पराक्रमी, धैर्यशील ‘स्वातंत्र्यप्रेमी विरांगना अवंतीबाई लोधी

1402034198_Avantibai_new

सारणी

१. ‘स्वातंत्र्यप्रेमी विरांगना अवंतीबाई लोधी यांचा जन्म आणि बालपण
२. शौर्यमूर्ती राणी अवंतीबाईने राज्याची धुरा सांभाळून स्वतःच्या साहस, धैर्य आणि प्रसंगावधान या सुयोग्यतेचा परिचय करून देणे
३. प्रतिकूल काळातही आपल्या गुणांमुळे परिस्थितीवर राणी अवंतीबाईने यशस्वीपणे मात करणे
४. पतीनिधनानंतरही प्रजेचे मन जिंकून आपले राज्य अधिकाधिक विस्तृत करणारी कर्तव्यनिष्ठ स्त्री
५. स्वतःप्रमाणे सभोवतालच्या जहागिरदार आणि संस्थानिकांना सजग करून प्रेरणा देणारी धैर्यशील राणी
६. राणी अवंतीबाईने क्रांतीचे नेतृत्त्व समर्थपणे स्वीकारून आपल्या गुणांमुळे लोकप्रियता मिळवणे
७. आपल्या तलवारीने शौर्याची पराकाष्ठा करणार्‍या राणीवर तिच्याच सैन्यातील एका फितुराने तलवारीचा घाव मागून घालून तिला यमसदनी पाठवणे


१. ‘स्वातंत्र्यप्रेमी विरांगना अवंतीबाई लोधी यांचा जन्म आणि बालपण

अवंतीबाई लोधी एक पराक्रमी, धैर्यशील आणि प्रसंगावधानी स्त्री होती. मध्यप्रदेशामधील सिवनी या जिल्ह्यात राव जुंझारुसिंह यांच्या राजमहालात या अवंतीबार्इंचा जन्म १६ ऑगस्ट १८३१ या दिवशी झाला. तिचे नाव मोहिनी ठेवण्यात आले. बालपणापासूनच तिला अश्वसंचालन, खड्गसंचालन, तिरंदाजी (धनुर्विद्या), सैनिकी शिक्षण इत्यादी शूरवीरतेला आवश्यक अशा सर्वच विद्यांची अतिशय आवड होती.

२. शौर्यमूर्ती राणी अवंतीबाईने राज्याची धुरा सांभाळून स्वतःच्या साहस, धैर्य आणि प्रसंगावधान या सुयोग्यतेचा परिचय करून देणे

वयाच्या १७ व्या वर्षी मोहिनीचा विवाह रायगडचे महाराजा लक्ष्मणसिंह यांचे सुपुत्र वुँâवर विक्रमादित्य यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांचे नाव अवंती ठेवण्यात आले. महाराजा लक्ष्मणसिंहांच्या निधनानंतर विक्रमादित्य रायगडचे राजा झाले. विक्रमादित्य ईश्वरभक्त, धार्मिक प्रवृत्तीचे आणि वेदपठण करणारे होते. पुढे अवंतीबार्इंनी अमानसिंह आणि शेरसिंह या दोन सुंदर आणि गोंडस मुलांना जन्म दिला. काही वर्षांनंतर राजा विक्रमादित्य अस्वस्थ राहू लागले आणि त्यातच त्यांचे मानसिक संतुलनसुद्धा बिघडले. अशा परिस्थितीत शौर्यमूर्ती राणी अवंतीबाईने राज्याची धुरा सांभाळून स्वतःच्या साहस, धैर्य आणि प्रसंगावधान या सुयोग्यतेचा परिचय करून दिला.

३. प्रतिकूल काळातही आपल्या गुणांमुळे परिस्थितीवर राणी अवंतीबाईने यशस्वीपणे मात करणे

याच वेळी १८५१ ला इंग्रजांच्या इस्ट इंडिया कंपनीने राजा विक्रमादित्यसिंहाना वेडा घोषित करून, तिथे स्वतःचे एक सैन्यदल ठेवून, रायगडचे राज्य बळकावण्याचा मानस ठरवला. कंपनी सरकारचा तो कावा लक्षात येताच, तशाही स्थितीत राणी अवंतीबाईने निर्भीडपणे, प्रसंगावधान राखून आपल्या शारीरिक अन् मानसिक रुग्णाईत (आजारी) पतीला आणि अल्पवयीन उत्तराधिकारी पुत्राला हाताशी धरले. रायगड शासनाची धुरा सुयोग्यरीत्या व्यवस्थित सांभाळले आणि मोठ्या कुशलतेने शासन चालू ठेवून इंग्रज शासनाच्या राज्य बळकावण्याच्या हेतूला छेद दिला.

४. पतीनिधनानंतरही प्रजेचे मन जिंकून आपले राज्य अधिकाधिक विस्तृत करणारी कर्तव्यनिष्ठ स्त्री

१८५७ च्या मे मध्ये राजा विक्रमादित्यांचे निधन झाले; पण पतीनिधनाच्या दुःखाने विचलित न होता, न गोंधळता, धैर्याने या राणीने संपूर्ण राज्याचा दौरा केला. जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन, प्रजेचे मन जिंकून तिने आपले रायगडचे राज्य अधिकाधिक विस्तृत केले. तिच्या त्या राज्यांचे क्षेत्रफळ ४००० वर्गमीटर होते. त्यामध्ये मंडळा, हिंडोर, सोहागपूर, अमरकंटक इत्यादी जिल्हे आणि अन्य भूभाग होते. पुढे नानासाहेब पेशव्यांच्या नेतृत्वाखाली छेडल्या गेलेल्या स्वातंत्र्यसंग्रामांत ज्या धैर्य आणि चातुर्य या गुणांनी आपले विस्तृत राज्य कंपनी सरकारच्या हातात न जाऊ देता कसे सांभाळून राखले, याविषयी तिचे गौरव-गुण गाताना इंग्रज सेनापती (कप्तान) वॉडिंगटन म्हणतो, ‘१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात रायगडचे राज्य तिने इतके सुरक्षित ठेवले की, अनेक मास त्या भोवती सैनिक वेढा टाकूनही आम्हाला ते जिंकता आले नाही.’

५. स्वतःप्रमाणे सभोवतालच्या जहागिरदार आणि संस्थानिकांना सजग करून प्रेरणा देणारी धैर्यशील राणी

राणी अवंतीबाई हे जाणून होती की, आज नाही तर उद्या हे इंग्रज कंपनी सरकार आपल्याच समाजातील देशद्रोही फितुरांच्या साहाय्याने आपल्याला देशोधडीला लावून वा आपले प्राण घेऊन आपले राज्य बळकावून बसतील. असे होऊ नये; म्हणून प्रयत्नशील रहायलाच हवे, हे जाणून तिने आपल्या राज्याच्या सभोवतालच्या राजभूमी अधिकार्‍यांना (जहागिरदारांना), लहान-मोठ्या संस्थानिकांना स्वहस्ते पत्र आणि बांगड्या पाठवून स्वातंत्र्याप्रित्यर्थ सजग रहाण्याचा संदेश दिला. यापाठी उद्देश हा होता की, स्वातंत्र्य सतत टिकून रहावे, अशी इच्छा नसेल, तर या बांगड्या हातात घालून या इंग्रज शासनाचे दास्यत्व स्वीकार करा !

६. राणी अवंतीबाईने क्रांतीचे नेतृत्त्व समर्थपणे स्वीकारून आपल्या गुणांमुळे लोकप्रियता मिळवणे

योजनेनुसार इंग्रजांविरूद्ध स्वातंत्र्यसंग्राम छेडला गेला होता आणि तो यशस्वीही होत होता; पण ‘कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ’ या म्हणीप्रमाणे काही शिंदे, होळकर यांसारखे भारतीय संस्थानाधिपतीच ज्या वेळी इंग्रजांना जाऊन मिळाले, त्या वेळी या यशस्वी स्वातंत्र्यसंग्रामाला खीळ बसू लागली. यशाच्या वजनाने इंग्रजांचे पारडे जड होऊ लागले; पण राणी अवंतीबाई हताश झाली नाही. तिने आपल्या राज्यातून इंग्रजांनी नेमलेले ‘कोर्ट ऑफ वार्डस्’च्या अधिकार्‍यांना हाकलून लावले आणि आपल्या राज्याच्या सुरक्षिततेचे उत्तरदायित्व स्वतःकडे घेऊन क्रांतीचेही नेतृत्व स्वीकारले. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी आजूबाजूच्या सर्वच क्षेत्रात स्वातंत्र्यास्तव ती लोकांना प्रेरित करू लागली. स्वतःच्या प्राणांचीही तिने पर्वा केली नाही. तिच्या संरक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देण्यासही लोक तत्पर रहात होते, इतकी तिची लोकप्रियता वाढू लागली.

७. आपल्या तलवारीने शौर्याची पराकाष्ठा करणार्‍या राणीवर तिच्याच सैन्यातील एका फितुराने तलवारीचा घाव मागून घालून तिला यमसदनी पाठवणे

त्या वेळेस त्या क्षेत्रातील नेतृत्व जबलपूरच्या ५२ व्या पलटनीचे अधिकारी कॅप्टन वॉडिंग्टन यांच्याकडे होते. इंग्रज सेना आणि स्वातंत्र्यप्रिय क्रांतीकारकांमध्ये मंडळा या क्षेत्राजवळ, खैरी गावाच्या निकट बेधुंद युद्ध चालू झाले. राणी अवंतीबाईच्या क्रांतीकारी सेनेच्या जोशासमोर इंग्रज पराभूतच होत चालले होते. रणक्षेत्र सोडून वाडिंग्टन २३ नोव्हेंबर १८५७ ला पळून गेला होता; पण तो दिवा नरेशाचे साहाय्य आणि विपुल सैन्य घेऊन परत आला. राणी त्याच्यावर चालून गेली. घनघोर युद्ध झाले. शत्रुला नामोहरण करण्यासाठी तोफखाना विखुरला गेला, बंदुकी निस्तेज झाल्या आणि तलवारी तळपू लागल्या. राणी अवंतीबाई तलवारीनिशी वॉडिंग्टनवर तुटून पडली; पण तिच्याच सैन्यातील एका फितुराने तिच्यावर मागून तलवारीचा घाव घातला. स्वातंत्र्यास्तव स्वकर्तव्य पार पाडीत असतांनाच, त्या रणांगणी तिला यमसदनी पाठवले. या देशाचे स्वातंत्र्य अशाच फितुरांनी घालविले आहे, हे कधीही विसरणे शक्य नाही. भारतीय शौर्यमय इतिहास अशाच देशद्रोही फितुरांनी नासवला, तर देशप्रेमी, स्वातंंत्र्यवीर अशा क्रांतीवीरांनी, क्रांतीदेवी अवंतीबाई सम नारींनी तो ‘यावश्चंद्र दिवाकरौ’ उजळवीत ठेवला.’

– श्री वसंत अण्णाजी वैद्य, नागपूर (संदर्भ : मासिक ललना, ऑगस्ट २०१०)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात