हिंदूंच्या सातत्यपूर्ण संघर्षाचा विजय !

पुणे – मंचर (तालुका आंबेगाव) येथील १२ व्या शतकातील ऐतिहासिक ‘बारव’ आणि परिसर यांवर करण्यात आलेली वक्फ बोर्डाची अनधिकृत नोंद महसूल विभागाने अंततः रहित केली. आपल्या प्राचीन सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ आणि जागरूक नागरिक यांनी दिलेल्या प्रदीर्घ लढ्यानंतर प्रशासनाला ही अनधिकृत नोंद हटवावी लागली.
‘हा निर्णय केवळ कायदेशीर विजय नसून आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे’, असे भाजपच्या उद्योग आघाडीचे उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष प्रमोद बाणखेले यांनी मंचर येथील पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला भाजपचे तालुका माजी अध्यक्ष संदीप बाणखेले, महेश पिंगळे, गणेश बाणखेले, चैतन्य महाजन आदींसह विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी बारवच्या ठिकाणी अतिक्रमण झालेल्या ठिकाणी जाऊन आंदोलन केले होते.
सांस्कृतिक अस्मितेचे रक्षण करणारा विजय !
मंचर जवळच्या निघोटवाडी ग्रामपंचायत सीमेतील अनुमाने ४ एकर क्षेत्रावर अतिक्रमण झाले होते. या ऐतिहासिक जागेवर वक्फ बोर्डाचे नाव अवैधपणे लावण्यात आले होते. ही जागा पुन्हा सरकारी मालकीची होऊन तिचे ऐतिहासिक स्वरूप जपावे, अशी मागणी प्रमोद बाणखेले आणि स्थानिक हिंदू यांनी सातत्याने केली होती. या संघर्षाला यश आले असून आता ही भूमी पुन्हा सरकारी ७/१२ उतार्यावर नोंदवण्यात आली आहे.
संघर्षाचे महत्त्वाचे पैलू
१. ४ एकर क्षेत्रातील अतिक्रमण हटवून वक्फ बोर्डाचे अनधिकृत नाव काढण्यात आले आहे.
२. ऐतिहासिक बारव आणि तेथील शिलालेख यांचे संवर्धन व्हावे, यासाठी ही जागा पुरातत्व खात्याकडे वर्ग करण्याची मागणी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे करण्यात आली आहे.
ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण करण्यासाठी हिंदु समाजाने सजग रहावे ! – प्रमोद बाणखेले
‘‘हा विजय आपला इतिहास, संस्कृती आणि अस्मितेचे जतन करण्यासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. भविष्यातही अशा ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण करण्यासाठी हिंदु समाजाने सजग रहाणे काळाची आवश्यकता आहे.’’
— Pramod Bankhele (@Pramod_Bankhele) June 7, 2025
11 मार्च
मंचर (जिल्हा पुणे) येथील पांडवकालीन बारव परिसरात धर्मांधांचे अतिक्रमण
-
अनधिकृत दर्गा बांधून ती जागा ‘वक्फ’ म्हणून घोषित
-
खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
- हा ‘लँड जिहाद’चा प्रकार आहे. मंचर येथील पांडवकालीन बारव येथील लँड जिहादच्या षड्यंत्राविरुद्ध खासदार सौ. कुलकर्णी यांनी घेतलेली आक्रमक भूमिका अत्यंत कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे !
- हा अनधिकृत दर्गा उभा राहीपर्यंत प्रशासन झोपले होते का ? हिंदूंनी आतातरी जागरूक आणि संघटित होऊन धर्मांधांचे हे ‘लँड जिहाद’चे षड्यंत्र मोडून काढावे ! – संपादक

मंचर (जिल्हा पुणे, महाराष्ट्र) – येथे ऐतिहासिक पांडवकालीन बारव आहे. या जागेवर प्रत्यक्ष शिलालेख, गोमुख आणि दगडी कोरीव काम असून ही वास्तू हिंदु पद्धतीची असल्याचे स्पष्ट पुरावे आहेत. तरीही या जागेवर अनधिकृत दर्गा बांधून ती जागा ‘वक्फ’ म्हणून घोषित करण्यात आली आहे. याची तक्रार पुणे जिल्हाधिकारी, तसेच पुणे ग्रामीण पोलीस यांच्याकडे वारंवार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही. उलट या बांधकामामध्ये वाढ झाली असून गेल्या ६ महिन्यांपूर्वी जी जागा पहाणीमध्ये प्रांत अधिकार्यांना मोकळी आढळली, त्या ठिकाणी आता स्मशानभूमी सदृश परिसराचे बांधकाम करण्यात आले आहे. एवढेच नाही, तर वर्ष २०२१ मध्ये दिवंगत असलेल्या व्यक्तीचे थडगे दाखवण्यात आले आहे. ६ महिन्यांपूर्वी अस्तित्वात नसलेल्या स्मशानभूमीत वर्ष २०२१ चे थडगे कसे असू शकते.
या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह घटनास्थळी धाव घेऊन आंदोलन केले. या आंदोलनात सर्वश्री प्रमोद बाणखेले, संदीप बाणखेले, गणेश बाणखेले, अक्षय चिखले, महेश पिंगळे, चैतन्य महाजन यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपविभागीय पोलीस अधिकार्यांनी या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि प्रांताधिकारी यांच्याशी चर्चा करून ८ दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. ही कारवाई न झाल्यास अधिक प्रखर आंदोलन करण्याची चेतावणी या वेळी देण्यात आली आहे.


पोलिसांची दडपशाही, हिंदूंच्या श्रद्धेचा अवमान !
आंदोलनाच्या वेळी एक संतापजनक प्रकार घडला. जेव्हा खासदार सौ. कुलकर्णी यांनी तिथे हिंदूंच्या देवतेचे चित्र लावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी त्यांच्या हातातील चित्र हिसकावून घेतले. ‘त्यांना (मुसलमानांना) येथे दर्गा बांधायला आणि हिरवा रंग लावायला कुणीही अडवत नाही, मग मला ‘ॐ’ लिहिण्यापासून आणि देवाचे चित्र लावण्यापासून का रोखले जात आहे ?’ असा प्रश्न खासदार सौ. कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.
हिंदू सहिष्णु आहेत; म्हणून अंत पाहू नका !
खासदार सौ. कुलकर्णी यांनी या वेळी प्रशासनाला सांगितले की, हिंदू कधीही कायदा-सुव्यवस्था बिघडवत नाहीत किंवा कुणाच्या जागा बळकावत नाहीत; परंतु धर्मांधांकडून गणपति विसर्जन मिरवणुकीवर होणारी दगडफेक आणि हिंदूंच्या वारसास्थळांवर होणारी अतिक्रमणे आता सहन केली जाणार नाहीत. हिंदू हा आक्रमक नाही; पण त्याचा अंत पाहू नका.
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात







