थोर राष्ट्रपुरुष लोकमान्‍य टिळकांचे रत्नागिरीतील जन्‍मस्‍थान दुरावस्‍थेत !

‘स्‍वराज्‍य हा माझा जन्‍मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच !’, असे ब्रिटीशांना ठणकावणार्‍या आणि ‘केसरी’, ‘मराठा’ या वृत्तपत्रांच्‍या माध्‍यमातून, आपल्‍या वक्‍तृत्‍वातून इंग्रजांच्‍या अन्‍याय अणि अत्‍याचारांच्‍या विरोधात भारतीयांमध्‍ये असंतोष निर्माण करणारे ‘भारतीय असंतोषाचे जनक’, सार्वजनिक उत्‍सवांच्‍या माध्‍यमातून स्‍वराज्‍याच्‍या चळवळीला गतीमान करणारे, ‘गीतारहस्‍य’, ‘ओरायन’, ‘आर्क्टिक होम इन द वेदाज’, ‘वैदिक क्रोनोलॉजी अँड वेदांग ज्‍योतिष’ आदी धार्मिक ग्रंथांचे कर्ते प्रकांड पंडित, उत्‍कृष्ट संपादक, संस्‍कृत, गणित, खगोलशास्त्र, वेदान्‍त तत्त्वज्ञान आदींचे गाढे अभ्‍यासक, महान स्‍वातंत्र्यसेनानायक निष्‍काम कर्मयोगी लोकमान्‍य टिळक यांच्‍या राष्ट्र आणि धर्म विषयक कार्यापुढे भारतीय सदैव नतमस्‍तक राहतील ! केवळ ६४ वर्षांच्‍या आयुष्‍यात प्रचंड लोकोत्तर कार्य करणार्‍या अशा या थोर धुरंधर विभूतीच्‍या रत्नागिरी येथील जन्‍मस्‍थानाची दुरावस्‍था झालेली पहायला मिळत आहे. सदर जन्‍मस्‍थान हे महाराष्ट्र शासनाच्‍या पुरातत्त्व विभाग, रत्नागिरीच्‍या अंतर्गत येते. जन्‍मस्‍थानाच्‍या या दुरावस्‍थेविषयी जाग आणणारा लेखरूपी प्रयत्न लोकमान्‍य टिळकांच्‍या असामान्‍य निवडक कर्तृत्त्वविशेषासह येथे देत आहोत ! (देशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी सर्वोच्च त्‍याग केलेल्‍या स्‍वातंत्र्यसेनानींच्‍या वास्‍तव्‍याने पुनीत झालेल्‍या वास्‍तू भावी पिढीला प्रेरणादायी ठरतील, अशा तर्‍हेने संरक्षित करण्‍यात याव्‍या, त्‍यांचे जतन करण्‍यात यावे, हा या लेखामागचा उद्देश आहे, हे वाचकांनी कृपया लक्षात घ्‍यावे. – संकलक)

लोकमान्‍य टिळकांचे मूळ घराणे दापोली तालुक्‍यातील चिखलगाव येथील. लोकमान्‍यांचे वडिल शिक्षक म्‍हणून रत्नागिरीला असतांना सदोबा गोरे यांच्‍या मालकीच्‍या घरात रहात होते. याच घरात लोकमान्‍य (मूळ नाव केशव) बाळ गंगाधर टिळक यांचा जन्‍म २३ जुलै १८५६ या दिवशी झाला. याच घरात लोकमान्‍य १० वर्षांचे होईपर्यंत वाढले, शिकले, खेळले, बागडले. पुढे त्‍यांच्‍या वडिलांना असिस्‍टंट डेप्‍युटी एज्‍युकेशनल इन्‍स्‍पेक्‍टरची बढती मिळून ते सहकुटूंब पुणे येथे स्‍थानांतरीत झाले. वर्ष १८७७ मध्‍ये ते बी.ए. आणि त्‍यानंतर एलएलबी झाले.

वर्ष १८५७च्‍या स्‍वातंत्र्यसमरानंतर भारतीयांमध्‍ये ब्रिटीश सत्तेविरोधात असंतोष निर्माण करून भारतीय समाजाला एकसंध करून स्‍वराज्‍यप्राप्‍तीच्‍या दिशेने कृतीप्रवण करणारे लोकमान्‍य टिळक यांचे नाव देशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी लढलेल्‍यामंध्‍ये शिरोभागी राहील, यात कोणाचेही दुमत असणार नाही. ‘स्‍वदेशी, बहिष्‍कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्‍वराज्‍य’ ही चतुःसूत्री त्‍यांनी सांगितली. ‘गीतारहस्‍य’ या ग्रंथाद्वारे त्‍यांनी निष्‍काम कर्मयोगाचा मार्ग दाखवून ‘राष्ट्रकार्य म्‍हणजेच देवकार्य’ हा उपदेश जनतेला केला. या ग्रंथाने स्‍वराज्‍याच्‍या चळवळीला आध्‍यात्मिक अधिष्ठान दिले. त्‍यांनी ‘होमरुल लिग’- ‘हिंद स्‍वराज्‍य संघा’ची स्‍थापना करून भारतभर दौरे करून स्‍वराज्‍याच्‍या चळवळीला गतीमान केले.

भारतीय समाजाला एकसंध करण्‍यासाठी सार्वजनिक गणेशोत्‍सव आणि शिवजयंती उत्‍सव सुरू करणारे द्रष्टे लोकमान्‍य टिळक !

हिंदुस्‍थानातील सत्ता टिकवण्‍यासाठी इंग्रजांनी ‘फोडा-झोडा आणि तोडा’ चा मार्ग अवलंबत हिंदू-मुसलमान, हिंदूंमधील विविध जाती-जाती यांमध्‍ये भांडणे लावली. जनता ही एक शक्‍ती आहे आणि ही प्रचंड लोकशक्‍ती जागृत करण्‍यासाठी संपूर्ण भारतीय समाजाला एकत्र करून स्‍वराज्‍याचे स्‍फुल्लिगं चेतवून सामान्‍यजनांना स्‍वराज्‍यासाठी प्रेरीत करण्‍याच्‍या उद्देशाने त्‍यांनी सर्वप्रथम पुण्‍यात १८९३ या वर्षी सार्वजनिक गणेशोत्‍सव; तर १८९५ या वर्षी शिवजयंती उत्‍सव सुरू केला. श्री गणेश हा विद्येचा देव, तसेच दुर्जनांचे पारिपत्‍य करणारा देवांचा सेनापती, पारतंत्र्यात असलेल्‍या देशाला शस्त्रधारी देवतेची जरूरी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी ५ मोगल पातशाह्यांशी एकांगी लढत देत निर्मिलेले ‘हिंदवी स्‍वराज्‍य’ जनतेला पुन्‍हा पराक्रमासाठी प्रेरीत करेल, हे उद्देश या उत्‍सवांमागे होते. जगाचा इतिहास पहाता अशा प्रकारे देशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी जनतेला कृतीप्रवण करण्‍यासाठी लोकमान्‍य स्‍वातंत्र्यसेनानीकडून केला गेलेला धार्मिक उत्‍सवांच्‍या अधिष्ठानाचा प्रयत्न जगातील एकमेवच असावा !

राजकीय तत्त्वज्ञान सांगण्‍यासाठी भगवद़्‍गीतेचा उपयोग; ब्रिटीशांनी घेतलेली धास्‍ती

वर्ष १८९७ मध्‍ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या राज्‍यारोहण समारंभानिमित्त झालेल्‍या सभेत अध्‍यक्षीय भाषणात टिळक म्‍हणाले, ‘‘छत्रपती शिवाजीराजांनी अफझलखानाचा वध केला, यात त्‍यांनी काही पाप केले का ? याचे उत्तर महाभारतात सापडेल. महाभारतातील गीतेमध्‍ये श्रीकृष्‍णाने आप्‍त व गुरूजनांचाही वेळप्रसंगी (ते अधर्म करत असल्‍यास) वध करावा, असा उपदेश केला आहे.’’

झाले, टिळक गीतेच्‍या शिकवणीतून लोकांना हिंसेचा मार्ग दाखवत आहेत, असा अधिकार्‍यांचा समज झाला. दोन दिवसांनंतर प्‍लेगच्‍या साथीत जनतेवर अन्‍याय-अत्‍याचार करणारे प्‍लेग कमिशनर रँड आणि ले. आयर्स्‍ट यांचा वध चापेकर बंधूंनी केला. टिळकांच्‍या शिकवणुकीचा हा परिणाम आहे, असा ब्रिटीशांनी ग्रह करून घेऊन त्‍यांच्‍यावर राजद्रोहाचा खटला भरला गेला आणि त्‍यांना ६ वर्षांची शिक्षा ठोठावली गेली. पुढे मंडाले येथे कारागृहात असतांना टिळकांनी मराठीत ‘गीतारहस्‍य;’ तर इंग्रजीत ‘वैदिक क्रोनोलॉजी अँड वेदांग ज्‍योतिष’ हे धार्मिक ग्रंथ लिहिले. बंदीवासातून सुटका झाल्‍यानंतर इंग्रजांनी या ग्रंथांची हस्‍तलिखिते टिळकांकडे सुपूर्द न करता त्‍याचे इंग्रजीत भाषांतर करवून घेऊन ती तपासून या ग्रंथांत आक्षेपार्ह (ब्रिटीशांच्‍या दृष्टीने) काही नाही, असा अहवाल आल्‍यानंतरच टिळकांच्‍या ताब्‍यात देण्‍यात आली. इतकी धास्‍ती ब्रिटीशांनी टिळकांच्‍या साहित्‍याची आणि वक्‍तृत्त्वाची घेतली होती.

धर्मनिष्ठ टिळक !

इंग्रजी शिक्षण आणि ख्रिस्‍ती मिशनर्‍यांचा आक्रमक प्रचार याला भुलून हिंदु धर्मावर टिका करणार्‍यांना लोकमान्‍य टिळकांनी सडेतोड प्रत्‍युत्तरे दिली आणि धर्मांतरण करणार्‍यांच्‍या विरोधात हिंदूंना आपल्‍या अग्रलेखांतून जागृत केले. स्‍वामी विवेकानंदांसंबंधीच्‍या ८ जुलै १९०२ च्‍या ’केसरी’तील मृत्‍यूलेखात टिळकांनी म्‍हटले होते, ’’आमच्‍याजवळ जर काही महत्त्वाचा ठेवा असेल, तर तो आमचा धर्मच होय. आमचे वैभव, आमचे स्‍वातंत्र्य, सर्व काही लुप्‍त झाले आहे; परंतु आमचा धर्म अद्याप आमच्‍यापाशी शिल्‍लक आहे व तो असा-तसा नव्‍हे, तर सुधारलेल्‍या राष्ट्रांत उघड रीतीने कसोटीस लावला असताही त्‍याचा कस शुद्ध व उत्‍कृष्ट येतो, हे आता अनुभवास आलेले आहे. अशा स्‍थितीत जर आम्‍ही त्‍यास सोडून देऊ, तर इसापनीतीतील कोंबड्याप्रमाणे आम्‍ही रत्नपारखी आहो, अशी आमची सर्व जगभर नालस्‍ती होईल !’’

लोकमान्‍य टिळकांच्‍या अलौकीक कार्याचा काही अंश

१. वर्ष १८५७ च्‍या स्‍वातंत्र्यलढ्यानंतर देशाला स्‍वराज्‍य मिळवण्‍यासाठी दिशा देणारे पहिले नेते !
२. भारतीय असंतोषाचे जनक आणि लाल,बाल,पाल या त्रैमुर्तीतील एक स्‍वातंत्र्यसेनानायक
३. तत्‍कालीन अखिल भारतीय काँग्रेसच्‍या जहाल गटाचे नेतृत्त्व. स्‍वातंत्र्यवीर सावरकर आदी अनेक क्रांतीकारकांना प्रत्‍यक्ष आणि अप्रत्‍यक्षरित्‍या क्रांतीकार्यात मदत
४. उत्‍कृष्ट संपादक, तसेच संस्‍कृत, गणित, खगोलशास्त्र, वेदान्‍त तत्त्वज्ञान यांचे मान्‍यताप्राप्‍त अभ्‍यासक
५. वर्ष १८८० – पुण्‍यात न्‍यू इंग्‍लिश स्‍कूलची स्‍थापना
६. वर्ष १८८१ – ब्रिटीशांचा अत्‍याचार आणि अन्‍यायकारक धोरणे यांच्‍या विरोधात जनजागृतीसाठी ‘केसरी’ (मराठी) आणि ‘मराठा’(इंग्रजी) ही वृत्तपत्रे सुरू केली. १८८१ ते १९२० या कालावधीत त्‍यांनी ५१३ अग्रलेख लिहिले. अग्रलेख हाच त्‍यांच्‍या वृत्तपत्रांचा आत्‍मा होता.
७. वर्ष १८८४ – पुण्‍यात डेक्‍कन एज्‍युकेशन सोसायटीची स्‍थापना केली
८. वर्ष१८८५ – पुणे येथे फर्ग्‍युसन कॉलेज सुरू केले
९. वर्ष १८९३ – पुण्‍यात सार्वजनिक गणेशोत्‍सव; तर १८९५ या वर्षी शिवजयंती उत्‍सव सुरू केला. त्‍याआधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या रायगडावरील समाधीचा प्रथम जीर्णोद्धार केला.
१०. वर्ष १८९५ – मुंबई प्रांत विनियम बोर्डचे सभासद म्‍हणून नेमणूक
११. वर्ष १८९७ – राजद्रोहाच्‍या आरोपाखाली दिड वर्षाचा तुरुंगवास पत्‍करला
१२. वर्ष १९०३ – ‘दि आर्क्टिक्‍ट होम ऑफ वेदाज’ हा वेदांसंदर्भातील ग्रंथ लिहिला
१३. वर्ष १९०५ – स्‍वदेशीचा अंगिकार आणि विदेशी मालावर बहिष्‍कार ही चळवळ सुरू केली
१४. वर्ष १९०८ – राजद्रोहाचा खटला चालून ६ वर्षांची शिक्षा ब्रह्मदेशात मंडाले कारागृहात भोगली. तुरुंगात असतांना ‘गीतारहस्‍य’, ‘वैदिक क्रोनोलॉजी अँड वेदांग ज्‍योतिष’ हे धार्मिक ग्रंथ लिहिले
१५. वर्ष १९१६ – ‘होमरूल लिग’ या संघटनेची स्‍थापना केली. होमरूल म्‍हणजे आपल्‍या राज्‍याचे प्रशासन आपण करायचे यालाच ‘स्‍वशासन’ असेही म्‍हणतात.
१६. हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळायला हवा याकरीता सर्वांत आधी पुढाकार लोकमान्‍य टिळकांनीच घेतला होता
१७. कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात टिळक पंचांग पद्धती आजही वापरली जाते
१८. महाराष्ट्रात सहकारी चळवळ टिळकांनी प्रथम सुरू केली. कम्‍युनिस्‍ट पार्टीची स्‍थापना भारतात होण्‍यापूर्वी कितीतरी आधी टिळक भारतीय कामगार चळवळीचे नेतृत्‍व करत होते.

‘झाले बहु, होतीलही बहु; परी या सम हा !’ ही उक्‍ती सार्थ ठरवणार्‍या लोकमान्‍य टिळकांचा प्रेरणादायी इतिहास मोगलांचा इतिहास कमी करून शालेय अभ्‍यासक्रमात अग्रक्रमाने घेतला; तर या युगपुरुषाची महती भावी पिढ्यांना पिढ्यान पिढ्या होत राहील !

लोकमान्‍य टिळकांच्‍या जन्‍मभूमीची झालेली दुरावस्‍था

जे राष्ट्र आपला इतिहास विसरते, त्‍या राष्ट्राचे भविष्‍य अंधःकारमय असते. या सिद्धांताचा विसर पडून आज अनेक भारतीय आपली गौरवशाली परंपरा विसरत चालले आहेत. दुर्दैवाने आज आमचे देव-देवता, संत-महात्‍मे, राष्ट्रपुरुष, क्रांतीकारक हे भावी पिढीचे आदर्श होण्‍याऐवजी ड्रग सेवन करणारे, तसेच अश्‍लिल चित्रपटांत काम करणारे अभिनेते-अभिनेत्री इत्‍यादी आदर्श होऊ लागले आहेत. नुकतेच ड्रगसेवन प्रकरणी अटक झालेला एका अभिनेत्‍याच्‍या मुलाला जामिन मिळाल्‍यानंतर त्‍याची घरापर्यंत ज्‍या पद्धतीने मिरवणूक काढली गेली, तो तुरुंगात असतांना त्‍याचा दिनक्रम कसा होता यासाठी प्रसारमाध्‍यमांनी भरभरून माहिती दिली, त्‍याला चित्रपट अभिनेते-अभिनेत्री यांपासून ते राजकारण्‍यांपर्यंत कसा पाठींबा दिला गेला, ते पहाता आपला देश कोणत्‍या दिशेने चालला आहे, याविषयी चिंता वाटू लागते. लोकमान्‍य टिळकांनी स्‍वराज्‍यप्राप्‍तीसाठी ब्रिटीशांच्‍या अन्‍यायकारक धोरणांच्‍या विरोधात चालवलेली लेखणी, केवळ राष्ट्रहिताच्‍या दृष्टीने केलेले राजकारण हे आजच्‍या प्रसारमाध्‍यमांनी आणि राजकारण्‍यांनी लक्षात घ्‍यायला हवे.

परदेशात राष्ट्रीय व्‍यक्‍तीमत्त्वांना मानाचे स्‍थान आणि जनतेकडून आदरभाव मिळतो. त्‍यांच्‍या स्‍मृतीस्‍थळांची जपणूक विशेषत्त्वाने होते. एकेकाळी जगावर राज्‍य करणार्‍या ब्रिटनने तेथील राजसत्ताक पद्धत अव्‍हेरून लोकसत्ताक पद्धत स्‍विकारली; मात्र आजही ब्रिटीशांच्‍या जीवनात त्‍यांच्‍या राणीचे आणि राजाचे स्‍थान तसूभरही कमी झालेले नाही. दुर्दैवाने भारतात मात्र राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांच्‍या संदर्भात उपेक्षाच होतांना आढळते. म्‍हणूनच लोकमान्‍य टिळकांचे जन्‍मस्‍थान आज उपेक्षित राहिले आहे. सदर जन्‍मस्‍थान हे महाराष्ट्र शासनाच्‍या पुरातत्त्व विभाग, रत्नागिरीच्‍या अंतर्गत येते. रत्नागिरीत उर्दु भवन उभारण्‍याची घोषणा केली जाते; मात्र वर्षानुवर्षे याच शहरात असलेल्‍या लोकमान्‍य टिळकांच्‍या जन्‍मभूमीच्‍या झालेल्‍या दुरावस्‍थेबाबत सरकार दरबारी अनास्‍थाच आढळून येते. कोरोना काळामुळे रत्नागिरी येथील लोकमान्‍य टिळकांचे बंद असलेले जन्‍मस्‍थान १३ नोव्‍हेंबर २०२१ पासून महाराष्ट्र शासनाच्‍या आदेशाने पर्यटकांसाठी खुले झाले आहे. लोकमान्‍य टिळकांच्‍या जन्‍मभूमीची झालेली दुरावस्‍थेबद्दलची माहिती येथे देत आहोत.

१. जन्‍मस्‍थानाच्‍या ऐतिहासिक वास्‍तूच्‍या छप्‍पराची दुरावस्‍था

छप्पराची दुरावस्था
छप्पराचे गंजून सडू लागलेले पत्रे
छप्पराची दुरावस्था
फुटलेली कौले (नळे)
मागील बाजूच्या छप्परावर उगवलेले गवत

स्‍वातंत्र्यपूर्व काळात ज्‍याप्रमाणे जुनी घरे होती; त्‍याप्रमाणे जन्‍मस्‍थानाचे छप्‍पर जुन्‍या नळ्‍यांनी (कौलांनी) आच्‍छादलेले होते. मात्र सोसाट्याचा वारा अन पाऊस, माकडांचा उच्‍छाद यांमुळे ही कौले फुटून त्‍यातून पावसाचे पाणी जन्‍मस्‍थानाच्‍या वास्‍तूत जाऊ लागले. यावर उपाय म्‍हणून राज्‍याच्‍या पुरातत्त्व खात्‍याने छप्‍परावर पत्रे बसवून त्‍यावर जुनी कौले बसवली, अशी माहिती स्‍थानिक सूत्रांकडून मिळाली. मात्र जन्‍मस्‍थानाच्‍या छप्‍पराची कौले (जुन्‍या काळातील नळे) फुटली आहेत; ती तशीच फुटलेल्‍या अवस्‍थेत छप्‍परावर ठेवण्‍यात आली आहेत. छप्‍पराच्‍या काही भागांतील कौले काढून ठेवण्‍यात आली आहेत. तेथील पत्रे उघडे पडून गंजून सडू लागले आहेत. स्‍मारकाच्‍या मागील भागाच्‍या छप्‍परावरील कौलांवर गवत वाढले आहे. याकडे जर वेळीच लक्ष दिले नाही, तर पावसाळ्‍यात पाणी गळून ही ऐतिहासिक वास्‍तू या वास्‍तूत जतन केलेल्‍या लोकमान्‍य टिळकांच्‍या अनमोल ठेव्‍यासह खराब होण्‍याचे भय आहे.

२. रंग उडालेली जन्‍मस्‍थानाची वास्‍तू

जन्मस्थान वास्तू भिंती रंग उडालेल्या २
जन्मस्थान वास्तू भिंती रंग उडालेल्या १
संरक्षक भिंतीला रंगकाम नाही

जन्‍मस्‍थानाच्‍या वास्‍तूचे रंगकाम केलेले नाही, भिंतींवर शेवाळ धरले आहे. काही ठिकाणी भिंतीला तडे गेले आहेत.

३. जन्‍मस्‍थानाचा गंजलेला फलक

गंजलेला जन्मस्थान फलक
जन्मस्थान फलकावर आलेली झाडी

पुरातत्त्व खात्‍याने जन्‍मस्‍थानाच्‍या प्रवेशद्वाराबाहेर लावलेला जन्‍मस्‍थानाचा फलक गंजला असून नीट वाचता येत नाही. दुसर्‍या फलकावर झाडाची फांदी आली असून त्‍यामुळे फलक पूर्ण वाचता येत नाही. वास्‍तूकडे दुर्लक्ष तर आहेच; परंतु पुरातत्त्व खात्‍याने किमान खराब फलक काढून तेथे चांगला फलक लावायला हवा, अशी अपेक्षा स्‍थानिक रहिवासी करत आहेत.

४. लोकमान्‍य टिळकांचा पुतळा आणि मेघडंबरीची दुरावस्‍था

पुतळ्याचा खराब होत चाललेला भाग १
पुतळ्याचा खराब होत चाललेला भाग २
पुतळ्याचा रंग उडालेला १
पुतळ्याचा रंग उडालेला २
मुठीचा खराब झालेला भाग
खांबांच्या भेगा न बुजवलेल्या
मेघडम्बरीचे छत रंग उडालेला

जन्‍मस्‍थानाच्‍या प्रवेशद्वाराजवळ मेघडंबरीमध्‍ये लोकमान्‍य टिळकांचा पूर्णाकृती पुतळा आहे. या पुतळ्‍याचा रंग काही ठिकाणी उडाला आहे. तेथील रंगाचे कपचे पडले आहेत. पुतळ्‍याचा धातूचा भाग काही ठिकाणी सडल्‍यासारखा झाला आहे. मेघडंबरीच्‍या खाबांना लावलेल्‍या फरशांमध्‍ये भेगा असून तो भाग बुजवलेला नाही. मेघडंबरीवरील अर्धगोलाकार छताचा रंग उडाला आहे. मेघडंबरीच्‍या उद़्‍घाटनाचा फलक खराब झाला असून तो नीट वाचता येत नाही. केवळ उद़्‍घाटने करून फलक लावायचे आणि संबंधित वास्‍तूकडे ती खराब होईपर्यंत ढुंकूनही पहायचे नाही, ही पुढार्‍यांची आणि अधिकारी वर्गाची जुनी खोड असल्‍याची खोचक प्रतिक्रिया स्‍थानिक रहिवासी व्‍यक्‍त करत आहेत.

५. शिल्‍पाकृतीची दुरावस्‍था 

खराब झालेली शिल्पाकृती
तुटलेली शिल्पाकृती

मेघडंबरीच्‍या मागे लोकमान्‍य टिळकांच्‍या जीवनातील काही प्रसंग दर्शवणारी शिल्‍पाकृती ज्‍या लोखंडी अँगलवर बसवण्‍यात आली होती त्‍याचे वेल्‍डिंग तुटल्‍याने ही शिल्‍पाकृती खाली पडली आणि तुटली. ही तुटलेली शिल्‍पाकृती स्‍मारकाच्‍या संरक्षक भिंतीला टेकवून ठेवलेली असून ती खराब झाली आहे. शिल्‍पाकृतीचा तुटलेला भाग अन्‍यत्र ठेवला असल्‍याचे समजते. शिल्‍पाकृतीवर झाडी आल्‍याने ती नीट दिसत नाही. लोकमान्‍य टिळकांच्‍या जीवनातील प्रसंग चित्रीत केलेल्‍या शिल्‍पाकृतीची जर ही अवस्‍था असेल, तर एकूणच लोकमान्‍यांच्‍या जन्‍मस्‍थानाचे जतन कशा प्रकारे होत असेल, याची वाचकांना सहज कल्‍पना येऊ शकेल.

६. अपुरा कर्मचारीवर्ग आणि जन्‍मस्‍थानाची माहिती सांगण्‍याची व्‍यवस्‍था नसणे

स्‍थानिक सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार स्‍मारकाला भेट द्यायला देशभरातून शेकडो पर्यटक, शाळांच्‍या सहली येत असतात. ते स्‍मारकाची माहिती पुस्‍तिका मागतात, मात्र स्‍मारकाच्‍या ठिकाणी माहिती पुस्‍तिका ठेवण्‍यात आलेली नाही. या आधी जन्‍मस्‍थानाची माहिती देण्‍यासाठी कर्मचारीवर्गाचा अभाव दिसून येत होता. जन्‍मस्‍थाची जागा सुमारे १ एकर आहे. एवढी मोठी जागा आणि जन्‍मस्‍थानाची वास्‍तू यांच्‍या देखभालीसाठी पूर्वी २ पाहरेकरी होते; सद्यस्‍थितीत फक्‍त १ पाहरेकरी येथे असल्‍याचे समजते. या एकमेव असलेल्‍या पाहरेकर्‍याला जन्‍मस्‍थानाची साफसफाई, पर्यटकांसाठी बांधलेल्‍या स्‍वच्‍छतागृहांची साफसफाई, झाडांची देखभाल, बागकाम, पर्यटकांना जन्‍मस्‍थानाची माहिती देणे इत्‍यादी करावे लागत असल्‍याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

७. जन्‍मस्‍थानामागील परिसराची दुरावस्‍था

अस्ताव्यस्त पडलेले चिरे
अस्ताव्यस्त फुटलेली कौले
कापलेली झाडे पडून
जुने स्वच्छता गृहाचे भग्नावशेष तसेच पडून
तुटलेल्या आंब्याचा बुंधा तसाच पडून
लाकूड सामान पडून
वाढलेले रान
संरक्षक भिंतीवर टेकलेले बाहेरील झाड
दोन रेज्‍यांमधील अंतरामधून प्राणी आत जाऊ शकतात

स्‍थानिक सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार स्‍मारकाचा परिसर सुमारे १ एकरचा असून त्‍यात आंबा, माड आणि इतर झाडे असून परिसरात साफसफाईचा अभाव आहे. एके ठिकाणी जन्‍मस्‍थळाच्‍या संरक्षक भिंतीबाहेरील एक मोठे झाड संरक्षक भिंतीला टेकले असून झाडाच्‍या वजनाने संरक्षक भिंत केव्‍हाही कोसळू शकेल, अशी स्‍थिती आहे. जन्‍मस्‍थानाच्‍या मागील बाजूस असलेल्‍या आंब्‍याचे झाड तुटून राहिलेला बुंध्‍याचा भाग तसाच ठेवलेला आहे. परिसरात पडलेली झाडे, लाकूड सामान, चिरे, फुटलेली कौले (नळे) अस्‍ताव्‍यस्‍त आहेत. पर्यटकांसाठी नवीन स्‍वच्‍छतागृह बांधण्‍यात आले; मात्र मोडकळीस आलेले जुने स्‍वच्‍छतागृह त्‍याच स्‍थितीत ठेवण्‍यात आले आहे.

८. पर्यटकांसाठी पिण्‍याच्‍या पाण्‍याची सोय दुर्लक्षित 

अस्वच्छ विहीर

जन्‍मस्‍थानाच्‍या मागील बाजूस असलेल्‍या विहिरीच्‍या २ पंपांपैकी १ नादुरुस्‍त आहे. विहिरीची साफसफाई होत नाही. विहिरीत गाळ साठला आहे. पिण्‍याचे पाणी साठवण्‍याची व्‍यवस्‍था नाही. एका देणगीदाराने दिलेला कुलर अनेक वर्षे बंद आहे. त्‍यामुळे पर्यटकांची पिण्‍याच्‍या पाण्‍याची सोय दुर्लक्षित झाल्‍याचे समजते.

९. गैरप्रकार टाळण्‍यासाठी सीसी टिव्‍ही कॅमेरे बसवण्‍याची आवश्‍यकता

जन्‍मस्‍थान पहायला येणार्‍या पर्यटकांपैकी काहींना जन्‍मस्‍थळाच्‍या मागील बाजूस असलेल्‍या बाकांवर बसून मद्यप्राशन करतांना पकडण्‍यात आले होते. देशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी आपले आयुष्‍य वेचणार्‍या स्‍वातंत्र्य धुरीणींचा अवमान करणार्‍या अशा नतद्रष्ट मंडळींना शासन करण्‍याच्‍या दृष्टीने आणि एकूणच ऐतिहासिक जन्‍मस्‍थळाच्‍या वास्‍तूचे संरक्षण होण्‍याच्‍या दृष्टीने येथे सीसी टिव्‍ही कॅमेरे बसवले जावेत, अशी मागणी स्‍थानिकांकडून होत आहे.

१०. वाहनतळाची (पार्किंगची) व्‍यवस्‍था अथवा त्‍यासाठी फलक नसणे

जन्‍मस्‍थानाला भेट द्यायला देशभरातून असंख्‍य नागरीक, तसेच विद्यार्थ्‍यांच्‍या सहली येत असतात. त्‍यांची वाहने कोठे उभी करायची, असा प्रश्‍न अनेक वेळा निर्माण होऊन रहदारीस अडथळा निर्माण होतो. यासाठी स्‍वतंत्र्य वाहनतळाची व्‍यवस्‍था करण्‍यात यावी आणि तसा फलक जन्‍मस्‍थानाच्‍या प्रवेशद्वाराच्‍या बाहेरील बाजूस लावण्‍यात यावा, अशी मागणी स्‍थानिकांकडून होत आहे.

११. प्रवेशद्वाराजवळील लोखंडी गंजून तुटलेले ग्रील

प्रवेश द्वाराजवळ गंजून तुटलेले ग्रील

जन्‍मस्‍थानाच्‍या प्रवेशद्वाराजवळील लोखंडी ग्रील गंजून तुटले आहे. तुटलेल्‍या भागी लाकडी पट्‍टया बांधून ठेवल्‍याचे दिसत आहे.

जन्‍मस्‍थानाच्‍या सुधारणेच्‍या दृष्टीने स्‍थानिकांकडून आलेल्‍या काही सूचना

१. जन्‍मस्‍थानाच्‍या देखरेखसाठी आणि अन्‍य कामांसाठी पुरेसा कर्मचारीवर्ग ठेवण्‍यात यावा.

२. जन्‍मस्‍थानामध्‍ये लोकमान्‍य टिळकांविषयी माहिती देणारे फलक मराठी आहेत. या ठिकाणी भेट द्यायला देशभरातून असंख्‍य बहुभाषिक नागरीक आणि विद्यार्थ्‍यांच्‍या सहली येत असतात. त्‍यांना भाषेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. यासाठी येथे इंग्रजी आणि हिंदी भाषेतील फलकही लावण्‍यात यावेत.

३. जन्‍मस्‍थानाची वास्‍तू जुनी असल्‍याने त्‍यासाठी वापरलेले खांब, वासे, रेजे, बॉटमपट्टी यांचे लाकूड खराब झालेले असण्‍याची शक्‍यता आहे. ते बदलण्‍यात अथवा दुरुस्‍त करण्‍यात यावेत.

४. जन्‍मस्‍थानामध्‍ये प्रवेश करण्‍याच्‍या दरवाजाच्‍या दोन्‍ही बाजूस लाकडी रेजे आहेत. दोन रेज्‍यांमधील अंतरामधून मांजर, घुशी, सरपटणारे साप इत्‍यादी आत जाऊन धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी रेज्‍यांच्‍या आतल्‍या बाजूने उघडझाप करता येणार्‍या लोखंडी झडपा (शटर) बसवण्‍यात यावीत.

५. लोकमान्‍य टिळकांचे कार्य दर्शवणारा जीवनपट (डॉक्‍युमेंटरी) चलचित्रपट दाखवण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात यावी. या शिवाय तेथे माहिती पुस्‍तिका, लोकमान्‍यांनी लिहिलेल्‍या ग्रंथांच्‍या निवडक प्रती, छायाचित्र इत्‍यादी साहित्‍य ठेवण्‍यात यावे. जन्‍मस्‍थानाची आठवण म्‍हणून पर्यटक ते खरेदी करून घेऊन जाऊ शकतील आणि त्‍यातून पुरातत्त्व खात्‍याला उत्‍पन्‍नही मिळू शकेल.

६. वास्‍तूची बाहेरील स्‍थिती लक्षात घेता वास्‍तूच्‍या आत भिंतींचा रंग उडाला असण्‍याची शक्‍यता आहे, त्‍याची रंगरंगोटी करण्‍यात यावी.

७. वास्‍तूच्‍या आत असलेल्‍या माहिती फलकांची तपासणी करावी आणि आवश्‍यक ते फलक (जीर्ण झालेले, अक्षरे दिसेनाशी झालेले) बदलून त्‍याजागी त्‍याच मजकूर आणि चित्रांचे नवीन फलक लावण्‍यात यावेत.

८. पूर्वीच्‍या काळी जमिनी सारवल्‍या जात. वास्‍तूच्‍या आतमध्‍ये कोबा केलेला आहे आणि त्‍यावर शेणाने सारवलेले असल्‍याचे जन्‍मस्‍थळाला पूवीॅ भेट दिलेले सांगतात. वास्‍तूचा जुना बाज टिकून रहावा यासाठी वास्‍तूच्‍या जमिनी नियमित शेणाने सारवण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात यावी.

९. जन्‍मस्‍थानासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर झाल्‍याच्‍या बातम्‍या प्रसिद्ध झाल्‍या होत्‍या. मंजूर झालेला शासकीय निधी कागदावर न रहाता त्‍याचा योग्‍य विनियोग करून लोकमान्‍य टिळकांच्‍या जन्‍मस्‍थानाचे त्‍वरित संरक्षण आणि संवर्धन करण्‍यात यावे.

१०. जन्‍मस्‍थानाच्‍या प्रवेशद्वाराजवळ असलेली वास्‍तू अनेक वर्षे पडून आहे. तेथे लोकमान्‍य टिळकांविषयीच्‍या ग्रंथांचे ग्रंथालय उभारण्‍यात यावे जेणेकरून पर्यटकांना लोकमान्‍यांविषयी विस्‍तृत माहिती घेता येईल आणि अभ्‍यासही करता येईल.

११. लोकमान्‍य टिळकांचे जन्‍मस्‍थान सध्‍या महाराष्ट्र शासनाच्‍या पुरातत्त्व विभागाच्‍या अंतर्गत देखभालीसाठी आहे. हे जन्‍मस्‍थान ‘राष्ट्रीय स्‍मारक’ म्‍हणून घोषित करण्‍यात यावे.

१२. लोकमान्‍य टिळकांना ‘भारतरत्न’ पुरस्‍कार जाहीर करावा.

ज्‍या लोकमान्‍य टिळकांनी स्‍वातंत्र्यप्राप्‍तीसाठी स्‍वतःचे आयुष्‍य वेचले, बंदीवास स्‍वीकारला त्‍यांच्‍या जन्‍मस्‍थानाची अशी दुरावस्‍था पाहून आपले राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचा जाज्ज्वल्‍य इतिहास जतन करण्‍याच्‍या दृष्टीने पावले उचलण्‍यासाठी ‘राज्‍यकर्त्‍यांचे डोके कधी ठिकाणावर येणार’, असा प्रश्‍न अनेकांच्‍या मनात उत्‍पन्‍न होत आहे. राष्ट्राच्‍या भावी पिढीला पर्यायाने राष्ट्राला विजिगिषु बनवायचे असेल तर लोकमान्‍य टिळकांसारख्‍या थोर स्‍वातंत्रसेनानायकांच्‍या स्‍मृतीस्‍थळांची जपणूक प्राणांपलीकडे करणे, ही काळाची गरज आहे !

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​