न्हावीगड

सह्याद्री पर्वताच्या उत्तर-दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते. उत्तरेकडून सुरू होणा-या या सह्याद्रिच्या रांगेला सेलबारी किंवा डोलबारी रांग असे म्हणतात. सेलबारी रांगेवर मांगी-तुंगी सुळके, न्हावीगड, असे गड आहेत तर दुस-या डोलबारी रांगेवर मुल्हेर, मोरागड, साल्हेर, हरगड,

सालोटा हे गडकिल्ले आहेत. पश्चिमेकडील गुजरात मधील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग यांच्या सीमेवर हे किल्ले वसलेले आहेत.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे या किल्ल्याला रतनगड असे देखील म्हणतात.

गडावर जाण्याच्या वाटेवर पिण्याच्या पाण्याची टाकी आणि देवीचे एक मंदिर लागते.गडावर जातांना आपल्याला पाय-या तर लागतात पण दरवाज्याचा मात्र मागमूसही नाही. किल्ल्याचा माथा तसा निमुळताच आहे.गडावर पाण्याची तीन ते चार टाकी आहेत.घरांचे काही अवशेष सापडतात.गडाचा सर्वोध माथा म्हणजे एक सुळकाच आहे. तो चढून जाण्यासाठी प्रस्तरारोहण आवश्यक आहे.गडमाथा फिरण्यास अर्धा तास पुरतो.गडावरुन मांगीतुंगी, मुल्हेर,मोरागड,साल्हेर आणि हरगड हा परिसर दिसतो.

गडावर जाण्याच्या वाटा :
– वडाखेल मार्गे :न्हावीगडावर जाण्यासाठी ताहाराबाद मार्गेमांगीतुंगी गाव गाठावे.मांगीतुंगी गावातून एक तासाच्या चालीने वडाखेल गावात यावे.वडाखेलपर्यंत डांबरी रस्ता नाही.त्यामुळे पायीच त्रेधातिरपीट करावी लागते. वडाखेलमधून पाताळवाडीकडे कूच करावे.पाताळवाडी हे पायथ्याचे गाव आहे. वडाखेल ते पाताळवाडी हे अंतर अर्ध्या तासाचे आहे.पाताळवाडीतून एक सरळ वाट किल्ल्याच्या पठारावर गेलेली आहे.या पठारावरुन दोन वाटा :फुटतात.

एक वाट समोर नाकाडावरुन वर चढते.ही वाट थोडी कठीण आहे. वाटेने वर चढताना सोपे प्रस्तरारोहण करावे लागते. वाटेने वर चढल्यावर आपण पाय-यापाशी पोहोचतो.दुसरी वाट पठारावरुन डावीकडे वळसा घालून पाययापाशी जाते. या वाटेला पाण्याची दोन-तीन टाकी लागतात.गडावर जाणा-या पाय-या मात्र जपूनच चढाव्या लागतात. पाय-यावर माती साचल्याने घसरण्याची शक्यता फार आहे.पाताळवाडीपासून गडावर दीड तासात पोहोचता येते.

राहण्याची सोय : गडावर राहण्याची भोजनाची सोय नाही
पाण्याची सोय : किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : जाण्यासाठी लागणारा वेळ पाताळवाडी गावातून दीड तास.
जाण्यासाठी उत्तम कालावधी : आक्टोंबर ते एप्रिल पर्यंत.