असुराच्या नाशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे दधीचीऋषीं


        मुलांनो, फार प्राचीन काळी वृत्रासुर नावाचा एक दैत्य होता. तो फारच माजला होता. त्याने देवांवर स्वारी केली. तो फार बलवान असल्यामुळे त्याला हरवणे देवांना कठीण झाले होते. त्याचा नाश कसा करायचा, याविषयी मार्गदर्शनासाठी देवांचा राजा इंद्र विष्णूकडे गेला. भगवान विष्णूने त्यावर उपाय सुचवला. तो असा की, दधीचीऋषींच्या हाडांपासून वज्र बनवले, तर त्याने वृत्रासुराचा नाश करता येईल.

        दधीचीऋषीं हे अतिशय प्रेमळ, सर्वांच्या उपयोगी पडणारे आणि शांत स्वभावाचे होते. अशा देवमाणसाकडे त्याचीच हाडे कशी मागायची, असा प्रश्न सर्वांना पडला. भगवान विष्णूने इंद्राला समजावले की, तू स्वत: दधीचीऋषींकडे जा. त्यांना सर्व समजावून सांग. दधीचीऋषीं तुझे म्हणणे ऐकून घेतील आणि आनंदाने प्राणत्याग करून आपली हाडे वज्र बनवण्यासाठी देतील.

        इंद्रदेव आपल्या इतर सहकाऱ्यांसह दधीचीऋषींकडे गेला. दधीचीऋषींनी अतिशय प्रेमाने सर्वांचे स्वागत केले. नंतर त्यांनी नम्रपणे इंद्राला येण्याचे कारण विचारले. इंद्र म्हणाला, “आम्ही सर्व आपल्याकडे याचक म्हणून आलो आहोत. वृत्रासुर नावाच्या दैत्याचा नाश करण्यासाठी एक वज्र बनवायचे आहे. त्या वज्रासाठी आपली हाडे हवी आहेत. आपल्या साहाय्याविना आम्ही हे करू शकत नाही.” एक क्षणाचाही विचार न करता दधीचीऋषीं म्हणाले, “मी प्राणत्याग करून माझा देहच तुम्हाला अर्पण करतो. मग या देहाचे तुम्ही काहीही करू शकता.” दधीचीऋषींनी योगबलाने प्राणत्याग केला. मग त्यांच्या देहातील हाडे बाजूला करून त्याचे षट्कोनी वज्र बनवण्यात आले आणि ते इंद्राला दिले. त्यानंतर मंत्रासह त्याचा वापर करून वृत्रासुराचा नाश करणे शक्य झाले.

        मुलांनो, आपण आपली छोटीशी वस्तूसुद्धा कोणाला देऊ शकत नाही; परंतु दुष्ट वृत्रासुराचा नाश करण्यासाठी इथे तर दधीचीऋषींनी आपले प्राण सहजपणे देऊन टाकले. यावरून आपले ऋषींमुनी केवढे महान होते, हे लक्षात येते. आपणही आपल्यापरीने चांगल्या कामासाठी त्याग करून आपली उज्ज्वल परंपरा कायम ठेवूया!

Leave a Comment