टोपे’ झाले.

पेशवाईच्या समाप्तीनंतर बाजीराव ब्रह्मावर्तास गेले. तेथे तात्यांनी पेशव्यांच्या राजसभेत स्थान पटकावले. सत्तावन्नचा क्रांतीकाल जसजसा जवळ येऊ लागला, तसतसे ते नानासाहेब पेशव्यांचे प्रमुख सल्लागारही बनले. सत्तावन्नच्या क्रांतीयुद्धात इंग्रजांना एकाकी; पण सर्वांत परिणामकारक झुंज दिली, ती तात्यांनीच !

झाशीहून निसटून आलेल्या राणी लक्ष्मीबाइंनीपेशव्यांना ग्वाल्हेर जिंकायचा सल्ला दिला. तात्यांनाही तो पटला. ग्वाल्हेरचे शिंदे क्रांतीपक्षाला येऊन मिळण्यात उदासीन होते. त्यांनी क्रांतीकारकांसमवेतच युद्ध चालू केले; पण तात्यांना समोर पहाताच शिंद्यांचे सारे सैन्य तात्यांना येऊन मिळाले. तात्यांनी मग रावसाहेब पेशव्यांच्या आधिपत्याखाली ग्वाल्हेरला एक स्वतंत्र राज्यच प्रस्थापित केले. ३ जून १८५८ या दिवशी रावसाहेब पेशव्यांनी भर राजसभेत एक रत्नजडित तलवार देऊन तात्यांना सेनापतीपदाचा मान दिला.

युरोपातील वर्तमानपत्रांनीही दखल घेतली !

१८ जून या दिवशी राणी लक्ष्मीबाई धारातीर्थी पडल्या आणि ग्वाल्हेरही इंग्रजांच्या नियंत्रणात गेले. यानंतर तात्यांनी गनिमी पद्धतीने झुंजण्याची रणनीती आखली. तात्यांना नामोहरम करण्यासाठी मग ब्रिटिशांनी त्यांचे वडील, पत्नी आणि मुले यांना अटकेत टाकले. तात्यांना पकडण्यासाठी ६ इंग्रज सेनानी तीन दिशांनी प्रयत्न करत होते; पण तात्या त्यांच्या जाळयात येत नव्हते. यातील तीन सेनानींना हुलकावणी देऊन आणि पाठलागावर असणाऱ्या इंग्रज सैन्याची दाणादाण उडवून २६ ऑक्टोबर १८५८ या दिवशी तात्या नर्मदा नदी ओलांडून दक्षिणेत उतरले. या घटनेला इंग्लंडमधीलच नव्हे, तर युरोपातील वर्तमानपत्रांनीही प्रमुख स्थान दिले. ही बातमी तात्यांच्या रणकुशलतेचे श्रेष्ठत्व पटवून देणारी होती.

सहस्रोच्या इंग्रज सैन्यावर हा वीर मूठभर सैन्यानिशीच आक्रमण चढवायचा. अत्यंत अवघड असलेला आणि तुटपुंजे सैन्यबळ असतांना तात्यांनी काल्पीचा किल्ला जिंकून इंग्रजांना आपल्या पराक्रमाची चुणूक दाखवली. इतकेच नव्हे, तर तात्यांनी इंग्रज सैन्यात सर्वश्रेष्ठ असलेल्या जनरल विंडहॅम या सेनापतीचा आणि त्याच्या सैन्याचा धुव्वा उडवला.

इंग्रजांनी फितुरीचा आश्रय घेतला !

सतत १० महिने एकट्याने इंग्रजांच्या नाकीनऊ आणणाऱ्या तात्यांना पकडण्यासाठी शेवटी इंग्रजांना फितुरीचा आश्रय घ्यावा लागला. ग्वाल्हेरच्या राजाविरुद्ध अयशस्वी बंड केलेल्या मानसिंगच्या करवी ७ एप्रिल १८५९ या दिवशी तात्यांना परोणच्या अरण्यात झोपेत असतांना पकडण्यात आले. १५ एप्रिल या दिवशी तात्यांचा अभियोग सैनिकी न्यायालयासमोर शिप्री येथे चालू करून त्याच दिवशी घाईने पूर्ण करण्यात आला. या न्यायालयाचा निकाल ठरलेला होता.

१८ एप्रिल १८५९ या दिवशी सायंकाळी ग्वाल्हेरजवळील शिप्रीच्या किल्ल्याजवळील पटांगणात तात्यांना जाहीर फाशी देण्यात आले.

सामान्यातून असामान्य बनून १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम ज्याने अनेक महिने धगधगत ठेवला, त्या तात्या टोपे यांच्या पराक्रमाला जगाच्या इतिहासात तोड नाही.