४० सहस्र भारतीय स्त्री-पुरुषांच्या सहभागाने स्थापन झालेली ‘आझाद हिंद सेना’!

आझाद हिंद सेना स्थापना दिनाच्या निमित्ताने…..

आज आझाद हिंद सेना स्थापनादिन आहे. ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ४० सहस्र भारतीय स्त्री-पुरुषांच्या सहभागाने आझाद हिंद सेना स्थापन केली आणि ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा’ असे आवाहन केले.

सुभाषबाबूंनी आई-वडिलांच्या इच्छेनुसार भारतीय मुलकी सेवा परीक्षेत चौथ्या क्रमांकासह सुयश मिळवणे आणि पुढे जालियानवाला बागेतील हत्याकांडासारख्या घटनांमुळे अस्वस्थ होऊन त्यांनी मुलकी सेवेचे त्यागपत्र देणे

२३.१.१८८७ या दिवशी कटक शहरातील एक वकील जानकीदास बोस यांच्या घरी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला. आई-वडिलांच्या इच्छेला मान देऊन सुभाषचद्र बोस यांनी १९२० मध्ये भारतीय मुलकी सेवा परीक्षेला बसून चौथ्या क्रमांकासह सुयश संपादन केले. या मुलकी सेवेत त्यांनी प्रवेश केला; पण भारतात होणार्‍या घटनांमुळे, विशेषतः जालियानवाला बागेतील हत्याकांडासारख्या घटनांमुळे सुभाषचद्र बोस अस्वस्थ होते. त्यांनी १९२१ मध्ये या मुलकी सेवेचे त्यागपत्र दिले.

स्थानबद्ध असतांना ब्रिटिशांची नजर चुकवून सुभाषबाबूंनी काबूलमार्गे जर्मनीत जाणे आणि तेथून विविध भाषांतून ‘रेडिओ’ संदेश प्रसारित करणे

ब्रिटिशांनी स्थानबद्ध केलेले सुभाषबाबू २६.१.१९४१ या दिवशी नजर चुकवून नाहीसे झाले आणि काबूल अन् मॉस्कोमार्गे जर्मनीत दाखल झाले. इंग्रजी, हिन्दी, बंगाली, तामिळ, तेलगू, गुजराथी आणि पुश्तू या भाषांतून त्यांनी नियमितपणे ‘रेडिओ’ संदेश प्रसारित केले. दक्षिण आशियातील जपानी आक्रमणानंतर दीड वर्षाने सुभाषबाबूंनी जर्मनी सोडली. जर्मन आणि जपानी पाणबुड्यांतून प्रवास करून ते मे १९४३ मध्ये टोकियोत दाखल झाले.

जपानच्या सहकार्याने ४० सहस्र भारतियांच्या ‘आझाद हिंद सेने’ची उभारणी करणे आणि भारतात आल्यावर ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा’ असे आवाहन करणे

४ जुलैला त्यांनी पूर्व आशियातील भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व स्वीकारले. जपानच्या सहकार्याने ५ जुलैला त्यांनी ४० सहस्र (हजार) भारतीय स्त्री-पुरुषांच्या सहभागाने ‘आझाद हिंद सेने’ची उभारणी केली. २१ ऑक्टोबरला त्यांनी हंगामी भारतीय सरकारची स्थापना केली. ‘आझाद हिंद सेने’ने जपानी सैन्यासह रंगूनमार्गे भारताकडे कूच केले. १८.३.१९४४ या दिवशी ही सेना भारतीय भूमीवर दाखल झाली. ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा’ आणि ‘चलो दिल्ली’ या त्यांच्या घोषणा होत्या. तसेच ‘जय हिंद’ ही त्यांची युद्धघोषणा होती.’ (संदर्भ : दैनिक ‘नवप्रभा’)

आझाद हिंद सेना अत्यंत लोकप्रिय होणे

१९४५ मध्ये जर्मनी आणि जपान यांचा पराभव झाला. तेव्हा आझाद हिंद सेनेचे सैनिक पकडले गेले. त्यांच्यावर १९४६ मध्ये खटला भरला गेला. तेव्हा ‘आझाद हिंद सेना’ अत्यंत लोकप्रिय झाली. सुभाषचंद्र बोस यांचे छायाचित्र घरा-घरांतून लावले गेले.

ब्रिटिश सैन्यातील बंड

१९४६ मध्ये ‘रॉयल इंडियन नेव्ही’ आणि ‘रॉयल इंडियन एअर फोर्स’ यांनी बंड पुकारले. ब्रिटिश शासनाने केलेल्या गुप्त चौकशीत त्यांना कळले की, ब्रिटीश सरकारातील बहुतांश भारतीय सैनिकांना ‘आझाद हिंद सेने’विषयी सहानुभूती आहे आणि त्यांच्याविरुद्ध चालू असलेल्या खटल्यांच्या ते विरुद्ध आहेत. इंग्रजांना जेव्हा कळले की, ज्या सैनिकांच्या आधारावर ते भारतावर राज्य करू पहात आहेत, तेच त्यांना आता साथ देणार नाहीत. तेव्हा ब्रिटिशांसमोर कोणताही पर्याय उरला नाही; म्हणून मग त्यांनी त्यांचे चंबुगबाळे आवरण्याची सिद्धता केली.

– जितेंद्र जोशी (अभय भारत, १५ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २००९)