श्री एकनाथी भागवत – (अध्याय अठरावा)

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो कर्मप्रकाशका । सद्विद्याविधिविवेका ।
कर्मधर्मप्रतिपाळका । जगन्नायका गुरुवर्या ॥ १ ॥
वर्णाश्रमादि मर्यादा । त्याचा सेतू तूं गोविंदा ।
तूं कारण वेदानुवादा । विवादसंवादा तूं मूळ ॥ २ ॥
तूं शब्दसृष्टीचा अर्कु । तूं वेदगुह्यप्रकाशकु ।
तूंचि एकला अनेकु । व्याप्य व्यापकु तूंचि तूं ॥ ३ ॥
तूंचि तूं विधि विधान । तूं बोलका तूंचि मौन ।
एका आणि जनार्दन । दोनी संपूर्ण तूं गुरुराया ॥ ४ ॥
यालागीं श्रीभागवता । तूंचि अर्थ तूं कविता ।
तूंचि अर्थावबोधकता । हेंही बोलविता तूंचि आम्हां ॥ ५ ॥
जैशीं आपुलींचि उत्तरें । पडसादें होतीं प्रत्युत्तरें ।
तेवीं माझेनि मुखांतरें । तूं कवित्वद्वारें बोलका ॥ ६ ॥
बोलका श्रीभागवतीं । श्रीकृष्ण कृपामूर्ती ।
तेणें वर्णाश्रम‍उत्पत्ति । यथास्थिती सांगितली ॥ ७ ॥
सप्तदशाध्यायीं सुगम । सांगितले ब्रह्मचर्य-धर्म ।
गृहस्थाचें स्वधर्मकर्म । नित्यनेम निरूपिले ॥ ८ ॥
आतां अष्टादशाध्यायीं जाण । वानप्रस्थाश्रमलक्षण ।
संन्यासधर्माचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ९ ॥

श्रीभगवानुवाच-
वनं विविक्षुः पुत्रेषु भार्यां न्यस्य सहैव वा ।
वन एव वसेच्छान्तस्तृतीयं भागमायुषः ॥ १ ॥

आतां क्रमेंचि निरूपण । वानप्रस्थाचें आलें जाण ।
त्यासी वनास निघावया कारण । आयुष्यलक्षण विभाग ॥ १० ॥
`शतायुःपुरुष'-मर्यादा श्रुती । त्याच्या तृतीयभागाची स्थिती ।
सासष्टी क्रमिल्याअंतीं । वनाप्रती निघावें ॥ ११ ॥
निघावया वनाप्रती । भार्या देऊनि पुत्राचे हातीं ।
आपण निघावें शीघ्रगतीं । वानप्रस्थीं वनवासा ॥ १२ ॥
भार्या साध्वी पतिव्रता सती । ईश्वरस्वरूप मानी पती ।
भ्रतार निघतां वानप्रस्थीं । जे पुत्राप्रती राहेना ॥ १३ ॥
सांडितां भ्रतारसेवेसी । कल्पांत हों पाहे जिसी ।
जे भ्रतारचरणांची दासी । ते सवें वनासी आणावी ॥ १४ ॥
जो पुरुष स्त्रीसमवेत । वनीं झाला वानप्रस्थ ।
तेणें स्त्रीकामासी अलिप्त । व्हावें दृढव्रत ते आश्रमीं ॥ १५ ॥
जो वानप्रस्थवनवासी । तेणें दृढ धरावी शांति मानसीं ।
नातळावें कामक्रोधासी । हेही व्रत त्यासी आवश्यक ॥ १६ ॥

कन्दमूलफलैर्वन्यैर्मेध्यैर्वृत्तिं प्रकल्पयेत् ।
वसीत वल्कलं वासस्तृणपर्णाजिनानि च ॥ २ ॥

वनींचीं कंदमूळफळें । जीं निपजलीं ऋतुकाळें ।
तींही अतिपवित्रें निर्मळें । आहार तेणें मेळें करावा ॥ १७ ॥
वनवासीं वस्त्रें जाण । वल्कलें व्याघ्रमृगाजिन ।
अथवा नेसावें केवळ तृण । कां पर्णाभरण वृक्षांचें ॥ १८ ॥
वानप्रस्थीं नेमग्रहण । ऐक त्याचेंही लक्षण ।
त्या नेमाचें निरूपण । स्वयें नारायण सांगत ॥ १९ ॥

केशरोमनखश्मश्रु मलानि बिभृयाद्दतः ।
न धावेदप्सु मज्जेत त्रिकालं स्थण्डिलेशयः ॥ ३ ॥

केश म्हणिजे मस्तकींचे । श्मश्रु बोलिजे मुखींचे ।
रोम ते कक्षोपस्थींचे । छेदन यांचें न करावें ॥ २० ॥
मस्तकीं न करावें वपन । न करावें श्मश्रुकर्म जाण ।
न करावें रोमनखच्छेदन । दंतधावन न करावें ॥ २१ ॥
स्नान मुसलवत् केवळ । अवश्य करावें त्रिकाळ ।
प्रक्षाळावे ना शरीरमळ । व्रत प्रबळ वनस्था ॥ २२ ॥
केवळ भूमीवरी शयन । सदासर्वदा करावें जाण ।
तळीं घालावें ना तृण । मग आस्तरण तें कैंचें ॥ २३ ॥
यापरी वानप्रस्थें जाण । दृढ धरूनि व्रतधारण ।
करावें तपाचरण । तें तपलक्षण अवधारीं ॥ २४ ॥

ग्रीष्मे तप्येत पञ्चाग्नीन् वर्षास्वासारषाड्वले ।
आकण्ठमग्नः शिशिर एवं वृतस्तपश्चरेत् ॥ ४ ॥

उष्णकाळीं पंचाग्नीं । अग्निकुंडे चहूं कोणीं ।
पांचवा रवि माध्याह्नीं । ऐसा पंचाग्नी साधावा ॥ २५ ॥
माळा करोनि उच्च प्रदेशीं । धन वर्षतां धारावर्त्तेंसीं ।
तेथ व्हावें आकाशवासी । वर्षाकाळीं ऐसी तपप्राप्ती ॥ २६ ॥
आलिया हेमंतऋतूसी । आकंठमग्न जळावासी ।
जळ वास करावा निशीं । हे वानप्रस्थासी तपक्रिया ॥ २७ ॥
हे तपक्रिया प्रतिवरूषीं । विहित वानप्रस्थासीं ।
वयसापरत्वें भक्षणासी । हृषीकेशी सांगत ॥ २८ ॥

अग्निपक्वं समश्नीयात्कालपक्वमथापि वा ।
उलूखलाश्मकुट्टो वा दन्तोलूखल एव वा ॥ ५ ॥

अगीस्तव पाका आलीं । कां काळें जीं परिपक्व झालीं ।
तीं तापसालागीं भलीं । आहारीं विहिलीं उदरार्थ ॥ २९ ॥
दांत असलिया बळी । फळें खावी तेणें सगळीं ।
कां गेलिया दांत समूळीं । कांडूनि उखळीं सुखे खावीं ॥ ३० ॥
जरी उखळ न मीळे वनीं । तरी खावीं दगडें ठेंचुनी ।
नाहीं चाड गोडपणीं । क्षुधानिवारणीं आहारार्थ ॥ ३१ ॥

स्वयं सञ्चिनुयात्सर्वमात्मनो वृत्तिकारणम् ।
देशकालबलाभिज्ञो नाददीतान्यदाहतम् ॥ ६ ॥

ऋतुकाळीं फळें संपूर्णें । तीं कालांतराकारणें ।
संग्रहो सर्वथा न करणें । व्रतधारणें वनस्था ॥ ३२ ॥
पूर्वदिवसीं फळें आणिलीं । अपरदिवसीं जरी उरलीं ।
ती अवश्य पाहिजे त्यागिलीं । नाहीं बोलिलीं आहारार्थ ॥ ३३ ॥
प्रत्यहीं आहारार्थ जाण । फळें आणावीं नूतन ।
जीर्ण फळांचें भक्षण । निषिद्ध जाण वानप्रस्था ॥ ३४ ॥
आणिकें फळें जीं आणिलीं । तीं अंगीकारा निषिद्ध झालीं ।
जीं स्वकष्टें अर्जिलीं । तींचि वहिलीं आहारार्थ ॥ ३५ ॥
देश काळ वर्तमान । इत्थंभूत कळलें ज्ञान ।
तरी संग्रह न करावा जाण अदृष्टधारण निर्धारें ॥ ३६ ॥
पराचा प्रतिग्रहो पूर्ण । सर्वथा न करावा आपण ।
प्रतिग्रह घेतां जाण । व्रतखंडन वानप्रस्था ॥ ३७ ॥

वन्यैश्चरुपुरोडाशैर्निर्वपेत्कालचोदितान् ।
न तु श्रौतेन पशुना मां यजेत वनाश्रमी ॥ ७ ॥

जो वानप्रस्थ स्त्रीसमवेत । त्यासी अग्निहोत्र झालें प्राप्त ।
तेव्हां कर्म जें वेदोक्त । तें करावें समस्त वनवासीं ॥ ३८ ॥
वनीं जीं फळें ज्या ऋतूस । तोचि कल्पावा चरुपुरोडाश ।
तेणें यजावा मी यज्ञपुरुष । सावकाश मंत्रोक्त ॥ ३९ ॥
यापरी श्रौतकर्मविधान । यागार्थ पशुहनन ।
तें वानप्रस्थासी नाहीं जाण । वनफळीं यजन यागाचें ॥ ४० ॥

अग्निहोत्रं च दर्शश्च पूर्ण्मासश्च पूर्ववत् ।
चातुर्मास्यानि च मुनेराम्नातानि च नैगमेः ॥ ८ ॥

पूर्वीं अग्निहोत्रकर्में जैसीं । गृहीं होतीं गृहस्थासी ।
तींचि चालवावीं वनवासीं । वेदाज्ञेसीं वनस्थें ॥ ४१ ॥
आम्नायें आगमनिगमांसी । जाणोनि करावें यागासी ।
दर्शपौर्णमासचातुर्मास्यांसी । निष्कामतेसी वेदाज्ञा ॥ ४२ ॥
ऐसा मुनीश्वर वनवासी । तपस्वी तेजोराशी ।
त्याचिये फळप्राप्तीसी । स्वयें हृषीकेशी सांगत ॥ ४३ ॥

एवं चीर्णेन तपसा मुनिर्धमनिसन्ततः ।
मां तपोमयमाराध्य ऋषिलोकादुपैति माम् ॥ ९ ॥

ऐसें वेदोक्त तप साचार । आस्तिक्यभावें अत्यादर ।
साक्षेपें करितां निरंतर । अस्थिमात्र देह उरे ॥ ४४ ॥
शुष्कशरीरपांजरा । त्वचेनें झांकिलिया शिरा ।
परी सामर्थें अति खरा । न सरे माघारा तपोनिष्ठें ॥ ४५ ॥
ऐसें यावज्जन्म करितां तप । तो सबाह्य झाला निष्पाप ।
लाहोनि ज्ञान सद्‌रूप । माझें निजस्वरूप तो पावे ॥ ४६ ॥
अवशेष वासना असतां । सूक्षरूप प्रतिबद्धकता ।
तपाभिमानें तत्त्वतां । देह‍अहंता अणुमात्र ॥ ४७ ॥
परी फळाशा पोटीं नाहीं । ऐसेनि निमाला जो देही ।
तो पावोनि ऋषिलोकाच्या ठायीं । तेथोनि पाहीं मज पावे ॥ ४८ ॥
जो ऋषिलोकातें पावला । तो क्रमें मुक्तीच्या मार्गा आला ।
तेथूनि क्रमेंचि मज पावला । यापरी उद्धरला वनस्थ ॥ ४९ ॥

यस्त्वेतत् कृच्छ्रतश्चीर्णं तपो निःश्रेयसं महत् ।
कामायाल्पीयसे युञ्ज्याद्‍बालिशः कोऽपरस्ततः ॥ १० ॥

एवं वानप्रस्थ अतिकष्टीं । तपादिसाधनसंकटीं ।
भोगफळाशेच्या तुटीं । मोक्षपरिपाटी पावले ॥ ५० ॥
जें हाता आलें मोक्षफळ । आविरिंच्यादि मंगळ ।
तें तपादिसाधन निर्मळ । कामार्थ केवळ कल्पिती ॥ ५१ ॥
जेवीं कां चिंतामणीचियेसाठीं । मागे चातीलागीं खापरखुंटी ।
कां परीस देवोनि पालटीं । काळी गोमटी वीट मागे ॥ ५२ ॥
तेवीं मनुष्यपणाचिये स्थितीं । उत्तम जन्में तपःप्राप्ती ।
ते तपःक्रिया व्यर्थ करिती । काम वांछिती ते मूर्ख ॥ ५३ ॥
त्या मूर्खांचें मूर्खपण । किती सांगावें गा गहन ।
मोक्षप्राप्तीचें साधन । कामलिप्सा जाण नाशिलें ॥ ५४ ॥
असो हें मूर्खाचें कथन । वानप्रस्थाचेंचि लक्षण ।
पूढील सांगेन संपूर्ण । शस्त्रार्थ जाण सुनिश्चित ॥ ५५ ॥
जो वानप्रस्थ आपण । तपादि साधनीं अतिक्षीण ।
झाला तरी वैराग्यज्ञान । ज्यासी जाण नुपजेचि ॥ ५६ ॥
पन्नास वर्षें गार्हस्थ्य । दोनी द्वादशें वानप्रस्थ ।
झाला तरी जो अप्राप्त । वैराग्ययुक्त निजज्ञाना ॥ ५७ ॥
आयुष्याचे तीन भागवरी । वेंचलें गा ऐशापरी ।
आतां चतुर्थ भाग उरल्यावरी । क्षीण शरीरीं जर्जर ॥ ५८ ॥
ऐसें शरीर झालिया क्षीण । अल्पही वैराग्य झाल्या जाण ।
करावें संन्यासग्रहण । कर्माचरण यथाशक्ती ॥ ५९ ॥
वानप्रस्थाश्रमी झाल्याही । निःशेष वैराग्य अल्पही ।
सर्वथा नुपजे ज्याच्या ठायीं । त्याचा अधिकार पाहीं हरि बोले ॥ ६० ॥

यदासौ नियमेऽकल्पो जरया जातवेपथुः ।
आत्मन्यग्नीन् समारोप्य मच्चित्तोऽग्निं समाविशेत् ॥ ११ ॥

सर्वथा वैराग्य नुठी देहीं । जरा आदळली ठायींचे ठायीं ।
स्वधर्माचरणीं शक्ति नाहीं । कंप पाहीं सर्वांगीं ॥ ६१ ॥
ऐसा वानप्रस्थवनवासी । आत्मसमारोप करूनि अग्नीसी ।
मातें दृढ ध्याऊनि मानसीं । अग्निप्रवेशीं रिघावें ॥ ६२ ॥
वानप्रस्थाश्रमीं वनस्थ । अतिशयें झाला जो विरक्त ।
त्याची उत्तरविधि समस्त । स्वयें भगवंत सांगतसे ॥ ६३ ॥

यदा कर्मविपाकेषु लोकेषु निरयात्मसु ।
विरागो जायते सम्यङ् न्यस्ताग्निः प्रव्रजेत्ततः ॥ १२ ॥

वानप्रस्थीं अनुष्ठान । तेणें वैराग्य अतिगहन ।
इंद्रचंद्रादिब्रह्मसदन । निरयासमान जो मानी ॥ ६४
ऐसा दृढ वैराग्य‍उठावा । तेणें विहिताग्नि बोळवावा ।
त्याग करूनि आघवा । अंगीकारावा संन्यास ॥ ६५ ॥
ते संन्यासग्रहणस्थिती । यथाशास्त्र यथापद्धती ।
स्वयें सांगताहे श्रीपती । यथानिगुती विहितार्थे ॥ ६६ ॥

इष्ट्वा यथोपदेशं मां दत्वा सर्वस्वमॄत्विजे ।
अग्नीन्स्वप्राण आवेश्य निरपेक्षः परिव्रजेत् ॥ १३ ॥

अष्टश्राद्धादि विधान । प्राजापत्यनामिष्टिसाधन ।
मज भगवंतातें यजून । सर्वस्वदान ऋत्विजां ॥ ६७ ॥
मुख्यत्वें मूर्त जो अग्नी । तो निजहृदयीं संस्थापूनी ।
आशा निःशेष छेदूनी । संन्यास करूनी निरपेक्ष ॥ ६८ ॥
संन्यास करितेठायीं । विघ्नें अपार उठतीं पाहीं ।
तीं रगडूनियां पायीं । संन्यास तिंहीं करावा ॥ ६९ ॥

विप्रस्य वै संन्यसतो देवा दारादिरूपिणः ।
विघ्नान्कुर्वन्त्ययं ह्यस्मानाक्रम्य समियात्परम् ॥ १४ ॥

संन्यास करिता जो ब्राह्मण । त्यासी समस्त देव मिळोन ।
नाना स्त्रियादि रूपें जाण । अनंत विघ्नें करूं येती ॥ ७० ॥
विघ्न करावया कारण । मनुष्य देवांचा पशु जाण ।
सदा अर्पी बळिदान । देवाअधीन हा सर्वदा ॥ ७१ ॥
तो बळी नेदी येथूनि आतां । पाय देऊनि आमुचे माथां ।
घेऊं पाहे ब्राह्मसायुज्यता । यालागीं सर्वथा विघ्नें करिती ॥ ७२ ॥
तेथ वैराग्यबळें तत्त्वतां । विघ्नें हाणूनियां लातां ।
अवगणूनि देवां समस्तां । संन्यास सर्वथा करावा ॥ ७३ ॥
ऐसा वैराग्यें उद्‍भट । विवेकज्ञानें अतिश्रेष्ठ ।
संन्यासग्रहण वरिष्ठ । विधिनिष्ट विभागें ॥ ७४ ॥
एवं झाल्या संन्यासग्रहण । त्याचें विधीचें विधिविधान ।
स्वयें सांगताहे नारायण । स्वधर्मलक्षण संन्यासिया ॥ ७५ ॥

बिभृयाच्चेन्मुनिर्वासः कौपीनाच्छादनं परम् ।
त्यक्तं न दण्डपात्राभ्यामन्यत्किञ्चिदनापदि ॥ १५ ॥

भूतां अभयदानपुरस्कर । संकल्पपूर्वक प्रेषोच्चार ।
तैं उरलें दिसे देहमात्र । सर्वस्य येर त्यागिलें ॥ ७६ ॥
जो गुरुवाक्यश्रवणासरिसा । वस्तूचि हो‍ऊनि ठेला आपैसा ।
उडाला देहबुद्धिचा वळसा । तुटला फांसा कर्माचा ॥ ७७ ॥
त्यासी विधिविधान कर्तव्यता । बोलोंचि नये गा सर्वथा ।
नवनीत आलिया हाता । रितें ताक आतां कोण घुसळी ॥ ७८ ॥
कापूर मिळालिया वन्हीं । तो परतेना कापूरपणीं ।
तेवीं वस्तु झाला जो गुरुश्रवणीं । तो विधिकिंकरपणीं वर्तेना ॥ ७९ ॥
परी गुरुवाक्यें तत्त्वतां । ज्यासी ऐसी हे अवस्था ।
सत्य न बाणेचि सर्वथा । त्याची विधानता अवधारीं ॥ ८० ॥
गुरुवाक्याचें करितां मनन । नागवेपणीं लाजे मन ।
तरी लिंगमात्र आच्छादन । कौपीन जाण धरावी ॥ ८१ ॥
इतुकेन निर्वाह न सरे । ऐसें जाणवलें जैं पुरें ।
तैं वस्त्रखंड दुसरें । स्वाधिकारें धरावें ॥ ८२ ॥
दंड कमंडलु जंव आहे । तंव कौपीन बहिर्वास राहे ।
दंडत्यागासवें पाहें । त्याग होये वस्त्रांचा ॥ ८३ ॥
आपत्तिकाळीं संन्याशासी । रोग लागला होय ज्यासी ।
का जरेनें व्यापिलें देहासी । तैं जें लागेल त्यासी तें द्यावें ॥ ८४ ॥
गुरुवाक्यें श्रवण मनन । ऐसें साधी जो साधन ।
त्या साधकाचें लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ८५ ॥

दृष्टिपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं पिबेज्जलम् ।
सत्यपूतां वदेद्वाचं मनःपूतं समाचरेत ॥ १६ ॥

दृष्टि ठायीं ठेवूनि जाण । पृथ्वी पाहूनि पावन ।
हंसगतीं करी गमन । अनुसंधान निजवृत्तीं ॥ ८६ ॥
जेथ जीवसंपदा दृष्टीं पडे । तैं प्राण गेल्या न चले पुढें ।
जीवांतें काढूनि कडे । पाऊल पडे अतिशुद्ध ॥ ८७ ॥
आधींच पवित्र गंगाजळ । त्याचा निर्मळ वस्त्रें निरसोनि मळ ।
यापरी करोनियां निर्मळ । गंगाजळ सेविती ॥ ८८ ॥
ज्याचे वाचेचे आळां । असत्याच्या तृणशाळा ।
जाळूनि वैराग्यज्वाळा । सत्याचा उगवला कल्पद्रुम ॥ ८९ ॥
ज्या कल्पद्रुमाचीं वचनफळें । परिपक्वे आणि सोज्वळें ।
मधररसेंसीं रसाळें । अतिनिर्मळें घमघमितें ॥ ९० ॥
जें श्रवणीं अतिगोड । पुरवी श्रोतयांचें कोड ।
निववी जीवाची चाड । सत्य सुरवाड हा वाचेचा ॥ ९१ ॥
सहजें संन्याशाचें ध्यान । `अहमेव नारायण' ।
तें दृढ धरोनि अनुसंधान । पवित्र मन करावें ॥ ९२ ॥
मन करोनि पावन । पृथ्वी विचरावी जाण ।
त्या मनाचें पवित्रपण । सर्वत्र आपण लक्षावें ॥ ९३ ॥
संन्याशाचे धर्मीं जाण । मुख्यत्वें हेंचि लक्षण ।
पवित्र करोनि अंत:करण । सर्वत्र नारायण लक्षावा ॥ ९४ ॥
मनाचें पवित्रपण । उद्धवा या नांव जाण ।
आतां त्रिदंडाचें लक्षण । संन्यासनिरूपण तें ऐक ॥ ९५ ॥

मौनानीहानिलायामा दण्डा वाग्देहचेतसाम् ।
न ह्येते यस्य सन्त्यङ्ग वेणुभिर्न भवेद्यतिः ॥ १७ ॥

मौन अथवा सत्य भाषण । कां श्रीरामनामाचें स्मरण ।
हो कां ओंकाराचें उच्चारण । `वाग्दंड' जाण या नांव ॥ ९६ ॥
शरीरींचे जितुकें चळण । तें प्राणाचेनि बळें जाण ।
त्या प्राणाचें प्राणरोधन । करावें आपण प्राणायामें ॥ ९७ ॥
प्राणायामें निजप्राण । जिणोनि करावा स्वाधीन ।
या नांव `देहदंड' जाण । ऐक लक्षण `मनोदंडाचें' ॥ ९८ ॥
मनाचें चपळपण । संकल्प विकल्प जाण ।
त्याचें करावया छेदन । ब्रह्मानुसंधान करावें ॥ ९९ ॥
माझें स्वरूप सर्वगत । तेथ निश्चयें ठेवितां चित्त ।
मन संकल्पविकल्पें जाय जेथ । तेथ तेथ स्वरूप ॥ १०० ॥
ऐसें सावध राखतां मन । दृढ लागल्या अनुसंधान ।
तंव संकल्पविकल्प क्षीण । सहजचि जाण स्वयें होती ॥ १ ॥
देह वाचा आणि मन । या त्रिदंडांचें लक्षण ।
तुज म्यां सांगितले संपूर्ण । संन्यासत्व जाण येणें सत्य ॥ २ ॥
हे तिन्ही दंड नसतां जाण । केवळ वेणुदंडग्रहण ।
तेणें संन्यासत्व न घडे जाण । देहविटंबन दंभार्थ ॥ ३ ॥
सन्याशाचा आहार विहार । आचार संचार विचार ।
स्वधर्मयुक्त साचार । स्वयें सारंगधर सांगतु ॥ ४ ॥

भिक्षां चतुर्षु वर्णेषु विगर्ह्यान्वर्जयंश्चरेत् ।
सप्तागारानसंक्लृप्तांस्तुष्येल्लब्धेन तावता ॥ १८ ॥

पूर्वी जाण संन्याशासी । चतुर्वर्णीं भिक्षा होती त्यासी ।
कलियुगीं गोष्टी झाली कैसी । ब्राह्मणापाशीं चतुर्वर्ण ॥ ५ ॥
ज्याची जीविका जेणें जाण । त्या ब्राह्मणाचा तोचि वर्ण ।
ऐका तेंही प्रकरण । जीविकालक्षण सांगेन ॥ ६ ॥
`मुख्य ब्राह्मणाची वृत्ती' जाण । `शिल' `उंछ' का `कोरान्न' ।
अयाचित का अध्यापन । अथवा याजन जीविकेसी ॥ ७ ॥
जो जीविकेलागीं निर्धारीं । शस्त्र घेऊनियां करीं ।
शूरवृत्तीं जीविका करी । तो जाणावा `क्षत्री' ब्राह्मणांमाजीं ॥ ८ ॥
जो वाणिज्यवृतीवरी । नित्य जीविका आपुली करी ।
तो ब्राह्मण ब्राह्मणामाझारीं । `वैश्य' निर्धारीं निश्चित ॥ ९ ॥
जो शूद्राचे शूद्रक्रियेवरी । सदा सर्वदा जीविका करी ।
तो ब्राह्मण शूद्रकर्मेंकरीं । `शूद्रत्व' धरी क्रियायोगें ॥ ११० ॥
जैं उत्तम ब्राह्मणाची भिक्षा न लभे । तैं क्षत्रियब्राह्मणीं भिक्षा लाभे ।
क्षात्रब्राह्मणांचेनि अलाभें । वैश्यादि ब्राह्मणीं लाभे भिक्षाग्रहण ॥ ११ ॥
ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्यब्राह्मणीं । भिक्षेस अप्राप्त हे तिनी ।
तैं शूद्रजीविका-ब्राह्मणीं । भिक्षाग्रहणीं अधिकारु ॥ १२ ॥
यांत निंद्य जे ब्राह्मणाआंतु । केवळ दोषी अथवा अभिशप्तु ।
ते भिक्षेसी न लावावा हातु । हा स्वधर्मार्थु भिक्षेचा ॥ १३ ॥
तेही भिक्षा अतिनेमस्त । भिक्षेसी येतों हें कळों नेदित ।
मागावीं नेमिलीं घरें सात । जें झालें प्राप्त तेणें सुखी ॥ १४ ॥
जे सातां घरीं भिक्षा प्राप्त । ते भिक्षेचा धर्म विहित ।
स्वयें सांगे श्रीकृष्णनाथ । स्मृतिशास्त्रार्थप्रयोगें ॥ १५ ॥

बहिर्जलाशयं गत्वा तत्रोपस्पृश्य वाग्यतः ।
विभज्य पावितं शेषं भुञ्जीताऽशेषमाहृतम् ॥ १९ ॥

ग्रामाबाहेर गंगातीरीं । अथवा तडागाचे परिसरीं ।
भिक्षा धरोनियां करीं । आचमन तीरीं करावें ॥ १६ ॥
याचित जें भिक्षेचें अन्न । तें द्वादशप्रणवें अभिमंत्रून ।
तेणें मंत्रोदकें प्रोक्षीतां जाण । होय पावन पवित्र ॥ १७ ॥
चतुर्धा करावें त्या अन्नातें । चार अधिकारी त्या भागतें ।
ब्रह्मा विष्णु अर्क आणि भूतें । अर्पण तेथें अवधारीं ॥ १८ ॥
विष्णुकल्पित जो भाग । तो जळीं घालावा साङ्ग ।
भूतकल्पित जो विभाग । तो पृथ्वीवरी चांग ठेवावा ॥ १९ ॥
उरले जे विभाग दोनी । यतीसी अधिकार सेवनीं ।
दीन मागों आलिया ते क्षणीं । भूतदयागुणीं अन्न द्यावें ॥ १२० ॥
परी मी एक अन्नदाता । हें आठवोंही नये चित्ता ।
आल्या दातेपणाची अहंता । अधर्मता संन्यासीं ॥ २१ ॥
मधुकरीचें अवघेंचि अन्न । समयीं मागों येती दीन ।
येणें उद्देशें अधिक अन्न । सर्वथा जाण मागों नये ॥ २२ ॥
करितां मधुकरीभोजन । ठायीं अधिक उरलिया अन्न ।
तें सांडितां अतिपतन । अवघेंच जाण भक्षावें ॥ २३ ॥
संन्यासधर्मीं लघु आहार । नित्य करावा निरंतर ।
अधिक आहारीं विकार । निद्रा आळस फार बाधिती ॥ २४ ॥
ज्यालागीं कीजे चतुर्थाश्रम । तो संन्याशाचा मुख्य धर्म ।
स्वयें सांगे पुरुषोत्तम । जेणें आत्माराम पाविजे ॥ २५ ॥

एकश्चरेन्महीमेतां निःसङ्गः संयतेन्द्रियः ।
आत्मक्रीड आत्मरत आत्मवान् समदर्शनः ॥ २० ॥

सदा वैराग्य अंगीं पुरतें । जो अपेक्षीना सांगात्यातें ।
निःसंग होत्साता चित्तें । सुखें पृथ्वीतें विचरतु ॥ २६ ॥
इंद्रियें बांधोनि चित्ताच्या पायीं । चित्त लावी चैतन्याच्या ठायीं ।
तेणें चिन्मात्र ठसावें पाहीं । देहत्व देहीं स्मरेना ॥ २७ ॥
ऐसा आत्मस्थितीचा उद्यम । तेणें आत्मक्रीडेचा आराम ।
आत्मसुखाचा संभ्रम । अनुभव परम तो ऐक ॥ २८ ॥
आत्मस्थिति निजात्मयुक्त । तेणें आत्मसुखें उल्हासत ।
सदा समदर्शनें डुल्लत । वोसंडत समसाम्यें ॥ २९ ॥
ऐशिया समसुखाची संपत्ती । भोगावया सुनिश्चितीं ।
सदा एकाकी वसे एकांतीं । तेंचि श्रीपती सांगत ॥ १३० ॥

विविक्तक्षेमशरणो मद्‍भावविमलाशयः ।
आत्मानं चिन्तयेदेकमभेदेन मया मुनिः ॥ २१ ॥

पवित्र आणि विजन । प्रशस्त आणि एकांतस्थान ।
तेणें माझें अनुसंधान । सद्‍भावें जाण सर्वदा ॥ ३१ ॥
तेथें सांडून जनपद दुश्चित । सदा एकांतीं व्हावें निरत ।
मद्‍भावें सुनिश्चित । आत्मसुख प्राप्त साधकां ॥ ३२ ॥
ज्यासी निजात्मसुख झालें प्राप्त । तो होय अनन्यशरणागत ।
मीवांचूनि जगाआंत । आणीक अर्थ देखे न ॥ ३३ ॥
ऐसे अनन्य करितां माझें ध्यान । साधक विसरे मीतूंपण ।
तेव्हां अभेदें चैतन्यघन । मद्‌रूप जाण तो होय ॥ ३४ ॥
त्या मद्‌रूपाचे स्वरूपस्थिती । पाहों जातां निजात्मवृत्ती ।
मी ना तो ऐशी होय गती । `अभेदप्राप्ती' या नांव ॥ ३५ ॥
जंव असे द्वैतवार्ता । तंव भयाची बाधकता ।
अभेदत्व आल्या हाता । निर्भयता साधकां ॥ ३६ ॥
अभेदप्राप्तीच्या ठायीं । बंधमोक्षांची वार्ता नाही ।
गडगर्जे बंधमोक्ष पाहीं । नांदती नवायी हरि बोले ॥ ३७ ॥

अन्वीक्षेतात्मनो बन्धं मोक्षं च ज्ञाननिष्ठया ।
बन्ध इन्द्रियविक्षेपो मोक्ष एषां च संयमः ॥ २२ ॥

ऐक्यें पावोनि एकात्मता । तेथूनि बंधमोक्ष पाहतां ।
दोंहीची मिथ्या वार्ता । मायिकता निश्चित ॥ ३८ ॥
प्रवृत्तीमाजीं बंधमोक्षता । त्या दोंहीची विभागता ।
इंद्रियांची जे विषयासक्तता । `दृढबद्धता' ती नांव ॥ ३९ ॥
काया-वाचा-चित्तवृत्तीं । निःशेष विषयांची विरक्ती ।
या नांव साचार `मुक्ति' । जाण निश्चितीं उद्धवा ॥ १४० ॥
ज्यासी साचार पाहिजे मुक्ती । तेणें करावी विषयनिवृत्ती ।
हेचि मुख्यत्वें उपायस्थिती । कृष्ण कृपामूर्ती सांगत ॥ ४१ ॥

तस्मान्नियम्य षड्वर्गं मद्‍भावेन चरेन्मुनिः ।
विरक्तः क्षुल्लकामेभ्यो लब्ध्वाऽऽत्मनि सुखं महत् ॥ २३ ॥

येणें विचारें विचारिता । विषयासक्ती दृढबद्धता ।
त्या विषयांचा त्याग करितां । निजमुक्तता सहजेंचि ॥ ४२ ॥
तेचि विषयांची विरक्ती केवीं । आतुडे आपुल्या हातीं ।
यालागीं वैराग्याची उत्पत्ती । साधकें निश्चितीं साधावी ॥ ४३ ॥
अंतरीं वासना दृढमूळ । विषयशाखा तेणें सबळ ।
ते वासना छेदावया समूळ । वैराग्य सबळ साधावें ॥ ४४ ॥
वैराग्यप्राप्तीचें कारण । स्वधर्मकर्म मदर्पण ।
सांडावें कर्माचें कर्तेपण । `मदर्पण' या नांव ॥ ४५ ॥
मदर्पणें कर्मस्थिती । तेणें माझ्या ठायीं उपजें प्रीती ।
माझें नाम माझी कीर्ती । चिंतन चित्तीं पैं माझें ॥ ४६ ॥
ऐशिया माझ्या परम प्रीतीं । होय वैराग्याची उत्पत्ती ।
तेणें विषयांची विरक्ती । माझी सुखप्राप्ती शनैःशनैः ॥ ४७ ॥
माझेनि सुखें माझें भजन । अत्यंत थोरावे पैं जाण ।
तेव्हा सर्वत्र मद्‍भावन । ब्रह्मत्वें पूर्ण ठसावे ॥ ४८ ॥
सर्वत्र ब्रह्मभावन । ब्रह्मसुखाचें अनुसंधान ।
धरूनि करावें पर्यटण । जंव निर्वासन मन होय ॥ ४९ ॥

पुत्रग्रामव्रजान् सार्थान् भिक्षार्थं प्रविशंश्चरेत् ।
पुण्यदेशसरिच्छैलवनाश्रमवतीं महीम् ॥ २४ ॥

पृथ्वी विचरणें विचित्र । पुण्यदेश कुरुक्षेत्र ।
सप्त पुर्‍या परम पवित्र । पुष्करादि थोर महातीर्थें ॥ १५० ॥
कृतमाला पयस्विनी । पुण्यरूप ताम्रपर्णी ।
गौतमी रेवा त्रिवेणी । परमपावनी गोमती ॥ ५१ ॥
कृष्णा वेण्या तुंगभद्रा । तपती पयोष्णी भिंवरा ।
यमुना भागीरथी नीरा । गंगा सागरासंगमीं ॥ ५२ ॥
ऋष्यमूक श्रीशैल व्यंकटाद्री । मूळपीठींचा सह्याद्री ।
गौतमीतीरींचा ब्रह्मगिरी । जो पापें संहारी यात्रामात्रें ॥ ५३ ॥
हो कां चढता हिमगिरी । पदीं दुरितांतें दूर करी ।
निःशेष पापांतें निवारी । ते यात्रा मुनीश्वरीं अवश्य कीजे ॥ ५४ ॥
दंडकारण्य बृहद्वन । नैमिषारण्य आनंदवन ।
इत्यादि वनांचें गमन । संन्याशीं जाण करावें ॥ ५५ ॥
च्यवनकपिलव्यासाश्रम । गौतमवामन‍आश्रमोत्तम ।
यात्रा श्रेष्ठ बदरिकाश्रम । जो सकळ कर्मदाहकु ॥ ५६ ॥
ऐशीं स्थळें जीं पावन । तेथें संन्याशियें करावें गमन ।
मार्गीं भिक्षार्थ जें अटन । तेंही निरूपण अवधारीं ॥ ५७ ॥
हाट हाटवटिया अति उत्तम । त्यातें `पुर' म्हणती नरोत्तम ।
हाटहाटवटियाहीन तो `ग्राम' । भिक्षेचा नेम सारवा तेथें ॥ ५८ ॥
गायीगौळियांचें निवासस्थान । `व्रत' त्यातें म्हणती जाण ।
`सार्थ' म्हणिजे पव्हा संपूर्ण । भिक्षार्थ अटन करावें तेथें ॥ ५९ ॥
पवित्र भिक्षेचे प्राप्तीकारणें । संन्यासीं अवश्य जाणें ।
तेचि अर्थींचें निरूपणें । स्वयें श्रीकृष्ण सांगिजे ॥ १६० ॥

वानप्रस्थाश्रमपदेष्वभीक्षणं भैक्ष्यमाचरेत् ।
संसिद्धयत्याश्वसंमोहः शुद्धसत्त्वः शिलान्धसा ॥ २५ ॥

शुद्ध व्हावया अंतर । वानप्रस्थाश्रमी जो नर ।
जाऊनि ठाकावें त्याचें द्वार । अतिसादर भिक्षार्थ ॥ ६१ ॥
सेवितां सात्त्विकाचे अन्नासी । शुद्धसत्त्वता साधकासी ।
तत्काळ होय ग्रासोग्रासीं । शुद्ध अन्नासी हा महिमा ॥ ६२ ॥
यालागीं वानप्रस्थाचें द्वार । ठाकोनिजावें वारंवार ।
तेणें सत्त्वशुद्धि अनिवार । होय साचार साधकां ॥ ६३ ॥
शुद्ध भिक्षेचिये प्राप्ती । सत्त्वशुद्ध होय वृत्ती ।
तेणें वासना निःशेष नासती । निजशांती उल्हासे ॥ ६४ ॥
वासना नासल्या निलाग । तो सत्यत्वें न देखे जग ।
विषयासक्ति कैंची मग । सहज विराग उद्‍भट ॥ ६५ ॥

नैतद्वस्तुतया पश्येद् दृश्यमानं विनश्यति ।
असक्तचित्तो विरमेदीहामुत्र चिकीर्षितात् ॥ २६ ॥

येथ जें जें दिसे नासे । हें सर्वांसी प्रत्यक्ष आभासे ।
परी अज्ञानें भुलले कैसे । विषयविलासें गुंतोनी ॥ ६६ ॥
यालागीं शुद्ध भिक्षेचिये प्राप्ती । ज्याची शुद्धसत्व झाली वृत्ती ।
त्यासी विषय सत्यत्वें न दिसती । मा विषयासक्ती तेथें कैंची ॥ ६७ ॥
ऐसें मिथ्या विषयांचें भान । त्याचें विषयासक्त नव्हे मन ।
यालागीं भवस्वर्गसाधन । दोन्ही तो जाण स्पर्शेना ॥ ६८ ॥
ऐसा जो विषयविरक्त । त्याचें परमार्थीं लागे चित्त ।
तो जगीं विचरे अनासक्त । परमार्थयुक्त निजबोधें ॥ ६९ ॥
त्याच्या निजबोधाचें लक्षण । स्वयें सांगताहे नारायण ।
प्रपंचाचें मिथ्यापण । समाधान निजात्मता ॥ १७० ॥

यदेतदात्मनि जगन्मनोवाक्क्ष्‍प्राणसंहतम् ।
सर्वं मायेति तर्केण स्वस्थस्त्यक्त्वा न तत्स्मरेत ॥ २७ ॥

मनसा-वाचा-प्राणप्रवाहीं । अहंकारकृत उभयदेहीं ।
जग आत्म्याच्या ठायीं । मिथ्या मायिक पाहीं आभासे ॥ ७१ ॥
दोराअंगीं सर्पाभास । शुक्तिकेमाजीं रजतप्रकाश ।
उखरीं मृगजळाचा विलास । तैसा जगदाभास चिन्मात्रीं ॥ ७२ ॥
जैसा स्वप्नींचा व्यवहार । तैसें भासे चराचर ।
ऐसें मिथ्या जाणोनि साचार । पुढती स्मरणादर स्फुरेना ॥ ७३ ॥
जो जागा झाला इत्थंभूत । तैं स्वप्नभोग न वांछी चित्त ।
तेवीं स्वरूपीं जो सुनिश्चित । तो प्रपंचजात स्मरेना ॥ ७४ ॥
त्रिदंडी बहूदकाचें कर्म । तुज म्यां सांगितलें सुगम ।
आता हंस परमहंसांचे धर्म । यथानुक्रम अवधारीं ॥ ७५ ॥
संन्यास चतुर्विध देख । `हंस' `परमहंस' एक ।
एक तो `बहूदक' । `कुटीचक' तयासी बोलिजे ॥ ७७ ॥
वार्धकीं कुटीचकाची परी । अग्निहोत्र-स्त्रियेचा त्याग करी ।
परी शिखासूत्र न अव्हेरी । गायत्रीमंत्रीं अधिकारु ॥ ७८ ॥
नित्य भिक्षा पुत्राचे घरीं । पर्णकुटी बांधे त्याचे द्वारीं ।
मठिका सांडोनि न वचे दूरी । `कुटीचक' निर्धारीं या नांव ॥ ७९ ॥
शिखासूत्र त्यागोनि जाण । करूनि त्रिदंडांचें ग्रहण ।
केवळ करी कर्माचरण । ज्ञानाचें लक्षण जाणेना ॥ १८० ॥
नाहीं वैराग्य वरिष्ठ । न दिसे ज्ञाननिष्ठा श्रेष्ठ ।
अतिशयेंसीं जो कर्मिष्ठ । `बहूदक' ज्येष्ठ त्यासी म्हणती ॥ ८१ ॥
जो कां वैराग्याच्या निर्धारीं । ज्ञानसाधनार्थ विचारी ।
शिखासूत्रकर्मत्याग करी । आत्मचिंतनावरी निजनिष्ठा ॥ ८२ ॥
ऐसा जो त्यागविलास । या नांव `विविदिषा' संन्यास ।
ऐशिया निष्ठें वर्ते तो `हंस' । एक `परमहंस' हा म्हणती ॥ ८३ ॥
ऐक परमहंसाचें लक्षण । ज्ञानपरिपाकें परिपूर्ण ।
अतएव शांति वोळंगे आंगण । देखे तिन्ही गुण मिथ्यात्वें ॥ ८४ ॥
मिथ्या जाणे कर्माची वार्ता । आपुली देखे नित्य निष्कर्मता ।
कर्मक्रिया जो कर्तव्यता । ते प्रकृतीचे माथां प्रारब्धें ॥ ८५ ॥
ऐशिया स्थितीं सावकाश । त्या नांव जाण `परमहंस' ।
नाहीं मठ मठिका विलास । नित्य उदास निराश्रयी ॥ ८६ ॥
आतां हंस-परमहंसांचे धर्म । स्वयें सांगताहे पुरुषोत्तम ।
त्या धर्माचें विशद वर्म । ऐक सुगम उद्धवा ॥ ८७ ॥

ज्ञाननिष्ठो विरक्तो व मद्‍भक्तो वाऽनपेक्षकः ।
सलिङ्गानाश्रमांस्त्यक्त्वा चरेदविधिगोचरः ॥ २८ ॥

विषयांची नावडे मातु । ज्ञानप्राप्तीलागीं उद्यतु ।
यापरी जो अतिविरक्तु । तो संन्यास बोलिजेतु मुख्यत्वें ॥ ८८ ॥
जो ज्ञाननिष्ठा अतिसंपन्न । सदा स्वरूपीं रंगलें मन ।
कदा न मोडे अनुसंधान । परमहंसासमान हा हंस ॥ ८९ ॥
ज्यासी करितां भगवद्‍भक्ती । अपेक्षामात्राची झाली शांती ।
मोक्षापेक्षा नुपजे चित्तीं । हे संन्यासपद्धती अतिश्रेष्ठ ॥ १९० ॥
ज्ञाननिष्ठ कां मद्‍भक्त । इहीं आश्रमधर्म दंडादियुक्त ।
त्याग करावा हृदयीं समस्त । बाह्य लोकरक्षणार्थं राखावे ॥ ९१ ॥
येचि अर्थींचें निरूपण । पुढें सांगेल श्रीकृष्ण ।
प्रस्तुत त्यागाचें लक्षण । ऐक संपूर्ण हरि बोले ॥ ९२ ॥
आश्रमधर्म समस्त करी । परी विधिकिंकरत्व तो न धरी ।
प्रतिबिंब कांपतां जळांतरी । आपण बाहेरी कांपेना ॥ ९३ ॥
तेवीं स्वधर्मकर्म कर्तव्यता । करी परी नाहीं कर्मठता ।
आपुली कर्मातीतता । जाणे तत्त्वतां निजकर्मी ॥ ९४ ॥
यापरी स्वधर्मकर्म करी । परी विधीचें भय तो न धरी ।
विधिनिषेध घालून तोडरीं । कर्मे करी अहेतुक ॥ ९५ ॥
जो नातळे स्वाश्रमकर्मगती । दंडादि लिंग न धरी हातीं ।
ऐसिया सर्वत्यागाची स्थिती । पुढें श्रीपती सांगेल ॥ ९६ ॥
प्रस्तुत हेंचि निरूपण । लोकरक्षणार्थ लिंगधारण ।
अंतरीं जो निष्कर्म जाण । त्याचे लक्षण हरी बोले ॥ ९७ ॥

बुधो बालकवत् क्रीडेत् कुशलो जडवच्यरेत् ।
वदेदुन्मत्तवद्विद्वान् गोचर्यां नैगमश्चरेत् ॥ २९ ॥

विवेकज्ञान शुद्ध आहे । परी बाळकाच्या परी पाहे ।
मानापमान सुखें साहे । सांडोनि सोये देहाभिमानाची ॥ ९८ ॥
निजनैष्कर्में अतिकुशल । परी कर्मजडाऐसा केवळ ।
कर्में आचरे तो सकळ । कोठेंही विकळ दिसों नेदी ॥ ९९ ॥
जाणे धर्माधर्मलक्षण । सर्वार्थीं अतिसज्ञान ।
परी न करी प्रश्नसमाधान । अप्रमाणिक जाण स्वयें बोले ॥ २०० ॥
करितां प्रश्नसमाधान । लौकिकीं वाढेल सन्मान ।
यालागीं साक्षेपें जाण । उन्मत्त वचन स्वयें बोले ॥ १ ॥
वेदतत्त्वार्थ विहित जाणे । तें लौकिकीं नाहीं मिरवणें ।
सकळिकीं मूर्खाचि म्हणणें । तैशीं `पशु' लक्षणें स्वयें दावी ॥ २ ॥
यालागीं वेदवादसंवाद । न करी वाद अतिवाद ।
येचि अर्थीं अतिविशद । स्वयें गोविंद सांगत ॥ ३ ॥

वेदवादरतो न स्यान्न पाषण्डी न हैतुकः ।
शुष्कवादविवादे न कञ्चित्पक्षं समाश्रयेत् ॥ ३० ॥

धरोनियां मीमांसकमत । कर्मकांडींचे शास्त्रार्थ ।
नानावाद कर्मार्थ । न करी निश्चित निजबोधें ॥ ४ ॥
तार्किकाचे अतितर्क । तर्क वितर्क कुतर्क ।
हेही वाद करीना देख । निजात्मसूख जो जाणे ॥ ५ ॥
बाहेरी ब्रह्मज्ञानें गर्जे तोंड । भीतरीं विषयवासना उदंड ।
ऐसे महावादी प्रचंड । अतर्क `पाखंड' त्या नाव ॥ ६ ॥
नसोनि ब्रह्मानुभव साचार । जो उच्छेदी निजाचार ।
तो केवळ पाखंडी नर । उदरंभर दुःशील ॥ ७ ॥
ऐशिया वादाचा विटाळ । ज्याचे वाचेसी नाहीं अळुमाळ ।
न लगे असत्याचा समूळ मळ । नित्य निर्मळ निजबोधें ॥ ८ ॥
`शुष्कवाद' ज्या वृथा गोष्टी । त्यांतही वाग्वाद उठी ।
होय नव्हे कपाळपिटी । मिथ्या चावटी करीना ॥ ९ ॥
ऐशिया विवादाची कथा । दृष्टीं न पाहे निजज्ञाता ।
मा स्वयें करील ऐशा वार्ता । हें सर्वथा घडेना ॥ २१० ॥
होतां शास्त्रार्थमहावाद । देतां युक्तीचे प्रतिबाध ।
तेथ न करी पक्षपात शुद्ध । जाणे परी शब्द बोलेना ॥ ११ ॥
श्रुतिस्मृतींसीं विरूद्ध । होतां देखे अतिवाद ।
स्वयें जाणे शास्त्रार्थ शुद्ध । परी पक्षपात करीना ॥ १२ ॥
वाग्वादीं बोलतां जाण । दुखवेल पुढिलांचें मन ।
कां क्षोभेल स्वांतःकरण । यालागीं वचन बोलेना ॥ १३ ॥

नोद्विजेत जनाद्धीरो जनं चोद्वेजयेन्न तु ।
अतिवादांस्तितिक्षेत नाममन्येत कञ्चन ॥ ३१ ॥

जनापासोनि उद्वेगगती । ज्ञाता न पवे सर्वथा चित्तीं ।
निंदा अवगणना अपमानिती । ते आत्मस्थितीं स्वयें साहे ॥ १४ ॥
जन जे जे उपद्रव देती । ज्ञाता साहे ऐशिया रीतीं ।
मीचि आत्मा एक सर्व भूतीं । यालागीं खंती मानीना ॥ १५ ॥
आपुलिया अवयवविकारता । उद्वेग नुपजें जेवीं चित्ता ।
तेवीं सर्वांभूतीं एकात्मता । जाणून तत्त्वतां उबगु न मनी ॥ १६ ॥
तैसेंचि ज्याचिया स्थितीं । भूतें उद्वेग न मानिती ।
ज्याचिया निजाचारगतीं । सुखी होती जीवमात्र ॥ १७ ॥
सर्व भूतीं भगवंत आहे । झणें त्यासी उपद्रव होये ।
यालागीं वागवितां हातपाये । सावध राहे निजदृष्टीं ॥ १८ ॥
थोर देतां आरोळी । झणें दचकेल वनमाळी ।
कां नेटें भवंडितां जपमाळी । देवाचे कपाळीं झणें लागे ॥ १९ ॥
यालागीं करचरणांच्या चेष्टा । आवरोनियां निजात्मनिष्ठा ।
भूतीं लागों नेदी झटा । झणें वैकुंठा उपद्रव लागे ॥ २२० ॥
ऐसिऐशिया निजात्मगती । उद्वेग उपजों नेदी भूतीं ।
तेथ वाग्वादाची गती । कैशा रीतीं संभवे ॥ २१ ॥
सर्वभूतीं भूतात्म ईश्वर । यालागीं उंच न बोले उत्तर ।
तेथ अतिवाद्यासी समोर । सर्वथा अधर उचलीना ॥ २२ ॥
पडल्या जीवसंकट प्राणांतीं । अपमान न करावे कोणे व्यक्ती ।
अपमानीना भूताकृती । सर्वांभूतीं हरी देखे ॥ २३ ॥
जनास्तव उद्वेगता । कदाकाळीं न पवे ज्ञाता ।
ज्ञात्यापासोनि उद्वेगता । नव्हे सर्वथा जनासी ॥ २४ ॥
ऐशी निजात्मस्थिती साचार । तो कोणासीं न करी वैर ।
येचि अर्थीं शारंगधर । विशद उत्तर सांगत ॥ २५ ॥

देहमुद्दिश्य पशुवद् वैरं कुर्यात्र केनाचित् ।
एक एवपरो ह्यात्मा भूतेष्वात्मन्यवस्थितः ॥ ३२ ॥

केवळ पशूचियापरी । हो‍ऊनियां देह‍अहंकारी ।
कोणासी वैर न करी । तेही परी परीयेंसी ॥ २६ ॥
प्रकृति-पर चिदात्मा आहे । तोचि सर्वांभूतीं भूतात्मा पाहे ।
मजमाजींही तोचि राहे । ऐशी सर्व भूतीं एकात्मता जो ॥ २७ ॥
त्यासी कोण आप्त कोण इतर । कोणासी करावें वैर ।
सर्व भूतीं मीचि साचार । निरंतर निजात्मा ॥ २८ ॥
एक आत्मा सर्व भूतांत । येचि अर्थींचा दृष्टांत ।
स्वयें सांगे श्रीकृष्णनाथ । श्रोता सावचित्त उद्धव ॥ २९ ॥

यथेन्दुरुदपात्रेषु भूतान्येकात्मकानि च ।

अलब्ध्वा न विषीदेत काले कालेऽऽशनं क्वचित् ।
लब्ध्वा न हृष्येद्धृतिमानुभयं दैवतंत्रितम् ॥ ३३ ॥

सहस्त्र घटीं भरल्या जळ । बिंबे एकचि चंद्रमंडळ ।
तेवीं निजात्मा एक केवळ । भूतीं सकळ भूतात्मा ॥ २३० ॥
देखे भूताकृति ज्या भिन्न । त्याही परमकारणीं अभिन्न ।
जेवीं अळंकारीं सुवर्ण । आकारींहीं जाण भिन्नत्वं नाहीं ॥ ३१ ॥
जेवीं मृत्तिकेचीं गोकुळें केलीं । नानाकारीं पूज्य झालीं ।
परी ते मृतिकाचि संचली । तेवीं भूतें भासलीं भगवंतीं ॥ ३२ ॥
का विणोनियां सुतें सुत । शेला परकळा पातळ म्हणत ।
तैशी वस्तूचि वस्तुत्वें येथ । साकार भासत भवरूपें ॥ ३३ ॥
एवं साकार निराकार । उभयतां ब्रह्मचि साचार ।
ऐसा ज्याचा ज्ञाननिर्धार । त्याचा `आहार' तूं ऐक ॥ ३४ ॥
आहार न मिळे जिये काळीं । दुःखी नव्हे तिये वेळीं ।
अन्नालागीं न तळमळी । धारणाबळीं बलिष्ठ ॥ ३५ ॥
आहार मिळाल्या उत्तम । हरिखेजेना मनोधर्म ।
दैवाधीन जाणे वर्म । निजकर्मप्राप्तीसी ॥ ३६ ॥
एवं प्राप्ताप्राप्ताची कथा । जाणे दैवाधीन तत्त्वता ।
यालागीं हर्षविषादता । त्याचे चित्ता स्पर्शेना ॥ ३७ ॥
दैवाधीन प्राप्ती प्राणियांसी । ऐसे सत्य कळलें ज्यासी ।
तैं भिक्षेसी कां हिंडणें म्हणसी । तेंचि हृषीकेशी सांगत ॥ ३८ ॥

आहारार्थं समीहेत युक्तं तत्प्राणधारणम् ।
तत्त्वं विमृश्यते तेन तद्विजाय विमुच्यते ॥ ३४ ॥

पाळावया आश्रमधर्मासी । अवश्य हिंडावें भिक्षेसी ।
मधुकरी संन्याशांसी । स्वधर्मासी अतिविहित ॥ ३९ ॥
साधकां तरी आहारार्थ । अवश्य हिंडावें लागे येथ ।
आहारेंवीण त्यांचें चित्त । विक्षेपभूत हों पाहे ॥ २४० ॥
तिंहीं रसासक्ति सांडून । भिक्षेसी करावा प्रयत्न ।
आहारेंवीण त्यांचें मन । अतिक्षीण सर्वार्थीं ॥ ४१ ॥
साधकांसी आहारेंवीण । न संभवे श्रवण मनन ।
न करवे ध्यान चिंतन । अनुसंधान राहेना ॥ ४२ ॥
संन्याशांसी ध्यान न घडे । तैं आश्रमधर्माचें तारूं बुडे ।
यालागीं भिक्षेसी रोकडें । हिंडणें घडे हितार्थ ॥ ४३ ॥
मिळावें मिष्टान्न गोड । हे सांडूनि रसनाचाड ।
करावें भिक्षेचें कोड । परमार्थ दृढ साधावया ॥ ४४ ॥
आहार घेतलिया जाण । साधकांसी घडे साधन ।
साधन करितां प्रकटे ज्ञान । ज्ञानास्तव जाण निजमोक्ष लाभे ॥ ४५ ॥
सर्वथा न वांछावें मिष्टान्न । तरी भिक्षा मागावी कोण ।
ऐसें कांहीं कल्पील मन । तेंचि श्रीकृष्ण सांगत ॥ ४६ ॥

यदृच्छयोपपन्नान्नमद्याच्छ्रेष्ठमुताऽपरम् ।
तथा वासस्तथा शय्यां प्राप्तं प्राप्तं भजेन्मुनिः ॥ ३५ ॥

सहज भिक्षेसी आलें जाण । शुष्क अथवा मिष्टान्न ।
तेणें करावें प्राणधारण । रसनालालन सांडोनि ॥ ४७ ॥
निद्रालस्याचें न ये प्रस्थान । तैसें करावें प्राणधारण ।
दृढ ठसावें आसनध्यान । `युक्ताहार' जाण या नांव ॥ ४८ ॥
वल्कल अथवा अजिन । नवें अथवा वस्त्र जीर्ण ।
सहजें प्राप्त झाल्या जाण । करी प्रावरण यथासुखें ॥ ४९ ॥
कंथा हो कां मृदु आस्तरण । तृणशय्या कां भूमिशयन ।
स्वभावें प्राप्त झाल्या जाण । तेथही शयन करी मुनि ॥ २५० ॥
मी एक भोक्ता शयनकर्ता । हेही नाहीं त्यासी अहंता ।
स्नानादि कर्मीं वर्ततां । त्याची निरभिमानता हरि सांगे ॥ ५१ ॥

शौचमाचमनं स्नानं न तु चोदनया चरेत् ।
अन्यांश्च नियमान् ज्ञानी यथाहं लीलयेश्वरः ॥ ३६ ॥

आचमन स्नान शौचाचार । करितां नव्हे विधिकिंकर ।
कर्माभिमानाची मोडली थार । जैसा मी अवतार तैसा तो ॥ ५२ ॥
जैसा मी `लीलावतार' धरीं । अलिप्तपणें कर्में करीं ।
तैसीचि जाण योग्याची परी । सर्व कर्माचारीं अलिप्त ॥ ५३ ॥
ज्यासी विधींचें भय नाहीं पोटीं । तो कर्में करावया कदा नुठी ।
तेचि विखींची विशद गोठी । कृष्ण जगजेठी सांगता ॥ ५४ ॥

न हि तस्य विकल्पाख्या या च मद्वीक्षया हता ।
आदेहान्तात्क्वचित्ख्यातिस्ततः संपद्यते मया ॥ ३७ ॥

कर्म करणें न करणें । ऐशिया संदेहाचें ठाणें ।
पळालें माझेनि दर्शनें । संकल्पाचें जिणें निमालें ॥ ५५ ॥
संकल्पु निमतांचि पोटीं । विराली लिंगदेहाची गांठी ।
भेदाची हारपली त्रिपुटी । मी परमात्मा दिठीं देखतां ॥ ५६ ॥
ज्यासी नाहीं भेदाचें भान । त्याचे देहाचें भरण पोषण ।
स्नान-भोजन-शयन । गमनागमन केवीं घडे ॥ ५७ ॥
जो जिणोनियां विकल्पभ्रांती । त्रिशुद्धिं मिसळला अद्वैंतीं ।
त्याचे देहाची स्थितिगती । प्रारब्धाहातीं निश्चित ॥ ५८ ॥
वृक्ष समूळ उपडलिया पाहें । परी सार्द्रता वृक्षीं राहे ।
तांबूल खाऊनियां जाये । तरी अधरीं राहे सुरंगात ॥ ५९ ॥
हो कां कन्यादान केल्या पाहें । वरु कन्याही घेउनि जाये ।
तरी उगा मान उरला राहे । रुसणें न जाये देहान्त ॥ २६० ॥
तैसा अभिमानाचेनि सळें । मी कर्मकर्ता म्हणवीं बळें ।
ते अहंता निमे ज्ञानबळें । तरी शरीर चळे प्रारब्धें ॥ ६१ ॥
कुलाल दंड भांडें घेऊनि जाये । पूर्वभवंडीं चक्र भंवत राहे ।
तेवीं अभिमान गेलिया पाहें । देह वर्तताहे प्रारब्धें ॥ ६२ ॥
त्या देहाचें भरणपोषण । प्रारब्धचि करितें जाण ।
ज्ञात्यासी प्रपंचाचे भान । सत्यत्वें जाण असेना ॥ ६३ ॥
जैशी मिथ्या छाया देहापाशीं । तैसें देह दिसे सज्ञानासी ।
यालागीं देहबुद्धि त्यासी । सत्यत्वेंसीं उपजेना ॥ ६४ ॥
छाया सुखासनामाजीं बैसे । कां विष्ठेवरी पडली दिसे ।
त्या छायेचे अभिमानवशें । सुखदुःख नसे पुरुषासी ॥ ६५ ॥
तेवीं देहाची ख्यातिविपत्ती । बाधीना सज्ञानाचे स्थितीं ।
प्रारब्धक्षयाचे अंतीं । विदेह पावती कैवल्य ॥ ६६ ॥
जैशी जळाची लहरी । निश्चळ होय सागरीं ।
तैसा ज्ञाता मजमाझारीं । विदेह करी समरसें ॥ ६७ ॥
उगम संगम प्रवाहगती । सरितांची नामरूपख्याती ।
जेवीं प्रळयोदकीं हारपती । तेवीं समरसती मजमाजीं ज्ञाते ॥ ६८ ॥
अपरोक्ष साक्षात्कार संन्यासी । त्याची स्थितिगति स्वधर्मेंसीं ।
उद्धवा सांगितली तुजपाशीं । आता मुमुक्षु संन्यासी ते ऐक ॥ ६९ ॥

दुःखोदर्केषु कामेषु जातनिर्वेद आत्मवान् ।
अजिज्ञासितमद्धर्मो गुरुं मुनिमुपाव्रजेत् ॥ ३८ ॥

शेंडा धरूनि समूळ । ज्याचें उत्तरोत्तर दुःख फळ ।
अतिबाधक विषयजाळ । त्यासी केवळ जो अनासक्त ॥ २७० ॥
माझे प्राप्तीलागीं चित्त । सदा ज्याचें आर्तभूत ।
स्वधर्मकर्मीं वर्तत । जो वेदशास्त्रार्थ विवंची ॥ ७१ ॥
इहामुत्रभोगीं निश्चित । त्रासलें असे ज्याचें चित्त ।
ऐसा जो कां नित्य विरक्त । अतिविख्यात मुमुक्षु ॥ ७२ ॥
तेणें साधवया ब्रह्मज्ञान । तेचि साधनीं लावितां मन ।
स्वकर्म झालिया विलक्षण । आली नागवण प्रत्यवायें ॥ ७३ ॥
तेणें कर्म संन्यासोनि जाण । करावें संन्यासग्रहण ।
सद्‍गुरूसी रिघावें शरण । तेणें ब्रह्मज्ञानपदप्राप्ती ॥ ७४ ॥
एक केवळ भावार्थीं । नेणे स्वधर्मकर्मगती ।
नेणे शास्त्रश्रवणव्युत्पत्ती । परी माझी प्रीती अनिवार ॥ ७५ ॥
तेणेंही संन्यासूनि जाण । गुरूसी रिघावें शरण ।
त्यासीही गुरुकृपा जाण । ब्रह्मज्ञान‍अवाप्ति ॥ ७६ ॥
गुरु करावा अतिशांत । शास्त्रार्थ परमार्थपारंगत ।
त्याचे सेवेचा भावार्थ । स्वयें श्रीकृष्णनाथ सांगत ॥ ७७ ॥

तावत्परिचरेद्‍भक्तः श्रद्धावाननसूयकः ।
यावद्‍ब्रह्म विजानीयान्मामेव गुरुमादृतः ॥ ३९ ॥

अचळ अमळ अविनाश । परात्परतर परेश ।
गुरु तो परब्रह्म ईश । हा दृढ विश्वास धरावा ॥ ७८ ॥
त्या विश्वासाच्या पडिपाडीं । नवल गुरुचरणीं आवडी ।
नित्य नूतन नवी गोडी । चढोवढी भजनार्थ ॥ ७९ ॥
ऐशिया भजनपरवडीं । हृदयीं श्रद्धा उसळे गाढी ।
गुरुआज्ञेची नुल्लंघी काडी । आळस तोडी समूळ ॥ २८० ॥
गुरुवाक्याचेनि श्रवणें । विकल्पाचें खत खाणणें ।
संकल्पासी सूळीं देणें । जीवें घेणें अभिमाना ॥ ८१ ॥
तेथ असूया कैंची उठी । धाकेंचि निमाली उठाउठी ।
ऐशी गुरुचरणीं श्रद्धा मोठी । परब्रह्मदृष्टीं गुरु पाहे ॥ ८२ ॥
निर्गुण जो निर्विकारु । तोचि मूर्तिमंत माझा गुरु ।
करूनि अकर्ता ईश्वरु । तोचि हा साचारु गुरु माझा ॥ ८३ ॥
नित्य निर्विकल्प देख । ज्यासी म्हणती समाधिसुख ।
तें माझ्या गुरूचें चरणोदक । ऐसा भावें नेटक भावार्थी ॥ ८४ ॥
गुरूतें पाहतां ब्रह्मदृष्टीं । शिष्य ब्रह्मत्वें आला पुष्टी ।
ब्रह्मरूप देखे सृष्टी । निज‍ऐक्यें मिठी गुरुचरणीं ॥ ८५ ॥
ऐसें ब्रह्मरूपीं ऐक्य घडे । तंव गुरुसेवा करणें पडे ।
ऐक्य झाल्याही पुढें । सेवा न मोडे अखंडत्वें ॥ ८६ ॥
कापूर घातलिया जळीं । स्वयें विरोनि जळ परमळी ।
तेवीं अहं जाऊनि सेवा सकळी । सर्वीं सर्वकाळीं गुरुचरणीं ॥ ८७ ॥
ऐशी अवस्था न येतां हाता । केवळ मुंडूनियां माथा ।
संन्यासी म्हणवी पूज्यता । त्याची अनुचितता हरि बोले ॥ ८८ ॥
स्वयें संन्यास अंगीकारी । ब्रह्मसाक्षात्कार जो न करी ।
त्यालागीं स्वयें श्रीहरी । अतिधिक्कारीं निंदीत ॥ ८९ ॥

यस्त्वसंयतषड्वर्गः प्रचण्डेन्द्रियसारथिः ।
ज्ञानवैराग्यरहितस्त्रिदण्डमुपजीवति ॥ ४० ॥

सुरानात्मानमात्मस्थं निन्हते मां च धर्महा ।
अविपक्वकषायोऽस्मादमुष्माच्च विहीयते ॥ ४१ ॥

नाहीं वैराग्याची स्थिती । नसतां विषयविरक्ती ।
देखोदेखीं संन्यास घेती । केवळ वृत्ती अन्नार्थ ॥ २९० ॥
संन्यास नेघतां पूर्व दृष्टीं । जें वैराग्य होतें पोटीं ।
तें संन्यास घेतल्यापाठीं । उठाउठीं पळालें ॥ ९१ ॥
ज्ञानेंद्रियें पांच सहावें मन । हेचि अरिषड्वर्ग जाण ।
यांचें न करितां निर्दळण । संन्यासपण तो विटंबु ॥ ९२ ॥
अवैराग्यें सकाम मन । तेणें विषयाकुलित बुद्धि जाण ।
नाहीं ज्ञान ध्यान साधन । दंडग्रहण उदरार्थ ॥ ९३ ॥
नुपजेच अनुताप जाण । न करीच श्रवण मनन ।
आदरें न साधीचि साधन । त्यासी ब्रह्मज्ञान नव्हेचि ॥ ९४ ॥
त्याचा व्यर्थ संन्यास जाण । व्यर्थ त्याचें दंड मुंडण ।
व्यर्थ काषायवस्त्रग्रहण । जेवीं वेषधारण नटाचें ॥ ९५ ॥
संन्यास घेतलिया पाठीं । काम उचंबळे उठाउठीं ।
क्रोधलोभांची धुमे आगिटी । चौगुणा पोटीं अभिमान ॥ ९६ ॥
आसक्ति अधिकाधिक उठी । सदा ग्रामणी चावटी ।
करणें पैशुन्याच्या गोष्टी । दंड कासोटी दंभार्थ ॥ ९७ ॥
अनधिकारीं दंडग्रहण । तेणें संन्यासरूपें जाण ।
केवळ आली नागवण । आपल्या आपण नाडिलें ॥ ९८ ॥
नाडिले यज्ञाधिकारी सुरगण । नाडिले स्वधाकाराचे पितृगण ।
नाडिले ऋषि भूतगण । बळिअर्पण ठाकेना ॥ ९९ ॥
जीवरूपें मी परमात्मा आपण । त्या मज हृदयस्था ठकिलें जाण ।
जीवोद्धारीं जें संन्यासग्रहण । तेंचि दृढबंधन त्यासी झालें ॥ ३०० ॥
संन्यासग्रहणीं दृढबंधन । व्हावया कोण कारण ।
तेचि विषयींचें निरूपण । स्वयें नारायण बोलिला ॥ १ ॥
पूर्वश्लोकींचे तिनी चरण । येथील हें निरूपण ।
श्रोतीं द्यावें अवधान । झणें विलक्षण कोणी म्हणे ॥ २ ॥
“निन्हुते मां च धर्महा । अविपक्वकषायोऽस्मादमुष्माञ्च विहीयते ॥''
करोनियां संन्यासग्रहण । न करी ज्ञान ध्यान साधन ।
न करी प्रणव‍उच्चारण । अविरक्त जाण विषयार्थी ॥ ३ ॥
तेणें दारादिअभिलाषण । करिती द्रव्याचें संरक्षण ।
आणि गोदानादि ग्रहण । पचन पाचन करविती ॥ ४ ॥
मठाधिपत्याचिये बुद्धीं । धनधान्यस्नेहसमृद्धी ।
नाना वाढवितां उपाधी । जीवात्मा त्रिशुद्धी नाडिला ॥ ५ ॥
ऐसें करितां अधर्मपण । जीवासी लागलें दृढ बंधन ।
जेणें इहलोकपरलोकसाधन । त्या नरदेहासी जाण नाडिलें ॥ ६ ॥
चौर्‍याशीं लक्ष योनींप्रती । जैं असंख्य फेरे होती ।
तैं नरदेहाची प्राप्ती । अवचटें पावती सभाग्य ॥ ७ ॥
त्या नरदेहासी येऊनि जाण । स्वयें नागवला आपण ।
करितां अधर्माचरण । नरक दारुण संन्याशा ॥ ८ ॥
ज्या नांव गा `आश्रम चौथा' । ज्यासी देवो वंदी माथां ।
तेथेंही अधर्म करितां । नरकपाता पावले ॥ ९ ॥
ज्या नरकाचे ठायीं । कोटि वर्षें बुडतां पाहीं ।
ठावचि न लागें कंहीं । तैसे ठायीं बुडाले ॥ ३१० ॥
मुख्य चतुर्थाश्रमीं हे स्थिती । तैं इतर आश्रमां कैंची गती ।
यालागीं आश्रमधर्मयुक्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥ ११ ॥

भिक्षोर्धर्मः शमोऽहिंसा तप इक्षा वनौकसः ।
गृहिणो भूतरक्षेज्या द्विजस्याऽऽचार्यसेवनम् ॥ ४२ ॥

संन्याशासी मुख्य `शम' । सबाह्य `इंद्रियनेम' ।
`अहिंसा' त्याचा स्वधर्म । हा परमधर्म संन्याशासी ॥ १२ ॥
वानप्रस्थाचा स्वधर्म । `तपप्राधान्य मंत्र होम' ।
आतां गृहस्थाचा नेम । तिंही आश्रमां विश्रामदाता ॥ १३ ॥
गृहस्थ मुख्य `अग्निहोत्र' जाण । संन्यासी ब्रह्मचार्‍यांसी द्यावें अन्न ।
करावें `भूतसंरक्षण' । तेहीं लक्षण अवधारीं ॥ १४ ॥
असिलेनि सामर्थ्यें जाण । अन्न धन वस्त्र जीवन ।
तृण पर्ण निवासस्थान । देऊनि दीन रक्षावे ॥ १५ ॥
ब्रह्मचार्‍याचे स्वधर्मीं जाण । श्रद्धायुक्त `गुरुसेवन' ।
एवं आश्रमधर्मलक्षण । मुख्यत्वें हें जाण उद्धवा ॥ १६ ॥
गृहस्थाश्रमीं जो धर्म आहे । तो इतर आश्रमीं करूं नये ।
इतराश्रमींचा धर्म पाहें । गृहस्थाश्रमीं होये करणीय ॥ १७ ॥

ब्रह्मश्चर्यं तपः शौचं संतोषो भूतसौहृदम् ।
गृहस्थस्याप्यृतौ गन्तुः सर्वेषां मदुपासनम् ॥ ४३ ॥

गृहस्थें व्हावया निष्पाप । ठाके तो करावा जप तप ।
उभय शौचांचें स्वरूप । अतिसाटोप करावें ॥ १८ ॥
पोटींची सांडूनि कुसमुस । यथालाभें अतिसंतोष ।
परोपकारीं अतिहव्यास । सुहृद सर्वांस स्वात्मत्वें ॥ १९ ॥
गृहस्थीं ब्रह्मचर्यलक्षण । ऋतुकाळीं स्वदाराभिगमन ।
मुख्यत्वें करावें माझें भजन । हा स्वधर्म जाण सर्वांचा ॥ ३२० ॥
सर्व आश्रम सर्व वर्ण । त्यांसी हाचि स्वधर्म जाण ।
सांडोनि विषयाचें भान । माझें भजन करावें ॥ २१ ॥
करितां स्वधर्में माझी भक्ती । भक्तासी होय जे प्राप्ती ।
तेचि सांगताहे श्रीपती । उद्धवाप्रती स्वानंदें ॥ २२ ॥

इति मां यः स्वधर्मेण भजेन्नित्यमनन्यभाक् ।
सर्वभूतेषु मद्‍भावो मद्‍भक्तिं विन्दतेऽदृढाम् ॥ ४४ ॥

सर्व भावें अनन्यगतीं । करितां स्वधर्में माझी भक्ती ।
माझा भावो सर्वांभूतीं । शीघ्रगती उल्हासे ॥ २३ ॥
मद्‍भावो जोडल्या सर्व भूतीं । तेणें प्रकटे माझी चौथी भक्ती ।
जिच्या पायीं चारी मुक्ती । सदा लागती स्वानंदें ॥ २४ ॥
अनिवार अनन्यगती । सर्वस्वें ज्यासी माझी प्रीती ।
तो लाहे माझी परमभक्ती । जेथोनि कल्पांतीं च्यवेना ॥ २५ ॥

भक्त्योद्धवानपायिन्या सर्वलोकमहेश्वरम् ।
सर्वोत्पत्त्यप्ययं ब्रह्म कारणं मोपयति सः ॥ ४५ ॥

सकळ सच्चिदानंदस्थिती । जीमाजीं सांपडे मी सहजगती ।
ती नांव माझी `परमभक्ती' । जाण निश्चितीं उद्धवा ॥ २६ ॥
विपरीत संसाराचें भान । दिसे दृष्य-विलक्षण ।
तेथ सदा स्वानंदपूर्ण । ते चौथी जाण भक्ती माझी ॥ २७ ॥
जेथ देव भक्त एक होती । एकपणें भजनस्थिती ।
ऐशी साधकांसी प्राप्ती । ते `परमभक्ती' उद्धवा ॥ २८ ॥
माझी प्रकटल्या परम भक्ती । पतन नाहीं प्रळयांतीं ।
साधक मद्‌रूपा येती । स्वरूपस्थितीं समसाम्यें ॥ २९ ॥
त्या स्वरूपाचें लक्षण । सांगताहे श्रीनारायण ।
उत्पत्ति-स्थिति-निदान । कारणा जो चिदात्मा ॥ ३३० ॥
जो सकळ नियंता ईश्वरु । जो विश्वात्मा विश्वंभरु ।
जो उपनिषदांचें सारु । जो महेश्वरु जगाचा ॥ ३१ ॥
त्या पदाची पदप्राप्ती । भक्त पावले परमभक्तीं ।
तेंचि पुढती उद्धवाप्रती । स्वानंदें श्रीपति सांगत ॥ ३२ ॥

इति स्वधर्मनिर्णिक्तसत्त्वो निर्ज्ञातमद्‍गतिः ।
ज्ञानविज्ञानसंपन्नो नचिरात्समुपैति माम् ॥ ४६ ॥

ऐशिया पदाची पदप्राप्ती । साधक पावले स्वधर्मस्थितीं ।
ते स्वधर्मप्रयोजनगती । यथानिगुती सांगत ॥ ३३ ॥
करितां स्वधर्मानुष्ठान । रजतमें नाशती जाण ।
शुद्धसत्त्व अंतःकरण । तेथ माझें ज्ञान प्रकाशे ॥ ३४ ॥
प्रकाशल्या माझें ज्ञान । तेणें उल्हासे माझें भजन ।
भजनास्तव मन । विकल्पपण पैं त्यागी ॥ ३५ ॥
विकल्पत्यागाचिये गतीं । वैराग्यें उचंबळे विरक्ती ।
भासे परमात्मा सर्व भूतीं । तेणें `परमभक्ती' उल्हासे ॥ ३६ ॥
उल्हासल्या परमभक्ती । भक्तासी माझी स्वरूपप्राप्ती ।
तेचि स्वरूपाची स्वरूपस्थिती । यथानिगुतीं सांगत ॥ ३७ ॥
परमात्मा परंज्योती । परब्रह्म परंज्ञप्ती ।
परात्परतर प्रकृती । वेद बोलती `परावर' जो ॥ ३८ ॥
अज अव्यय अक्षर । अरूप अनाम अगोत्र ।
अलक्ष अतर्क्य अपार । अपरंपारस्वरूप ॥ ३९ ॥
ऐशी निजस्वरूपीं निजप्राप्ती । भक्त पावले स्वधर्मस्थिती ।
जेथूनि परतलिया श्रुती । नेतिनेतीं निजनिष्ठा ॥ ३४० ॥
ऐसें मद्‌रूप पावल्यापाठीं । संसाराची काढिली कांटी ।
नांवरूपांची बुडाली गोठी । पडली तुटी जन्ममरणां ॥ ४१ ॥
एवं स्वधर्माचेनि धर्मवशें । मीतूंपणाचें नांवचि पुसे ।
मद्‌रूपाचेनि सामरस्यें । अनायासें मीचि जाहले ॥ ४२ ॥
`पूर्वीं होतों मी जीव । आतां झालों सदाशिव' ।
हाही बुडाला आठव । ऐसा माझा अनुभव मद्‍भक्तां ॥ ४३ ॥
शून्य पडिलें संसारस्थिती । तेथ कैंची पुनरावृत्ती ।
ऐशी मद्‍भक्तां माझी प्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ४४ ॥
एवं स्वधर्में मत्प्राप्ति जाण । तया स्वधर्माचें महिमान ।
स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । सावधान परियेसा ॥ ४५ ॥

वर्णाश्रमवतां धर्म, एष आचारलक्षणः ।
स एव मद्‍भक्तियुतो, निःश्रेयसकरः परः ॥ ४७ ॥

अनादि जो स्वधर्माचार । जो कां मोक्षकर साचार ।
तेणें स्वधर्में सकाम नर । लोकांतर वांछिती ॥ ४६ ॥
झालिया लोकांतरप्राप्ती । तेथूनि होय पुनरावृत्ती ।
न करूनियां माझी भक्ती । स्वधर्म नाशिती सकामें ॥ ४७ ॥
ब्राह्मणा आला भद्रजाती । आम्हां न पोसवे हा निश्चितीं ।
मग तो देऊनियां घेती । वाहावया पोथी वृद्ध ढोर ॥ ४८ ॥
यापरी स्वधर्म जाण । उपेक्षिती गा ब्राह्मण ।
मग लोकांतरीं कोरान्न । मागावया कण धांवती ॥ ४९ ॥
घरीं आणोनि दीघली कामधेनु । आम्हां न पोसवे म्हणूनु ।
ताकासाठीं देती हेळसूनु । आली नागवणु ते नेणे ॥ ३५० ॥
तेवीं म्यां जाण गायत्रीमंत्र । दिधला ब्राह्मणांसी स्वतंत्र ।
तो उपेक्षूनियां मंत्रतंत्र । शूद्राचार आचरती ॥ ५१ ॥
सौर शाक्त गाणपत्यादि जाण । नाना मंत्रदीक्षा घेती ब्राह्मण ।
परी गायत्रीचें अनुष्ठान । एकही जाण न करिती ॥ ५२ ॥
नाहीं गायत्रीचें अनुष्ठान । परी विपरीत झालें आन ।
गायत्रीचें श्रेय जाण । देती ब्राह्मण द्रव्यार्थ ॥ ५३ ॥
गायत्रीमंत्र असोनि घरीं । तिचा भावार्थ कोणी न धरी ।
दीक्षेलागीं मूर्खाचे द्वारीं । लोळिजे द्विजवरीं ऐसें झालें ॥ ५४ ॥
शस्त्रास्त्रीं रथ सुदृढू । त्यावरी बैसविला भेडू ।
सांडूनि पळणें मानी सुरवाडू । न शके विभांडूं रणांगण ॥ ५५ ॥
तेवीं वेदरूप मी नारायण । ब्राह्मणहृदयीं असें जाण ।
त्याचें नेणोनि महिमान । वेदपारायण विकिती ॥ ५६ ॥
वांछूनियां स्वर्गफळ । नाना याग करिती प्रबळ ।
कामकल्पना केवळ । स्वधर्म विकळ पाडिती ॥ ५७ ॥
वेदीं प्रतिपाद्य कर्मफळ । तो वेदु मिथ्या नव्हे केवळ ।
तो वेदवाद समूळ । नेणोनि बरळ हा मानिती ॥ ५८ ॥
घ्यायवा वोखदाची वाटी । माता साकर दे चिमुटी ।
तें मुख्य फळ नव्हे दृष्टीं । जावया पोटींचा महारोगु ॥ ५९ ॥
तेवीं वेद बोले जें फळ । तें प्रवृत्तिरोचना केवळ ।
स्वधर्म विचारितां समूळ । चित्तमळक्षाळक ॥ ३६० ॥
स्वधर्म सांडूनि सर्वथा । सकाम कर्में करूं जातां ।
तेंही शिणल्यावेगळें तत्त्वतां । क्षुद्रकामता फळेना ॥ ६१ ॥
जेणें द्रव्यें अमृत ये हाता । तें वेंचूनि मद्य घेतां ।
अधर्म आणि उन्मत्तता । पिशाचता जग थुंकी ॥ ६२ ॥
स्वपतीसीं काम भोगितां । परलोक पावि पतिव्रता ।
तोचि काम परपुरुषीं करितां । अधःपाता नेतसे ॥ ६३ ॥
जिह्वा दुरुक्ती बोलतां । यमप्रहार वाजती माथां ।
तिणेंचि `राम राम' म्हणतां । हरिभक्तां यम कांपे ॥ ६४ ॥
तेवीं पावोनि उत्तम जन्म । कर्म करूनि सकाम ।
भोगावें दुःख परम । मरण जन्म अनिवार ॥ ६५ ॥
तेणेंचि देहें स्वधर्म । करितां निरसे सकळ कर्म ।
निवारे मरणजन्म । बहुतां हे वर्म कळेना ॥ ६६ ॥
स्वधर्में घडे भगद्‍भक्ती । ऐशी अतिगुह्य आहे व्युत्पत्ती ।
ते मी सांगेन तुजप्रती । यथानिगुतीं उद्धवा ॥ ६७ ॥
स्वधर्म करणें आवश्यक । तेथें सांडणें फळाभिलाख ।
तेंचि `मदर्पण' चोख । न करितां देख संकल्पु ॥ ६८ ॥
हो कां घरिच्याचि रांजणीं । निघती मुक्ताफळांच्या श्रेणी ।
तरी कां ताम्रपाणीं । समुद्रमिळणीं शोधावी ॥ ६९ ॥
आपुलेच घरींचीं झाडें । फळती कल्पतरूचेनि पाडें ।
तरी अमरावतीचे चाडें । वृथा वेडे कां शिणती ॥ ३७० ॥
हो कां सद्‍गुरूंचे तीर्थ घेतां । पाविजे परम पवित्रता ।
तरी धांवावया नाना तीर्था । विशेषता ते कायी ॥ ७१ ॥
कां ईश्वरत्वें पिता पूजितां । निजमोक्ष लाभे आइता ।
तरीं भजावें देवां देवतां । कोण्या अर्था सज्ञानीं ॥ ७२ ॥
तेवीं स्वकर्माचि करितां । लाभे आपली निष्कर्मता ।
ते स्वधर्मीं काम कल्पितां । जीव निजस्वार्था नाडले ॥ ७३ ॥
निर्विकल्पें स्वधर्माचरण । त्या नांव माझें `शुद्ध भजन' ।
तेणें भजनें हो‍ऊनि प्रसन्न । मी विवेक-वैराग्य-ज्ञान भक्तांसी दें ॥ ७४ ॥
तेणेंचि ज्ञानें होय शुद्ध मती । चित्तशुद्धीमाजीं परमभक्ती ।
ते भक्तीनें माझी परम प्राप्ती । भक्त पावती उद्धवा ॥ ७५ ॥
यालागीं नैराश्यें जें स्वधर्मकर्म । तेंचि माझें भजन परम ।
तेणें भजनें भक्तोत्तम । स्वयें पुरुषोत्तम हो‍ऊनि ठाकती ॥ ७६ ॥
यापरी स्वधर्मस्थितीं । लाभे आपुली निजमुक्ती ।
तेचि म्यां तुजप्रती । यथानिगुतीं सांगितली ॥ ७७ ॥

एतत्तेऽभिहितं साधो भवन्पृच्छति यच्च माम् ।
यथा स्वधर्मसंयुक्तो भक्तो मां समियात्परम् ॥ ४८ ॥

इति श्रीभागवते महापुराणे पारमहंस्यां संगितायामेकादशस्कन्धे अष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥

उद्धवा पुसिलें त्वां मजप्रती । स्वधर्में केवीं घडे मुक्ती ।
भक्तीनें पाविजे निजमुक्ती । तें म्यां तुजप्रती सांगितले ॥ ७८ ॥
हाता आलिया स्वधर्म । तत्काळ निरसे स्वकर्म ।
उडोनि जाय भवभ्रम । प्राप्ती परम स्वधर्में ॥ ७९ ॥
माझिया प्राप्तीलागीं स्वकर्म । नैराश्यें आचरावा स्वधर्म ।
हें ज्यासी कळे वर्म । तया पुरुषोत्तम सदा वश्य ॥ ३८० ॥
स्वधर्माऐसा स्पर्शमणी । सांपडल्या निर्विकल्पपणीं ।
तो लावितां दृश्यस्थानीं । चिन्मात्रसुवर्णीं तेज उठी ॥ ८१ ॥
स्वधर्माऐसा दिनमणी । नैराश्यें उगवलिया स्वभुवनीं ।
तो अज्ञाननिशा निरसुनी । स्वप्रकाशपणीं सदा वर्ते ॥ ८२ ॥
स्वधर्माऐसें निज‍अमृत । जे निर्विकल्पें सेवूं जाणत ।
त्यांसी जन्ममरणांचा आवर्त । मी श्रीअनंत लागों नेदीं ॥ ८३ ॥
जे कां स्वधर्मीं विमुख । त्यासीं माझी प्राप्ती नाहीं देख ।
जन्मकोटी परम दुःख । सकामें मूर्ख भोगिती ॥ ८४ ॥
त्या स्वधर्माची अतर्क्य गोष्टी । न कळे नैष्कर्में निजदृष्टीं ।
याचिलागीं जन्मकोटी । अतिसंकटीं जीव भोगी ॥ ८५ ॥
स्वधर्में करितां स्वकर्म । जैं नैष्कर्म्यतेचें कळे वर्म ।
तैं विभांडूनि मरणजन्म । परब्रह्म पावती ॥ ८६ ॥
एवं स्वधर्म यापरी । तारक होय संसारीं ।
स्वधर्माचे नावेवरी । तरले भवसागरीं निजभक्त ॥ ८७ ॥
संसार तरले हा बोलु कुडा । स्वधर्म करितं माझिया चाडा ।
होय भवसागर कोरडा । मी सांपडें पुढा निजात्मा ॥ ८८ ॥
ऐशी स्वधर्माची थोरी । निष्कामतेच्या निजकुसरी ।
देवो सांगे आवडीभरीं । नानापरी प्रबोधें ॥ ८९ ॥
भक्तिप्राधान्य भागवत । मुख्य भक्ति ते स्वधर्मयुक्त ।
येणें स्वधर्मभजनें समस्त । परम भागवत उद्धरले ॥ ३९० ॥
त्या स्वधर्मकर्माचा एकान्त । निजभजनभक्तीचा भावार्थ ।
उद्धवासी श्रीकृष्णनाथ । स्वयें सांगत एकादशीं ॥ ९१ ॥
त्या एकादशाच्या गोष्टी । स्वधर्मकर्माची कसवटी ।
एका जानार्दनकृपादृष्टीं । टीका मराठी हे केली ॥ ९२ ॥
हे करणी केली जनार्दनें । मज अभंगीं घातलें तेणें ।
शेखीं मीतूंपणाचे ठाणें । येणें निरूपणें उडविलें ॥ ९३ ॥
उडविलें विषयीं विषयपण । उडविले भेदाचें भान ।
उडविलें जीवशिवपण । जनीं जनार्दन तुष्टोनी ॥ ९४ ॥
जनार्दनें जनकें तेणें । आम्हां केलें परब्रह्म खेळणें ।
यालागीं सकळ क्रिया तेणें होणें । स्वधर्मपणें सहजेंचि ॥ ९५ ॥
सहजीं लागल्या स्वधर्म । कर्मचि होय निष्कर्म ।
संसार होय परब्रह्म । हे कृपा परम जनार्दनीं ॥ ९६ ॥
यालागीं सांडूनियां एकपण । एका जनार्दन शरण ।
स्वधर्मकर्माचें निरूपण । झालें संपूर्ण तया कृपा ॥ ९७ ॥

इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे
एकाकारटीकायां वानप्रस्थसंन्यासधर्मनिरूपणं नाम अष्टादशोऽध्यायः ॥ ९८ ॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ओंव्या ३९७ ॥ श्लोक ॥ ४८ ॥

Leave a Comment