वाढदिवस कसा साजरा कराल ?

वाढदिवस साजरा करण्याची पद्धत

१. वाढदिवसाच्या दिवशी अभ्यंगस्नान करून नवीन कपडे घालावेत.

२. आई-वडील, तसेच वडीलधार्‍या व्यक्‍ती यांना नमस्कार करावा.

३. देवाची मनोभावे पूजा करावी.

४. ज्याचा वाढदिवस असेल, त्याचे औक्षण करावे.

५. औक्षण झाल्यावर कुलदेवता किंवा उपास्यदेवता यांचे स्मरण करून वाढदिवस असलेल्याच्या डोक्यावर तीन वेळा अक्षता टाकाव्यात.१

६. वाढदिवस असलेल्याला खाण्यास गोड पदार्थ द्यावा.

७. वाढदिवस असलेल्यांसाठी मंगलकामना करणारी प्रार्थना करावी.

८. त्याला एखादी भेटवस्तू द्यावी; पण ती देतांना अपेक्षा किंवा कर्तेपणा बाळगू नये.

भारतीय पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे महत्त्व !

भारतीय पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे महत्त्व आणि केकवर पेटवलेल्या मेणबत्त्या विझवण्याचे दुष्परिणाम !

पाश्‍चात्त्य पद्धतीने वाढदिवस साजरा करतांना केकवर मेणबत्त्या पेटवून त्या फुंकून विझवतात. या पद्धतीमुळे फुंकरीसमवेत लाखो जिवाणू केकमध्ये येतात; म्हणून ती पद्धत योग्य नाही, असे आता पाश्‍चात्त्यांना समजले आहे. त्यामुळे त्यांनी या पद्धतीला प्रतिबंध करायचे ठरवले आहे. खरेतर हा झाला स्थुलातील भाग. ज्याला सूक्ष्मातील कळते, तो पेटती मेणबती विझवणे आणि केक सुरीने कापणे, हे अशुभ आहे, असे सांगेल. स्थुलातील कारणापेक्षा सूक्ष्मातील कारणाचा परिणाम अनेक पटींनी अधिक असतो; म्हणून वाढदिवस साजरा करण्याची ही पद्धत अयोग्य आहे. भारतीय पद्धतीत (हिंदु संस्कृतीत) जिचा वाढदिवस आहे, त्या व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावर लाभ व्हावा, अशा पद्धतीने तो साजरा करायला सांगितला आहे. यामध्ये त्या व्यक्तीचा वाढदिवस तिच्या जन्मतिथीच्या दिवशी साजरा करायला सांगून तिचे औक्षण करायला आणि तिला देवाला अन् वडीलधार्‍या माणसांना नमस्कार करायला सांगितले आहे. तसे केल्याने देवाचा आणि वडीलधार्‍यांचा आशीर्वाद लाभतो अन् चैतन्य ग्रहण होते. या पद्धतीत दिवा विझवणे नाही, केक कापणे नाही कि कोणताही गडबड-गोंधळ नाही. वाढदिवस मानसिक स्तरावर साजरा न करता आध्यात्मिक स्तरावर साजरा करायला सांगितले आहे आणि त्यामुळे ती पद्धत लाभदायक आहे.

१. केकवर पेटवलेल्या मेणबत्त्या विझवतांना फुंकरीतून कित्येक लक्ष जिवाणू केकमध्ये येऊन मुलांना जिवाणूंची बाधा होऊ शकणे : वाढदिवसानिमित्त काही लोक केकवर मेणबत्त्या पेटवतात. मग फुंकर मारून त्या विझवतात. त्या फुंकल्यामुळे फुंकरीसमवेतच लक्ष-लक्ष जिवाणूही केकमध्ये येतात. असा जिवाणूयुक्त केक तुमच्यासाठी हितकर नाही; म्हणून या पाश्‍चात्त्य पद्धतीपेक्षा भारतीय संस्कृतीनुसार वाढदिवस साजरा करावा.

२. ऑस्ट्रेलियात यावर संशोधन होऊन वाढदिवसानिमित्त केकवर जळत्या मेणबत्त्या विझवण्यावर प्रतिबंध घालण्यात आलेला असणे : ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय आरोग्य आणि चिकित्सा संशोधन परिषदेने प्रयोगांद्वारे असे सांगितले की, वाढदिवसाला केकवर पेटवलेल्या मेणबत्त्या एकाच वेळी फुंकल्यामुळे फुंकणार्‍यांच्या तोंडातून निघालेल्या हवेसमवेत जिवाणूही केकवर पसरतात. यामुळे मुले अनेक प्रकारच्या जिवाणूंच्या कचाट्यात येऊ शकतात.

यासाठी ऑस्ट्रेलियात वाढदिवसानिमित्त केकवर जळत्या मेणबत्त्या विझवण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.

संदर्भ : दैनिक हिन्दुस्तान, ८ जानेवारी २०१३,मासिक ऋषीप्रसाद, मार्च २०१३