Menu Close

मराठ्यांचा इतिहास सांगणारा ‘अटक ते कटक’ हा नकाशा एन्.सी.ई.आर्.टी.च्या पाठ्यपुस्तकातून गायब !

  • श्रीमंत मुधोजीराजे भोसले यांचा आरोप     

  • मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट

पाठ्यपुस्तकातून गायब झालेला मराठ्यांचा सत्ताविस्तार दाखवणारा नकाशा परत घेण्यासाठी न्यायालयात जावे लागणे, हे दुर्दैवी ! – संपादक 

पुणे – ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद’ म्हणजे एन्.सी.ई.आर्.टी.कडून शालेय पाठ्यक्रम पुस्तकातून मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास सांगणारा ‘अटक ते कटक’ असा विस्तार दर्शवणारा नकाशा वगळण्यात आला. तो मराठ्यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न आहे. तो का वगळण्यात आला ? याचे ते समर्पक उत्तरही देऊ शकत नाहीत. महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या आळशीपणामुळे महाराष्ट्राच्या दैदीप्यमान इतिहासावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या अन्यायाच्या विरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे, असे वक्तव्य श्रीमंत मुधोजीराजे भोसले यांनी केले. ते ५ मे या दिवशी पुण्यातील पत्रकार भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

श्रीमंत मुधोजीराजे भोसले यांनी मांडलेली सूत्रे 

१. हा नकाशा काढल्यामुळे समाजात विशेषत: मुलांच्या मनात चुकीचा संदेश जात आहे. मराठ्यांचा इतिहास हा केवळ गोष्टी आणि गप्पांतून राहिला आहे का ? असा प्रश्न निर्माण होतो.

२. हा नकाशा काढण्यासाठी राजस्थानातील राजकीय नेते आणि राजघराण्यांनी केंद्रीय शिक्षण मंडळावर दबाव टाकला आहे.

३. यासंबंधी ११ मार्च २०२६ या दिवशी महाराष्ट्राच्या विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. तेव्हा राज्यमंत्र्यांनी ‘उर्दू आणि मराठी माध्यमांतून नकाशा गायब आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र देऊनही त्याची नोंद घेतली नाही. उलट त्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकातूनही हा नकाश गायब करण्यात आला’, अशी माहिती दिली.

४. आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पुस्तकांमध्ये हा नकाशा समाविष्ट होणार नसल्याची खंत व्यक्त केली. राज्य सरकार केवळ ‘कागदी घोडे’ नाचवत पोकळ आश्वासने देत असल्याचा आरोप केला.

५. जेव्हा लोकप्रतिनिधी जनतेचा विश्वासघात करतात, तेव्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागतो, असे सांगत त्यांनी याचिका प्रविष्ट केल्याचा उल्लेख केला.

६. नकाशा हा पूर्ववत् पुस्तकामध्ये येण्यासाठी यापुढे हे आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यात येईल.

नरवीर तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज कुणाल मालुसरे म्हणाले, ‘‘जोपर्यंत एन्.सी.ई.आर्.टी.च्या पाठ्यक्रम पुस्तकांमध्ये तो नकाशा पूर्ववत् येत नाही, तोपर्यंत आमचा हा लढा चालूच रहाणार. आम्ही शांत बसणार नाही.’’

‘हिंदु बांधव समिती’चे अध्यक्ष रवी पडवळ म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत सध्याचे राजकारणी सत्तेत आहेत; परंतु या प्रश्नाविषयी एकही लोकप्रतिनिधी पुढे येत नाही. सर्व राजकारणी षंढ असून ते झोपी गेलेले आहेत. या मागणीसाठी आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत.’’

Latest News