Menu Close

कन्हैयालाल दत्त

१. जन्म

‘हिंदुस्थानवर इंग्रजांची राजवट सुरू असतांनाच साधारणतः ११४ वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. त्या दिवशी गोकुळाष्टमी असल्याने संपूर्ण हिंदुस्थानात कृष्णजन्माचा उत्सव सुरू होता. कंसाच्या अन्यायी व अत्याचारी राजवटीचा नाश करण्यासाठी जसा श्रीकृष्णाचा जन्म झाला होता, त्याच मुहूर्तावर इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध बंड करून आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोलकाताजवळील चंद्रनगरच्या फ्रेंच वसाहतीमध्ये रहाणार्‍या ‘दत्त’ कुटुंबात एका बालकाचा जन्म झाला होता. संपूर्ण दत्त कुटुंबात आनंदीआनंद होता. ३०.८.१८८८ रोजीचा तो दिवस होता. नामकरण विधी होऊन त्या बालकाचे नाव ‘कन्हैया’ ठेवण्यात आले.’

२. कुशाग्र, एकपाठी व विनम्र

‘कन्हैयाची बालपणाची १-२ वर्षेच चंद्रनगरातील आपल्या घरी गेली असतांनाच त्याच्या वडिलांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आपल्या कुटुंबासह मुंबई गाठली. तेथे एका खाजगी कंपनीमध्ये ते नोकरी करू लागले. कन्हैया थोडा मोठा झाल्यावर शिक्षणासाठी त्याच्या वडिलांनी त्याचे नाव ‘आर्यन एज्युकेशन सोसायटी’च्या शाळेत दाखल केले. शाळेत ‘एक कुशाग्र, एकपाठी व विनम्र असलेला विद्यार्थी’ म्हणूनच त्याची ओळख होती. स्वभाव मनमिळावू व परोपकारी असल्याने वेळप्रसंगी स्वतःला त्रास घेऊन दुसर्‍याला मदत करण्याची त्याची वृत्ती होती.’

३. सैनिकी शिक्षणाचे आकर्षण

‘लहानपणापासूनच त्याला व्यायामाची आवड होती. त्याची शरीरयष्टी सडपातळ; परंतु काटक होती. त्याने लहानपणापासूनच लाठी चालवण्याची कसब अवगत केली होती. कन्हैयाच्या बालमनाला सैनिकी शिक्षणाचेही अत्यंत आकर्षण होते.’

४. इंग्रज राजवटीतील अन्यायकारक घटनांचा तरुण मनावर परिणाम होणे

‘बाल कन्हैया आता युवा कन्हैया झाला होता. जसे वय वाढले, तशी कन्हैयामध्ये आणखी काही गुणांची भर पडली. त्याची प्रगल्भता वाढली. घरात होणार्‍या सुसंस्कारांमुळे, तसेच आजूबाजूला असलेल्या सामाजिक व राजकीय परिस्थितीचे अवलोकन केल्यावर पदोपदी इंग्रज राजवटीतील अन्यायकारक घटना कन्हैयाच्या तरुण मनावर परिणाम करीत होत्या.’

५. बी.ए.ची परीक्षा ‘इतिहास’ विषयात प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण होणे

‘तशातच महाविद्यालयीन शिक्षणासाठी आपल्याच गावी जायचे त्याच्या मनाने घेतले. त्यामुळे १९०३ मध्ये कन्हैयाने चंद्रनगरच्या ‘डुप्ले कॉलेज’मध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयातही आपल्या हुशारीने व मनमिळावू स्वभावाने ‘सर्वांचाच आवडता विद्यार्थी’ म्हणून कन्हैयाला ओळखत. कन्हैयाला इतिहासाची आवड तर बालपणापासूनच होती. त्यामुळे त्याने १९०७ मध्ये प्रा. चारुदत्त रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली बी.ए. ची परीक्षा ‘इतिहास’ विषयात प्राविण्य मिळवून अग्रक्रमाने उत्तीर्ण केली. कन्हैयाला वाचनाची आवड होती.’

६. सत्येंद्रनाथ बोस व अन्य क्रांतीकारकांशी परिचय होणे

‘कोलकातामधील ‘युगांतर’ समितीच्या कार्यकर्त्यांशी कन्हैयालालजींचा परिचय झाला. ‘युगांतर’च्या अरविंद घोष, बारींद्र घोष, उल्हासकर दत्त व सत्येंद्रनाथ बोस अशा अनेक जाज्वल्य देशाभिमानी वीरांच्या सहवासाने कन्हैयालालजी हिरीरीने क्रांतीकार्यात सहभागी होऊ लागले. त्यांच्या आवडत्या प्राध्यापक चारुचंद्र रॉय यांनी इतिहासाच्या व्यतिरिक्त बंदूक चालवण्याचे उत्तम शिक्षणही कन्हैयालालजींना दिले. मुष्टीयुद्धाची कलाही त्यांनी आत्मसात केली होती.’

७. विदेशी सर्कशीविरुद्ध जनमत तयार करून तिचे खेळ बंद पाडणे

‘इंग्रज सरकारच्या विरोधात जनमत तयार करण्याचे कन्हैयालालजींचे कार्य सदैव चालू असायचे. १९०७ मध्ये ‘वॉरेन सर्कस’ ही विदेशी सर्कस चंद्रनगर येथे आली होती. त्या विदेशी सर्कशीविरुद्ध जनमत तयार करून त्या सर्कशीचे खेळ तेथे होऊ न देण्यासाठी सर्कशीच्या तिकीट खिडकीजवळ कन्हैयालालजींनी ‘पिकेटींग’ करून तिकीटविक्री बंद पाडली होती. कन्हैयालालजींचा स्वदेशी वस्तूंच्या वापरावर भर होता. त्यांनी स्वदेशी वस्तूंच्या विक्रीचे दुकानही सुरू केले होते.’

८. नरेंद्र गोस्वामीने फितूर होऊन क्रांतीकारकांबद्दलची माहिती पोलिसांना सांगणे

‘चंद्रनगर येथील फ्रेंच वसाहतीमध्ये बाहेरून होत असलेला शस्त्रपुरवठा तेथील मेयरच्या (महापौराच्या) लक्षात आला होता. त्याविरुद्ध त्या मेयरने निर्बंध घातला होता. त्यामुळे क्रांतीकारकांना अनेक अडचणी निर्माण झालेल्या होत्या. शेवटी त्या क्रांतीकारकांनी ठरविले, ‘त्या मेयरला ठार मारायचे.’ १८.४.१९०८ रोजी मेयरच्या घरावर बॉम्ब टाकून त्याला मारण्यासाठी युगांतर समितीच्या नरेंद्र गोस्वामी व इंद्रभूषण राय या कार्यकर्त्यांनी ही जबाबदारी स्वीकारून तसा प्रयत्न केला; परंतु मेयर त्यातूनही नशिबाने वाचला. पोलिसांच्या तपासात काही दिवसांनंतर नरेंद्र गोस्वामी व इंद्रभूषण राय पकडले गेले. पोलिसांनी ‘पकडल्यानंतर क्रांतीकारकाची अवस्था कशी होते’, हे दाखवल्याने शेवटी नरेंद्र गोस्वामी पोलिसांच्या गळाला लागला. पोलिसांच्या छळापासून मुक्तता व तुरुंगात असेपर्यंत सर्व सुखसोयी मिळाव्या या अटींवर तो क्षमेचा साक्षीदार झाला. त्याने सर्व क्रांतीकारकांबद्दलची माहिती पोलिसांना सांगितली व आपल्या सहकार्‍यांचा विश्वासघात केला.’

९. नरेंद्र गोस्वामीने दिलेल्या माहितीच्या आधारे इंग्रजांनी अन्य क्रांतीकारकांसह पकडणे

‘नरेंद्र गोस्वामीने दिलेल्या माहितीच्या आधारे वेगाने तपास करत असतांनाच त्यांना जी काही माहिती मिळाली, त्याच्या आधारे इंग्रज अधिकारी सावधानता बाळगत हिंदुस्थानच्या वंग क्रांतीकारकांना पकडण्याचे अथक प्रयत्न करत होते. तेव्हाच ३० एप्रिलला खुदीराम बोस व प्रफुल्लचंद्र चाकी या दोन वंगवीरांनी मुझफ्फरपूरच्या किंग्जफोर्डला बॉम्बने ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. चंद्रनगरची घटना व किंग्जफोर्डवरील हल्ला या दोन घटनांच्या अनुषंगाने तपास चालू असतांनाच इंग्रज अधिकार्‍यांनी नरेंद्रकडून त्यांना मिळालेल्या माहितीवरून कोलकातामधील १३४ हॅरीसन रोड येथील एका घरावर, तसेच माणिकतोळा उद्यानाजवळील एका घरावर धाड घातली असता एक सुसज्ज बॉम्ब कारखानाच त्यांना आढळला. २.५.१९०८ रोजी त्याच आधारे युगांतर समितीच्या बारींद्रकुमार घोष, अरविंद घोष, उल्हासकर दत्त, कन्हैयालाल दत्त व सत्येंद्रनाथ बोस अशा अनेक महत्त्वाच्या क्रांतीकारकांना इंग्रज अधिकार्‍यांनी पकडले. या सर्वांना बंगालमधील अलीपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. बंगालमधील इंग्रज सरकारच्या विरोधात जनमत निर्मितीचे कार्य करणार्‍या, तसेच सशस्त्र क्रांतीकारकांना त्यांच्या कार्यासाठी शस्त्रास्त्रे पुरविणार्‍या सर्व प्रमुख क्रांतीकारकांच्या अटकेमुळे माणिकतोळा बगीच्या जवळील गुप्तरीत्या चालू असलेल्या बॉम्बचा कारखाना बंद पडला. जोशात असलेले क्रांतीचे वारे अचानक आलेल्या वादळाने सैरभैर होऊन बंद पडले.’

१०. आपल्या सहकार्‍यांना सोडून जावे लागेल; म्हणून सुटका करून घेण्यास नातेवाइकांना नकार देणे

‘कन्हैयालाल दत्त तुरुंगात असूनही निर्विकार होते. तुरुंगात ते नेहमी त्यांच्या आवडीचे बंकीमचंद्रांनी निर्मिलेले ‘वंदे मातरम्’ हे गीत स्वतः गात व इतरांनाही गायचा आग्रह करीत. इंग्रज सरकारने पकडलेल्या क्रांतीकारकांविरुद्ध नरेंद्र गोस्वामीने दिलेल्या जबानीशिवाय कोणताच पुरावा उपलब्ध नव्हता. त्यामुळे कन्हैयालालजींच्या घरच्यांनी व इतर हितसंबंधीयांनी कन्हैयालालजींना म्हटले होते, ‘आपण एक चांगला वकील करून तुमची सुटका करून घेऊ.’ त्यावर कन्हैयालालजींनी आपल्या नातेवाइकांना सांगितले, ‘माझ्या सर्व साथीदारांबरोबर मी आजपर्यंत कार्य केले आहे. त्यांचे जे होणार असेल, तेच माझेही होईल. जिवंत असेपर्यंत त्या सर्वांना सोडून मी कदापीही जाणार नाही.’

११. एकत्र कारावास भोगत असलेल्या सत्येंद्रनाथ बोस यांच्या बरोबरीने कट रचून फितुर नरेंद्र गोस्वामीला अद्दल घडवण्याचे ठरवणे

‘अलीपूरच्या तुरुंगात असलेल्या सर्व क्रांतीकारकांवरील खटला न्यायालयात सुनावणीस आला होता. नरेंद्र गोस्वामी फितूर होऊन क्षमेचा साक्षीदार झाला असल्याने त्याला इतर क्रांतीकारकांमधून काढून वेगळ्या बराकीमध्ये ठेवले होते. युगांतर समितीच्या क्रांतीवीरांमध्ये नरेंद्र गोस्वामीला फितुरीची अद्दल घडविण्याचे ठरत होते; परंतु सदैव पोलिसांच्या गराड्यात असणार्‍या नरेंद्र गोस्वामीला भेटताही येत नव्हते. त्यामुळे शेवटी कन्हैयालालजींनी आपल्याबरोबर असलेल्या सत्येंद्रनाथ बोस (खुदीराम बोस यांचे काका) यांच्या बरोबरीने एक कट रचला व तो प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू केले. तशातच ११.८.१९०८ रोजी खुदीराम बोस यांना फाशी देण्यात आली. त्यामुळे कन्हैयालाल व सत्येंद्रनाथ यांचा निर्धार अधिकच पक्का झाला.

कन्हैयालाल दत्त व सत्येंद्रनाथ हे दोघेही नरेंद्र गोस्वामीला कंठस्नान घालण्याच्या उद्देशाने संधीची वाट पहात होते. न्यायालयात त्यांची फक्त दुरूनच दृष्टादृष्ट व्हायची अथवा शाब्दिक चकमकी होत असत. १.९.१९०८ रोजी नरेंद्र गोस्वामीची न्यायालयात मुख्य साक्ष होणार होती. त्या आधीच नरेंद्रला यमसदनी धाडण्याचा निर्णय कन्हैयालालजींनी घेतला. त्यासाठी आता त्यांनी नाटक करायचे ठरविले. नरेंद्र गोस्वामीला इतर क्रांतीकारकांकडून सदैव जीवानिशी मारण्याच्या धमक्या मिळत असत. शिवाय न्यायालयातही एक-दोनदा त्याची साक्ष चालू असतांनाच एका क्रांतीकारकाने नरेंद्रला चप्पल मारली होती. या अशा प्रकारांमुळे नरेंद्र गोस्वामीला रक्तदाबाचा त्रास होऊन त्याचे मानसिक संतुलनही बिघडत असे. त्यामुळे नरेंद्र गोस्वामीला इंग्रज अंगरक्षकाच्या संरक्षणात रुग्णालयात भरती केले होते.’

१२. दोघांनीही रुग्णालयात भरती होऊन नरेंद्रचा विश्वास संपादन करणे

‘२७.८.१९०८ रोजी सत्येंद्रनाथांनी पोट दुखण्याचे कारण सांगून रुग्णालयात स्वतःला भरती करून घेतले. तेथे नरेंद्रशी गप्पा मारत त्याचा विश्वास संपादन केला व आपणही क्षमेचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचे खोटेच सांगितले. त्यानंतर दोनच दिवसांनी कन्हैयालालजीदेखील पोट दुखण्याचे निमित्त करूनच रुग्णातलयात भरती झाले. त्या आधी रुग्णालयात घरून येणार्‍या जेवणाच्या डब्यातून त्यांनी २ पिस्तुले गुपचूप आणून घेतली होती. एक पिस्तूल सहाबारी ३८० व्यासाचे ‘ओसबॉर्न’ बनावटीचे होते, तर दुसरे ४५० व्यासाचे होते. सत्येंद्रनाथांनी नरेंद्र गोस्वामीला सांगितले, ‘मी कन्हैयालालशीदेखील बोलून त्यालाही क्षमेचा साक्षीदार होण्यास तयार करतो; कारण आम्हा दोघांचीही पोटदुखी जीवघेणीच आहे. तशातच पोलिसांनी आम्हाला छळून तुरुंगात खितपत ठेवले, तर मात्र आमचे कठीणच आहे. त्यापेक्षा तुझ्यासारखा क्षमेचा साक्षीदार झाल्यास जीव वाचेल व नंतर तुरुंगातून सुटका होईल.’ ही सर्व केलेली बतावणी नरेंद्र गोस्वामीला खरी वाटली. त्याने इंग्रज पोलीस अधिकार्‍यास तसा निरोप पाठवला.’

१३. संधी साधून नरेंद्र गोस्वामीवर गोळी झाडणे व ती त्याला वर्मी लागणे

‘३१.८.१९०८ रोजी सकाळी ८ वाजता नरेंद्र गोस्वामीचा निरोप मिळताच इंग्रज अधिकारी हिगिन्स नरेंद्र गोस्वामीला सोबत घेऊन कन्हैयालाल व सत्येंद्रनाथ यांना भेटण्यास आला. आपल्या सावजाच्या प्रतीक्षेत शिकारी तयारीतच होते. कन्हैयालालजींनी दुरूनच नरेंद्र गोस्वामीला येत असतांना बघितले. सत्येंद्रनाथांना त्यांनी इशारा केला. रुग्णालयाच्या एका कोपर्‍यातच इंग्रज अधिकारी हिगिन्सला सत्येंद्रनाथांनी थांबवून ‘त्याला काहीतरी गुपित सांगतो आहे’, असे भासवून त्याच्या कानात पुटपुटले. हिगिन्सला काहीच न कळल्याने हिगिन्स प्रश्नार्थक मुद्रेने सत्येंद्रनाथांकडे फक्त बघतच होता. तेवढ्यात नरेंद्र गोस्वामी बराच पुढे गेला होता. हीच संधी साधून कन्हैयालालजींनी नरेंद्र गोस्वामीला थांबवून त्याला मारण्यासाठी रिव्हॉल्व्हर बाहेर काढले. ते पाहून हिगिन्स त्यांना पकडण्यास पुढे धावला. नरेंद्र गोस्वामीची तर पाचावर धारण बसली होती. तो जिवाच्या आकांताने पळत सुटला. पळता पळता ओरडू लागला, ‘हे माझा जीव घेत आहेत. मला वाचवा !’

नरेंद्रच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करत सत्येंद्रनाथांनी एक गोळी झाडली. ती गोळी नरेंद्रला हातावर लागली, तरीही जीव वाचवण्याच्या उद्देशाने तो धावत होता. त्याला वाचवण्यासाठी हिगिन्सने कन्हैयालालजी व सत्येंद्रनाथ यांना रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु देशद्रोही व मित्रद्रोही नरेंद्रला सहजासहजी सोडून द्यायला हे बंगाली वाघ तयार नव्हते. हिगिन्सला मारपीट करून जायबंदी केल्याने हिगिन्स निपचित पडला होता. कन्हैयालाल व सत्येंद्रनाथ दोघेही पुन्हा नरेंद्रच्या मागावर गेले. रुग्णालयाचे आवार खूप मोठे होते; परंतु तेथून बाहेर पडण्याचा मार्ग कन्हैयालालजींनी रोखून धरल्याने नरेंद्रला फक्त इकडून-तिकडे पळण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तेवढ्यात लिटन नावाचा एक सुरक्षारक्षक हा आरडाओरडा ऐकून तेथे आला. त्याने नरेंद्रला वाचवण्यासाठी धाव घेतली. हे बघताच सत्येंद्रनाथांनी लिटनला ३-४ मुष्टीप्रहार लगावले. लिटनने धरणीवर लोळण घेतली. हीच संधी साधून कन्हैयालालजींनी आपल्या पिस्तुलातून नरेंद्रवर गोळी झाडली. ती गोळी नरेंद्रला वर्मी लागली. नरेंद्र गोस्वामी गोळी लागून तेथील एका सांडपाण्याच्या गटारात कोसळला. गटारात पडता-पडता तो म्हणाला, ‘‘मी फितूर झाल्यानेच मला यांनी मारले ! माझा जीव घेतला !’’

१४. राष्ट्र्रद्रोह्याला मारल्यामुळे सर्व जनतेने ‘बरे झाले’, असे म्हणणे

‘कन्हैयालालजींनी व सत्येंद्रनाथांनी एका राष्ट्र्रद्रोही फितुरला कंठस्नान घालून यमसदनी पाठवले. आपले ध्येय पूर्ण करताच
‘वन्दे मातरम्’चा जयघोष करत सत्येंद्रनाथ व कन्हैयालालजी पोलीस येण्याची वाट पहात थांबले होते. आजूबाजूचे कैदी, सहकारी व तुरुंगातील सुरक्षा सैनिक सर्वच जण स्तब्ध झाले होते. थोड्याच वेळात इंग्रज अधिकारी तेथे आले. त्यांनी दोन्ही वंगवीरांना हातकड्या घालून पिस्तुले ताब्यात घेतली. तुरुंगाधिकार्‍याच्या खोलीत आल्यावर तुरुंगाधिकारी इमर्सनने कन्हैयालालजींना विचारले, ‘‘तुम्ही पिस्तुले कोठून आणली ? कोणी दिली ?’’ त्यावर कन्हैयालालजींनी हसत हसत उत्तर दिले, ‘‘आम्हाला ही पिस्तुले वंगवीर खुदीरामच्या भुताने काल रात्री १२ वाजता आणून दिली.’’ फितूर नरेंद्रच्या वधामुळे संपूर्ण हिंदुस्थानातील सर्व जनता म्हणत होती, ‘राष्ट्र्रद्रोह्याला शिक्षा व्हायलाच हवी होती. बरे झाले दुष्टात्मा मेला !’

१५. दोघांनाही मृत्यूदंडाची शिक्षा होणे

‘७.९.१९०८ रोजी सेशन कोर्टात कन्हैयालाल दत्त व सत्येंद्रनाथ बोस यांच्यावर खटला चालू झाला. काही दिवसांनंतर तो खटला वरिष्ठ  न्यायालयात गेला. न्याय देण्याचे नाटकच असल्याने निर्णय देण्यासाठी इंग्रज सरकार जेवढे उत्सुक होते, त्यापेक्षा
अधिक उत्साही होते बंगालचे वाघ कन्हैयालालजी व सत्येंद्रनाथजी. त्यांना माहीत होते की, शिक्षा मृत्यूदंडाचीच होणार आहे. त्यांच्या अपेक्षेनुसारच निर्णय आला, फाशीची शिक्षा ! फाशीचे दिवसही ठरले. १०.११.१९०८ रोजी कन्हैयालालजींना, तर २१.११.१९०८ रोजी सत्येंद्रनाथांना !’

१६. दोघेही कर्तव्यपूर्तीच्या आनंदात असणे

‘कन्हैयालाल व सत्येंद्रनाथ दोघेही कर्तव्यपूर्तीच्या आनंदात होते. देशासाठी प्राणार्पण करण्याची त्यांची इच्छा पूर्ण होणार होती. अलीपूरचा तुरुंगाधिकारी इमर्सन कन्हैयालालजींना म्हणाला, ‘‘फाशीचे गांभीर्य तुला दिसत नाही. फाशी म्हणजे मृत्यू ! ही काही आनंदाची घटना नाही.’’ कन्हैयालालजींचे मोठे भाऊ त्यांना भेटायला आले होते. फाशीच्या शिक्षेने ते एवढे व्याकूळ झाले होते की, कन्हैयालालजींनी त्यांचेच सांत्वन केले. ते म्हणाले, ‘‘काही काळजी करू नका. माझे वजन १२ पौंडांनी वाढलेले आहे.’’ ही गोष्ट सत्यच होती. शिक्षेचे कोणतेही दडपण त्यांना आले नव्हते.’

१७. फाशी

‘१०.११.१९०८ रोजी अलीपूरच्या तुरुंगात पहाटे ५ वाजता कन्हैयालालजींना उठवण्यात आले. त्यांना रात्री शांत झोप लागली होती. ‘स्नानादी कर्मे आटोपून शुचिर्भूत होऊन एखाद्या मंगल समारंभास जावे’, अशा उत्साहाने कन्हैयालालजी आपल्या कोठडीतून बाहेर पडले ते ‘वंदेमातरम्’चा जयघोष करतच. त्याच वेळी इतर बंदीवान व क्रांतीकारक यांनी त्यांना मातृभूतीचा
जयजयकार करत प्रतिसाद देऊन शुभेच्छाही दिल्या. वधस्तंभावर चढून गेल्यावर स्वतःच्या हातानेच फास गळ्यात अडकवून ते सज्ज झाले. त्याच वेळी कन्हैयालाल तुरुंगाधिकारी इमर्सनला म्हणाले, ‘‘आता मी तुम्हाला कसा दिसतो आहे ?’’ नंतर त्यांनी ‘वंदे मातरम् !’ म्हणून सर्वांचा निरोप घेतला. ठीक ७ वाजता कन्हैयालालजींना फाशी देण्यात आली. आपल्या नश्वर देहाचा त्याग करून मातृभूमीच्या स्वातंत्र्यप्राप्तीचे साकडे प्रत्यक्ष ईश्वराला घालण्यास कन्हैयालालजींनी स्वर्गाकडे कूच केले.’

१७ अ. विराट अंत्ययात्रा निघणे व कालीघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणे

‘कन्हैयालालजींचा अचेतन देह तुरुंगाधिकार्‍याने त्यांचे मोठे भाऊ डॉ. आशुतोष यांच्या स्वाधीन केला. मृत्यूनंतर कन्हैयालालजींचा चेहरादेखील समाधानी व शांत होता. कोणतेही दुःख चेहर्‍यावर दिसत नव्हते. कन्हैयालाल दत्तांचे पार्थिव त्यांच्या चंद्रनगरच्या घरी आणले गेले. संपूर्ण बंगालमधून गावागावातून शेकडो लोक त्यांचे अंत्यदर्शन घेण्यास आले होते. कन्हैयालालजींची विराट अंत्ययात्रा कालीघाट स्मशानभूमीत पोहोचली. हृद्य कंठाने ‘कन्हैयालाल अमर रहे !’च्या जयजयकारात त्यांचा नश्वर देह चंदनाच्या चितेवर अग्नीज्वालात नाहीसा झाला. त्यांच्या अमूल्य बलीदानाच्या आठवणीच्या व्यतिरिक्त उरली होती, ती फक्त त्यांची पवित्र रक्षा !’

१८. सत्येंद्रनाथ बोस यांना फाशी देणे व निघणार्‍या अंत्ययात्रेला घाबरून सरकारने त्यांच्यावर कारागृहातच अंत्यसंस्कार करणे

‘कन्हैयालालजींच्या अंत्ययात्रेतील जनतेचा प्रतिसाद पाहून इंग्रज सरकार हबकले होते. २१.११.१९०८ रोजी सत्येंद्रनाथ बोस यांना फाशी दिल्यावर त्यांचे पार्थिव तुरुंगाबाहेर नेण्यास त्यांनी परवानगी नाकारली व तुरुंगातच अंत्यसंस्कार करण्यात आला.

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी आत्मार्पण करणारे दोन निधडे देशभक्त कन्हैयालाल दत्त व सत्येंद्रनाथ बोस यांना आजचा भारतीय समाज विसरला आहे, असे वाटते. स्वातंत्र्यसंग्रामातील ज्ञात-अज्ञात वीरांनी केलेल्या बलीदानाची सार्थकता आपण सर्वांनी कसोशीने जोपासली पाहिजे. हीच खरी त्यांना श्रद्धांजली होईल.’

– श्री. जयंत यशवंत सहस्रबुद्धे, सदस्य, अक्षय व्यावसायिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या., अकोला.

1 Comment

Comments are closed.