पंढरपूरची काही वैशिष्ट्ये


पंढरी हे भगवान शंकराचे सर्वोत्तम तीर्थक्षेत्र मानले आहे. आद्य शंकराचार्यांनी या क्षेत्राला ‘महायोगपीठ’ म्हटले आहे. (त्यांनी पांडुरंगाचे गुणगान करणारे ‘पांडुरंगाष्टकम्’ सुद्धा म्हटले आहे.) पंढरी हे क्षेत्र म्हणजे श्रीकृष्णाचे दक्षिणेकडील रासक्रीडेचे गोकुळच आहे. यासंदर्भात पुराणांत निरनिराळ्या कथा आहेत.

चंद्रभागा

पंढरपूरला जी ‘चंद्रभागा’ आहे, ती भीमाशंकरच्या डोंगरातून उगम पावल्यामुळे ‘भीमा’ झाली. तीच पंढरपुरात मांड खडकापासून विष्णुपद स्थानापर्यंत पाऊण मैल चंद्रकोरीप्रमाणे वहाते; म्हणून तिला ‘चंद्रभागा’ म्हणतात. ती कर्नाटकात कृष्णा नदीला मिळते.’

– प.पू. परशराम पांडे महाराज

लोहतीर्थ

एकदा शंकर-पार्वती वरुण-राजाच्या भेटीस निघाले असता त्यांना तहान लागली. तेव्हा ते भीमानदीच्या काठावर थांबले. तेथे शंकराने त्याच्या त्रिशूळाने पाताळगंगेला वर आणले. ती वर येताच दोघांनी आपली तहान भागवली. त्यामुळे प्रसन्न होऊन शंकराने त्या प्रवाहाला ‘लोहतीर्थ’ हे नाव दिले. चंद्रभागेच्या जवळच ‘लोहतीर्थ’ आहे.

पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीत श्रीकृष्णतत्त्व आणि श्रीविष्णुतत्त्व जास्त असल्याने दोन्ही मार्गांनी, म्हणजेच सगुण, तसेच निर्गुण मार्गाने उपासना करणार्‍यांसाठी ही मूर्ती लाभदायक आहे. तसेच ब्रह्मगण, शिवगण आणि अनेक शक्तीगण यांनाही अंगाखांद्यावर खेळवणारी ही मूर्ती असल्याने सर्वच स्तरांवरील उपासकांना चैतन्याची फलप्राप्ती करून देणारी आहे; म्हणून सर्वच स्तरांवरील भक्तगण श्री विठ्ठलाच्या मूर्तीला भजणारे आहेत.

Leave a Comment