रामगड आणि सदानंदगड

सिंधुदुर्ग हा कोकणामधील दक्षिणेकडील जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून मुंबई-पणजी हा महामार्ग गोवेकडे जातो. या महामार्गाच्या पश्चिम अंगाला लहान लहान म्हणजे कमी उंचीच्या टेकडय़ा समुद्रापर्यंत पसरलेल्या आहेत. या लहान टेकडय़ामधे काही किल्ले विसावलेले आहेत. यातच रामगडचा लहान पण सुबक असा किल्ला आहे.

कणकवली हे तालुक्याचे गाव असून ते मुंबई -पणजी महामार्गावर आहे. कणकवली पासून रामगडला जाणे सोयीचे आहे. रामगडला कणकवली तसेच कसालकडूनही जाता येते. एस.टी. बसेसची सोय आहे. रामगडच्या पायथ्याला वेले नावाचे गाव आहे. कणकवली ते बांदीवडे या गाडीरस्त्यावर बेले गाव आहे या वेले गावाजवळून गड नावाची नदी वहाते. या गड नदीच्या काठावर असलेल्या लहानशा टेकडीवर गर्द झाडीने घेरलेला रामगड किल्ला आहे.

समुद्रसपाटीपासून अवघा ५० मीटर उंचीचा हा किल्ला आहे. गावामधून दहा ते पंधरा मिनिटांमधे आपण रामगडावर पोहोचू शकतो. गावाला लागूनच जाणारी वाट आहे. या वाटेवर एक पाण्याची टाकी आहे. त्याच्या जवळून थोडे चढल्यावर गडाचा प्रवेशमार्ग आहे. हा प्रवेशमार्ग बुरुजांमधे लपलेला आहे. गोमुखी पद्धतीने बांधलेला हा प्रवेशमार्ग म्हणजे शिवकालीन बांधकामाचे वैशिष्ठ आहे. शत्रु प्रवेशद्वाराला येवून भिडला तरी बाहेर आलेल्या बुरुजांवरुन त्याच्यावर मारा करता यावा अशी याची योजना असते.

उत्तम अवस्थेमधील प्रवेशद्वारातून आत आल्यावर पहारेकर्‍यांच्या देवडय़ा आपल्या दिसतात. पुर्वी पहार्‍यावर असणारे पहारेकरी येणार्‍या नवीन माणसाची ओळख पटवून आणि झाडाझडती घेतल्याशिवाय येथून पुढे सोडत नसत.

आता पहारेकरीही राहीले नाहीत आणि पहाण्याची गरज ही राहीली नसल्यामुळे रामगड पुर्णपणे बेसाऊ पडलेला पडलेला आहे. गडाचा या दरवाजाच्या माथ्यावर जाता येते. त्यासाठी पायर्‍यांचा मार्ग केलेला आहे. या दरवाजापासून काही अंतरावर दुसरा दरवाजा केलेला आहे. एकंदरीत एकाच तटबंदीत एवढय़ाजवळ असे दोन दरवाजे इतरत्र पहायला मिळत नाहीत.

रामगडाची तटबंदी काही ठिकाणी १५ ते २० फूट उंचीची आहे. काही ठिकाणी तिची पडझड झालेली दिसते. देखभाली अभावी तिची दुरावस्था झाल्याचे दिसते. या तटबंदीमधे जवळजवळ पंधरा बुरुजांची गुंफण केलेली आहे. या बुरुजांमुळे गडाची सरंक्षणसिद्धता वाढवलेली दिसून येते. पुर्वी या बुरुजांवर तोफा होत्या. गडावर तोफांचे गोळे आणि २१ तोफां असल्याची नोंद आहे. सध्या सात तोफा किल्ल्यात आहेत. या तोफा कोणी नेऊ नये म्हण्नू एका घराच्या जोत्यावर उभ्या करुन अर्धवट जमिनीमधे गाडून ठेवल्या आहेत. तोफा इकडे तिकडे हलवू नये म्हणून केलेली ही नामी शक्कल पाहून करणार्‍याचे कौतुकच वाटते.

रामगडाच्या एका बाजुने गडनदी वहाते. नदीच्या बाजुच्या तटबंदीमधे एक लहान दरवाजा केलेला आहे. या दरवाजाची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. पुर्वी याचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असणार कारण गडावर पाण्याची कसलीच सोय केलेली आढळत नाही. गडावरील पाण्याची गरज ही नदीतून वाहणार्‍या पाण्यावरच भागवली जात असावी असे दिसते.

रामगडाचा आवाका लहानच आहे. गडावरील घरांची जोती. वाडय़ाचे अवशेष, तटबंदी, बुरुज तसेच गणेशमूर्ती तोफां इत्यादी पहाण्यासाठी तास दीड तासांचा अवधी पुरेसा आहे.

शिवकालीन बांधकामाची वैशिष्ठ जपणारा रामगड मात्र इतिहासाबद्दल मौन बाळगून आहे. रामगडाचा किल्ला तुळाजी आंग्रे यांनी जिंकुन घेतल्याची नोंद आहे. इंग्रजांच्या सेनेचा कॅप्टन पिअससन हा रामगड जिंकण्यासाठी आला. त्याने ६ एप्रिल १८१८ मध्ये रामगड जिंकून घेतला.

रामगडाची ही छोटीशी पण आनंदाची भ्रमंती आटोपून आपण जवळच्या सदानंदगडाकडे निघतो. हो सदानंदगड नावाचा किल्ला रामगडापासून १२ ते १३ कि.मी. अंतरावर आहे. १९८६ साला पर्यंत सदानंदगडाची माहिती कोणालाही नव्हती. आजही या दुर्लक्षीत किल्ल्याची माहिती अनेकांना नाही.

सदानंदगडाच्या परिसरातील गावांमधेसुद्धा किल्ला म्हणून तो डोंगर प्रसिद्ध नाही. रामगड मधून एक रस्ता शिरगावकडे जातो. या मार्गावर गोठणे, सांडवे, कुवळे अशी गावे लागतात या मार्गावर एस.टी. बसेस मर्यादीतच आहेत. स्वत:चे वाहन सोयीचे पडते.

कुवळेगावाच्या पुढे सदानंदगडाचा डोंगर आहे. पुर्णपणे झाडीने झाकल्यामुळे त्याचे गडपणही हरवून गेले आहे. सदानंदगडाच्या मार्गावर कातळात कोरलेल्या काही पायर्‍या आढळतात. गडाच्या प्रवेशद्वाराचे तुरळक अवशेष दिसतात. तटबंदी व इतर वास्तू कालौघात नष्ट झाल्याचे आढळते. सदानंदगडावर पाण्याच्या दोन विहीरी मात्र आहेत. त्यात दगडमाती पडल्याने त्याही बुजत चालल्या आहेत.

सदानंदगडावरुन साळशीकडे उतरता येते. या मार्गावर काही पायर्‍यांही केलेल्या आढळतात. सदानंदगडासारख्या उपेक्षीत किल्ल्याची भ्रमंती येथील निसर्गरम्य परिसरामुळे आपल्याला वेगळाच आनंद देवून जातो.