Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘उद्योजक आणि अधिवक्ता’ यांच्यासाठी मार्गदर्शन

हिंदूंनी संघटित होण्यासमवेत राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

डावीकडून श्री. गोविंद भारद्वाज, सद्गुरु स्वाती खाडये आणि सौ. दीपा औंधकर

रत्नागिरी – हिंदू संघटित नसल्यामुळेच त्यांच्यासमोर अनेक समस्या उद्भवत आहेत. हिंदु मुली किंवा महिलांवरील अत्याचार, धर्मांतरण, मंदिर सरकारीकरण, गोहत्या, विविध जिहाद असे अनेक प्रकार समाजात चालू आहेत. हे सर्व कुठल्याही जमिनीच्या तुकड्यासाठी नाही, तर हिंदु धर्म संपवण्यासाठी आहे. हे रोखण्यासाठी भारत ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित होणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन आपापल्या क्षमतेनुसार तन-मन-धन यांचा त्याग करून या राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.

शहरातील मारुति मंदिर येथे ‘विवा एक्झिक्युटिव्ह’ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘उद्योजक आणि अधिवक्ता’ यांच्यासाठी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. दीपा औंधकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद भारद्वाज, उद्योजक आणि अधिवक्ता उपस्थित होते. सद्गुरु स्वाती खाडये यांनी मार्गदर्शनादरम्यान सनातन संस्थेच्या वतीने मुले, पालक यांच्यासाठी उपयुक्त असणार्‍या ग्रंथांचीही माहिती सांगितली.

सद्गुरु स्वाती खाडये म्हणाल्या की,

१. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदू स्वधर्मापासून दूर चालला आहे. हिंदूंना विविध सणांमधील कृतींमागील शास्त्र ठाऊक नसल्यामुळे ‘गणपतीला दुर्वा किंवा शंकराला बेल हे संबंधित देवतेला आवडते म्हणून वहायचे’, असे त्यांना वाटते. यासाठी खरे शास्त्र समजून घेतले पाहिजे.

२. धर्मकार्यासाठी भगवंताचे अधिष्ठानही हवे. यासाठी धर्मकार्य करणार्‍यामधील अहं अल्प होणे आवश्यक असते. प्रत्येकाचा साधनेचा पाया भक्कम असणे महत्त्वाचे आहे.

३. देशात असलेल्या शेकडो हिंदु संघटनांनी एका भगव्याखाली एकत्र यायला हवे. या संघटनाच्या माध्यमातूनच आपण ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करू शकतो.

४. आज धर्म धोक्यात आहे आणि जेव्हा धर्म धोक्यात असतो, तेव्हा आपणही धोक्यात असतो. अशा वेळी प्रत्येकाच्या वेळेचा त्याग पुष्कळ महत्त्वाचा ठरतो.

५. आज विविध प्रकारचे असे ४५ जिहाद कार्यरत आहेत. त्याचा प्रतिकार करण्यासाठी सतर्क असणे आवश्यक आहे. उद्योगपती, अधिवक्ता यांनी यामध्ये योगदान देऊन याची माहिती अन्य हिंदूंना द्यायला हवी.

Related News