Menu Close

धर्मप्रेमी आणि धर्मरक्षक लोकमान्य टिळक !

रविवार, २३ जुलै या दिवशी असणार्‍या लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त

लोकमान्य टिळक यांना जसे राष्ट्र प्रिय होते, तसाच धर्मसुद्धा त्यांना प्रिय होता. धर्माचरण, धर्मशिक्षण, धर्मरक्षण आदी कर्तव्येही त्यांना आवश्यक वाटत होती. लोकमान्यांच्या चरित्रात यांविषयीचे अनेक प्रसंग आहेत. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, या त्यांच्या धारिष्ट्य दाखवणार्‍या गोष्टीसह त्यांच्या चरित्रातील हे प्रसंगही भावी पिढीला पुनःपुन्हा सांगायला हवेत ! हरिश्‍चंद्र त्र्यंबक देसाई लिखित गुणसागर टिळक या पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन, पुणे ३० यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातून साभार निवडलेले काही प्रसंग आज असणार्‍या त्यांच्या जयंतीनिमित्त पाहूया !

संकलक : श्री. संजय दिगंबर मुळ्ये, रत्नागिरी

पुण्यातील प्लेगचे निवारण होण्यासाठी ग्रामदेवतेला साकडे घालणारे लोकमान्य !

वर्ष १८९६ – ९७ मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीमुळे कहर उडाला होता. तेव्हा प्रयत्नवादाची कास धरून टिळकांनी पुण्याच्या नागरिकांसाठी सर्व लौकिक उपाय (उदा. नागरिकांना प्लेगसंबंधी माहिती व्हावी, या हेतूने त्यांनी तज्ञ डॉक्टरांकडून दोन लेख लिहून घेतले आणि ते केसरीत प्रसिद्ध केले; टिळकांनी खटपट करून हिंदूंसाठी एक वेगळे रुग्णालयही स्थापन केले.) तर केलेच; पण त्यासह दैवी उपायही केले. त्यांनी भाऊसाहेब अर्थात् लोहदेही गोखले यांना सांगितले, हे संकट आधिदैविक आहे. ते निवारण्यासाठी ग्रामदेवता श्री जोगेश्‍वरी हिला अभिषेक करायला हवा. त्या अभिषेकाची सर्व व्यवस्था करा आणि लागेल तो व्यय (खर्च) मागून घ्या. गावावर आलेल्या संकटापासून रक्षण करण्याचे कार्य ग्रामदेवता करते, असे धर्मशास्त्र सांगते. त्यानुसार प्रत्यक्ष कृती करणारे अन् त्यासाठी होणारा व्यय स्वतःच्या खिशातून देणारे टिळक लोकमान्य झाले नसते, तरच नवल !

लोकमान्यांची ईश्‍वरावरील श्रद्धा !

वर्ष १९०७ मध्ये सुुरत येथे काँगे्रसचे अधिवेशन होते. काँग्रेसमध्ये त्या वेळी जहाल आणि मवाळ असे दोन गट होते. जहाल गटाचे नेतृत्व टिळक करत होते. अधिवेशनाच्या काळात टिळकांचा एक विश्‍वासू सहकारी रात्री २ वाजता येऊन टिळकांना म्हणाला, विरोधी पक्षाने उद्या तुम्हाला मारण्याचा बेत केला आहे. तेव्हा काय उपाययोजना करायची ? टिळक चटकन् म्हणाले, मारू देत, खुशाल मारू देत. मी करीत आहे ते सत्कार्य आहे. मला कोण मारणार ? आमचे रक्षण करण्यास ईश्‍वर समर्थ आहे !

वर्ष १९०८ मध्ये इंग्रज शासनाने टिळकांना अटक केली, तेव्हा अनेकांचा धीर खचला. आता काय करावे, असे टिळकांना विचारल्यावर त्यांनी कळवले, मी चालवलेला मार्ग पुढे चालू ठेवा, त्यात चूक होऊ देऊ नका, तसेच सर्वांस सद्बुद्धी देण्यासाठी श्री ओंकारेश्‍वरास रुद्राभिषेक करा. त्यानुसार टिळकांवरील अभियोग (खटला) मुंबईला चालू असेपर्यंत पुण्याला श्री ओंकारेश्‍वरावर रुद्राभिषेक करून श्रींचा तीर्थप्रसाद आणि अंगारा प्रतिदिन कृ.मो. फाटक हे अधिवक्ता (वकील) मुंबईस घेऊन जात आणि लोकमान्यही त्याचा भावपूर्ण स्वीकार करीत.

भगवंताचे अधिष्ठान म्हणजे काय ?

टिळक शिष्टमंडळासह इंग्लंडला जायला निघाले, तेव्हाचा एक प्रसंग. त्या वेळी टिळकांना पुण्यातील ब्रह्मवृंदाच्या वतीने पानसुपारी (निरोप देण्याचा कार्यक्रम) झाली. त्या कार्यक्रमात टिळक म्हणाले, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ।, असे समर्थांनी म्हटले आहे. मात्र कित्येकांना अशी शंका आहे की, आमच्या स्वराज्याच्या चळवळीला भगवंताचे अधिष्ठान नाही; मात्र भगवंताचे अधिष्ठान म्हणजे काय, याचा विचार फारसा कोणी करीत नाही. कोणतीही एखादी चळवळ चालू केली आणि त्या चळवळीच्या कचेरीत एखादी मूर्ती बसवली आणि तिच्यापुढे नित्य धूप जाळला, म्हणजे का तिथे भगवंताचे अधिष्ठान येते ?

जगात भगवंताचे कार्य म्हणजे साधूंचे रक्षण, दुष्टांचे निर्दालन आणि धर्माची संस्थापना ! ही कार्ये जिथे चालत असतील, तिथे भगवंताचे अधिष्ठान आपोआपच येते. आमची स्वराज्याची चळवळ ही परकीय जुलमातून हिंदुस्थानला सोडवण्यासाठी आणि सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी आहे. यासाठी ही कार्ये जिथे जिथे चालू असतील, तिथे तिथे भगवंताचे अधिष्ठान आहेच आहे !

देवता आणि संत यांचा मान राखणारे लोकमान्य !

वर्ष १९१७ मध्ये दौर्‍यावर असतांना, शिर्डीला श्री साईबाबांचे दर्शन घेतल्यावर लोकमान्य कोपरगावी गेले. तिथे त्यांचा सत्कार झाला. त्यांच्यासाठी बैठकीवर दत्ताचा मखमलीचा गालिचा अंथरला होता. सत्कार समितीचे प्रमुख लोकमान्यांना त्या गालिच्यावर बसायची विनंती करीत होते; पण तो गालिचा देवाचा आहे हे ओळखून, त्यांनी त्यास प्रथम नमस्कार केला आणि आपल्या पायाचा त्याला स्पर्श न होऊ देता तो स्वतः उचलून बाजूला ठेवला नि मग ते बैठकीवर बसले.

वर्ष १९०८ च्या मे मासात, शिवजयंती उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने होती. अकोल्याला टिळकांच्या व्याख्यानाला शेगावनिवासी श्री गजानन महाराज हे आपणहून आले. त्या दिवशीच्या कार्यक्रमाचे दादासाहेब खापर्डे हे नियोजित अध्यक्ष होते; पण महाराज आलेले पाहून स्वतः टिळकांनीच म्हटले, आपल्या भाग्याने आज श्री गजानन महाराज येथे आले आहेत. तेव्हा अशा प्रसंगी अध्यक्षपद भूषवायला त्यांच्याहून अधिक पात्र कोण असणार ? तेव्हा महाराजांनीच अध्यक्षस्थान स्वीकारावे, अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. आश्‍चर्य असे की, महाराजांनी अध्यक्षस्थान स्वीकारलेही. आज किती राजकारणी संतांना असा सन्मान देतात ?

भावी पिढीला नीटपणे धर्मशिक्षण देऊन धर्माचा र्‍हास टाळण्यास सांगणारे लोकमान्य !

गीतारहस्य हा ग्रंथ प्रसिद्ध झाल्यावर, एकदा एक विद्वान शास्त्री लोकमान्यांजवळ ग्रंथवाचन करीत होते. त्या वेळी य.ना. आठवले टिळकांकडे काही शंका विचारायला आले. टिळक म्हणाले, वैदिक कर्मकांडाविषयीच्या तुमच्या शंका शास्त्रीबुवा सोडवतील. त्यांना शंका विचारा. मात्र ते शास्त्रीबुवा आठवले यांचे नीट समाधान करू शकले नाहीत. ते पाहून टिळक शास्त्रीबुवांजवळ जाऊन म्हणाले, हे पहा शास्त्रीबुवा, अलीकडे ब्राह्मणांची शेकडा ५० हून अधिक मुले संध्या-वैश्‍वदेव इत्यादी ब्रह्मकर्म करीत नाहीत, याचे खरे कारण तुम्ही आहात. त्या कर्माचे महत्त्व पालक किंवा गुरुजन जर त्यांना नीट समजावत नसतील, तर ती धर्मकर्मे न करण्यासाठी मुलांना दोष का द्यावा ? संध्या केल्याने सूर्योपासना घडून तेजाची प्राप्ती होते, जलदेवतांपासून औषधींची प्राप्ती होते, दिक्पालांपासून अभय लाभते आणि गायत्री तर, सर्व मंत्रांची माता असल्याने गायत्रीच्या जपाने सर्व सुख-समृद्धी नि आयुरारोग्यही लाभते. अशा रितीने तुम्हा धर्मरक्षकांनी आणि पालकांनी जर लहानपणीच मुलांना समजुतीने शिकवले, तर मला विश्‍वास आहे की, सध्याच्या धर्मग्लानीच्या काळातसुद्धा ९० टक्के मुले अगदी हौसेने ब्रह्मकर्म करू लागतील; पण अशा होतकरूंच्या शंका आपण जर वाटाण्याच्या अक्षता लावून दूर करू लागलो, तर ते निरुत्साही होऊन वैदिक आचारापासून अधिक दुरावतील अन् त्या धर्मर्‍हासाला पर्यायाने आपणच कारणीभूत होऊ.

धार्मिक कृत्ये व्यवस्थित नि यथासांग करण्यास सांगणारे लोकमान्य !

टिळकांच्या मुलाच्या विवाहाच्या वेळचा प्रसंग. विवाहाच्या वेळी मातृकापूजन असते. त्यात २७ देवता असतात. टिळकांचे कुलोपाध्याय रामभाऊ ठकार यांनी टिळकांचा वेळ वाचावा नि त्यांना त्या वयात विशेष श्रम होऊ नयेत म्हणून गंध-दुर्वांनी सर्व देवतांवर एकदम प्रोक्षण करावे, असे सुचवले. टिळकांना तसे करणे आवडले नाही. ते ठकार यांना म्हणाले, कोणतेही कृत्य पद्धतशीर आणि यथासांगच केले पाहिजे. आपण व्यवहारात थोडे का श्रम घेतो ? मग इथेच हलगर्जीपणा का ? असे म्हणून त्यांनी त्या २७ देवतांना स्वतंत्रपणे गंध लावले आणि फूल वाहिले. तसेच ग्रहयज्ञातील ५१ देवतांनाही स्वतंत्रपणे गंध लावून आणि फूल वाहून त्यांचे पूजन केले.

या विवाह सोहळ्यात देवक उठवतांनासुद्धा असेच झाले. उपाध्यायांनी सर्वसामान्य पद्धतीप्रमाणे केवळ नंदिन्यादी मंडप-देवतांचीच पूजा करवून विसर्जन करवले. मातृकांचे पूजन आणि विसर्जन करवलेच नाही. तेव्हा लगेच टिळकांनी विचारले, काहो, या मातृकांचे पूजन नि विसर्जन का केले नाही ? उपाध्याय म्हणाले, तशी पद्धत नाही. त्यावर टिळक म्हणाले, विसर्जन न करणे चूक आहे. नांदीश्राद्धे कृते पश्‍चात् यावत् मातृ-विसर्जनम् । असे श्‍लोकात आहे ना ? मग तुम्हीच सांगा विसर्जन आवश्यक आहे कि नाही ?  अशा रितीने जे धर्मकृत्य करायचे ते समजून, व्यवस्थित नि यथासांग करावे, असा टिळकांचा आग्रह असे.

गोरक्षकांना आधार देणारे लोकमान्य !

गोरक्षणाच्या चळवळीसंबंधाने टिळकांनी एकदा सडेतोडपणे विचारले हिंदू गोरक्षण करतात म्हणून मुसलमान गोमांसभक्षणाच्या अभावी उपासमारीने तडफडून मरत आहेत, अशी परिस्थिती कुठेही आढळत नाही. मग गोरक्षणाच्या चळवळीमुळे मुसलमानांची माथी कशासाठी भडकतात ? आता तर काही नेत्यांचीही माथी भडकून ते गोरक्षकांना अटकाव करण्याची भाषा बोलू लागले आहेत. आज टिळक असते, तर पुन्हा एकदा सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? असे त्यांनी विचारले असते !

अपेक्षारहित राष्ट्रसाधना करणारे लोकमान्य !

एकदा लोकमान्यांना बाबामहाराजांचे कारभारी य.ग. कुलकर्णी यांनी विचारले, आपण (म्हणजे लोकमान्य टिळक) काही उपासना तर करीत नाही, तरी आपली चित्तशुद्धी तर झालेली आहे. ती कशामुळे झाली ? टिळकांनी उत्तर दिले, स्नान-संध्यादी कर्मे आणि देवतेची उपासना हा चित्तशुद्धीचा एक मार्ग आहे; पण दुसरा नि याहून सोपा मार्ग श्रीकृष्णानेच सांगितला आहे. तो म्हणजे अपेक्षा न ठेवता परोपकार करणे. या सवयीमुळे फार लवकर चित्तशुद्धी होते. याच मार्गाने मी जनता-जनार्दनाची उपासना करीत असतो. देशाकरिता आयुष्य वेचणे हीच माझी स्नान-संध्या नि उपासना, अन् मी ती प्रतिक्षणी करीत असतो !

एक दिवस आरामखुर्चीवर चिंतन करीत स्वस्थ पडले असता टिळक एकदम उठून उद्गारले, परमेश्‍वराने मला साक्षात् मोक्ष देतो म्हटले, तरी तो मी झिडकारून त्याला म्हणेन की, प्रथम माझा देश पारतंत्र्यातून मुक्त झालेला मला बघायचा आहे. देश पारतंत्र्यात असतांना वैयक्तिक मोक्ष मिळवणे, हासुद्धा एकप्रकारचा स्वार्थच असल्याचे समजणारे लोकमान्य धन्य आहेत ! लोकमान्यांच्या चरित्रातील हे काही प्रसंग वाचून आम्हा सर्वांना धर्माचरण आणि धर्मरक्षण करण्याची स्फूर्ती मिळो, हीच त्या धर्मसंस्थापक श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

लोकमान्य टिळक यांच्या वंशजांनी त्यांच्या वापरातील अमूल्य वस्तूंचे केलेले जतन

आपल्या थोर राष्ट्रपुरुषांना विसरून कोणतेही राष्ट्र उदयास येत नाही, असा ऐतिहासिक सिद्धांत आहे. या सिद्धांताचा विसर पडल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जण आपल्या गौरवशाली परंपरेविषयी अनभिज्ञ आहेत. या परंपरेतील लोकमान्य टिळक हेही त्यास अपवाद नाहीत ! केसरीवाडा, पुणे येथील लोकमान्य टिळक यांच्या वंशजांनी त्यांच्या वापरातील अमूल्य वस्तूंचे जतन केले आहे.

लोकमान्य टिळक यांचे रत्नागिरी येथील जन्मस्थानाचे छायाचित्र ! २३ जुलै १८५६ मध्ये टिळकांचा जन्म झाला. लोकमान्यांचे मूळ नाव केशव होते, परंतु बाळ हे टोपण नांवच कायम राहिले.
लोकमान्य टिळक यांची आरामखुर्ची, पलंग (पलीकडे) आणि त्यांनी वापरलेले तांब्या भांडे ! भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी काय करायला हवे, याचे चिंतन लोकमान्य बहुधा येथेच करत असावेत.
सावरकर बंधू यांसारख्या अनेक ज्वलंत क्रांतीकारकांना प्रेरणा देणार्‍या आणि राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणासाठी जीवनाच्या शेवटच्या श्‍वासापर्यंत लढणार्‍या लोकमान्य टिळक यांची कुंडली !
क्षात्रभाव, विजिगीषू वृत्ती, दुर्दम्य आशावाद इत्यादी समष्टी गुण असलेले लोकमान्य टिळक यांचा स्पर्श झालेली त्यांच्या नित्य वापरातील भांडी, जणू त्यांच्यातून आपल्याला राष्ट्ररक्षणाचा संदेशच मिळत आहे !
जुलमी ब्रिटीश सत्तेच्या विरोधात धगधगत्या विचारांचा उगम झालेली हीच ती लोकमान्यांची लिखाणाची खोली ! येथे अजूनही त्यांची पुस्तके, पटल इत्यादी वस्तूंचे जतन करण्यात आले आहे.
सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?, अशा प्रकारची जाज्वल्य विधाने अन् संपादकीय लोकमान्य टिळकांच्या याच लेखणीतून साकारली गेली. यातून राष्ट्ररक्षणाचा आपणही निर्धार करूया.
केसरीच्या छपाईसाठी वर्ष १९१९ मध्ये लोकमान्य टिळकांनी इंग्लंडहून आणलेले डबल फीडर यंत्र ! लोकमान्यांचे तेजस्वी विचार त्यांच्यानंतरही या यंत्राद्वारे प्रसृत करण्यात आले.
डॉ. अ‍ॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी या पटलावर अनेक वेळा होमरूल लीग या चळवळीसंदर्भात चर्चा केली. या चळवळीच्या माध्यमातून स्वराज्याचा मंत्र देशाच्या कानाकोपर्‍यात पसरवण्यात आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *