सृष्टिरचना

स्वरुपाची यथार्थ ओळख न झाल्यामुळें ब्रह्मदेव सृष्टिरचना करण्यास भांबावला

एवं नाभिकमळीं कमलासन । बैसला केवळ अज्ञान ।
तंव हदयी झाली आठवण । मी येथें कोण कैचा पां ॥६१॥

मज कैचें हें कमलासन । येथें याचें मूळ तें कवण ।
तें पाहावया आपण । जळीं निमग्न स्वयें जाहला ॥६२॥

सहस्त्रवरुषें बुडी देतां । कमळमूळ नयेचि हाता ।
तेथें निरबुजला ये वरुता । बैसे मागुता कमळासनी ॥६३॥

विधाता विचारी चारी खाणी । चौर्‍यांसीलक्ष जीवयोनी ।
या चराचराची मांडणी । सृष्टी कैसेनी सृजावी हे ॥६४॥

सुर नर आणि पन्नग । उत्तममध्यमअधमभाग ।
कैसेनी सृजावें म्यां जग । पूर्वत्रविभाग स्फुरेना मज ॥६५॥

ऐसी स्त्रष्टा चिंता करी । निश्चळ बैसे कमळावरी ।
पंचभूतें हीं कवणेपरी । देही देहधारी होतील ॥६६॥

ऐसी तो चिंता करी । चित्त उगें न राहे क्षणभरी ।
मी कोण मजभीतरी । हें मनी निर्धारी कळेना ॥६७॥

नकळतां माझें मीपण । केवी प्रपंच होय निर्माण ।
ऐसें चिंतोनी अतिगहन । चतुरानन अनुतापी होत ॥६८॥

Leave a Comment