देवीच्या मूर्तीला पुजार्‍यांनी वस्त्र नेसवण्याच्या कृतीविषयी भावाच्या पातळीवर नव्हे, तर लैंगिक स्तरावर विचार येणे, हे विकृत मानसिकतेचे लक्षण !

ठाणे जिल्ह्यातील एका व्हॉटस्अपच्या ग्रुपवर धर्मभावना दुखावणारे पुढील लिखाण आले आहे. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने तसेच धर्मशास्त्र किंवा धार्मिक आचार यांच्याविषयी जाणून घ्यायची जिज्ञासाही नसल्याने आपण शाळा-महाविद्यालयांत शिक्षण घेतले म्हणजे आपल्याला सर्वकाही समजते, अशा आविर्भावात ते धर्मातील आचारांविषयी त्यांचे मत सार्वजनिकरित्या मांडतात. त्यात आपलेच हसे होते, याचेही त्यांना अहंकारापोटी भान उरत नाही; कारण धर्माचारामागील शास्त्र सांगितल्यावरही हे लोक अहंकारापोटी ते मान्य करत नाहीत. व्हॉट्स अ‍ॅपवरील अशा विकृत लिखाणामुळे सर्वसामान्य हिंदूंची दिशाभूल होऊ नये, यासाठी व्हॉट्स अ‍ॅपवरील विकृत लिखाण (कानामात्रेचाही फरक न करता) आणि त्याचा प्रतिवाद येथे देत आहोत.

व्हॉट्स अ‍ॅपवरील विकृत लिखाण

रोज होतोय तिचा विनयभंग….?

एका नामांकित कॅसेट कंपनीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानाचे चित्रीकरण करण्याचा योग आला. महाराष्ट्रातील साडेतीन पीठ समजल्या जाणार्‍या देवींचा देखील त्यात समावेश होता. कंपनीच्या मागणीनुसार देवीची काकड आरती महत्वाची होती, शक्य होईल तेव्हडा प्रयत्न आम्ही वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि बर्‍याच ठिकाणचे चित्रीकरण पूर्ण केले. एका ठिकाणी मात्र आम्ही वेळेच्या एक तास आधीच पोहचलो होतो. देवीचा उत्सव सुरु असल्याने लाखो भाविकांची गर्दी होती सर्व भक्तगण थांबले होते. मी आणि माझा सहकारी ट्रस्ट ने दिलेल्या व्यक्तीसोबत वाट काढत थेट मंदिराच्या गाभार्‍यात पोहचलो. गर्दी थांबल्याचे कारण विचारले तर म्हणजे देवीला अंघोळ घालण्याचे काम सुरु आहे. आणि त्यानंतर मग आरती होईल. देवीला अंघोळ घालण्याचा हा सोहळा पाहण्याची संधी का सोडावी; म्हणून मी जरा अधिकच पुढे गेलो. बाजूने मोठमोठे सोहळे आणि देवीच्या अंगावरचे कपडे लावून मध्ये तीन पुरुष (पुजारी) देवीची अंघोळ घालत होते. प्रयत्न करून देखील देवीच्या मुखवट्याएवजी शरिराचा कोणताच भाग दिसत नव्हता. मी ट्रस्टच्या एका व्यक्तीला प्रश्‍न केला. देवीला अंघोळ घालतांना एव्हडी काळजी का घेतली जाते बाजूना हे सोहळे वैगरे का ? तर त्यांचेकडून उत्तर मिळाले देवीचे पावित्र्य राखण्यासाठी हे सर्व करावे लागते. देवी कोणतीही असो सर्व भक्त तिला माता, जगत्जननी, आई, मानतात तिचे पावित्र्य तर ठेवलेच पाहिजे असा विचार मनात आला. पण अंघोळीच्या वेळी बाजूने सोहळे लावून, गर्दी थांबवून खरंच पावित्र्य राखले जाते का ? आणि सोहळे लावून अंघोळ घातल्याने जर पावित्र्य राखले जात असेल तर अंघोळ घालणारे पुरुष पुजारी कसे ? ज्या देवीला लोक आई मानतात, माता मानतात तिच्या अंगावरचे कपडे काढण्याचा अधिकार या पुरुष पुजार्‍यांना कुणी दिला असेल. आज एखादी स्री मरण पावली तर तिच्या अंत्यसंस्काराचा सोपस्कार स्रिया करतात. मुडद्याचे पण पावित्र्य राखले जाते. बाजूने कापडे धरून त्या मुदड्यावरचे कपडे काढले जातात. अंघोळ घातल्यानंतर त्या स्री ला नवीन कपडे घालण्याचे काम देखील स्रीयाच करतात तर मग येथे लाखो करोडो भक्तांच्या आईला, मातेला, जगत्जननीला अंघोळ घालायला पुरुषांना परवानगी कशी. ठीक आहे हे पुरुष देविला अंघोळ घालतात पण अंघोळ घालतानी या पुरुषांच्या भावना काय असतील. देवीला अंघोळ घालतोय, आईला अंघोळ घालतोय, स्री ला अंघोळ घालतोय, कि दगडावर पाणी ओततोय ? नेमके काय …? आईला अंघोळ घालतोय असे कुणी म्हणत असेल तर कोणताही मुलगा आईच्या अंगावरचे कपडे काढणार नाही ..! , स्री ला अंघोळ घालतोय म्हणल्यावर कोणताच पुरुष तिचे कपडे काढून पावित्र्य जपणार नाही ….! आणि हि अंघोळ घालतानी यांच्या मनात फक्त आम्ही एका निर्जीव दगडावर पाणी ओततोय असे वाटत असेल तर मग श्रद्धेच्या नावाखाली लाखो करोडो लोकांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार यांना कुणी दिला. खरंच हीच का ती देवी जि भक्तांच्या रक्षणासाठी धावून आली, महिषासुर असेल किंवा याच टाईप अनेक राक्षस मारले. मग आज याच देवीच्या अंगावरचे कपडे काढणारे पुजारीरूपी राक्षस या देवीच्या अंगावरचे कपडे काढतात तेंव्हा ती स्वताचे रक्षण का करत नाही. आमचे आंधळे भक्त याची चिकित्सा कधीच नाही करणार. ज्या देवीला आपण आई मानता त्या आईच्या नागावारचे कपडे आपल्यासमोर कुणीतरी काढतोय आणि आपण श्रद्धेच्या नावाखाली शांत बसतोय. वा रे भक्ती …! रोज लाखो लोकांसमोर तिचा विनयभंग होतोय, रोज तिचे कपडे आपल्या नजरेसमोर काढले जात आहेत आणि आम्ही भक्ती आणि श्रद्धेच्या नावाखाली हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहतोय. एक तर त्या देवीचे पावित्र्य राखायचे असेल तर तिची अंघोळ घालतांना पुरुषांऐवजी स्रीयाच असाव्या नाहीतर अश्या पुजार्‍यांवर विनयभंग करत असल्याचे गुन्हे का दाखल करण्यात येवू नये.
– एक धर्मद्रोही
(कृपया कुणीही जात, धर्म ह्या पातळीवर जाऊन टीका करू नये. फक्त विषय समजून घ्यावा.)

धर्मद्रोही विकृत लिखाणाचा प्रतिवाद

१. देवतांना वस्त्र नेसवणे ही भावपूर्ण कृती !

देवतेची मूर्ती म्हणजे ब्रह्मांडातील निर्गुण देवतातत्त्वाचे सगुण साकार रूप ! निर्गुणापेक्षा सगुण म्हणजेच प्रत्यक्ष दिसत असलेल्या रूपामुळे सामान्य भक्ताच्या मनात भाव निर्माण होण्यास साहाय्य होते. या मूर्तीची पूजा-अर्चा, आरती, भजन यांद्वारे भक्त आपल्यातील देवतेप्रतीचा भाव व्यक्त करत असतो. देवतेच्या मूर्तीला स्नान घालतांना मी देवतेला स्नान घालत आहे, वस्त्र नेसवत आहे, नैवेद्य दाखवतांना देवतेला भरवत आहे, अशा कृतींतून त्याचे देवतेशी अनुसंधान राहून भावजागृती होते. प्रत्येक भक्त वेगवेगळ्या भावातून या क्रियेकडे पहातो आणि त्यातून फलनिष्पत्तीही तशीच मिळते. काहींचा देवतेच्या सेवेची संधी मिळाली, हा भाव असू शकतो. लहान बाळाचे लाड करतो, तसे देवाला नटवणेे, हाही भाव असू शकतो.

२. देवतेच्या दगडी मूर्तीवर कोरलेल्या वस्त्रांवरच कापडी वस्त्रे नेसवली जातात !

देवतेच्या दगडी मूर्तीवर वस्त्रे कोरलेली असतातच; म्हणजेच कोणत्याही देवतेचे नग्न अवयव स्नान घालतांना दिसत नाहीत. या दगडी वस्त्रांवरच कापडी वस्त्रे घातली जातात. या प्रकारे देवतेच्या मूर्तीला वस्त्र नेसवणे, हा भावाशी निगडीत भाग आहे. त्यामुळे पुरुष देव अथवा देवी यांना आंघोळ घालतांना पुजार्‍यांच्या मनात काय विचार येत असतील, हा विचार लेखकाच्या मनातील लैंगिक विकृती दर्शवतो. यातून लेखकावर लहानपणापासून धार्मिक संस्कार काहीच झालेले नाहीत, हेही स्पष्ट दिसून येते. त्यांचे आई-वडील नास्तिक आहेत, असे वादाकरिता गृहित धरले, तरी शेजार्‍यांच्या घरी किंवा सार्वजनिक नवरात्रोत्सवात त्यांना वस्त्र नेसवण्याचा सोहळा पहाण्याची संधी कधीही मिळाली नाही, असे दिसते. सार्वजनिक नवरात्रोत्सवात जी देवीची मूर्ती आणतात, ती शाडूची अथवा प्लास्टर ऑफ पॅरिसची असली आणि त्यात वस्त्र अंतर्भूत असले, तरी कापडी वस्त्र देवीला नेसवून या नऊ रात्रींच्या वस्त्रांचा (साड्यांचा) लिलाव करण्याची पद्धत आहे. देवीने नेसलेली साडी शुभ असते, देवीच्या मूर्तीतील सात्त्विकता त्यात आलेली असते, अशी यामागे श्रद्धा आहे. हादेखील भावाचाच एक भाग आहे. असाच भाव मंदिरांतील मूर्तीच्या संदर्भातही असतो; म्हणूनच अनेक भक्त देवीला साडी अर्पण केल्यानंतर ती देवीला नेसवून परत प्रसाद म्हणून मिळणे, हे स्वतःचे भाग्य समजतात.

३. आपण स्त्री प्रसूतीतज्ञांनीच गर्भवती महिलांच्या तपासण्या किंवा शस्त्रक्रिया कराव्यात, असे कधी म्हणतो का ?

कित्येक पुरुष रुग्णालयात किंवा घरीही वयस्कर आजारी आईची सर्व सेवा करतात किंवा मुली आजारी वडिलांची सेवा करतात. त्या वेळी त्यांच्या मनात जसा भाव असतो तसाच पुजार्‍यांचाही असतो. गर्भवती महिलांच्या संदर्भात गर्भ धरला आहे का ? इथपासून ते बाळाला जन्म देईपर्यंत अनेक ठिकाणी पुरुष प्रसूतीतज्ञ सर्व वैद्यकीय तपासण्या आणि उपचार करतात. त्या वेळी आपण स्त्री प्रसूतीतज्ञांनीच गर्भवती महिलांच्या तपासण्या आणि शस्त्रक्रिया कराव्यात, असे कधी म्हणतो का ? त्या परिस्थितीत जसा पुरुष प्रसूतीतज्ञाच्या किंवा त्याच्याकडे जाणार्‍या महिलेच्या मनात कोणताही वाईट विचार किंवा संकोच नसतो, तसाच पुजार्‍याच्याही मनात नसतो.

४. प्रत्येक गोष्टीकडे भोगवस्तू म्हणून पहाणार्‍या पाश्‍चात्त्यांप्रमाणे धर्मद्रोही लेखकाची विकृत मनोवृत्ती !

देव आणि देवी यांची मूर्तीपूजा हा सगुण भक्तीचा भाग आहे. देवाकडे कधी माता-पित्याप्रमाणे, तर कधी बंधू-सखा म्हणून पाहिले जाते; मात्र तो सर्वशक्तीमान आणि सर्वोच्च आहे, हे भक्ताला मनोमन मान्य असते. त्यामुळे देव असो अथवा देवी, भक्ताच्या मनात लैंगिक विचार येऊच शकत नाहीत. या लेखकासारख्या विकृत व्यक्तीच्या मनात मात्र तो येऊ शकतो. हा पाश्‍चात्त्य विचारसरणीचा प्रभाव आहे. पाश्‍चात्त्य देशांत तर लैंगिकतेने एवढेे थैमान घातले आहे की, कुत्रा, घोडा यांसारख्या जनावरांशी संभोग दर्शवणार्‍या चित्रफितींना लाखोंच्या संख्येने तेथे मागणी येते. भारतात गायीला माता मानणे, दत्ताच्या देवळात वावरणार्‍या कुत्र्यांना प्रेमाने घास खाऊ घालणे, वानरसेनेचे स्मरण ठेवून माकडांची हत्या न करणे, यांसारख्या श्रद्धा आहेत. परदेशात या सर्वांचे मांसही खाल्ले जाते आणि काही विकृत मंडळी या प्राण्यांकडेही संभोगवस्तू म्हणून पहातात. लेखकाची मनोवृत्ती याच स्वरूपाची आहे. देवतांकडे ते या दृष्टीकोनातून पहात असल्यास प्रत्यक्ष जीवनात त्यांचे वर्तन कसे असेल, याची कल्पनाच न केलेली बरी.

५. धर्मद्रोही लेखकाच्या मनात येणारे विकृत विचार, हे मानसशास्त्राच्याही पलीकडचे !

दुपारी आणि रात्री देव झोपतात, त्यांच्या प्रसादाची आणि आंघोळीची वेळ असते, या संंबंधी सर्वसामान्य जीवनात पाळतो, तसेच शिष्टाचार पाळावेत, असे कित्येक धार्मिक संकेत परंपरेने चालत आले आहेत. देवाची मिरवणूक काढतांना देव सोबत चालले आहेत, अशी भावना असते. श्री गणेशमूर्तीचे पाण्यात विसर्जन करतांना देवतत्त्व चिरंतन असल्यामुळे श्री गणेशाला बुडवून ठार केले, यासारखे विकृत विचार भक्त करत नाहीत. देवाला नमस्कार करतांना जणू देव प्रत्यक्ष उपस्थित आहे, असे मानून भक्त त्याच्याशी संवाद साधतो. एखाद्याच्या शयनगृहात देवाची प्रतिमा आहे आणि तो रात्री पत्नीसोबत शयनगृहात असतांना देवाची प्रतिमा बाहेर काढून टाकावी; कारण तो पहात आहे, असा त्याच्या मनात विचार येत नाही. देव सर्वच पहातो आणि त्याच्यापासून काय लपवायचे ?, अशी श्रद्धा असते. त्यामुळे देवाच्या बाबतीत द्वैत आणि अद्वैत असा संघर्ष कधी होत नाही. उलट या दोहोंचा सुरेख संगम होतो. लेखकासारख्या विकृत व्यक्तींनाच अशा प्रकारचे संघर्षात्मक विचार सुचतात. या विकृतीला उत्तर नाही. हे मानसशास्त्राच्याही पलीकडचे आहे.

६. लेखकाची विचारधारा वितंडवाद घालून विकृत समाधान मिळवण्याची !

अशा विषयांना कायदेशीर पठडीत बसवणेही कठीण असते, उदा. कायद्यानुसार १६ वर्षांखालील युवतीशी तिच्या संमतीने शरीरसंबंध ठेवले, तरी त्यास बलात्कार मानले जाते; परंतु संमतीसाठी वयोमर्यादा कशाला ? रजोधारणा झाल्यानंतर सगळ्याच स्त्रियांना असे अधिकार दिले पाहिजेत, असे काही विकृत लोकांचे म्हणणे असते. लेखकाची विचारधाराही याच प्रकारे वितंडवाद घालून विकृत समाधान मिळवण्याची दिसते.

– अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई.